विटामीन बी १२ च्या कमतरतेमुळे होणारा ऍनिमिया म्हणजे काय?
ऍनिमिया म्हणजे अशक्तपणा, शरीरात रक्ताची कमतरता असेच आपण समजतो.
परंतु ऍनिमिया होण्याची अनेक कारणे आहेत. रक्तातील वेगवेगळ्या घटकांच्या कमतरतेमुळे ऍनिमिया होऊ शकतो.
उदाहरणार्थ लोह कमी असेल, लाल रक्तपेशी कमी असतील किंवा हिमोग्लोबिन कमी असेल तर ती व्यक्ति ऍनिमियाने ग्रस्त आहे असे समजले जाते.
ह्यापैकी ऍनिमिया असण्याचे एक कारण म्हणजे लाल रक्तपेशी कमी असणे.
हे कशामुळे होते आणि त्यावर मात कशी करता येईल हे आज आपण पाहणार आहोत.
रक्तात पुरेशा सशक्त लाल रक्तपेशी नसणे हे विटामीन बी १२ च्या कमतरतेमुळे घडते.
जेव्हा शरीरात लाल रक्तपेशी कमी असतात तेव्हा शरीरातील सर्व अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे अशक्तपणा जाणवणे, थकवा येणे आणि आणि दम लागणे अशी लक्षणे दिसून येतात.
विटामीन बी १२ च्या कमतरतेमुळे होणारा ऍनिमिया नक्की कसा होतो?
१. आपल्या अन्नातून जर पुरेसे विटामीन बी १२ मिळत नसेल तर हा बी १२ च्या कमतरतेमुळे होणारा ऍनिमिया होऊ शकतो.
सहसा दूध, दही, अंडी, आणि मांसाहारी पदार्थांमध्ये बी-१२ भरपूर प्रमाणात असते.
जर आपले शरीर अन्नातून मिळणारे बी १२ विटामीन शोषून घेऊ शकत नसेल तर आपल्या शरीरात त्याची कमतरता होऊ शकते.
तसेच वयस्कर लोकांमध्ये ही कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येते. शाकाहारी लोकांमध्ये ही कमतरता असण्याचे प्रमाण जास्त आहे.
२. फक्त आहार हेच ह्या ऍनिमियाचे कारण नाही. जर एखाद्या व्यक्तीला ऑटोइम्यून डिसीज असेल, म्हणजेच त्या व्यक्तीचे शरीर स्वतःच त्याच्या प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पेशींना मारक असेल तर असा ऍनिमिया होऊ शकतो.
३. काही कारणाने शस्त्रक्रिया करून आतडयाचा काही भाग काढावा लागला तरी देखील अशा प्रकारचा विटामीन बी १२ च्या कमतरतेमुळे होणारा ऍनिमिया होऊ शकतो.
४. विशिष्ट प्रकारचे इन्फेक्शन्स किंवा एचआयव्ही सारखे आजार झाले असल्यास देखील हा ऍनिमिया होऊ शकतो.
५. आपल्या आतडयात वाईट बॅक्टीरिया असतील तरीही अशा प्रकारच्या ऍनिमियाचा धोका असतो,
६. पोटात जंत असतील तर हा आजार होऊ शकतो.
असा ऍनिमिया झाला आहे हे कसे ओळखावे? त्याची लक्षणे काय आहेत?
ऍनिमियामुळे वारंवार थकवा येणे आणि दम लागणे ही प्रमुख लक्षणे दिसून येतात.
त्याव्यतिरिक्त खालील लक्षणे दिसून येतात.
१. त्वचा पिवळसर आणि निस्तेज दिसते.
२. नेहेमी चक्कर आल्यासारखे वाटते.
३. अजिबात भूक लागत नाही. अन्नावरची वासना उडते.
४. वजन झपाट्याने कमी होते.
५. हातापायाला मुंग्या येणे किंवा हात, पाय सुन्न होणे असे होऊ शकते.
६. हृदयगती जास्त असते.
७. स्नायू कमकुवत होतात.
८. मनःस्थिती वारंवार बदलते.
९. विसराळुपणा अथवा मनाची गोंधळलेली स्थिति आढळून येते.
१०. काही वेळा छातीत वेदना होतात.
अर्थातच वरील लक्षणे ही बऱ्याच आजारांमध्ये दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसताच मनानेच काही उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे.
डॉक्टर शारीरिक तपासणीबरोबरच काही रक्त तपासण्या करून ह्या प्रकारचा ऍनिमिया आहे का ह्याचे निदान करू शकतात.
डॉक्टर सहसा खालील रक्ततपासण्या करायला सांगतात.
१. कंप्लीट ब्लड काऊंट – ह्या तपासणीमध्ये रक्तातील लाल पेशींचे प्रमाण आणि त्यांचा आकार तपासला जातो. जर विटामीन बी १२ ची कमतरता असेल तर लाल पेशींचा आकार बराच मोठा आणि हेल्दी पेशींपेक्षा वेगळा असतो.
२. विटामीन बी १२ ची लेवल – ह्या टेस्टमध्ये शरीरातील विटामीन बी १२ ची लेवल समजून येते.
३. इंट्रिनसिक फॅक्टर अँटिबॉडीज – ह्या प्रकारचे अँटिबॉडीज शरीरात आढळले तर त्याचा अर्थ आपले शरीर बी १२ विटामीन शोषून घेण्यात कमी पडत आहे.
विटामीन बी १२ च्या कमतरतेमुळे होणाऱ्या ऍनिमियावर मात कशी करावी?
अशा प्रकारच्या ऍनिमियावर मात करणे सोपे आहे. योग्य आहार आणि टॉनिक घेऊन आपण हा ऍनिमिया घालवू शकतो. कसे ते पाहूया.
आहारात बी १२ चे प्रमाण वाढवण्यासाठी खालील आहार घ्या.
१. चिकन, मटण इत्यादी मांसाहार
२. सामन, ट्यूना ह्यासारखे मासे
३. दूध, दही, चीज
४. अंडी
५. कॉर्न फ्लेक्स, म्युसली सारखे सिरियल्स
ह्याशिवाय डॉक्टर आपल्याला काही पूरक विटामिनच्या गोळ्या अथवा इंजेक्शन लिहून देतील. त्या गोळ्या किंवा इंजेक्शन नियमित घेणे देखील आवश्यक आणि उपयुक्त आहे.
शरीरात योग्य प्रमाणात विटामीन बी-१२ असणे अत्यंत आवश्यक आहे.
बी-१२ ची कमतरता जर फार जास्त काळ राहिली तर त्याचा परिणाम आपल्या हृदय, मेंदू, हाडे आणि इतर अवयवांवर होऊ शकतो.
म्हणून वेळीच आपल्याला ही कमतरता आहे का हे ओळखून त्याप्रमाणे औषधे घ्यावीत आणि आहारात देखील योग्य बदल करावेत.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.