आज आपले प्रत्येकाचे आयुष्य हे धावपळीचे झाले आहे. नोकरी, शिक्षण, व्यवसाय अशा एक ना अनेक गोष्टींमुळे आपण आयुष्यात व्यस्त होत चाललो आहोत.
याच धावपळीच्या जगण्यामुळे आपले आपल्या आरोग्याकडे देखील अनेक वेळा दुर्लक्ष होत असते.
धकाधकीच्या जीवनात आपल्या कुटूंबातील एखादी व्यक्ती कधी आजारी पडेल सांगता येत नाही. कधी कोणती घटना घडेल ते सांगता येत नाही.
औषध-उपचारांचा खर्च देखील आज लाखोंच्या घरात जातो. अशा वेळेस उपयोगी पडतो तो म्हणजे आरोग्य विमा.
तरूण वयात विमा काढणे नेहमी फायदेशीर ठरत असते. तरूण वयात विम्याचे हफ्ते देखील कमी असतात व तरूण वयात शक्यतो कोणताही आजार नसल्याने, विम्याची पुर्ण सुरक्षा देखील मिळते.
वय वाढल्यावर विमा काढल्याने, विमा हफ्ता देखील अधिक असतो व जर काही आजार असेल तर त्या आजारांना विमा क्षेत्राच्या बाहेर देखील ठेवले जाते. त्यामुळे तरूण वयात विमा काढणे नेहमीच फायदेशीर ठरते.
आरोग्य विमा खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असतेच पण त्याच बरोबर विम्याचे नुतनीकरण म्हणजेच Renewal करताना देखील अनेक बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.
अनेक वेळा आपण आरोग्य खर्चाकडे दुर्लक्ष करत असतो. जाणून घेऊ या की, आरोग्य विम्याचे नुतनीकरण करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
१. नुतनीकरणाची तारीख
विम्याचे नुतनीकरण हे आपले सर्वात महत्त्वाचे काम असले पाहिजे. नुतनीकरणाची तारीख लक्षात ठेवून त्या तारखेच्या आत नुतनीकरण केले पाहिजे.
काही विमा कंपन्या नुतनीकरणाची तारीख निघून गेल्यानंतर देखील नुतनीकरणासाठी काही दिवसांचा कालावधी देत असतात. मात्र त्या वाढवून दिलेल्या कालावधीमध्ये विमा कंपनी कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण देत नाही.
त्यामुळे आरोग्य विमा नुतनीकरणाची तारीख निघून जाण्याआधी नुतनीकरण केले पाहिजे.
२. नवीन आजारपणाबद्दल माहिती
जर तुम्ही अथवा कुटूंबातील एखाद्या सदस्याला एखादा आजार असेल, तर त्याची माहिती विमा कंपनीला द्यावी.
जेणेकरून, विमा कंपनी तुम्हाला चांगला विमा प्लॅन प्रदान करून शकेल. नवीन आजारपणाची माहिती लपवली तर पुढे जाऊन काही वेळेस विमा संरक्षण देखील मिळत नाही.
त्यामुळे नुतनीकरणावेळेस नवीन आजाराची माहिती विमा प्रदान करणाऱ्या कंपनीला प्रामाणिकपणे द्यावी.
३. कुटूंबातील सदस्यांच्या संख्येत बदल
आरोग्य विम्यामध्ये कुटूंबातील सदस्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी नुतनीकरण ही सर्वोत्तम वेळ असते. आई-वडील, मुले अथवा कुटूंबातील एखाद्या सदस्याचे नाव नुतनीकरणावेळेस विम्यामध्ये समाविष्ट करणे फायदेशीर ठरते.
यामुळे करामध्ये देखील जास्त सवलत मिळते.
४. विम्याच्या राशीत बदल
विमा नुतनीकरणावेळेस विम्याच्या राशीमध्ये देखील बदल करता येत असतो. अशावेळेस कुटूंबाच्या खर्चानुसार व गरजांनुसार विम्याच्या राशीत वाढ करता येते. ज्याचा फायदा नंतर होऊ शकतो.
५. कुटूंबातील सदस्यांना माहिती देणे
विमा नुतनीकरण केल्यानंतर त्याची माहिती कुटूंबातील सदस्य, आई-वडील, मुले यांना नक्की द्यावी. तसेच, जर विम्यामध्ये काही बद्दल केले असतील तर त्याचीही माहिती सदस्यांना द्यावी.
६. प्लॅनमध्ये बदल
काही कारणामुळे जर तुम्हाला सध्याची विमा पॉलिसी योग्य वाटत नसेल अथवा त्यामध्ये बदल करायचा असेल तर नुतनीकरण ही योग्य वेळ असते.
बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पॉलिसीजची तुलना करून, त्यानंतर योग्य ती पॉलिसी निवडली पाहिजे. योग्य पॉलिसीची निवड केल्याने तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.
७. नियम आणि अटींमधील बदल समजून घ्या
कंपनी अथवा सरकारच्या धोरणांमुळे आरोग्य विम्यातील नियम व अटींमध्ये बदल होऊ शकतो. आणीबाणीच्या वेळेस नियमांमधील बदल झाल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे नुतनीकरणावेळेस विम्याचे नियम आणि अटीमध्ये झालेले बदल जाणून घेणे गरजेचे आहे.
८. कागदपत्रे तयार ठेवावी
आरोग्य विमा नुतनीकरण करताना आवश्यक कागदपत्रांची गरज लागत असते. नुतनीकरणावेळेस विमा नुतनीकरणाची नोटिस, विमा क्रमांकाची आवश्यकता असते. अशावेळेस कागदपत्रे जवळ असणे गरजेचे असते.
९. विमा कंपनीत तुम्ही बदल करू शकता
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) नुसार विमा धारक आता विमा कंपनी बदलू शकतो. नुतनीकरणावेळेस जर काही कारणामुळे विमा प्रदान करणारी कंपनी अयोग्य वाटत असेल, तर तुम्ही तिच विमा पॅालिसी दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करू शकता.
दुसऱ्या कंपनीकडे पॅालिसी पोर्ट केल्याने विम्यामध्ये कोणताही बदल होत नसतो. विमा पोर्ट केला तरीही विम्यामध्ये असणारे आधीचे सर्व फायदे तुम्हाला मिळतात.
आरोग्य विमा नुतनीकरण करताना या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला विम्याचा जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल.
सौजन्य : www.arthasakshar.com
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुप महत्वाची व उपयुक्त माहिती दिली.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुप उपयुक्त माहिती. धन्यवाद 💐💐