आपली त्वचा नितळ, स्वच्छ असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं.
शरीराच्या इतर व्याधींप्रमाणेच त्वचेच्याही व्याधी असतात.
त्या होऊच नयेत यासाठी किंवा झाल्या असतील तर त्या लवकर कमी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
कारण शरीराचे इतर अवयव जितके महत्वाचे तितकीच त्वचासुद्धा महत्वाची असते.
त्वचेला जखम झाली किंवा इतर कोणता आजार झाला तर त्याचा गंभीर परिणामही होऊ शकतो.
त्यामुळे योग्य वेळी योग्य ती काळजी घेऊन आपण आपली त्वचा आणि शरीर निरोगी ठेवलं पाहिजे. खरूज, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, कुष्ठ या त्वचेच्या काही त्रासदायक व्याधी आहेत.
सोरायसिसच्या आजारात त्वचेवर लाल चट्टे येऊन पापुद्रे निघतात.
त्याजागी सतत खाज येऊ शकते.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने सोरायसिस आजार होतो.
त्यामुळे माणसाचं सामान्य स्वास्थ्य हरवून जातं.
या आजारावर औषधोपचार आहेतच. तरीही योग्य आहार पथ्य पाळल्यास हा आजार लवकर कमी होतो.
तर या लेखात आपण जाणून घेऊ की सोरायसिस असलेल्या व्यक्तिने कोणकोणती आहार पथ्य पाळावीत…
सोरायसिस ग्रस्त व्यक्तीने काय खावं
१. धान्य – जुना तांदूळ, गहू, बार्ली
सोरायसिस ग्रस्त व्यक्तीच्या आहारात जुना तांदूळ, गहू, बार्ली यांचा जरूर समावेश असावा.
२. डाळी – तूर, मूग, मसूर डाळ
सोरायसिसच्या आजारात तूर, मूग, मसूर या डाळींचा आहारात समावेश करावा.
३. फळं, भाज्या
शेवगा, पडवळ, दुधी भोपळा, दोडके, काकडी, लसूण, आलं, डाळिंब अशा भाज्या आणि फळांचा आहारात समावेश असावा.
४. इतर घटक
ओवा, सुंठ, बडीशेप, हिंग, काळं मीठ, जीरं इत्यादींचा आहारात समावेश असावा.
तसेच सोरायसिस ग्रस्त व्यक्तीने नेहमी कोमट पाणी प्यावं.
सोरायसिस आजार असल्यास काय खाऊ नये
१. धान्य – नवीन धान्य, मैदा
सोरायसिसच्या आजारात कोणतही नवीन धान्य, मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत.
२. डाळी – हरभरा, वाटाणा, उडीद
हरभरा, वाटाणा, उडीद या डाळींचे पदार्थ वर्ज्य करावेत.
३. फळं, भाज्या
टोमॅटो, वांगी, बटाटा, लिंबू, संत्र, द्राक्ष, कंदमुळे अशा भाज्या आणि फळं खाणं टाळावं.
४. इतर पदार्थ
दही, मासे, गुळ, दूध, खारट पदार्थ, कोल्ड्रिंक, अशुद्ध पाणी अशा गोष्टी सोरायसिस असलेल्या व्यक्तिने टाळाव्यातच.
५. तेलकट, मसालेदार पदार्थ, मांसाहार, दारू
फास्टफूड, जंकफूड, हवाबंद डब्यातले पदार्थ, पचायला जड असणारे पदार्थ सोरायसिस ग्रस्त व्यक्तीने अजिबात खाऊ नयेत.
६. मासे आणि दूध असा विरूद्ध आहार अजिबात घेऊ नये.
सोरायसिस झालेला असताना विशिष्ट आहारपद्धती अंगीकारावी :
सोरायसिस झालेला असताना सकाळी उठल्यावर अनुषापोटी एक दोन ग्लास कोमट पाणी प्यावं. दिवसभराचं आहारनियोजन
सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे असावं
१. सकाळचा नाश्ता ( सकाळी ०८.३० ) :
पोहे, उपमा, दलिया, मोड आलेली कडधान्यं, पोळी भाजी, फळं.
२. दुपारचं जेवण ( १२.३० – ०१.३० ) :
दोन पोळ्या भाजी, डाळ तांदुळाची खिचडी, सलाड.
३. संध्याकाळचा नाश्ता ( ५.३० – ०६.०० ) :
पौष्टिक बिस्किटे, भाज्यांचं सूप
४. रात्रीचं जेवण ( ०७.०० – ०८.०० ) :
दोन पोळ्या भाजी, डाळ तांदुळाची खिचडी
सोरायसिस झालेल्या व्यक्तीची दैनंदिनी सर्वसाधारण पुढीलप्रमाणे असावी :
- दिवसा झोपू नये.
- जेवणानंतर थोडी हालचाल करावी.
- आधीच्या खाण्याचं पचन झाल्याशिवाय दुसरं काही खाऊ नये. भूक लागल्यावर नीट खावं.
- हलका व्यायाम करावा.
- तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा.
- त्वचा कोरडी ठेवावी.
- त्वचेला कडक ऊन लागणार नाही याची काळजी घ्यावी.
- मूत्र आणि शौचाचा आवेग अडवू नये.
- उष्ण हवामानात थंड पाणी प्यावं.
सोरायसिस झाला असल्यास पुढील गोष्टी जरूर पाळाव्यात :
- दररोज योगासनं, व्यायाम जरूर करावा.
- ताजं आणि गरम जेवण घ्यावं.
- जेवताना आजूबाजूचं वातावरण शांत असावं.
- दिवसातून तीन ते चार वेळा खावं.
- अति खाणं किंवा उपाशी राहणं टाळावं.
- आठवड्यातून एक दिवस उपवास करावा.
- जेवल्यावर पोट गच्च भरणार नाही याची काळजी घ्यावी.
- जेवताना अन्न व्यवस्थित चावून शांतपणे खावं.
- जेवणानंतर थोडी हालचाल करावी.
- सूर्योदयापूर्वी ०५.३० – ०६.३० दरम्यान उठावं.
- दिवसातून दोन वेळा दात स्वच्छ करावे.
योगासनांचा फायदा :
सोरायसिस लवकर कमी होण्यासाठी योगासनं करवी.
- भस्रिका, कपालभाती, बाह्यप्राणायम, अनुलोम विलोम, भ्रामरी, उदगीथ, उज्जायी इत्यादी प्राणायम प्रकार करावे.
- सूक्ष्म व्यायाम, पश्चिमोत्तानासन, हलासन, मर्कटासन, हलासन इत्यादी योगासनं करावी.
आपल्या जीवनशैलीत योग्य बदल केला तर सोरायसिस सारखा आजार नक्कीच कमी होऊ शकतो.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.