२१ वर्षांची चनिरा वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत हे बंदिस्त देवपण याची देही याची डोळा अनुभवत होती. किनऱ्या आवाजात चनिरा सांगते, पाच वर्षांपासूनचं माझं ते आयुष्य खूप आव्हानात्मक होतं. मासिक पाळी आली तेव्हा कुठे माझ्यातलं देवपण संपलं. ते संपलं तेव्हा मला नीट चालता सुद्धा येत नव्हतं. कारण मी जमिनीवर पाय टेकवूच शकत नव्हते. बाहेरचं हे जग माझ्यासाठी पूर्ण नवखं होतं. चनिरा हि पहिली कुमारी देवी आहे जीने शालेय शिक्षण घेतले. चनिराच्या मते एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा कुमारी देवी असणं हा तिच्या आणि तिच्या घरच्यांसाठी मोठा सन्मान आहे.
स्त्रीशक्तीची दिव्य रूपं आणि त्यांच्या अवतारांची पूजा करणे हे हिंदू धर्मीक परंपरांमध्ये प्राचीन काळापासून प्रचलित आहे. पण नेपाळमध्ये स्त्रीच्या या शक्तीला वेगळ्याच रूपाने पुजले जाते.
नेपाळात कुमारी देवतांची एक प्राचीन आणि अनोखी परम्परा विस्मयचकित करते. यामध्ये एका कुमारी कन्येला देवीच्या रूपाने पुजले जाते. हिला ‘कुमारी देवी’ म्हणतात.
असे म्हणतात कि हि कन्यका देवी तालेजूचा जिवंत अवतार असते. या देवीला पुजल्याने वेगवेगळे कठीणात कठीण आजार बरे होण्यापासून सुख समृद्धी मिळते अशी श्रद्धा इथल्या लोकांमध्ये दृढ आहे.
या परंपरेची सुरुवात १७ व्या शतकात इथल्या काही हिंदू आणि बौद्ध परम्परा मानणाऱ्या लोकांनी सुरु केली. तिबेटी बौद्ध मात्र यात समाविष्ट झाले नाहीत.
या कुमारी देवीची निवड नेपाळमधल्या शाक्य जातीच्या किंवा वज्रचार्य समुदायाच्या कुमारी कन्यकांमधून अतिशय काटेकोरपणे केली जाते. यात काही मुलींना तर जन्मांनंतर लगेचच देवीपद बहाल केले जाते.
काही मुली मात्र ५ ते १० च्या वयात पुजाऱ्यांकडून निवड केल्या जातात. नेपाळच्या सर्वच शहरात अश्या कुमारिका आहेत पण काठमांडूमध्ये ‘कुमारी घर’ महालात असणारी देवी हि रॉयल देवी मानली जाते. काठमांडूच्या वसंतपूर दरबार स्क्वेअर मध्ये हा महाल आहे.
या कुमारी देवींच्या निवडीची प्रक्रिया अतिशय कठीण आहे. हि निवड करतांना त्यांच्या जन्मनक्षत्रांचा अभ्यास केला जातो.
या निवड प्रक्रियेमध्ये पास होण्यासाठी या कुमारिकांना ३२ शारीरिक चाचण्यांमधून जावं लागतं. त्यातील काही चाचण्या तर अशा असतात कि यातून मुलगी घाबरते कि नाही याची चाचणी घेतली जाते.
त्यांच्या समोर म्हशीचं कापलेलं मुंडकं ठेवलं जातं, राक्षसी मुखवटा घातलेले पुरुष तिच्यासमोर नृत्य करतात. अश्या प्रकारे ती मुलगी पुढपुढच्या कठीण परीक्षांमध्ये उतरत जाते.
धर्मचर्यांच्या पत्नींकडून त्यांची काही शारीरिक तपासणी होते. यामध्ये त्यांचे दात, नखं शरीराची ठेवणं हे सारं काटेकोरपणे तपासलं जात.
त्यांनतर यांना देवीची विविध रूपं दाखवणाऱ्या वेगवेगळ्या पोशाखांमध्ये काही दिवस राहावे लागते. यातून देवीची वेगवेगळी रूपं प्रतिबिंबित व्हावीत हा यामागचा हेतू असतो.
निवडीच्या वेळी या कन्येला स्थानिक मंदिरांमध्ये देवीच्याच रूपात स्थापित केलं जात इथे भक्त तिचा सन्मान करतात. आणि पूजाही करतात.
या छोट्याश्या देवी कन्यकेला मात्र सक्तीचा निर्देश दिलेला असतो कि या वेळात तुला एका जागी शक्य तितके स्तब्ध बसून रहावे लागेल.
शुद्धतेचं प्रतीक म्हणून तिला लाल वस्त्रच घातली जातात. या इवल्याश्या जीवाला बोलण्याची… आपल्या घरातल्या लोकांशी बोलण्याची सुद्धा परवानगी नसते.
ती अजाणती कन्या मात्र काहीतरी नवे आपण अनुभवतो आहोत या भावनेतून जाते. पण शुद्धतेचं रक्षण व्हावं यासाठी त्या देवी कन्यकेला आपले पाय जमिनीवर टेकवण्याची अनुमती नसते.
म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी तिला उचलून नेले जाते. या कुमारी देवींना काही विशिष्ठ धार्मिक उत्सव सोडले तर दिलेल्या जागेच्या म्हणजे मंदिराच्या बाहेर जाण्याची परवानगी नसते.
या कालावधीत तिला धार्मिक शिक्षण दिले जाते. काही उत्सवांच्या वेळेस तिला वाजत गाजत पालखीत ठेऊन पूजा अर्चा केली जाते.
हि कुमारी जेव्हा मासिक पाळी येण्याच्या वयापर्यंत येऊन ठेपते. तेव्हा तिला या देवीपदापासून निवृत्त केलं जातं. आणि असं मानलं जातं कि आता देवीने या मुलीचे शरीर सोडले आहे. त्यांनतर मात्र या मुलीला पुजले जात नाही.
पूर्वीच्या काळात या कुमारी देवीला तिचे देवीपण सरल्यानन्तरही शिक्षण, लग्न, तसेच इतर सामान्य लोकांनी उपभोगण्याच्या आनंदापासून वंचीत ठेवले जात होते.
देवपण ओसरल्यानन्तर एक सामान्य व्यक्ती म्हणून तिचे जगणे नेपाळच्या कुठल्यातरी कानाकोपऱ्यात विनासायास चालत असे. पण आता सुदैवाने या कन्यकांवरील बरीचशी बंधनं शिथिल केली गेली आहेत.
चनिरा वज्राचार्या या माजी कुमारी देवीशी बोलून टीम मनाचेTalks ने देवपणा नन्तरचे तिचे आयुष्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
२१ वर्षांची चनिरा वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत हे बंदिस्त देवपण याची देही याची डोळा अनुभवत होती. किनऱ्या आवाजात चनिरा सांगते, पाच वर्षांपासूनचं माझं ते आयुष्य खूप आव्हानात्मक होतं.
मासिक पाळी आली तेव्हा कुठे माझ्यातलं देवपण संपलं. ते संपलं तेव्हा मला नीट चालता सुद्धा येत नव्हतं. कारण मी जमिनीवर पाय टेकवूच शकत नव्हते. बाहेरचं हे जग माझ्यासाठी पूर्ण नवखं होतं. सुदैवाने चनीरा हि शालेय शिक्षण घेऊ शकलेली पहिली कुमारी देवी आहे.
ती सांगते एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा कुमारी देवी असणं हा तिच्या आणि तिच्या घरच्यांसाठी मोठा सन्मान आहे.
वाचण्यासारखे आणखी काही…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.