किस्सा क्र.१
माझा एक शेजारी, वय साधारण 25 वर्षे त्याच्या पायाच्या मागील शिरा काही वेगळ्याच दिसत आहेत म्हणाला. मी म्हटले बघावे लागेल. तपासून निदान करुन औषधोपचार करु शकतो. त्याला तपासले व निदान केले वेरीकोज वेन (varivose vein) व फक्त व्यायाम youtube वर पहायला सांगितले नंतर बरेच दिवस तो स्वतःहून औषधे सुरु करण्याविषयी काही बोललाच नाही, मी सहज विचारले मग व्यायाम चालु आहे का?
शेजारी:- नाही चालु.
मी :- मग काहीच करत नाहीस का?
शेजारी :- online औषध मागवून चालु केले रामदेवबाबाचे.
मी :- धन्य!
(असे आजार बरे होत असतील बिना रुग्ण तपासता तर सकल विश्वातील डाॅक्टरांची गरजच काय? नाही का!)
सर्दि, खोकला सुरुवात असताना काही घरगुती उपाय केले तर थोडेफार ठिक आहे, इतर मोठ्या आजारांशी तुलना करता! खरे पाहता तेही अयोग्यच आहे. कारण कित्येक जण ओल्या खोकल्यावर अधिक तीक्ष्ण, उष्ण व तिखट, कडु चवीची औषधे खाऊन कोरडा खोकला वाढवून घेतात. आल, लवंग, मिरे यांचा काढा यांसारखे कोण सांगेल ते उपचार करत राहतात. नि पैसे वाचवण्यासाठी शरीराची प्रयोगशाळा करुन काहीतरी भलतेच घडल्यावर यांचे पाय डाॅक्टरांच्या दिशेने धाव घेतात. असे प्रयोग केवळ गरीब, मध्यमवर्गीयच करतात असे नव्हे तर सुशिक्षित व श्रीमंतही यात कमी नाहीत अशी एकंदर अवस्था आहे!
किस्सा क्र.२
डायबिटीजचे तर काही बोलायलाच नको.
श्री प्रधान :- अरे वसु काय करु माझा डायबिटीज कंट्रोल करायचाय, काही उपाय माहीती आहे काय?
श्री.वसंत :- अरे काय टेन्शन घेऊ नकोस, कारल्याचा रस घेत जा- रोज 2 वेळा, मग बघ कसा डायबिटीज रफु चक्कर होतो ते!
श्री. प्रधान :- हो का, मग बघतोच उद्यापासून सुरु करुन! अरे पण एका वेळी रस किती घ्यायचा ?
श्री. वसंत :- त्यात काय एवढं तुला जमेल तेवढा पि. नि जेवढा जास्त पिशील तेवढा मधुमेह लवकर कंट्रोल होईल.
श्री. प्रधान :- बरं झालं सांगितलस मित्रा.
श्री. प्रधान यांनी साधारण एक वर्षे रोज 50 – 125 ml कारल्याचा रस पिला नि नंतर त्यांना पॅरालिसीसचा झटका आला.
मी केस टेकिंग घेत असताना त्यांचे मेंदुतील रक्तवाहीनी फुटून रक्तस्राव होण्याचे दुसरे कोणतेच सक्षम कारण मला सापडले नाही.
पॅरालिसीस म्हणजे पक्षाघात हा वातप्रधान व्याधी आहे. कडु चवीच्या अतिसेवनाने वात वाढतो,हा वात शिरांच्या ठिकाणी वाढल्यास त्यांची स्निग्धता कमी होऊन त्यांच्या भिंती कठिण होतात नि पर्यायाने लवचिकता कमी होते.अशा शिरांतून रक्त प्रवाह जाताना शिरांच्या भिंतींकडून येणारा दाब अधिक असल्याने त्याला मात करण्यासाठी रक्तदाब अधिक वाढतो. हा रक्तदाब सहन न झाल्यास बारीक शिरा म्हणजेच केशवाहिन्या फुटतात. हे सांगितले तेव्हा त्यांना कळाले की स्वस्तातला व वैद्यांच्या सल्ल्याशिवाय केलेला सोपा उपाय केवढ्याला पडू शकतो, नि दुर्दैव हेच कि कारणमीमांसा न कळाल्याने, रुग्ण अंधारात राहतात व पुन्हा तोच सल्ला शहानिशा न करता, पुढे चालु राहतो. नुसते घरगुती औषध कळून काही उपयोग नसतो, त्याचे प्रमाण कळायला हवे. कोणत्या प्रकृतीला, कोणत्या ऋतुत, कोणत्या वयात ते घेऊ शकतो अशा बर्याच बाबींचा सखोल विचार करावा लागतो. जसे आपण घर बांधताना you- tube वर बघून सामान आणून पाहून पाहून बांधकाम करू शकत नाही, त्यासाठी सिविल इंजीनियिरच हवा, तसेच online पाहून स्वतःच स्वतःचे स्वयंघोषित डाॅक्टर आपण होऊ शकत नाही.
किस्सा क्र.३
रुग्ण :- डाॅक्टर याला सांधेवात आहे वाटतं, आजवर आम्ही अॅलोपॅथीक, आयुर्वेदिक सगळे केले काहीच फरक नाही.
डाॅक्टर :- आयुर्वेदिक उपचार कोणाकडे केलेत?
रुग्ण :- वेताळवाडीत एक जण औषध देतात. खूप लांबून येतात लोक त्यांच्याकडे. बर्याच जणांना गुण आलाय.
डाॅक्टर :- डाॅक्टर आहेत का ते ?
रुग्ण :- नाही चांभार आहेत. पण लोकांना फरक पडतो त्यांचा.
डाॅक्टर :- आता मग माझ्याकडे चपला शिवायला आला नाहित ना! म्हणजे मिळवलं…… अहो आता काय सांगायचं तुम्हाला – पाणपट्टिवाला, चहावाला, ऊसाचा रसवाला यांच्याकडे मिळतो तो आयुर्वेद नव्हे!
ऊसाच्या रसवाल्याकडे पाटी असते – आमच्याकडे काविळीचे रामबाण औषध मिळेल, अशा ठिकाणी काही लोक उपचार करतात तर काय म्हणावे याला?
सलूनवाले केसगळतीवर उपाय सांगतात ते सुद्धा लोक बिनधास्त करतात.
जे जे फुकट सल्ले, ते ते पहावे करुन।
संसार करावा नेटका, आरोग्याचा बळी देऊन ।।
अशी ओवीच जणू आपण जगायची ठरवले असेल तर मात्र अवघड आहे, सगळं!!!
किस्सा क्र.४
माझ्या एका नातेवाईकांना टाचदुखी होती. मी तपासून औषध पाठवले फरकही वाटत होता, पण कोणाच्या तरी सांगण्यावरुन कोणत्यातरी अबवाडीला एक प्रसिद्ध आयुर्वेदिक डाॅक्टर आहेत, त्यांच्याकडे गेल्या, तेथे म्हणे एकावेळी ट्रकभरुन पेशंट जातात चेकअपला!
मी विचारले, त्यांचे व्हिझिटिंग कार्ड किंवा पॅम्प्लेट दाखवा.
पॅम्प्लेटवर माझ्या शंकेप्रमाणे त्यांच्या नावासमोर डीग्रीच लिहीली नव्हती.
त्या औषधांनी त्यांचे दुखणे जादुसारखे थांबे पण औषधे थांबली की पुन्हा दुखणे सुरु होतं लगेच. पण मी म्हटले सलग काही महीने औषध घेतल्यावर सुद्धा असे होते म्हणजे, हे मूळापासून बरे होत नाही आहे. मला त्यात पेन किलर वापरतात कि काय याची शंका आली. मला त्यांनी औषधे दाखवली. काही चूर्णे व गोळ्या होत्या. मी लगेच पाण्याने अर्धी भरलेली वाटी मागितली, त्यात ते चूर्ण टाकले, आयुर्वेदिक चूर्ण थोडे मिसळले थोडे तळाला बसले, नि पांढरट कण पाण्याच्या वर तरंगु लागले व पाण्याला ऍलोपॅथी डाॅक्टरच्या डिस्पेन्सरीतील टिपिकल वास येऊ लागला. तो वास पेशंटलाही जाणवला. अशा रीतीने माझी व रुग्णाची खात्री पटली की यात पेनकिलर एकत्र केले आहेत.
वारंवार पेनकिलर खाल्याने किडनी खराब होते – हे आपणास माहित आहे, पण जर असे आयुर्वेदिक म्हणवले जाणारे, पण पेनकिलर व स्टेराॅइड एकत्र करून बनवलेले चूर्ण जर आपल्या नकळत बरीच वर्षे पोटात जात असेल, तर आपल्या किडणीला वाली कोण ?
आपण आपली गाडी दुरुस्त करताना चांगल्या मोटर मेकॅनिक कडेच नेतो ना, मग शरीराच्या बाबतीत एवढा हलगर्जीपणा का करतो? असे नको ना व्हायला!
असे किस्से बर्याच वैद्यांनी अनुभवले असतील, मी फक्त त्यांचे प्रतिनीधीत्व करुन स्वयं उपचार करणे थांबावे व रुग्णांचे आरोग्य अबाधित रहावे म्हणून त्यांच्या मनातल्या भावनांना शब्दबद्ध केले.
आयुर्वेद म्हणजे नो साईड इफेक्ट म्हणून त्याला एवढेसुद्धा कॅज्युअली घेऊ नका.
आजीबाईचा बटवा म्हणून घरगुती औषधे नको तेव्हा सल्ल्याविना करत बसू नका.
वैद्यांनीही उपचार सांगणारे लेख लिहू नयेत असे मला वाटते, याने आपणच भोंदू वैद्य निर्माण व्हायला खतपाणी घालतो.
कोणतेही आयुर्वेदिक औषध विना प्रीस्क्रिप्शन आपल्याकडे मिळू शकते, अगदि चाॅकलेट-गोळी मागावी तसे – हिच परिस्थिती बदलायला हवी.
त्यात आयुर्वेदिक औषधे व पुस्तके मराठीत उपलब्ध असल्याने, सगळं काही अजूनच सोप वाटतं कोणालाही – स्वयं उपचार करायला ही व स्वयंघोषित आयुर्वेदिक डाॅक्टर म्हणून घ्यायलाही.
सर्वांनीच या विषयाकडे डोळसपणे पाहायला हवं!
Self medication could be injurious to health
लेखक : डॉ. मंगेश देसाई
मोबाईल : ७३७८८२३७३२
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Helpful information
Please send mi by email