मानवी शरीर म्हणजे एक अजब यंत्रणा आहे. लाखो पेशी, रक्तवाहिन्यांचे जाळे, अनेक अवयव न चुकता आपापली कामं पार पाडतात आणि हे शरीररुपी यंत्र वर्षानुवर्षे कार्यरत ठेवतात.
पण काही वेळा कुठेतरी काहीतरी चुकतं आणि मग शरीर तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही संकेत देऊ लागतं.
ही लक्षणं वेळेत ओळखून तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला तर आजार गंभीर होत नाही.
या लेखातून खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अशीच सहा लक्षणं ज्यातून शरीर तुम्हाला काहीतरी सांगू पहातंय !!!
जाणून घेऊया या सहा संकेतांची अधिक माहिती.
१. तुमचे डोळे कोरडे पडले आहेत का?
डोळ्यांमध्ये अश्रू ग्रंथी असतात. त्यातून स्त्रवणाऱ्या अश्रूंमुळे आपले डोळे ओलसर रहातात.
पण जर डोळे शुष्क झाले असतील तर निश्चितपणे काही बिघाड झाला आहे हे लक्षात येते.
याची अनेक कारणे आहेत पण मुख्य कारण म्हणजे तुम्ही खूप जास्त वेळ मोबाईल किंवा कॉम्प्युटर स्क्रीन कडे एकटक पहात असाल तर डोळे कोरडे पडतात.
असं असेल तर अधूनमधून डोळ्यांना विश्रांती द्या. पण काही वेळा याची कारणे गंभीर असू शकतात.
शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाली तर sjogren’s syndrome नावाचा आजार होतो ज्यात डोळे दीर्घ काळ शुष्क होऊन जातात.
२. तोंडाला दुर्गंधी येणे.
जेवणानंतर काही काळ तोंडाला वास येणे हे नैसर्गिक आहे. स्वच्छतेची सवय, व्यवस्थित ब्रश करणे, किंवा माऊथ फ्रेशनर वापरून ही समस्या दूर करता येते.
परंतु जर कोणत्याही उपायाने ही दुर्गंधी जात नसेल तर त्यामागे दडलेले कारण वेळीच शोधले पाहिजे.
दातांचे किंवा हिरड्यांचे आजार हे याचे कारण असू शकते. दातांच्या फटींमधे साचणारे बॅक्टेरीया दात व हिरड्या कमजोर बनवतात.
म्हणून वेळीच आपल्या डेंटिस्टचा सल्ला घेऊन ही लक्षणे अजून गंभीर होण्याच्या आतच त्यावर उपचार सुरू करा.
३. तुम्हाला अधूनमधून भरपूर घाम फुटतो का?
घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित केले जाते.
भरपूर व्यायाम केला की अंगातून घाम निघतो. काही लोकांना भीती किंवा टेन्शन मुळे घाम फुटतो.
पण अशी काहीच कारणं नसताना जर तुम्हाला अचानक भरपूर घाम येत असेल तर शरीर नक्कीच तुम्हाला काही संकेत देत आहे.
हृदयरोग किंवा चयापचय क्रिया बिघडणे, काही प्रकारच्या कॅन्सर मधे भरपूर घाम येणे हे लक्षण दिसते.
म्हणून जर तुम्ही विनाकारण घामाने भिजून जाताय तर ताबडतोब डॉक्टरना भेटा आणि याचे कारण जाणून घ्या.
४. तुम्हाला थंडी वाजली की बोटांचा रंग बदलतो का?
रेनॉड्स डिसीज नावाच्या रोगात शरीरातील रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते आणि बोटांपर्यंत रक्त पोहोचत नाही.
त्यामुळे बोटांची पेरं आधी फिकट पांढरी आणि नंतर निळसर दिसतात.
तुम्हाला थंडी वाजली की बोटांचा रंग बदलत असेल तर या रोगाची शक्यता लक्षात घेऊन त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घ्या.
५. तुमचे वजन अनपेक्षितपणे कमी किंवा जास्त होतेय का?
यामागे अनेक गंभीर आजार असू शकतात.
कॅन्सरचे पूर्वलक्षण म्हणून झपाट्याने कमी होणारे वजन दिसते किंवा भराभर वजन वाढते तेव्हा थायरॉईडची शक्यता असते.
त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही यावर उपाय कराल तेवढेच पुढे होणारा त्रास वाचेल.
गंभीर आजार लवकर ओळखता आले तर उपचारासाठी जास्त वेळ मिळतो.
६. तुमच्या नखांची वाढ विचित्र पद्धतीने होत आहे का?
नखांची वाढ पसरट पद्धतीने, फुगीर आकारात होत असेल तर त्याला क्लबिंग असे म्हणतात.
हे फुफ्फुसांच्या आजाराचे लक्षण आहे.
क्लबिंग मधे बोटांचे टोक सुद्धा फुगलेले दिसते आणि नखे त्या फुगीर भागासभोवती वाढतात.
अशावेळी लगेच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या.
शरीराचे संकेत समजून घ्या, गंभीर आजार टाळा.
तुम्ही धावपळीच्या जीवनात आपल्या शरीराकडे सजगपणे लक्ष देत नाही.
किंवा कदाचित काही वेळा दुर्लक्ष सुद्धा करता. पण शरीर मात्र प्रत्येक लहान सहान बदलांची न चुकता दखल घेत असते.
आणि त्यांचे रिपोर्टिंग प्रामाणिकपणे तुम्हाला करते. आजार लहान असो की मोठा तुम्हाला काही संकेत देऊन सावध करण्याचे काम शरीर करत असते.
म्हणूनच या लक्षणांची किंवा संकेतांची वेळीच दखल घ्या. आपल्या शरीराप्रती कृतज्ञ राहून त्याने दिलेल्या संकेताबद्दल त्याचे आभार माना.
हा लेख उपयुक्त वाटला तर लाईक व शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.