जर मला अगदी चांगल्या शाळेत जायला मिळालं असतं तर मी सुद्धा आज अगदी फरडं इंग्लिश बोलू शकलो असतो. असं बऱ्याच इंग्लिश कच्चं असलेल्या लोकांना वाटतं.
या लेखात इंग्लिश बोलायला हमखास शिकण्यासाठी प्रार्थमिक तयारी कशी करावी याबद्दल महत्त्वाच्या अशा १२ टिप्स सांगितलेल्या आहेत. (लक्षात घ्या हे लिहिताना मराठीला कमी लेखण्याचा काहीही हेतू नाही. इंग्लिश शिकण्याच्या दृष्टीने हे लिहिलेले आहे)
इंग्लिश शिकायचंय? मग ह्या काही गोष्टी अगदी मनापासून करा…..
तुम्ही अगदी आत्मविश्वासाने इंग्लिश बोलायला लागाल.
जर मला अगदी चांगल्या शाळेत जायला मिळालं असतं तर मी सुद्धा आज अगदी फरडं इंग्लिश बोलू शकलो असतो.
असं बऱ्याच इंग्लिश कच्चं असलेल्या लोकांना वाटतं.
खरंय ना? पण एक गोष्ट तुम्ही डोक्यात घ्या की त्या गोष्टीला बराच काळ लोटलाय.
म्हणजे ती तुमच्या भूतकाळातली गोष्ट होती हो. आता वर्तमान काळात तुम्हाला काय करायचं ते ठरवा.
इंग्लिश शिकायला वयाची अट नाही. कधीही कुणीही इंग्लिश शिकू शकतं.
पण आता कोण शिकणार? कोण परत अभ्यास करणार?
अशा ह्या, इंग्लिश बद्दल बऱ्याच लोकांच्या मनात काही समज किंवा गैर समज आहेत.
ते काय आहेत ते आधी बघा….. हे इंग्लिश शिकायचं म्हणजे आधी इंग्लिशचं सगळं व्याकरण (Grammer) नीट यायला पाहिजे तरच इंग्लिश येईल.
हा मोठा समज किंवा गैर समज आपल्या डोक्यात बसलाय.
मला एक सांगा, की तुमची मातृभाषा जर मराठी, किंवा हिंदी असेल तर ती तुम्हाला कशी यायला लागली?????
त्याच्यासाठी तुम्ही मराठी, किंवा हिंदीचं व्याकरण आधी शिकला का??
मातृभाषा घरात सगळेच बोलतात त्यांचं ऐकून ऐकून तुम्हाला पण ती सहज यायला लागली.
तुमचं लहानपण आठवा.. तुम्ही आधी एक एक शब्द बोलायला शिकलात.
मामा, दादा, आत्या, आई आणि बाबा हे एक एक शब्द शिकत, आई ये, बाबा या, अशी छोटी वाक्य बोलायला शिकलात.
त्यासाठी तुम्हाला व्याकरण आधी शिकायला लागलं का? त्याची जरुरीच नव्हती.
आणखी लोकांना असं वाटतं की इंग्लिश मिडीयम च्या शाळेत शिकलं तर इंग्लिश चांगलं येतं.
ही सुद्धा चुकीची समजूत आहे. माझ्यापेक्षा माझा मोठा भाऊ आज मराठी मिडीयम मध्ये शिकून सुद्धा मोठ्या हुद्यावर काम करतोय आणि त्याच्या ऑफिस मध्ये इंग्लिश शिवाय दुसरी भाषा बोलली जात नाही.
मी इंग्लिश मिडीयम मध्ये शिकले पण आता तुम्ही माझी व्याकरणाची टेस्ट घ्याल तर मी त्यात पास पण होणार नाही. पण त्या शाळेत गेले म्हणून इंग्लिश चा सराव झाला म्हणून चांगलं बोलते एवढंच.
तसंच इंग्लिश पण तुम्हाला शिकायला जड जाणार नाही हे आधी डोक्यात पक्कं बसवा. आणि माझ्याबरोबर चला इंग्लिश शिकायला.
ते शिकताना तुम्हाला काय काय करायचं ते जरा बघा, म्हणजे तुम्हाला वाटेल की असं सगळं मी ह्या आधीच का नाही केलं? केलं असतं तर आज फाड फाड इंग्लिश बोलायला शिकलो असतो.
असूद्या, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही कधीही इंग्लिश शिकू शकता.. अमिताभ बच्चन सुद्धा म्हणून गेलाय की ‘इंग्लिश इज अ फनी लँग्वेज..’ तर दोस्तांनो, पक्कं ठरवा, आजपासून इंग्लिश शिकायचंच.
कसं? ते वाचा पुढे, आणि करा सुरू…..
१- इंग्लिश वातावरण तयार करा….
तुम्ही मराठी किंवा हिंदी सहज शिकलात कारण ती तुमची मातृ भाषा आहे. घरात सगळेच मराठी बोलत असतील तर सगळं वातावरण मराठी होते.
अगदी तसंच वातावरण तुम्हाला तुमच्या भोवती बनवायचं आहे. घरात इंग्लिश बोलायला सुरुवात करा. चुकीचं बोलाल पण सुरुवात करा.
टी. व्ही. वरचे इंग्लिश कार्यक्रम मुद्दाम बघायला लागा. मराठी वर्तमान पत्र न वाचता इंग्लिश न्यूज पेपर वाचा.
इंग्लिश कॉमिक्स, इतर गोष्टीची पुस्तकं वाचायला लागा. आपल्या मित्रांशी बोलताना सुद्धा बिनधास्त इंग्लिश शब्द वापरा.
नंतर हळू हळू वाक्य बोला. असं सगळं इंग्लिश वातावरण आपल्या भोवती राहील असा प्रयत्न करा.
जेवताना, खाताना, मनात त्या पदार्थांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे जाणून घ्या.
सगळा इंग्लिश ‘माहोल’ तयार करा. सतत दिवसातले सगळे तास फक्त इंग्लिश बोला, इंग्लिश वाचा, इंग्लिश पहा, इंग्लिश शिका.
हळू हळू शब्द, वाक्य ह्यांचा थोडा थोडा अर्थ तुम्हाला समजायला लागेल. म्हणजे सुरुवात एकदम ‘धडाक्यात’ होऊन जाऊद्यात.
तुम्ही इंग्लिश शिकताय हे घरातल्या लोकांना, तुमच्या सारख्याच इंग्लिश कच्चं राहिलेल्या तुमच्या मित्रांना पण कळू द्या. त्याचा तुम्हाला पुढे फायदाच होणार आहे.
२- तुमच्या सारखं ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे त्यांना एकत्र आणून एक ग्रुप बनवा…..
तुमचे भाऊ, किंवा बहीण, किंवा मित्र ज्यांना इंग्लिश शिकायचंय असे सगळे एकत्र या. आणि सतत इंग्लिश बोला.
चर्चा करा, पुस्तकं वाचा, प्रश्न विचारा, उत्तरं द्या, अगदी मोबाईल वर सुद्धा इंग्लिश मेसेज पाठवून काही माहिती मिळवा, मित्रांना पाठवा.
पण जे काही करायचं ते फक्त इंग्लिश मधून झालं पाहिजे. आठ, पंधरा दिवसात तुमच्या डोक्यात मराठी, किंवा हिंदी चं ट्राफिक कमी होऊन इंग्लिश ट्राफिक वाढायला लागल्याचं तुम्हालाच जाणवेल.
तुमचा ग्रुप पण हे बदल झाल्यामुळे जास्त “इंग्लिशमय” होईल.
३- एखाद्या जाणकार व्यक्तीला मेंटॉर (Mentor) बनवा:
काही समजलं नाही तर त्यांच्याकडून ते जाणून घ्या.
इंग्लिश शिकण्यासाठी सतत त्यांच्या संपर्कात रहा. त्यातून तुमचं इंग्लिश सुधारायला खूप मदत होईल.
अडलेले शब्दार्थ त्यांच्याकडून समजून घ्या. त्यांच्याशी पण इंग्लिश बोला, तुमच्या चुका ते दुरुस्त करून देतील. असा एक एक मार्ग तुमचा सरळ होत जाईल.
४- बोलताना तुम्ही बरोबर का चुकीचं बोलताय ह्याच्या कडे जास्त लक्ष देऊ नका….
आपल्याच ग्रुप मध्ये बोलताना तुम्ही व्याकरण शुद्ध बोलताय का ह्याचा विचार करू नका. कसं ही बोला, बोलत रहा. बोलण्याने शब्द तुमच्या लक्षात राहतील. हळू हळू तुम्ही बरोबर बोलायला लागाल.
५- इंग्लिश शिकताना सावध रहायला लागतं…
तुम्ही सतत इंग्लिश शिकताना सावध (alert) रहा. म्हणजे जर तुम्ही एखादा इंग्लिश प्रोग्रॅम बघत असाल तर त्यातले लोक बोलताना शब्दांचा उच्चार (Pronauciation) कसा करतात हे नीट बघा, ऐका.
आणि तसं बोलायचा प्रयत्न करायला लागा. हळू हळू सगळ्या शब्दांचे उच्चार तुम्हाला कळायला लागतील. बोलताना तुम्ही ते शब्द सहज वापरू शकाल.
तुम्ही पुस्तक वाचताना, न्यूज पेपर वाचताना काही शब्दांचा अर्थ तुम्हाला कळणार नाही ते शब्द एका डायरीत लिहून ठेवा.
नंतर मोकळ्या वेळात त्यांचा अर्थ डिक्शनरीत बघून शब्दांच्या पुढं लिहून ठेवा. नंतर परत समजून घेताना ती डायरी तुमच्या उपयोगी पडेल.
६- गोष्टीची पुस्तकं, न्यूज पेपर मोठ्याने वाचा….
तुम्ही जेंव्हा एकटे असाल तेंव्हा, किंवा तुमच्या ग्रुप मध्ये बसला असाल त्यावेळी एखादी इंग्लिश पुस्तकातली कथा, किंवा न्यूज पेपर मधली बातमी मोठ्या आवाजात वाचायची सवय करा.
असं केलंत तर तुमचे उच्चार चांगले होतील. आणि बातमी किंवा कथा कशी वाचायची ते कळेल. मोठ्याने वाचलेलं चांगलं लक्षात रहातं.
७- आरशासमोर उभं राहून बोला.
तुम्ही इंग्लिश शिकत असताना हळू हळू बोलायला शिकता. इंग्लिश शिकून ते बोलायला शिकताना तुमच्यातला आत्मविश्वास वाढण्यासाठी आरशासमोर उभं राहून बोला.
शब्द, वाक्य, कथा, हळू हळू तुम्ही बोलण्यात प्रगती करायला लागाल.
आरसा तुमची बोलण्याची भीती घालवेल. तुम्ही आत्मविश्वासाने बोलायला लागाल. तुमच्या चुका सुद्धा आरशासमोर तुम्हाला कळतील.
८- इंग्लिश शिकताना तुम्ही आनंदाने ते शिकण्यातली मजा घेत शिका:
तुम्ही तुमच्यासाठी एक वेगळी भाषा शिकताय. ती तुमची आवड म्हणून अगदी आनंदाने शिका.
शिकताना तुमची प्रगती होते आहे त्याची मजा घ्या. उच्चार करताना चुका झाल्या तर भलतेच उच्चार केले जातील.
तुम्हाला त्याचं हसू येईल, हसा, पण उच्चार नीट करायला शिका. म्हणजे इंग्लिश शिकणं तुम्हाला सहज सोपं वाटेल आणि त्यात तुम्ही लवकर प्रगती कराल.
९- इंग्लिश शिकताना तुम्हाला आनंद कसा मिळेल:
तुम्हाला इंग्लिश शिकताना आनंद मिळवायला आधी लहान मुलांची इंग्लिश स्टोरी बुक्स वाचायला लागा. सोपी वाक्यरचना तुमच्या डोक्यात लगेच शिरतील.
त्याचा अर्थ सुद्धा सोपे शब्द असल्यामुळे लगेच कळायला लागेल. अर्थ कळला की तुम्हालाच सोपं वाटायला लागेल.
नंतर जरा मोठ्या मुलांची कॉमिक्स वाचायला लागा. त्यातले विनोद कळत जातील तसं तुम्ही भाषेची मजा घेत जाल.
मग तुमच्या आवडीची काही पुस्तकं वाचा. आवडीचा विषय असेल तर तो लगेच समजतो. शब्द अडले तर डिक्शनरी बघून अर्थ समजून घ्या. मग वाचन करताना सुद्धा मजा वाटेल.
कारण प्रत्येक वाक्याचा अर्थ तुम्हाला वाचतानाच समजायला लागेल. तुमचा आत्मविश्वास असाच वाढत जाईल. आत्मविश्वास वाढायला लागला की इंग्लिशवर तुमची पकड घट्ट होत जाईल.
१०- अर्थ कळायला लागला की तुमच्या बोलण्यात पण प्रगती व्हायला लागेल.
त्यावेळी तुम्ही तुमच्या डोक्यात येणारे विचार सुद्धा इंग्लिश मधून करायचा प्रयत्न करा..
जसं तुम्ही कोणतंही वाक्य मराठीत बोलताना विचार मराठीतून करता. आता तुम्ही इंग्लिश शिकायचा पक्का निर्णय घेतला आहे तर विचार पण इंग्लिशमधून सुचले पाहिजेत.
मनातच इंग्लिश वाक्य तयार करा आणि बोला… तुमच्या वाक्यात सहजता यायला लागेल.
हीच सहजता इंग्लिश यायला लागल्याची जाणीव तुम्हाला करून देईल. तुमचा बोलण्याचा वेग सुद्धा आपोआप वाढेल.
११- इंटरनेटचा भरपूर उपयोग करून शिका…
यू ट्यूब वरचे व्हिडीओ बघा, त्यात कसा शब्दांचा उच्चार केला जातो तसा उच्चार तुमच्या बोलण्यात आला पाहिजे ह्याचा सराव करा.
काही शब्द कळणार नाहीत त्यासाठी “द फ्री डिक्शनरी.कॉम” चा उपयोग करा. आणि तुमचा शब्दसंचय वाढवत चला.
मग तुम्हाला इंलिश न्यूज पेपर सहज कळायला लागेल. नंतर मोठी नॉवेल्स वाचू शकाल.
अगदी कधीही तुम्ही इंग्लिश शिकायला केलीत तरी अर्थ समजून नॉवेल्स वाचायला जास्तीत जास्त सहा महिन्यांचा कालावधी लागेल.
अगदी तुम्ही इंग्लिशला पूर्वी घाबरत असलात तरी सुद्धा. मग ज्यांची आकलन शक्ती (Grasping power)जरा जास्त असेल तर तीन चार महिन्यात ते असं इंग्लिश शिकू शकतील.
जिद्द असेल तर तुम्ही काहीही करू शकता ह्याची तुम्हाला जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.
असं तुमचं तुम्ही इंग्लिश शिकलात ना तर पुढं आयुष्याची वाटचाल करताना, इंटरव्ह्यू देताना आणि इंग्लिश येत नाही म्हणून अडलेल्या सगळ्या कामात तुम्ही अगदी सहज यश मिळवाल.
१२- तुम्हाला यशापासून लांब ठेवणारी इंग्लिश न येणं ही गोष्ट तुम्ही अगदी जिद्दीनं शिकून घेतली तर आयुष्य एकदम सोपं होणार आहे हे लक्षात घेऊनच ते शिका.
आळस, कंटाळा, निगेटिव्ह विचार हे शिकताना सहा महिने तुम्हाला त्रास देतील. परत परत पाय ओढतील. पण त्यांना तुमच्यापासून लांब ठेवा आणि ही हातात घेतलेली गोष्ट पूर्ण केल्यावरच मागे वळून बघा.
काय अनुभव तुम्हाला आला ते लिहून ठेवा. आम्हाला ही कळवायला विसरू नका. कारण तुमच्याकडून प्रेरणा घेऊन पुढे जाणारे तुमचा अनुभव ऐकायला उत्सुक असतील.
आता तुमच्यातल्या पालकांसाठी एक मस्त सल्ला (फुकटचा 😜पण मनापासून) : मी माझ्या मुलाला लहान असल्यापासून एक सवय लावली होती, ‘इंग्लिश न्यूज पेपर समोर घे आणि रोज त्यातले दोन शब्द लिहून डिक्शनरीतून बघून त्याचा अर्थ लिहून ठेव…’
पहिली, दुसरीला असताना नुसती हेडिंग बघून शब्द काढू द्या. मग जरा पॅराग्राफ वाचतील असं जास्त जास्त, वाचत वाचत जातील. नक्की करून बघा. हे लहानपणीच सुरु करा कारण ते लहानपणीच ऐकतील. आणि व्होकॅब्युलरी म्हणजेच शब्दसंग्रह वाढत जाईल.
पण मोठं होईपर्यंत सवय लागली तर पुढे न सांगता या गोष्टींचं महत्त्व त्यांना समजेल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खूप छान माहिती दिली सर…तुमचा खूप आभारी आहे….तुमचा पूर्ण लेख वाचत असताना एक चांगली उपाय योजना कशी करावी आणि इंग्लिश कसे इम्प्रोव करावे हे शिकायला मिळाले…..धन्यवाद
धन्यवाद सर
very nice imformation
khup chhan mahiti dili sir, dhanyavad sir.