तुम्ही कधी अगदी संपूर्ण अंधार अनुभवला आहे का? किंवा ५ मिनिटे डोळे बंद करून घरात किंवा बाहेर वावरायचा प्रयत्न केला आहे का? डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय
लहानपणी आंधळी कोशिंबीर खेळताना कधी एकदा डोळ्याला बांधलेली पट्टी काढून टाकू असं होऊन जात असे.
ठार अंधारात किंवा डोळे बांधून वावरावे लागले तरच आपल्याला आपल्या डोळ्यांचे महत्व समजून येईल.
नाहीतर एरवी आपण आपल्या डोळ्यांची काहीच काळजी घेत नाही. डोळ्यांच्या आरोग्याकडे आपले दुर्लक्षच होते.
आज आपण अशा ५ सवयी पाहूया ज्या आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.
१. सलग खूप जास्त वेळ मोबाईल किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनकडे पाहणे
कामाच्या स्वरुपामुळे आजकाल सतत लॅपटॉप किंवा मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहणे अगदी स्वाभाविक झाले आहे. घरून शाळा असल्यामुळे लहान मुले देखील बराच जास्त वेळ स्क्रीनकडे पाहतात. असे असले तरी सतत एकटक स्क्रीनकडे पहाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी मात्र अतिशय घातक आहे. कम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनच्या प्रकाशाचा डोळ्यांना त्रास होतो.
त्यासाठी अगदी सलग स्क्रीनकडे बघणे टाळावे.
दर अर्ध्या पाऊण तासाने नजर दुसरीकडे वळवावी. तसेच खिडकीबाहेर हिरव्या झाडांकडे पहावे. डोळ्यांचे व्यायाम करावेत.
निरश्या दुधाच्या घड्या, अथवा काकडीचे काप डोळ्यांवर ठेवावे. त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.
२. मेकअप न पुसता तसेच झोपणे
मैत्रिणींनो, काजळ घातले, आय लायनर लावले किंवा आय शॅडो लावल्या की आपले डोळे अगदी सुंदर दिसतात ना! पण हा मेकअप फार वेळ तसाच ठेवणे डोळ्यांच्या दृष्टीने चांगले नाही. अनेक महिला दमल्यामुळे, उशीर झाल्यामुळे डोळ्यांचा मेकअप स्वच्छ ण् करता तशाच झोपतात. परंतु असे करणे योग्य नाही. त्यामुळे कितीही उशीर झाला असला तरी रात्री झोपण्याआधी सर्व मेकअप पुसून चेहरा व डोळे थंड पाण्याने धुवून मगच झोपावे.
३. कडक उन्हात फिरणे
कडक उन्हात डोळ्यांना काहीही संरक्षण न देता तसेच फिरणे डोळ्यांसाठी फार वाईट आहे. तीव्र सूर्यकिरणे डोळ्यांना हानी पोचवतात. त्यातून निघणारे अल्ट्रा वॉयलेट रेज डोळे कमकुवत बनवतात. तसेच कडक उन्हात असताना वाहणारे उष्ण वारे देखील डोळ्यांसाठी चांगले नाहीत. तीव्र उन्हात जाताना चांगल्या प्रतीचा गॉगल जरूर वापरावा. गॉगल लावल्याशिवाय उन्हात बाहेर पडू नये विशेषतः बाईकवर जाताना.
४. खूप जोरजोराने डोळे चोळणे
सकाळी उठल्यावर किंवा डोळ्यात काही गेल्यावर डोळे जोरजोरात चोळणे ही आपली पहिली प्रतिक्रिया असते. परंतु असे करणे योग्य नाही. डोळे आणि पापण्यांचा भाग अतिशय नाजुक असतो, तसेच डोळ्यांकडे येणाऱ्या रक्तवाहिन्या देखील अतिशय नाजुक असतात. जोरजोरात डोळे चोळण्यामुळे त्या नाजुक भागांना हानी पोचू शकते तसेच हातांमुळे डोळ्यांना इन्फेक्शन होण्याचा देखील धोका असतो. त्यामुळे डोळे चोळण्याची सवय जाणीवपूर्वक सोडून द्यावी.
५. कॉनटॅक्ट लेन्स वापरताना काळजी न घेणे
अनेक लोकांना चश्मा आवडत नाही म्हणून ते लेन्सचा वापर करतात. परंतु लेन्स वापरताना हायजिन म्हणजेच स्वच्छतेची अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. लेन्सचा संबंध थेट डोळ्यांशी येत असल्यामुळे त्या काढता घालताना हात निर्जंतुक केलेले असणे, लेन्स सोल्यूशनचा वापर करून स्वच्छ ठेवणे हे सर्व करणे अतिशय आवश्यक आहे. तसेच खूप जास्त वेळ लेन्स घालून ठेवल्या तर डोळ्यातील कोर्नियाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे वेळोवेळी लेन्स काढून नीट ठेवणे आवश्यक आहे. झोपताना लेन्स घालून झोपणे अतिशय धोकादायक आहे. ह्या सर्व गोष्टींची काळजी घेऊन लेन्स वापरावी.
तर ह्या आहेत अशा ५ सवयी ज्या आपल्या डोळ्यांसाठी अतिशय घातक आहेत. आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. जर आपले डोळे चांगले असतील तरच आपण हे सुंदर जग पाहू शकू.
तर मित्रांनो, आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय काय करता हे आम्हाला नक्की सांगा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.