गॅस सिलेंडरच्या किमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. दररोज स्वयंपाक करायला गॅस लागत असल्यामुळे तो खर्च अनिवार्य आहे. कुटुंब लहान असो वा मोठे, दर महिन्याला गॅस सिलेंडरचा वाढता खर्च आहेच.
तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर मागचं गॅस सिलेंडर साधारण ८३५ रुपयांच्या आसपास घेतलेलं आठवत असेल. पण आज पासून गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ झालेली असून हे सिलेंडर आता तुम्हाला साधारण ८५९ रुपयांना घ्यावे लागेल.
ह्या वाढत्या खर्चामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडते आहे.
आज आपण स्वयंपाक करण्याच्या अशा ६ ट्रिक्स पाहूया ज्या वापरल्यामुळे गॅसची बचत होईल आणि त्यामुळे गॅस सिलेंडर जास्त दिवस वापरला गेल्यामुळे पैसेही वाचतील.
ह्या आहेत त्या ६ ट्रिक्स
१. डाळी, कडधान्ये भिजूवन वापरा
जर तुम्ही आमटी, उसळ, राजमा, छोले असे पदार्थ करणार असाल तर ते बनवण्याआधी किमान अर्धा तास भिजवून ठेवा. त्यामुळे डाळी, कडधान्य लवकर शिजतात आणि गॅसची बचत होते.
२. स्वयंपाकाला लागणारी सर्व तयारी आधी करून ठेवा
तुम्ही जो पदार्थ करणार असाल त्याला लागणारे सर्व जिन्नस आणि भांडी आधी ओट्यावर काढून घ्या. त्यामुळे पदार्थ बनवताना मध्ये मध्ये वेळ वाया जाणार नाही आणि गॅस चालू राहून तो देखील वाया जाणार नाही. सर्व तयारी असेल तर पदार्थ लवकर तयार होतो.
३. प्रेशर कुकरचा वापर करा
अन्न कढई किंवा पातेल्यात शिजवण्याऐवजी प्रेशर कुकरचा वापर करा. त्यामुळे पदार्थ लवकर शिजतो आणि गॅसची बचत होते. ह्याचा दुसरा फायदा असा की पदार्थातील पोषक घटक त्यातच राहतात.
४. पदार्थ शिजवताना त्यावर झाकण ठेवा
कोणताही पदार्थ शिजवताना तो झाकण ठेवून शिजवला तर तो पटकन शिजतो. झाकणावर थोडे पाणी घालून ठेवले तर पदार्थ करपत देखील नाही. गॅसची बचत होते आणि पदार्थाचे पोषणमूल्य टिकून राहते.
५. पदार्थ शिजण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी घाला
कोणतीही भाजी किंवा इतर काही पदार्थ करताना त्यात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी घालू नका. असा पदार्थ शिजायला जास्त वेळ लागतो आणि गॅस वाया जातो.
६. पदार्थ नेहेमी मध्यम आचेवर शिजवा
बऱ्याच गृहिणींना असे वाटते की गॅस मोठा ठेवला की स्वयंपाक लवकर होईल. परंतु तसे नाही, तसे करण्याने फक्त गॅस वाया जातो. पदार्थ नेहेमी मध्यम आचेवर शिजवायची सवय ठेवा. त्यामुळे गॅसची बचत तर होतेच शिवाय योग्य प्रमाणात शिजल्यामुळे पदार्थ अधिक पौष्टिक आणि रुचकर होतो.
तर ह्या आहेत अगदी सोप्या ट्रिक्स ज्या वापरून आपण स्वयंपाकाच्या गॅसची बचत नक्कीच करू शकतो. त्यांचा जरूर वापर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.