आजच्या काळामध्ये आपण मोबाईल वर एखादा मेसेज पाठवतो आणि तो क्षणार्धात पलीकडच्या व्यक्तीला मिळतो.
पाच मिनिटं जरी त्याने तो मेसेज बघितला नसेल तरी आपण बेचैन होतो.
कल्पना करा तुमचा मेसेज जर वीस वर्षांनी पोचला तर काय होईल?
बापरे तुमचं तर बीपीच वाढेल!!
ज्या काळामध्ये मोबाईल नव्हते एस. एम. एस.नव्हते, व्हाट्सअप नव्हतं, त्या काळात होती पत्रं.
आणि त्याच काळातली ही गोष्ट. तुमच्या लाडक्या जुन्या दूरदर्शन वर एक मालिका होती. त्यात छोट्या छोट्या पण हृदयाचा ठाव घेणाऱ्या काही गोष्टी चित्रित केलेल्या असायच्या. त्यातीलच ही एक कहाणी!!
तर एक पोस्टमन आपल्याला वाटायला मिळालेली पत्रे एका ट्रंकेत साठवून ठेवतो.
वीस वर्षांनी ती पत्रं सापडतात आणि मग ती वाटली जातात. यामागे त्यावेळी पोस्टात झालेल्या काही घडामोडी कारणीभूत असतात.
आता, वीस वर्षांनी पत्र मिळाल्यानंतर काय काय घडेल???
बरंच काही घडून गेलं असणार!! एखाद्याचं कुटुंबच विस्कळीत झालं असणार. एखाद्याचं आयुष्य ‘फ़र्श से अर्श तक’ असा पल्ला गाठून कुठेच्या कुठे निघून गेलेलं असणार!!
याच कल्पनेवर आधारित होती दुरदर्शनच्या “या” मालिकेतली कथा!!
हमलोग आणि बुनियाद पासुन सुरु झालेला दुरदर्शन मालिकांचा प्रवास, कथासागर, अफसाने, चेकॉव्ह की दुनिया, दर्पण, अशा मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसण्याप्रमाणं झाला.
दूरदर्शनच्या मालिकात भारतीय आणि जागतिक साहित्यातील लघुकथा फार प्रभाविपणे समोर आल्या.
आज कितीतरी वर्षे झाली पण या मालिका त्यातली पात्र यांचा प्रेक्षकांना विसर पडला नाही….
प्रेक्षकांनी त्या काळीही या मालिकांना भरभरून प्रेम दिलं.
अशाच मालिकांतील एक ‘ही’ मालिका. त्यातला पत्र वाटपाचा गोंधळ आणि त्या अनुषंगाने भावनांची आवर्तनं प्रेक्षकांनी अनुभवली.
आज ही कथा कालबाह्य ठरली असली तरी ज्यांनी पत्राला महत्त्व असण्याचा काळ अनुभवला आहे त्यांच्या मनाला या कथेतील कारुण्य अलगद स्पर्शुन जातं.
तर वीस वर्षांनी योग्य पत्यावर पोचलेल्या एका पत्रात दत्तक मुलाचा उल्लेख असतो, ज्यामुळे त्या मुलाचं भावविश्व ढवळून निघतं.
दुसरं एक पत्र असतं त्यानुसार एक मुलगा एका मुलीला पळवून नेणार असतो, यात मात्र धमाल घडते.
तिस-या पत्राने मात्र प्रेक्षकांच्या काळजाला वेदना दिली.
हे पत्र एका जोडप्याला मिळतं. त्या जोडप्याची लहान मुलगी वीस वर्षांपुर्वी हरवलेली असते.
सुदैवानं एका कुटुंबात तिला आसरा मिळतो. ती सुखरूप आहे, आणि ती जिथं आहे तिथला पत्ता देणारं पत्र वीस वर्षानंतर मिळाल्यावर या जोडप्याची काय अवस्था होत असेल?
ती दोघं लगेच दिलेल्या पत्यावर पोचतात. मात्र ती मुलगी कायमस्वरूपी परदेशात स्थायिक होण्यासाठी निघालेली असते.
जोडपं कसबसं विमानतळावर पोहचतं. मुलीला निदान एकदा तरी बघावं अशी त्यांची इच्छा असते.
मात्र ज्या कुटुंबानं तिला सांभाळलेलं असतं ते मुस्लीम असल्यामुळे मुलीने बुरखा घेतलेला असतो.
त्या जोडप्याला मुलीचा चेहरा ही दिसत नाही.
अशी ही ह्दय स्पर्शी कथा प्रेक्षकांच्या आज ही लक्षात आहे.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, “या” मालिकेचं नाव तुम्हाला सांगायचं आहे?? आठवून बघा आणि कमेंट्मध्ये सांगा?
कोणताही फाफट पसारा नसलेल्या, नात्यांची नाजूक वीण विणणा-या अशा दूरदर्शनच्या मालिका पुर्वी आपल्या भेटीला यायच्या.
दर आठवड्याला एक भाग पहायला मिळायचा. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहिली जायची.
तुम्हांला अशा कोणकोणत्या मालिका आठवतात? ज्या आज ही तुमच्या साठी खास आहेत आम्हांला कमेंट मध्ये नक्की कळवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.