भारतात ८०० ते १५०० वर्षापूर्वी अनेक राज्यकर्ते असे होऊन गेले ज्यांनी ह्या समृद्ध भारताच स्वप्न बघितलं आणि त्याला मूर्त रूप दिलं.
आपल्या राज्याचा विस्तार करताना त्यांनी नुसतं जमीन आणि आपला प्रांत वाढवला नाही तर आपल्या संस्कृती, कला आणि त्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांना ही योग्य दर्जा दिला.
ह्याची अनेक उदाहरणे आपल्याला आजही भारतात बघायला मिळतात. साधारण १००० ते १३५० शतकापर्यंत जोवर भारतात परकीय आक्रमण झाली नव्हती तेव्हा ह्या संस्कृतीचे दाखले आणि तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ठ निर्मितीचे पुरावे असणाऱ्या जवळपास १५०० मंदिरांची निर्मिती भारतात झाली.
ह्यातील प्रत्येक मंदिर हे शक्तीपीठ अथवा श्रद्धेच स्थान असलं तरी त्यामागे त्याकाळी अवगत असलेल्या तंत्रज्ञानाचा, कलेचा एक सर्वोत्तम अविष्कार होता.
ही सगळीच मंदिरं काळाच्या कसोटीवर टिकून उभी राहतील व येणाऱ्या अनेक पिढ्यांना आपल्या भव्यतेचं रूप दाखवतील अशी बनवली गेली.
आपल्या राज्यावर परकीय कोणीतरी आक्रमण करून आपल्या भव्यतेची ही प्रतिकं आणि संस्कृतीला नष्ट करतील हा विचार करण्यास त्यावेळचे राज्यकर्ते कमी पडले.
अन्यथा अश्या सर्वोच्च तंत्रज्ञानाची निर्मिती करणाऱ्या राज्यकर्त्यांना अश्या आक्रमणांना थोपवणे सहज शक्य होते.
आजही अनेकदा परीकीय आक्रमणातून वाताहत होऊनसुद्धा ह्या मंदिरांच सौंदर्य, त्याचं विज्ञान, त्याचं तंत्रज्ञान २१ व्या शतकात सुद्धा आपल्याला अनेकदा स्तिमित करते.
कारण सगळं लुटून नेलं तरी भव्यतेची ही प्रतिक आजही भारतात शाबूत आहेत. आपलं दुर्दैव असं की आज आपण त्यांना त्या दृष्टीकोनातून समजून घेण्यास कुठेतरी कमी पडत आहोत.
कर्नाटकच्या बेल्लूर इकडे असलेलं चेन्नाकेशवा मंदिर हे अश्याच एका तंत्रज्ञानाच्या परिपूर्णतेचं प्रतिक आहे. राजा विष्णूवर्धना ने १११७ ह्या वर्षात ह्या मंदिराची निर्मिती सुरु केली.
तब्बल ३ पिढ्यांच्या अथक परिश्रमानंतर १०३ वर्ष निर्मिती सुरु राहिल्यावर हे मंदिर पूर्ण झालं.
हिंदू धर्मातील विष्णू ह्या देवावर आधारित असलेलं हे मंदिर म्हणजे कलेचा एक सर्वोच्च अविष्कार आहे. १४ व्या शतकात अल्लाउद्दिन खलजीच्या सेनापती मालिक काफुर ने ह्या मंदिराला लुटलं.
ह्या मंदिराची मोडतोड केली. इथली संस्कृती, तंत्रज्ञान सगळं नष्ट केलं पण विज्ञानाची कास धरून भव्यदिव्य निर्मिती असणाऱ्या ह्या मंदिराला तो किंवा त्या नंतर लुटणारे अनेक परीकीय शासक पूर्णतः नष्ट करू शकले नाहीत.
चेन्नाकेशवा मंदिराची काही वैशिष्ठय अशी आहेत की ज्याच्या निर्मिती मागचं विज्ञान, तंत्रज्ञान आजही आपल्याला त्या प्रगत संस्कृतीची साक्ष देते.
चेन्नाकेशवा मंदिर अनेक सुंदर शिल्पांनी नटलेल आहे. ह्या मध्ये पुराणातील अनेक गोष्टी शिल्पांच्या स्वरूपात कोरलेल्या आहेत.
ह्या शिवाय आधी इकडे ४० मंदाकिनी ची अति सुंदर शिल्प अस्तित्वात होती. त्यापेकी सध्या ३८ आजही अस्तित्वात आहेत. त्यावरील कला कुसर म्हणजेच शिल्प तंत्रज्ञानाचा अदभूत नमुना आहेत.
ह्या मंदिरातील खांब हे खूप सुंदर असून ते बनवताना त्यात काळाच्या पुढच्या तंत्रज्ञानाचा आणि अभियांत्रिकीचा वापर केला गेला.
ह्या मंदिरातील नवरंग हॉल हा ४८ खांबांनी तोललेला आहे. ह्यातील मध्यभागातील ४ खांब सोडले तर बाकीचे सगळे एकाच पद्धतीने टर्निंग केलेले आहेत. टर्निंग हा प्रकार ८००-९०० वर्षापूर्वी भारतीय कारागिरांनी आत्मसात केला होता.
टर्निंग ह्या प्रकारात वस्तूला गोलाकार फिरवून त्याला त्याच्यापेक्षा कठीण असणाऱ्या वस्तूने कापून त्यावर वेगवेगळ्या आकाराच काम केलं जाते. हे पूर्ण झाल्यावर वस्तूवर गोलाकार असणाऱ्या रेषा आपण स्पष्ट बघू शकतो.
गोल फिरण्यामुळे ह्याची फिनिशिंग ही चांगली आणि कोणत्या टोकाविना होते.
टर्निंग हा प्रकार तसा खूप जुना असला आणि इजिप्त मध्ये लोकांनी लेथ मशीन वापरून टर्निंग केलं असले तरी ते लाकूड होतं.
कित्येक टन वजन असणारा दगड गोलाकार फिरवण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचं तंत्रज्ञान त्यांच्याकडे अस्तित्वात नव्हतं. लाकूड आणि दगड ह्यात जमीन आस्मानाचा फरक आहे.
लाकूड कापणं सोप्प आहे. पण कित्येक टन दगडाला गोलाकार फिरवून त्याला सुपर फिनिश देणं हे तंत्रज्ञाना मधलं पुढचं पाउल आहे. बरं हे सगळ एकदा करायचं नव्हतं तर तब्बल ४८ खांब अश्या पद्धतीने कलाकुसरीचे बनवले गेले आहेत.
जे की सारखे आहेत. म्हणजे हे सगळं निर्माण करायला लागणारी मास प्रोडक्शन ची यंत्रणा ही निर्माण केली गेली.
इतक्या प्रचंड वजनाचे हे खांब कोणत्याही इलेक्ट्रिक उर्जेशिवाय फिरवायचे त्यावर कलाकुसर करायची त्याशिवाय मंदिराच्या छताचं वजन ते पेलवतील ह्याचं गणित आणि पूर्ण मंदिराचा आराखडा, रचना तशी निर्माण करायची हे शिवधनुष्य पेलणं हेच किती प्रचंड आव्हान आहे.
ह्यातील दोन खांब खूप महत्वाचे आहेत. एक खांब ज्याला नरसिंह खांब असे म्हंटल जाते त्यावर खूप कलाकुसर केलेली आहे.
ह्या खांबावरील प्रत्येक मूर्ती अतिशय सुंदर रीतीने कोरलेली आहे.
हा खांब पूर्ण गोलाकार नसून भूमितीय भाषेत पॉलीगॉनल आहे. असे म्हंटल जाते हा खांब हाताने पूर्णतः गोल फिरवता येत होता.
बॉल बेअरिंग प्रमाणे साचा बनवून ह्या खांबाला बसवलं गेलं होतं त्यामुळे धार्मिक कार्यात किंवा विशिष्ठ पूजेच्या दिवशी ह्या खांबाला फिरवले जात असे.
पण सध्या मात्र हा खांब गोलाकार फिरत नाही. इकडे अजून एक खांब आहे ज्याला मोहिनी खांब असे म्हंटल जाते. ह्यावर विष्णूचा स्त्री रूपातील अवतार कोरला आहे.
त्या शिवाय विष्णूचे दहाही अवतार सर्व बाजूने कोरले आहेत. पण ह्यात तंत्रज्ञान वापरलं आहे ते दगड निवडताना. विष्णूची स्त्री वेशातील रचना सोप स्टोन मध्ये घडवली आहे.
त्याकाळी वीज नसताना हे मंदिर पूर्ण दिव्यांनी उजळून निघत असे. आजही ह्या दिव्यांच्या प्रकाशात ह्या विशिष्ठ दगडामुळे विष्णूच्या मूर्तीला वेगळं वलय प्राप्त होतं. ह्या खांबांशिवाय ह्या मंदिराच्या छतावर अतिशय सुंदर रचना कोरलेली आहे.
ह्या मंदिराच्या बाहेर ४२ फुट उंचीचा महास्तंभ आहे. हा स्तंभ एका दगडावर कोणत्याही आधाराशिवाय तब्बल ९०० पेक्षा जास्त वर्ष उन, वारा, पाउस ह्यांना झेलत उभा आहे.
ह्याच्या बेसच्या दगडाचा आकार ताऱ्या प्रमाणे आहे. खरे तर चेन्नाकेशवा मंदिराची रचना ही ताऱ्याच्या आकाराप्रमाणे आहे. त्याचंच प्रतिबिंब ह्या दगडात आहे. हा स्तंभ तीन टोकावर टेकलेला असून एका बाजूने हवेत आहे.
आपल्या प्रचंड वजनामुळे हा स्तंभ इतके वर्ष उभा आहे असे म्हंटल जाते. तर ह्याच्या मागे ही काही तंत्रज्ञान असावं जे अजून तरी आपल्याला माहित झालेलं नाही असं अनेकांचं म्हणणं आहे.
चेन्नाकेशवा मंदिर, त्याचे खांब, त्यांची निर्मिती ह्या शिवाय ते बनवताना वापरलं गेलेलं तंत्रज्ञान हे सगळं काही देवाने दिलेलं नाही तर भारतीय लोकांनी आत्मसात केलेलं होतं.
अनेक पिढ्या ह्यात खर्ची पडल्या तेव्हा कुठे जाऊन ह्या भव्यदिव्य मंदिरांची निर्मिती झाली. आज काळाच्या कसोटीवर अनेक परकीय आक्रमणा नंतर ह्याचं रूप आजही टिकून आहे.
त्या सोबत इथल्या शिल्पांच सौंदर्य आजही आपले मन मोहून टाकते. आपण ह्या सगळ्या मंदिरांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे. देव, देव करून आत्मसात काही होत नाही त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड दिली की आपण ह्या सगळ्या मंदिरांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघायला लागतो.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.