भविष्यातील व्यवहार ( Futures Transactions)

मागील लेखात परंपरागत पद्धतीने वायद्याचे विविध व्यवहार कसे होतात ते आपण पाहिले. या पद्धतीतील मुख्य तोटा हा की हे व्यवहार पूर्ण होतील किंवा पूर्ण न झाल्यास काही भरपाई मिळेल याची खात्री नाही. परस्परांवरील विश्वासाने ते होतात. यातील प्रत्येक करार हा वेगळा असून तो कोठे नोंदवला जात नाही. मात्र एक्सचेंजच्या माध्यमातून होणारे असे व्यवहार हे भविष्यकालीन व्यवहार आणि पर्याय व्यवहार (Futures & Options) या प्रकारच्या कराराने होतात. यात उल्लेख केलेल्या मालमत्तेची देवाण घेवाण ही एक्सचेंजच्या क्लियरींग कॉर्पोरेशनमार्फत त्याच्या नियमांनुसार होत असल्याने गुंतवणूकदाराना हे व्यवहार पूर्ण होतील याची हमी आहे.

विविध हेतूने गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार येथे मोठ्या प्रमाणात व्यवहार करीत असल्याने एकूण उलाढालीचे प्रमाण प्रचंड आहे, किंबहुना जगात सर्वाधिक आहे. यात डिलिव्हरी घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. बहुतेक व्यवहार हे भावातील फरकातून नफा मिळवणे. तोट्याचे प्रमाण कमी करणे, सट्टेबाजी अशा व्यापारी आणि व्यावसायिक हेतूने केले जातात. हे व्यवहार शेअर्स, कमोडिटी, विदेशी चलन, व्याजदर, इंडेक्स या अस्थिर किंमत असलेल्या मालमत्तेत केले जातात. यातील प्रत्येक मालमत्तेच्या व्यवहारात थोडाफार फरक असला तरी त्याचे मूलतत्व एकच आहे. ते लक्षात येण्यासाठी नमुन्यादाखल शेअर्सच्या फ्युचर्सचा विचार करूया. हा दोन व्यक्ती / संस्था यांच्यामध्ये भविष्यात ठरवलेल्या भावाने, आज केलेला करार असून तो कोणत्या शेअर्सच्या संदर्भात आहे? किती संख्येचा? कोणत्या भावाने? कधी होईल? यांचा उल्लेख असतो. तो दोन्ही बाजूना बंधनकारक असतो. उलट व्यवहार करून यातून सौदापुर्तीपूर्वी कधीही बाहेर पडता येते त्याचप्रमाणे डे ट्रेडिंगही करता येते. हे व्यवहार खरेदीदार व विक्रेता यांच्यातील संमतीने शेअर्स प्रमाणेच संगणकामार्फत होतात आणि एक्सचेंजकडे नोंदवले जातात. यातील शेअर्सचा लॉट किती शेअर्सचा असावा त्यांची मूळ किंमत किती असावी. ती किती पैशांनी कमी / जास्त कराता यावी आणि दिवसभरात कितीने वर/खाली जावू शकेल यांसाठी अनामत म्हणून दोन्ही बाजूनी किती रक्कम मार्जिन म्हणून एक्सचेंजकडे ठेवावी लागेल ते एक्सचेंजकडून निश्चित करण्यात येते. साधारणपणे शेअर्समधील फ्युचरचे व्यवहाराची पूर्तता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी केली जाते. या दिवशी एक्सचेंजला सुटी असेल तर सौदापुर्ती त्या आधीच्या दिवशी केली जाते. त्याच बरोबर तेथूनच तीन महिन्यापुढील महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सौदापुर्ती होणारे नवीन व्यवहार सुरू होतात.

उदाहरण द्यायचे झाले तर Yes Bank Ltd चा मार्च २०१८ चा फ्यूचरची सौदापुर्ती २८/०३/२०१८ रोजी झाली. २९/०३ च्या मार्च महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सार्वजनिक सुटी असल्याने ही सौदापुर्ती २८/०३ रोजी झाली. सेबीच्या नियमानुसार फ्यूचरचा एक लॉट हा किमान ५ लाख रुपये एवढा असणे गरजेचे आहे. Yes bank च्या शेअर्सचे गेल्यावर्षी विभाजन होवून त्याचे दर्शनी मूल्य ₹१०/- वरून ₹२/- झाले. त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे या शेअर्सचा एक लॉट १७५० शेअर्सचा ठरवण्यात आला आहे. शेअर्सचे बाबतीत पुढील तीन महिन्यांचे व्यवहार होत असल्याने एप्रिल २०१८ मे २०१८ चे व्यवहार पूर्वीपासून आणि जून २०१८ चे कालपासून अशा तीन प्रकारात व्यवहार चालू आहेत. यापूर्वीचे मार्च २०१८ चे व्यवहार बंद होवून जून २०१८ च्या व्यवहाराची सुरुवात झाली. या किमतीतून चालू बाजारभाव वजा केला तर येणाऱ्या किंमतीला स्ट्राईक प्राईज असे म्हणतात. ही किंमत एक्सचेंज कडून जाहीर केली जाते. यातील पुढे होणारे सर्व सौदे प्रत्येकी ५ पैसे वरखाली या भावाने होतील. ज्यांना भविष्यात भाव खाली असेल असे वाटते ते त्यांना अपेक्षित अंदाजाने लॉट विकतील तर ज्यांना भविष्यात वाढ होईल असे वाटते ते लोक त्यांना मान्य भावाने खरेदी करतील. यातील ज्यांचे सौदे जुळतील त्यांचे व्यवहार एक्सचेंजकडे नोंदवले जातील. हा सौदा करणारा खरेदीदार आणि विक्रेता दोघेही जोखीम कमी करण्यासाठी आवश्यक अनामत मार्जिन म्हणून जमा करतील. रोजच्या रोज बंद भावाप्रमाणे ब्रोकरकडून नोशनल व्यवहार झाला असे समजण्यात येवून जर रक्कम अधिक होत असेल तर परत केली जाईल किंवा कमी पडत असेल तर त्याची मागणी केली जाईल. दिवसभरात होणाऱ्या घडामोडींमुळे खरेदी / विक्री केलेल्या फ्यूचरचे भावात फरक पडेल. याप्रमाणे हा एक लॉट १७५० शेअर्सचा असल्याने एक रुपयाच्या चढ/उतारामुळे १७५० ₹ नफा/तोटा होईल. दिवसभरात १० रुपये फरक पडला तर त्यामुळे ₹१७५००/- एवढा नफा/तोटा होवू शकतो एवढे हे फायदा झाल्यास सुखकारक आणि तोटा झाल्यास दुःखदायक आहे. यावरून जितके अधिक लॉट आणि भावातील फरक तेवढे नफा-तोट्याचे प्रमाण वाढू शकते. जर तुमच्याकडे एक लाख रुपये असतिल तर Yes bank ltd चे साधारण ₹३०५/- या भावाने क्यँश मार्केट मधून ३३० शेअर्स घेता येतील. जर फ्यूचरची डिलिव्हरी घ्यायची असेल तर साधारण ₹७००००/- मार्जिन मध्ये एक लॉट म्हणजे १७५० शेअर घेता येतील तर डे ट्रेडींग करायचे असेल तर ₹३००००/- मार्जिन ला एक याप्रमाणे तीन लॉट म्हणजेच ५२५० शेअर्स खरेदी करता येवून शिल्लक राहिलेली रक्कम मार्जिन कमी पडल्यास वापरता येईल. शेअर्स मधील ₹१०/- च्या फरकामुळे कॅश मार्केट मध्ये ₹३३००/- फ्युचर डिलिव्हरीमधे ₹१७५०० /- तर डे ट्रेडिंग मध्ये ₹५२५००/- चा ब्रोकरेज वगळून फायदा अथवा तोटा होण्याची शक्यता असते.

एकाच रकमेच्या विविध व्यवहारात एवढी प्रचंड तफावत असल्याने मोठे आणि धाडसी गुंतवणूकदारच हे व्यवहार करू शकतात. सर्वसाधारण कोणत्याही गुंतवणूकदारांची मानसिकता ही तोटा करून घेण्याची नसल्याने चार, पाच दिवसात मिळालेला नफा एक दिवसात नाहीसा झाल्याचा अनुभव त्यांना येवू शकतो. त्याचप्रमाणे हे व्यवहार करण्यासाठी मार्जिन म्हणून मोठी रक्कम गुंतवावी लागत असल्याने छोट्या गुंतवणूकदारांना असे व्यवहार करण्यावर बऱ्याच मर्यादा येतात. लवकरच शेअर्सचे फ्यूचरचा एक लॉट हा ५ लाखावरून १० लाख करण्याचा प्रस्ताव सेबीच्या विचाराधीन आहे असे झाल्यास ते सर्वसामान्य गुंतवणूकदारांवर अन्याय करणारे वाटते. सट्टेबाज, मोठे गुंतवणूकदार, संस्थात्मक गुंतवणूकदार याचा वापर करून घेत आहेत. ते नेमके काय करतात? ती माहिती, आपण फ्यूचर संबधी शब्दावली, ऑप्शन्सची प्राथमिक माहिती, ऑप्शन्स संबंधी शब्दावली या विषयीची यापुढिल ३-४ लेखांतून करून घेवूयात.

वाचण्यासारखे आणखी काही…..

डिपोझिटरी रिसिप्ट (Depository Receipts)
वायद्यांचे व्यवहार (Forward Transactions)
नफा देणारे शेअर शोधण्याची गुणोत्तरे -भाग २ (How to find good Shares)

 

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “भविष्यातील व्यवहार ( Futures Transactions)”

  1. अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलं त्याबद्दल तुमचे आभार.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।