चिकुनगुनिया हा एक व्हायरल आजार आहे आणि त्याची लक्षणे बरीचशी लक्षणे डेंग्यू सारखी आहेत. हा आजार एडिस जातीचा डास चावल्यामुळे होतो आणि लक्षणे सारखे असल्यामुळे साधा ताप आहे की डेंग्यू की चिकुनगुनिया हे समजणे अवघड होऊन बसते. अशा वेळी रक्त तपासणी करून नक्की निदान करणे अतिशय आवश्यक आहे.
आज आपण चिकनगुनियाची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
चिकुनगुनिया म्हणजे काय?
३९ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त ताप अतिशय अशक्तपणा आणि सांधेदुखी अशी लक्षणे असतील तर चिकुनगुनियाची शक्यता असते. हा ताप दोन दिवस राहतो आणि अचानक कमी देखील होतो. विशिष्ट प्रकारच्या विषाणूमुळे हा आजार पसरतो. वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय ह्या आजाराचे निदान होत नाही. त्यामुळे ताप आल्यावर डॉक्टरांना दाखवणे आवश्यक असते.
चिकुनगुनिया होण्याची कारणे
चिकुनगुनियाने बाधित रुग्णाला चावलेला डास निरोगी माणसाला चावला की दोन ते चार दिवसात निरोगी माणूस देखील चिकुनगुनियाने बाधित होतो. अशा रीतीने डासांमुळे हा आजार पसरतो. बाधित झालेल्या रुग्णाला पहिले दोन दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो.
हा आजार प्राण्यांमध्येही दिसत असला तरीही प्रामुख्याने माणसांना होतो.
चिकुनगुनियाची लक्षणे
चिकनगुनियाचे इन्फेक्शन झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसून येण्यास दोन ते चार दिवस लागतात. ह्या कालावधीत रुग्णाला ताप येणे हे प्रमुख लक्षण आहे. त्याशिवाय खालील प्रकारची लक्षणे दिसून येतात.
१. हात आणि पायांवर चट्टे दिसणे.
२. तीव्र स्वरूपाची सांधेदुखी
३. डोकेदुखी, अंगदुखी आणि थकवा
४. पाठदुखी
५. डोळे दुखणे किंवा डोळे येणे
६. घसा दुखणे किंवा खवखवणे
७. ताप कमी झाला तरी बाकीची लक्षणे काही आठवडे दिसू शकतात.
८. किशोरवयीन मुले आणि वयस्कर व्यक्ती ह्यांना ह्या आजाराचा जास्त धोका असतो.
चिकुनगुनिया पासून बचाव कसा करावा?
चिकुनगुनिया पसरण्याचे प्रमुख कारण डास हे आहे. डासांपासून स्वतःला सुरक्षित ठेवणे हा चिकुनगुनिया पासून बचाव करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.
त्यासाठी झोपताना मच्छरदाणी वापरणे, घरात डासांना मारणारी मशीन वापरणे, अंगाला मॉस्क्यूटो रेपेलंट क्रीम लावणे, घर आणि घराबाहेरील परिसर स्वच्छ ठेवणे, रिकाम्या कुंड्या, भांडी इत्यादींमध्ये पाणी न साठू देणे, बाहेर जाताना संपूर्ण अंग झाकणारे कपडे वापरणे असे उपाय करता येतात.
त्याशिवाय घरात कापूर जाळणे, अंगणात अथवा खिडकीत तुळशीचे रोप लावणे हे उपाय देखील फायदेशीर ठरतात.
भरपूर प्रमाणात पाणी पिऊन शरीर नेहमी हायड्रेटेड ठेवावे.
चिकुनगुनिया झाला असता आहार कसा असावा?
१. दररोज नारळ पाणी पिणे.
२. हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाणे.
३. दररोज भाज्यांचे सूप पिणे.
४. भरपूर फळे खाणे. प्रामुख्याने केळी व सफरचंद खाणे.
५. विटामिन सी आणि विटामिन ई युक्त आहार घेणे. यामध्ये प्रामुख्याने संत्री, मोसंबी, लिंबू आणि अक्रोड, बदाम ह्यांचा समावेश होतो.
६. भरपूर प्रमाणात पाणी पिणे.
७. मांसाहाराचे प्रमाण कमी ठेवणे.
चिकुनगुनिया वरचे घरगुती उपाय
दवाखान्यात न जाता शक्यतो घरगुती उपायांनी बरे वाटावे ह्याकडे लोकांचा कल असतो. चिकुनगुनिया वर खालील घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.
१. भरपूर पाणी पिणे
चिकुनगुनिया मध्ये ताप आल्यामुळे डीहायड्रेशन होऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशावेळी रुग्णाने भरपूर पाणी प्यायले पाहिजे.
२. डेअरी प्रोडक्टस्
दूध, दही, तूप, पनीर अशाप्रकारच्या डेअरी प्रॉडक्टचे सेवन चिकुनगुनियाच्या रुग्णाने करावे. त्यामुळे पोषक तत्वे मिळून आजार आटोक्यात येण्यास मदत होते.
३. ओवा
गरम पाण्याबरोबर ओवा घेण्याने अंगदुखी कमी होण्यास मदत होते.
४. दूध हळद
गरम दुधात हळद मिसळून दररोज रात्री पिण्याने चिकुनगुनियाचा आजार आटोक्यात येण्यास मदत होते.
५. शेवग्याच्या शेंगा
शेवग्याच्या शेंगांचे सेवन फायद्याचे ठरते. त्याचे सूप बनवून पिणे फारच उपयोगी ठरते. शेवग्याचा पाला सुद्धा चिकुनगुनिया साठी गुणकारी आहे.
६. तुळस
तुळशीच्या पानांचा काढा करून पिणे घसादुखी तसेच तापावर गुणकारी आहे.
७. गुळवेल
गुळवेलीच्या पानांचा काढा अथवा एक ग्रॅम गुळवेल कॅप्सूल घेणे गुणकारी आहे.
८. पपईच्या पानांचा रस
पपईच्या पानांचा वाटून रस काढावा दर दोन तासाने तीन चमचे रस घेतल्यास शरीरातील प्लेटलेट्स भरपूर प्रमाणात वाढून चिकुनगुनिया चा परिणाम कमी होतो.
९. लसूण
चिकुनगुनियामुळे होणाऱ्या सांधेदुखीवर लसूण गुणकारी आहे. दहा-बारा लसणाच्या पाकळ्या वाटून त्याची पाणी घालून पेस्ट करून घ्या. ही पेस्ट दुखणार्या सांध्यांना लावून ठेवा. दोन ते तीन तासांनी देऊन टाका. बराच फरक पडतो.
१०. मध आणि लिंबू
एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस कोमट पाण्यातून घेण्यामुळे फायदा होतो. ह्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
११. भाज्यांचे सूप
विविध भाज्या तसेच टोमॅटो वापरून सूप बनवून ते पिणे चिकुनगुनिया मध्ये गुणकारी आहे.
१२. ओमेगा थ्री फॅटी ॲसिड
डाळी, आळशीच्या बिया आणि अक्रोड ह्यांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणात असते. त्यांचे नियमित सेवन करावे.
१३. केळ
केळ्यामध्ये स्टार्च आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. साखर मात्र कमी असते. केळ खाल्ल्यामुळे पचन सुधारते.
१४. गाजर
कच्चे गाजर नियमित खाल्ल्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते.
१५. नारळ पाणी
चिकनगुनिया झाला असता दररोज २ वेळा नारळ पाणी पिणे फायद्याचे ठरते. त्यामुळे डीहायड्रेशन कमी होऊन शरीराला पोषण मिळते.
१६. आईस पॅक
ताप उतरल्यानंतर चिकुनगुनियामुळे होणाऱ्या अंगदुखीवर आईस पॅकने म्हणजेच बर्फाने शेकणे फायद्याचे ठरते. हा उपाय तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.
तर हे आहेत चिकुनगुनिया झाल्यावर करण्याचे घरगुती उपाय. हे उपाय नियमित केल्यामुळे चिकूनगुनिया बरा होण्यास निश्चित मदत होते. परंतु आठवडाभर सलग घरगुती उपाय करूनही फरक पडत नसेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
तसेच आलेला ताप नक्की कोणत्या प्रकारचा आहे हे ठरवण्यासाठी देखील डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या लेखात दिलेल्या माहितीचा जरूर लाभ घ्या. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.