मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्हांला अनेक गोष्टी मिळालेल्या असतात, पण त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही नसलेल्या छोट्या गोष्टीचं दुःख उगाळत बसता.
आपल्याच ओळखीच्या अशा काही व्यक्ती असतात ज्या प्रचंड दुःख सहन करून ही मोडून पडत नाहीत पुढं जात राहतात.
आपल्या दुःखांचा वेदनांचा त्या व्यक्ती कधीही बाजार मांडत नाहीत. जे आयुष्य आहे त्याचं दोन्ही हात पसरून स्वागत करतात.
या व्यक्तींपैकी कुणी कोरोनानं आपला जिवलग गमावलेला असतो, तर कुणी महापूरानं, पण तक्रारीचा एक ही सूर न लावता या व्यक्ती जीवन पेरतात, आपल्याला जगायला ही शिकवतात.
तुम्ही मात्र तुमच्या रोजच्या जीवनात दिवास्वप्नात रमता. त्यामुळं वास्तवात तुमच्यावर प्रचंड ताण येतो, चिडचिड होते.
कोणत्या तरी अशक्यप्राय स्वप्नामागे तुम्ही जगणंच विसरता. आनंदाचे क्षण हातातून निसटू देता.
कल्पनेत समस्या डोंगराएव्हढ्या होतात आणि आनंदाचे क्षण फुलबाजीसारखे उडून विझून जातात. काल्पनिक जगातलं सुख आणि वास्तवातल्या समस्या यामध्ये तुम्ही एखाद्या भूलभुलैया मध्ये भरकटल्या सारखे हरवून जाता.
त्याच त्याच ठिकाणी फिरता. त्यातून बाहेर पडायलाच हवं. यासाठी तुम्हीच तुमच्या बुद्धीला घासून पुसून लख्ख करायला हवं.
मला जे हवं आहे त्यातलं माझ्याकडे काहीच नाही या सूचना बुद्धीला देण्यापेक्षा मी समजून घेउ शकतो, शिकू शकतो आणि मला हवं ते मिळवू शकतो हे बुद्धीला पटवून द्या.
नव्या वर्षात कात टाकून नव्या उत्साहानं जगा. पण त्यासाठी या 10 गोष्टी मात्र आवर्जून बाजूला करा.
1) अवास्तव कल्पनांना बाजूला करा
एखाद्या कल्पनेत रंगून जाणं तुम्हांला खूप छान वाटतं, मात्र केवळ कल्पनेतच या गोष्टी सतत करत राहणं कंटाळवाण होतं.
समजा तुम्ही इंजिनिअरिंगला अगदी आवडीने निवडलं आहे, मात्र स्वप्न बघता एखाद्या रियालिटी शोमध्ये गाणं गाण्याचं.
मग वेगळं काय होणार? तुमचं लक्ष अभ्यासावरून उडणार.
तुम्ही गाण्याची प्रॅक्टिस करत नसाल, गाणं न शिकता नुसतचं स्वप्नं पाहात असाल तर तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ तुम्ही वाया घालवत आहात.
त्यामुळे आयुष्यात तुम्हाला नक्की काय करायचं आहे यावर फोकस ठेवा.
2) जगाला तुमचं व्यक्तिमत्त्व घडवू देऊ नका
तुम्ही जर सतत लोकांचा विचार करत असतात की लोक कोणते कपडे घालतात? कोणते दागिने वापरतात? त्यांची लाइफस्टाइल काय आहे, कोणती फँशन सुरू आहे, त्यातलं तुमच्यासाठी बेस्ट काय आहे? असा विचार जर तुम्ही करत असाल तर ते साफ चूक आहे.
दुसऱ्यांच्या जीवनशैलीत स्वतःला फिट करण्याचा कल्पनाविलास सोडा.
सोशल मीडिया सतत तुम्हाला दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची संधी देतो.
तुम्ही त्यात गुंतला तर तुमची प्रगती नक्की थांबते. त्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यात न डोकावता स्वतःचं आयुष्य स्वतः घडवा.
तुमचे नातेवाईक, तुमच्या मित्र मैत्रिणी यांच्याशी नातेसंबंध तुम्ही तुमच्या पद्धतीने जपा.
तुम्हाला काय हवंय हे फक्त एकाच व्यक्तीला नीट माहिती असतं आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः….
तेव्हा दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावणं यावर्षी नक्की सोडून द्या.
3) इतरांवर आपली जवाबदारी टाकणे सोडून द्या
तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाशी पक्की ठरवता. त्यात समोरच्या व्यक्तीने कसं वागलं पाहिजे हे ही ठरवता.
पण समोरच्या व्यक्तीला तिच्या आवडीनुसार जगण्याचं स्वातंत्र्य आहेच. ते तुम्ही मान्य करत नाही मग तुमची चिडचिड होते. आता मला सांगा यात चूक नेमकी कोणाची?
तर मित्रांनो तुमच्या अपयशाचं, चुकीच्या वागण्याचं खापर दुसऱ्यावर फोडणं किंवा यासाठी दुसऱ्या व्यक्तीला दोषी ठरवणं सोडून द्यायला हवं. नाही का?
4) तुमच्या यशाच्या मार्गात कोणतातरी अदृष्य अडथळा आहे ही कल्पना दूर करून टाका.
महापुरात अपघातात भूकंपात संसार मोडून पडला तरी कणा मोडू न देणारी माणसं पहा.
परिस्थितीचं रडगाणं न गाता त्या व्यक्ती परिस्थितीवर मात करतात.
जरा तुमच्याकडे पहा बरं, दाराशी सुखं हात जोडून उभी असतात.
दहावीची परीक्षा द्यायची तर अभ्यासाला स्वतंत्र खोली असते. कोचिंग क्लासेस असतात.
खायला-प्यायला उत्तम आहार असतो. तरीही मार्क कमीच मिळतात.
याउलट एखाद्या साध्या परिवारातल्या मुलगा कुठल्याही कोचिंग क्लास शिवाय, प्रचंड गोंधळात अभ्यास करून टॉपला येतो.
कारण त्याच्या मनात परीक्षेच्या यशाच्या मार्गात कोणताही अडथळा नसतो.
तुम्ही मात्र तुमच्या मनात अनेक काल्पनिक अडथळे तयार केलेले असतात.
तर तुमच्या मनातला हा ब्लॉक काढून टाका आणि नव्या वर्षाचं नव्या उमेदीने स्वागत करा.
5) आयुष्यातल्या गोष्टी सहजपणे घडतील हे दिवास्वप्न पहाणं थांबवा.
निसर्गा विषयी तज्ञ सांगतात की निसर्ग दयाळू ही नाही किंवा निसर्ग क्रूर ही नाही तो फक्त जे घडायला हवं ते घडवतो.
तर मित्रांनो तुमचं आयुष्य सुद्धा अगदी सोप्पं वजाबाकी किंवा बेरजेचं गणित सुद्धा नाही किंवा इंजिनिअरिंग मधला अवघड फॉर्म्युला सुद्धा नाही.
आयुष्य हे आयुष्य आहे त्याला समजून घेण्यासाठी तुम्ही तुमचं स्कील वाढवा स्वतःला अपडेट करत राहा.
म्हणजे सुखाच्या वेळी तो क्षण तुम्ही एन्जॉय कराल आणि दुःखाचा क्षणी त्याच्याशी दोन हात करायला समर्थ असाल.
6) कलक्युलेटेड रिस्क घ्या
आयुष्यानं आपल्याला एक सुरक्षित वर्तुळ दिलेलं असतं. त्या बाहेरच्या परिघाची आपल्याला प्रचंड ओढ असते उत्सुकता असते.
नवीन मित्र, नवीन नाती, नवी जोखीम स्वीकारावी असं बऱ्याच वेळा तुम्हाला वाटतं. मात्र प्रत्यक्षात अशी संधी समोर आली की मात्र भंबेरी उडते.
रिस्क घेऊ का नको? या संभ्रमात संधी हातची सुटून जाते.
अगदी साधं उदाहरण म्हणजे तुमच्या आवडत्या छंदाला अपडेट करण्यासाठी तुम्ही पुढं शिकायचं ठरवता. पण त्याचं नवं वेळापत्रक त्याचा सराव आपल्याला जमेल का या काळजीनं प्रयत्नच सोडून देता आणि कम्फर्ट झोनमध्ये राहणे पसंत करता.
तर आयुष्यात एकदम पूर्ण बदलाची रिस्क न घेता हळूहळू बदल करणं हे योग्य ठरतं.
7) यशाच्या मार्गावर कोणी हात धरून नेईल याची वाट पाहणं सोडा.
आपल्या सगळ्यांच्या लाडक्या चित्रपटसृष्टीत तुमच्या आवडत्या कलाकाराचा गॉडफादर कोण असेल याची चर्चा नेहमी होत असते.
नीट बारकाईने पाहिलं तर असं लक्षात येतं की यशस्वी लोकांना कुणाच्या आशीर्वादाने ,मार्गदर्शनाने संधी मिळालेली नसते.
तर स्वतःच्या मेहनतीनं यशस्वी कलाकारानं संधी निर्माण करून यश मिळवलेले असतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा या आशेवर ती जगू नका की कोणीतरी तुम्हाला यशाचा फॉर्म्युला सांगेल आणि मग तुम्ही यशस्वी व्हाल.
तर त्यासाठी स्वतःचे कौशल्य वाढवा आणि स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा.
8) माझ्यात आत्मविश्वास काठोकाठ भरला आहे ही कल्पना सोडून द्या
काही वेळेला आयुष्य इतकं सहज सोपं सामोरं येतं की नवं पाऊल टाकताना तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आत्मविश्वासानं परिपूर्ण आहात.
अशावेळी थांबा. नवं पाऊल उचलल्यानंतर काय धोके उद्भवू शकतात याचा जास्तीत जास्त विचार करा मगच पाऊल उचला.
त्यानंतर येणारे चांगले-वाईट अनुभव तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढवतात.
कुठल्याही बिल्डिंगचा टॉप फ्लोअर आधी बांधत नाहीत तर बिल्डिंगच्या भक्कम पायावरच पूर्ण बिल्डिंग उभी राहते.
त्याचप्रमाणे अनुभवांच्या आधारावर तुमचा आत्मविश्वास वाढतो. तो एकदम तयार होत नाही हे लक्षात घ्या.
9) एखाद्या गोष्टीचा हव्यास सोडा
आयुष्यात एखादा टप्पा तुम्ही पूर्ण करता. जसं की घर, गाडी, फर्निचर त्यानंतर त्यातलं लेटेस्ट डिझाईन, त्याचा हव्यास, आणखी सुंदर आणखी चांगलं हवं असा अट्टाहास सुरू होतो.
यामध्ये तुमचं समाधान कापरासारखा उडून जातं. उरतो तो केवळ संघर्ष. त्यासाठी एका ठराविक मर्यादेनंतर प्रलोभनांना नाही म्हणायला शिका.
काहीच धावपळ न करता जे आहे ते स्वीकारून आयुष्य जगणं किंवा आणखी चांगलं, याचा अट्टाहास ही दोन टोकं झाली. यातला बॅलन्स साधायला शिका. हव्यास मात्र कटाक्षाने टाळा
10) तुमचा ज्ञान हा शेवटचा शब्द हा केवळ तुमच्या कल्पनेतला समज सोडायला शिका.
एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही ज्ञान मिळवलेलं असतं यात शंकाच नाही पण ज्ञान हे मर्यादित स्वरूपात नसतं हो मित्रांनो, ज्ञानाचा महासागर असतो.
त्यातलं ओंजळभर पाणी फक्त तुमच्याकडं असतं हे नेहमी लक्षात ठेवा.
नवनवीन ज्ञान घ्यायला, नवं शिकायला तयार राहा.
आता भारतीय शास्त्रीय संगीतातले मोठे मोठे कलाकारच पहा, ते आयुष्यभर संगीत सेवा करूनही विनम्रपणे सांगतात मी संगीताचा केवळ विद्यार्थी आहे. तेंव्हा त्यांना या ज्ञानाच्या महासागराची कल्पना आलेली असते.
तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर कोणतंही सॉफ्टवेअर नवनव्या व्हर्जनमधूनच अधिकाधिक सोपं, निर्दोष करण्याचा प्रयत्न करतात. पहिल्याच प्रयत्नात कोणतंही सॉफ्टवेअर परफेक्ट बनवणं अशक्य असतं.
तर मित्र-मैत्रिणींनो आयुष्यात काही चुकीच्या गोष्टी कवटाळून घेऊन तुम्ही एकाच जागी अडकू शकता.
पाणी जेंव्हा प्रवाही असतं तेंव्हाच ते स्वच्छ आणि नितळ असतं. त्यामुळे स्वतःला घडवण्याचा प्रवास चालू ठेवा.
आयुष्य आनंदाने जगा, उपभोगा नवं शिका नवे अनुभव घ्या आणि समृद्ध व्हा.
हो,पण या नव्या वर्षात तुम्ही स्वतः मध्ये कोणता बदल करणार आहात किंवा केलेला आहे हे आम्हाला कमेंट मधून जरूर कळवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Hii.. Sir मी १२ विला आहे आणि मला १०. विषयावर सुधारणा करायची आहे..