टोमॅटो हे खरेतर पेरू, कोलंबीया, बोलिव्हिया या देशातून आलेले फळ.
हो, बरोबर शास्त्रीय दृशिकोनातून बघितले तर टोमॅटो हे एक फळच आहे.
पण त्याच्या चवीमुळे किंवा ते ज्या पद्धतीने स्वयंपाकात वापरले जाते त्यामुळे त्याला भाजी मानले जाते.
टोमॅटोबद्दल आणखी एक रोचक गोष्ट अशी आहे की साधारण १८०० सालापर्यंत उत्तर अमेरीकेत टोमॅटोला विषारी फळ समजायचे आणि त्याचा वापर शोभेचे झाड म्हणून केला जायचा.
साधारण त्यापुढच्या काळात या टोमॅटोचा व्यापार होऊन तो जगभरात पोहोचला.
टोमॅटो जसा जगभरात पोहोचला तसा तो प्रचंड लोकप्रिय झाला आणि आता जगातील बहुतांश देशांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टोमॅटो अगदी पुरेपूर वापरला जातो.
टोमॅटो सॉस, केचप, प्युरे हे तर अनेक पशात्य देशातल्या जेवणातले मुख्य घटक.
आपल्याही आहारात कोशिंबीर ते भाज्यांची ग्रेव्ही सगळ्यात टोमॅटोचा सढळ हाताने वापर केला जातो.
तर या आपल्या फ्रीजमध्ये अगदी हक्काची जागा घेऊन बसलेल्या टोमॅटोबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे?
टोमॅटोमध्ये असे कोणते घटक, पोषणद्रव्ये असतात ज्याचा आपल्या शरीराला फायदा होतो याबद्दल उत्सुकता आहे?
मग हा लेख तुमच्यासाठीच आहे.
टोमॅटोचे आपल्या आरोग्यासाठी होणारे फायदे या लेखात वाचा.
१. आरोग्यपूर्ण भाजी
टोमॅटमध्ये भरपूर मिनरल्स आणि व्हिटामिन असतात.
यामध्ये फायबरचे प्रमाण पण जास्त असते. याच बरोबर टोमॅटमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते.
एका मध्यम आकाराच्या टोमॅटमध्ये फक्त २५ कॅलरी असतात.
टोमॅटोमध्ये व्हिटामिन ‘ए’, ‘सी’, ‘बी-2’ हे जास्त प्रमाणात आढळतात.
यामध्ये antioxidants चे प्रमाण जास्त असते.
हे antioxidants आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात.
म्हणजेच आपल्या शरीरातील पेशींचे रक्षण करून त्यांना नुकसान पोहोचू नये यासाठी ते कार्यरत असतात.
पोटाशीयम हे खनिज सुद्धा टोमॅटोमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळते.
आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी हे खनिज अत्यंत महत्वाचे असते.
त्याचबरोबर यामुळे आपल्या स्नायूंची कार्यक्षमता सुद्धा सुधारते.
२. ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगला
टोमॅटोच्या नियमित सेवनाने ह्रदयाचे आरोग्य सुधारते.
कसे ते आपण बघूया.
टोमॅटोमध्ये लायकोपीन हे कॅराॅटीनाॅइड आढळते.
टोमॅटोचा लाल भडक रंग याच लायकोपीनमुळे येतो.
हे लायकोपीन आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.
यामुळे ह्र्दय विकारांचा धोका कमी होतो.
ह्रदयाचे आरोग्य राखायचे काम लायकोपीन दोन प्रकारे करते.
एकतर यामुळे फॅट रक्त वाहिन्यांमध्ये साठून राहत नाहीत.
जेव्हा काही कारणाने हे फॅट आपल्या रक्त वाहिन्यांमध्ये साठून राहतात तेव्हा ह्रदयाला व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही आणि यामुळे ह्र्दयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.
लायकोपीनचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे LDL ज्याला आपण बॅड कोलेस्टेरॉल म्हणतो त्याची पातळी कमी होण्यासाठी मदत होते.
याशिवाय आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी आपल्या शरीरात सोडियम आणि पोटाशियम या दोन्ही खनिजांचा समतोल असणे गरजेचे असते.
आपल्या ह्रदयाच्या आरोग्याला सोडीयम हानिकारक असते.
टोमॅटोमध्ये पोटाशीयम जास्त प्रमाणात आढळत असल्याने या दोन्ही खनिजांचा समतोल व्यवस्थितपणे राखला जातो आणि सोडीयमचा आपल्या ह्रदयाच्या आरोग्यावर होणारा धोकादायक परिणाम कमी होतो.
३. हाडांच्या आरोग्यासाठी चांगला
लायकोपीनमुळे आपली हाडे बळकट होतात.
यामुळे वाढत्या वयाबरोबर होणारे हाडांचे त्रास होत नाहीत.
जसेजसे वय वाढत जाते तशी आपली हाडे कमजोर आणि ठिसूळ व्हायला लागतात.
याला ओस्टीओपोरॉसीस असे म्हटले जाते.
लायकोपीनमुळे वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या ओस्टीओपोरॉसीस चा धोका कमी होतो.
महिलांना मेनापॉज नंतर गुडघेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते.
अशा महिलांनी जर आपल्या आहारात टोमॅटोचा वापर वाढवला तर गुडघेदुखीचा त्रास कमी व्हायला मदत होते.
४. डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला
टोमॅटोमध्ये व्हिटामिन ‘ए’ जास्त प्रमाणात असतात. व्हिटामिन ‘ए’ हे आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते.
यामुळे आपल्या डोळ्यातील रेटीनाची कार्यक्षमता वाढते. टोमॅटोच्या नियमित सेवनाने रातांधळेपणाचा धोका सुद्धा कमी होतो.
टोमॅटोमध्ये बीटा कॅराॅटीन सुद्धा जास्त प्रमाणात असतात.
या बीटा कॅराॅटीनचे आपल्या शरीरात गेल्यावर व्हिटामिन ‘ए’ मध्ये रुपांतर होते.
म्हणूनच व्हिटामिन ‘ए’ आणि बीटा कॅराॅटीन हे दोन्ही जास्त प्रमाणात असणारा टोमॅटो डोळे निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतो.
५. पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयोगी
साधारणपणे सगळ्याच ताज्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.
त्यांच्या नियमित सेवनाने आपली पचनशक्ती सुधारते.
टोमॅटोमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात.
यामुळे आपली पचनशक्ती सुधारते. आपल्या आहारात जर फायबरचे प्रमाण जास्त असेल तर आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा ते चांगले असते.
फायबरमुळे आपले पोट सुद्धा लवकर भरते.
त्यामुळे ज्यांना डायबेटीस आहे, वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी या प्रकारचा आहार लाभदायक ठरतो.
६. त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक
आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी व्हिटामिन ‘ए’ आणि ‘सी’ची आवशक्यता असते.
टोमॅटोमध्ये हे दोन्ही व्हिटामिन जास्त प्रमाणात असतात.
व्हिटामिन ‘सी’ मुळे आपली त्वचा तरुण दिसण्यासाठी मदत होते.
जखम भरून यायला सुद्धा व्हिटामिन ‘सी’ हे एक महत्वाचे व्हिटामिन आहे.
व्हिटामिन ‘ए’ हे जास्त करून anti ageing च्या ट्रीटमेंटमध्ये वापरले जाते.
म्हणजेच आपली त्वचा तजेलदार दिसण्यासाठी तसेच त्वचेवर सुरकुत्या पडू नयेत यासाठी व्हिटामिन ‘ए’ लाभदायक असते.
म्हणूनच टोमॅटोचे नियमितपणे सेवन हे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते.
७. कॅन्सरपासून बचाव करते
टोमॅटोमध्ये आढळणाऱ्या लायकोपीनमुळे प्रोस्टेट, फुफुस, पोट, आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.
ब्रेस्ट आणि सरवायकल कॅन्सरचा धोका सुद्धा यामुळे कमी होतो.
प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी टोमॅटो विशेष फायदेशीर असतो कारण टोमॅटोमध्ये आढळणारे सॅपोनीन हे द्रव्य प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींचा प्रसार रोखते.
८. स्नायू आणि नसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
पोटाशीयम हे खनिज आपल्या स्नायूंच्या आणि नसांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते.
पोटॅशीयममुळे आपल्या ह्रदयाचे ठोके नियमितपणे पडतात म्हणजेच यामुळे आपल्या ह्रदयाच्याकार्यात नियमितपणा येतो.
एखाद्या पदार्थाचे इतके फायदे आहेत म्हणून त्याचे खूप प्रमाणात सेवन करणे हे सुद्धा चांगले नाही.
कोणत्याही पदार्थाचे प्रमाणाबाहेर सेवन हे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
टोमॅटोमध्ये आढळणाऱ्या लायकोपीनचे इतके फायदे असले तरी त्याच्या अति सेवनाचे धोके सुद्धा आहेत.
आपण टोमॅटो जर जास्त प्रमाणात खाल्ला तर आपल्याला पोट दुखी, मळमळने, जुलाब होणे यासारखे त्रास होण्याची शक्यता असते.
आपल्या आहारात समतोल राखणे महत्वाचे असते ते याच साठी.
म्हणूनच टोमॅटोचे जास्तीतजास्त फायदे मिळवण्यासाठी त्याचे योग्य प्रमाणात सेवन करावे, जेणेकरून आपले एकूण आरोग्य सुधारेल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.