एक होता राजा. त्याची राणी आजारी पडली. राजाच्या नातेवाईकांना वाटलं आता राजानं दुसरं लग्न करावं.
त्यासाठी एक देखणी मुलगी निश्चित करण्यात आली. पंगतीत तिला वाढण्याच्या बहाण्याने पुढं करण्यात आलं.
महाराजांच्या कानावर घालण्यात आलं की या मुलीचा विवाह करायचा आहे.
महाराज म्हणाले “आमच्या राजवाडयात हिचा विवाह होईल आम्ही स्वतः कन्यादान करू”
महाराजांनी दिलेला शब्द पाळला.
ही कथा किंवा नाटक सिनेमातली गोष्ट नाही…. कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यात घडलेला ‘हा’ खराखुरा प्रसंग आहे.
स्वतःच्या प्रजेची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेणारे छत्रपती शाहू महाराज एक आदर्श राजा होते.
छत्रपती शाहू महाराज यांचा रयतेबरोबर थेट संपर्क सातत्याने व्हायचा.
राजेपणाची झूल बाजूला ठेवून शाहू महाराज सहज जनतेत मिसळून जायचे.
त्यातुन कितीतरी गोष्टी, किस्से घडले जे आजही आठवले जातात.
आई आणि नंतर वडिल गमावलेल्या दोन मुलांना वा-यावर न सोडता छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः या भावंडांची जबाबदारी घेतली आणि त्यांना इंजिनिअर केलं.
कोल्हापूरच्या गंगावेशीतल्या बाजारात जवळच्या एका गावातून एक आजी टोपलीभर शेण्या विकायला घेऊन येताना छत्रपती शाहूंना दिसली.
आता ही दिवसभर उन्हात बसणार मग घरी जाणार, त्यात विक्री किती होणार कुणास ठाऊक?
म्हणून शाहू महाराजांनी तिची पुर्ण टोपली खरेदी करून शेण्या गाडीच्या डिकीत ठेवून घेतल्या.
शाहू महाराजांनी तिला दोन रुपये दिले. मात्र शाहू महाराजांना न ओळखलेल्या त्या आजीनं सगळ्या शेण्यांची किंमत ७५ पैसेच होते, मला तेव्हढेच द्या जास्तीची रक्कम ही पाप आहे असा सूर लावला…
छत्रपतीं शाहू महाराजांनी तिच्या मताचा आदर केला, आणि योग्य रक्कम हातात ठेवली.
आठवडा बाजारासाठी आलेल्या भाजीवालीची बस चुकल्यानंतर त्या आजीला गाडीतून तिच्या गावी सोडलं, ती मात्र वडापची गाडी समजून बसली, आपल्याला आपल्या गावापर्यंत सोडणारे शाहू महाराज होते हे त्या आजीला नंतर समजलं आणि तिचा ऊर भरून आला.
शिक्षणासाठी कोल्हापूरात अनेक विद्यार्थी यायचे या विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करणे, वगैरे अडचणी लक्षात आल्यावर अभ्यासासाठी कंदीलांची ताबडतोब व्यवस्था करून शिक्षण कुठल्याही कारणानं थांबू नये म्हणून डोळयात तेल घालून विद्यार्थ्यांना जपणं हे केवळ शाहू महाराजच करु जाणे.
छत्रपती शाहू महाराजांचा प्रत्येक दिवस जनतेच्या कल्याणासाठीच उगवायचा.
या छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ ला कागल मधल्या घाटगे घराण्यात झाला.
त्यांचे मूळ नाव होतं यशवंत,
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ ला यशवंतरावांना दत्तक घेतलं.
यशवंताचं नाव ठेवण्यात आलं ‘शाहू’.
१८८९ ते १८९३ या चार वर्षांत धारवाड इथं शाहू महाराजांचा शिक्षण झालं.
शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ ला बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या मुलीशी लक्ष्मीबाईंशी शाहू महाराज विवाहबद्ध झाले.
२ एप्रिल १८९४ ला छत्रपती शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला.
राजा म्हणून काम पहायला लागल्यावर केवळ जनतेच्या भल्याचाच त्यांनी विचार केला.
छत्रपती शाहू महाराजांनी सर्वच थरात शिक्षणचा प्रसार व्हावा यावर विशेष भर दिला.
कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं.
स्त्री शिक्षणासाठी तर त्यांनी राजाज्ञाच काढली होती.
अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने ही छत्रपती शाहू महाराजांनी प्रचंड काम केलं.
स्वातंत्र्य प्राप्तीपुर्वीच १९१९ ला सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत छत्रपती शाहू महाराजांनी बंद केली.
आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
इतकच नाही तर १९१७ साली छत्रपती शाहू महाराजांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
देवदासी प्रथा कायद्याने बंद केली.
जनतेच्या भल्यासाठी अनेक काळाच्या पुढे असणारे निर्णय त्यांनी घेतले.
लोककल्याणकारी राजा अशीच त्यांची ओळख आजही आहे.
जनतेसाठी त्यांनी उद्योग निर्मिती केली कोल्हापूरच्या शाहू मिलमध्ये (शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल) पहिल्यांदा सूतनिर्मिती आणि नंतर कापड निर्मिती सुरू झाली.
इचलकरंजी, कोल्हापूर, शिरोळ, चिंचली, गडहिंग्लज अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिनिंग फॅक्टरी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केल्या.
शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणं असे असंख्य उपक्रम छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात राबवले.
अष्टावधानी राजा असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले.
आजही शेती प्रधान असणारं कोल्हापूर, छत्रपतीं शाहू महाराजांच्या काळातही शेतीवर अवलंबून होतं.
मात्र शेतीची लहान लहान तुकड्यांत वाटणी झाली होते.
त्याचे रूपांतर मोठ्या शेतीमध्ये व्हावे ही छत्रपती शाहू महाराजांची इच्छा होती.
शेतीमुळे दोन प्रकारे फायदा होतो, एक स्वत:ला सुख मिळतंच, शिवाय संपूर्ण मनुष्य जातीलाही सुख मिळतं. त्यामुळे शेती हा व्यवसाय कमीपणाचा आहे ही समजूत वेडगळपणाची आहे, ‘शेती ही श्रमाची प्रतिष्ठाच आहे’, असं त्यांचं ठाम मत होतं.
नवी अवजारे घेण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.
इतकंच नाही त्यासाठी त्यांनी तज्ज्ञांची प्रात्यक्षिकं आयोजित केली, प्रदर्शनं भरवली.
शेतीला उपयुक्त जनावरांची प्रदर्शनं त्यांनी भरवली.
नवी पिके घेण्याचा प्रयोग ही छत्रपती शाहू महाराजांनी यशस्वीपणे राबविला.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा आणि भुदरगड इथे चहा आणि कॉफी लागवड करण्याचा प्रयोग त्यांनी केला.
याचबरोबर वेलदोडे, कोको, रबर, ताग, बटाटे, लाख, टॅपिओका, कंबोडीयन कापूस, अशा पिकांची लागवड करुन प्रयोगशीलता आणि प्रगतिशीलतेची चुणूक छत्रपती शाहू महाराजांनी दाखवली.
किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची स्थापना त्यांनी केली.
१८९६ ला मोठा दुष्काळ पडला होता. पण अतिशय नियोजनबद्ध काम करत छत्रपती शाहू महाराजांनी राजा म्हणून आपलं काम व्यवस्थित केलं.
छत्रपती स्वत: दुष्काळ ग्रस्त भागात फिरुन. परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
अन्नधान्याची आयात त्यांनी केली.
शेतकऱ्यांना सारामाफी दिली तर त्यांच्या गुराढोरांसाठी वैरणाची व्यवस्था केली.
दुष्काळग्रस्तांसाठी निराधार आश्रमांची सोय केली.
रोजगारासाठी रस्ते, विहिरी, तलावाची कामे सुरू केलीच पण तिथं काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी पाळणाघरे उभी केली.
१२ शाळा आणि २६ वसतीगृह सुरू करून शिक्षणाचा हक्क सर्वांना मिळाला यासाठी त्यांनी प्रचंड धडपड केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी, त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांच्या “मूकनायक” वृत्तपत्रासाठीही छत्रपती शाहू महाराजांनी सहकार्य केले होते.
चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिलं होतं.
समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वं छत्रपती शाहू महाराजांनी १९व्या शतकाच्या सुरवातीलाच करवीर म्हणजे कोल्हापूर संस्थानात अमलात आणली.
बहुजन समाजातील लोकांना स्वतंत्र व्यवसाय जसं की दुकान, हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
त्यासाठी फक्त आर्थिक मदत दिली नाही तर स्वतः काम दिलं.
शिवण यंत्रं देऊन स्वतंत्र व्यवसाय करायला प्रोत्साहन देताना राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेतले.
एका व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचं दुकान काढून दिले, स्वतः तिथं चहा घेतला.
आपल्या चुलत बहिणीचं आंतरजातीय लग्न लावून देऊन ते थांबले नाहीत तर करवीर स्ंस्थानात जवळपास १०० आंतरजातीय विवाह त्यांनी जुळवले.
आरक्षणाचा मुद्दा आज ऐरणीवर असला तरी १०० वर्षापुर्वी त्यांनी सरकारी नोकरीसाठी आरक्षण जाहीर करुन काटेकोर अंमलबजावणी केली होती.
नाईलाजाने गुन्हेगार झालेल्या व्यक्तींचं पुनर्वसन छत्रपती शाहू महाराजांनी केलं.
महिला आणि बहुजन समाजासाठी प्रतिष्ठा मिळवून देण्याचं मोठं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं
संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना कोल्हापूर संस्थानात नेहमीच राजाश्रय आणि प्रोत्साहन मिळालं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा समर्थपणे पेलणारा रयतेचा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज…
सामाजिक बंधुभाव, समता, उपेक्षितांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा आरोग्य या सगळ्याच क्षेत्रामध्ये अफाट स्वरूपाचे काम त्यांनी केलं.
आजही देशभरात ‘महाराजांचे महाराज’ असा त्यांचा गौरव होतो.
शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली, त्यालाही आता १०० वर्षे होऊन गेली.
राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून उभ्या असणा-या आणि कोल्हापूर भुमी सुजलाम सुफलाम करणा-या राधानगरी धरणाचा उल्लेख केला नाही तर छत्रपती शाहू महाराजांचा परिचय अपुरा राहील.
फक्त जमिनीतून पाणी न घेता नद्यांमध्ये असणाऱ्या पाण्याचा प्रभावी वापर करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी धरणाची संकल्पना मांडली.
धरणाची संकल्पना मांडून थांबतील ते छत्रपती शाहू महाराज कसले?
१९०९ मध्ये राधानगरी धरण प्रकल्पाची सुरवात ही झाली.
शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराज यांनी या राधानगरी धरणावर १४ लाख रुपये खर्च केले.
आजही या धरणाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांच्या महत्वाकांक्षेचा आणि दूरदृष्टीचा प्रत्यय येतो.
जलसाक्षरता आणि जलसंधारण क्षेत्रासाठी हे राधानगरी धरण आजही मार्गदर्शक ठरतं.
खरंतर संस्थानाचा आकार, आर्थिक कुवत आणि तंत्रज्ञानाची मर्यादित उपलब्धता असताना सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी हे शिवधनुष्य विचारपुर्वक उचललं आणि यशस्वी रित्या पेललंसुद्धा.
अशा या राजाचं २०२२ हे स्मृतीशताब्दी वर्ष.
६ मे २०२२ ही लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १०० वी पुण्यतिथी.
महाराष्ट्राला वैचारिक वारसा देणा-या, या सुधारक व्यक्तीमत्वाला, छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
छत्रपती शाहू महाराज यांच्या बद्दल अत्यंत सखोल माहिती मिळाली आपले मनःपूर्वक आभार
नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.
मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…
#मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇
व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇
https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE
टेलिग्राम चॅनल👇
https://t.me/manachetalksdotcom
Dhanyavad khup chan mahiti dilit…🙏
नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.
मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…
#मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇
व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇
https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE
टेलिग्राम चॅनल👇
https://t.me/manachetalksdotcom