घरातील लाईट्सचा आपल्या मन:स्थितीशी खूप जवळचा संबंध असतो. स्वच्छ उजेड असलेल्या ठिकाणी मन आनंदी होतं तर काळोख्या, अपुऱ्या उजेडात मन उदास होतं.
आळस येतो आणि नकारात्मक विचार येतात. म्हणून घरातील लाईट्स योग्य प्रकारे लावले पाहिजेत. या लेखातून आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत घरातील लॅंप्स व लायटिंग विषयी उपयुक्त अशी माहिती.
लाईटचा आपल्या आरोग्याशी व मानसिक अवस्थेशी काय संबंध आहे?
शरीरशास्त्राच्या दृष्टीकोनातून हा संबंध समजून घेऊया. आपल्या डोळ्यावर कोणताही प्रकाश पडतो तेव्हा डोळ्यातील लाईट रिसेप्टर द्वारे तो मेंदूपर्यंत पाठवला जातो.
मेंदू आपल्या शरीरावर प्रकाशाचा परिणाम कसा होईल हे ठरवत असतो. मेंदू द्वारे जे हार्मोन्स रिलीज होतात त्यानुसार तुमचा मूड कसा असेल हे ठरते.
आपले शरीर हे सूर्योदय ते सूर्यास्त ठराविक पद्धतीने काम करते. याला बॉडी क्लॉक किंवा बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात. प्रकाशाचा सुद्धा शारीरिक व मानसिक अवस्थेशी संबंध येतो तो ह्याच कारणामुळे.
म्हणून लख्ख प्रकाशात अथवा सकाळच्या वेळी आपल्याला उत्साही वाटते. जसजसा काळोख होऊन रात्र होईल तसतशी काम करण्याची एनर्जी कमी होते व झोप येते.
याचे कारण मेंदू मधील हार्मोन्स मधे दडलेले आहे.
जसे बाहेरच्या वातावरणात उजेडामुळे फरक पडतो तसाच शरीरातही बदल होतो. मानसिक स्थिती सुध्दा बदलते. ज्या ठिकाणी दिवसा खिडकीतून भरपूर सूर्यप्रकाश येतो अशा घरात आनंदी वाटते.
पूर्व पश्चिम दिशेच्या घरांमध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात येतो. वास्तुशास्त्रातही पूर्वाभिमुख घराला महत्त्व दिलेले आहे.
याचप्रमाणे आपण घरात जे कृत्रिम लाईट लावतो त्याचा आपल्या मूडवर, कार्यक्षमतेवर खूप परिणाम होतो.
घरातील प्रकाशयोजना करताना कोणती काळजी घ्यावी?
१. पुरेसा उजेड मिळेल याची दक्षता घ्यावी.
विशेषतः घरातील कोपरे किंवा काळोख्या जागी योग्य प्रमाणात उजेड मिळेल असे पहावे. ज्याप्रमाणे अगदी मंद प्रकाशात उदास वाटते, तसेच अती प्रखर उजेडामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
म्हणून अतिरेक न करता दिवसा तसेच रात्री पुरेसा प्रकाश मिळेल अशी लाइट्स ची रचना असावी. ही तीन प्रकारे करू शकतो.
तीन प्रकारची प्रकाशयोजना
१. सर्वसाधारण रोजच्या वापरासाठी लावलेल्या लाईट्स.
यात पावसाळ्यात किंवा दिवसा अंधार पडला तरीही आपली रोजची कामे न अडखळता करता यावीत अशी योजना असते. यात बल्ब, सिलिंग लॅंप्स, स्टॅंडिंग लॅंप्स यांचा समावेश होतो.
२. विशेष उद्देशाने लावलेल्या लाइट्स
घरात काही विशिष्ट ठिकाणी स्पेशल प्रकाशयोजना किंवा ती जागा हायलाइट करण्यासाठी लावलेले मिरर लॅंप्स, डेस्क जवळील दिवे, किचनमधील एखाद्या भागात जास्त लाईटची गरज असते, त्यादृष्टीने बसवलेला दिवा किंवा रिडींग लाइट्स.
३. मूड सुधारण्यासाठी केलेली विशेष प्रकाशयोजना.
यात वेगवेगळे कॅंडल लॅंप्स, सौंदर्य वाढविण्यासाठी लॅंप्स, झुंबर यांचा समावेश होतो. शांत व प्रसन्न वाटावे म्हणून अशी लायटिंग केली जाते.
हे करण्यापूर्वी व्यवस्थित प्लानिंग करणे गरजेचे आहे. यासाठी घरी किंवा ऑफिसमध्ये तुम्ही कोणती जागा कशाप्रकारच्या कामासाठी वापरणार आहात हे लक्षात घेतले पाहिजे.
उदा. किचनमध्ये भाज्या वगैरे चिरण्याचा जो प्लॅटफॉर्म असतो त्या ठिकाणी छान उजेड नसेल तर अपुऱ्या प्रकाशात हात कापणे असा प्रकार होऊ शकतो.
त्याचप्रमाणे मुलांचे स्टडी टेबल, बेडरूममध्ये रिडिंग लॅंप्स, ऑफीसमधील वर्क डेस्क, क्युबिकल किंवा आपल्या घरातील डायनिंग टेबल या प्रत्येक ठिकाणी प्रकाशाची गरज वेगवेगळी असते.
त्यानुसार दिव्यांची निवड करावी. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी योग्य तिथे स्विचेसची रचना करावी. यात काही स्विचेस अधीकचे लावून घ्यावेत म्हणजे भविष्यात गरज लागली तर आपण अधिक दिव्यांची रचना करू शकतो.
आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये जागा किती लहान, मोठी आहे ते पाहून त्याप्रमाणे लाईटचा डिझाईन प्लॅन बनवावा.
विजेची बचत करण्यासाठी आपण LED लाईट वापरतो. पण यातही तीव्र आणि मंद असे प्रकार आहेत. यातील विविध कलरशेड्स आपल्या मूडशी संबंधित आहेत. कोझी शेड्स
उदा. पिवळसर, दुधी शेड आपला मूड फ्रेश ठेवतात. भगभगीत किंवा तीव्र पांढरा रंग डोकेदुखी, अस्वस्थ वाटणे यासारखे त्रास निर्माण करतो.
पांढऱ्या रंगाच्या सुद्धा विविध छटा आहेत. तरुण लोकांना व वृद्ध व्यक्तींना यातील कूल व्हाईट व कोझी व्हाईट हे अनुक्रमे जास्त सूट होतात.
याचप्रमाणे स्त्री व पुरुष यांच्यावर कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्सचा वेगवेगळा परिणाम दिसून येतो. यावरून आपल्याला समजेल की लाईट डिझाईन प्लॅन बनविताना किती बारकाईने विचार करावा लागतो.
जगभरात कोणत्या प्रकारची प्रकाशयोजना आपल्या शरीरावर आणि मानसिक स्वास्थ्यावर कशी परिणाम करते यावर संशोधन केले जात आहे. रंगांचा आणि आपल्या मूडचा जवळचा संबंध असतो. प्रकाशयोजनेतून तो अधिक चांगल्या प्रकारे जपता येतो.
योग्य काळजी घेऊन केलेल्या लाइट्सच्या रंगसंगती आणि रचना यामुळे प्रॉडक्टिव्हिटी वाढते.
वातावरण प्रसन्न व आनंदी रहाते.
कोझी लाईट म्हणजे मनाला सुखावणारा, सुरक्षित, ज्याच्याकडे पाहून आश्वासक वाटते असा प्रकाश.
आपल्या संस्कृतीत निरांजन अथवा समईचा प्रकाश असा मन प्रसन्न करणारा आहे. दिवाळीत पणत्या उजळल्या नंतर त्या मंद उबदार प्रकाशात छान वाटते कारण आपला मूड सुधारतो.
याचप्रमाणे बेडरूममध्ये मंद बेड लॅंपमुळे शांत झोप लागते. लाईटचे रंग, शेडस् हे केल्विन स्कोअर नुसार मोजतात. रंगांचा स्पेक्ट्रम मोजण्यासाठी हे परिमाण वापरतात.
लाईटिंग शास्त्रशुद्ध पद्धतीने केले तर नक्कीच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपले जाते. लाईट्स बाबतची ही माहिती नीट समजून घेऊन तुम्ही घरातील किंवा ऑफिसच्या ठिकाणी जागेचे सौंदर्य वाढवू शकता. त्याचबरोबर योग्य रंगाचे लॅंप्स निवडून आपला मूड फ्रेश ठेवू शकता.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. लाईक व शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.