वैवाहिक जीवनामध्ये एक वळण असं येतं जिथं तुम्हांला एकटं एकाकी वाटू शकतं.
मात्र विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पुन्हा संवाद साधू शकता.
तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करू शकता.
तुमच्या नात्याला अधिक बळकटी देऊ शकता.
पती पत्नीचं नातं निरोगी पद्धतीने जोपासण्यासाठी काय करता येईल जाणून घेऊया.
1) संवाद साधा
मुक्त संवाद हा कोणतंही नात फुलण्यासाठी फार गरजेचा असतो.
तुमच्या वर काय प्रसंग ओढवला आहे, तुमच्या भावना काय आहेत याविषयी तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे.
जर बऱ्याच गोष्टी मनात ठेवत परिस्थिती पूर्वीसारखे होण्याची वाट तुम्ही बघत बसलात तर परिस्थिती सुधारण्याऐवजी चिघळत जाईल.
त्यामुळे तुमच्या जोडीदाराला तुमच्या समोर बसवा आणि मोकळेपणाने संवाद साधा.
एखाद्या गोष्टीविषयी तुमची तक्रार असेल तर ती तक्रार नेमकी कशासाठी आहे हे स्पष्ट करा.
नोकरीवरून उशिरा घरी येणाऱ्या जोडीदाराची काळजी वाटते म्हणून त्यानं उशिरा येणं त्याला किंवा तिला कमी करावं हे तुमचं म्हणणं पटवून द्या.
2) एकावेळी एकच मुद्दा मांडा
नात्यात दुरावा का निर्माण होतो? तर वेळच्यावेळी गोष्टी नीट क्लिअर न केल्यामुळं..
निघेल काहीतरी मार्ग असं म्हणत मनात गोष्टी नकळत साठवल्या जातात.
एखाद्या क्षणी प्रचंड स्फोट होतो आणि मनात खदखदणारा लाव्हा बाहेर पडतो.
अशा वेळेला वेगवेगळ्या विषयांची सरमिसळ होते आणि बऱ्याच गोष्टींवरून आरोप- प्रत्यारोप सुरू होतात.
मित्रांनो अशी परिस्थिती येऊ देऊ नका.
एकेक मुद्दा ठराविक वेळी एकमेकांशी बोलून क्लिअर करा आणि दुसऱ्या मुद्द्यासाठी संवादाची दुसरी वेळ पक्की करा.
3) जोडीदाराचा दृष्टीकोनही समजावून घ्या.
जसं एखादा मुद्दा तुम्ही मांडत असताना जोडीदारानं ते शांतपणे ऐकून घ्यावे अशी तुमची अपेक्षा असते त्याच प्रमाणे तुम्ही तुमच्या जोडीदाराचं म्हणणं शांतपणे ऐकून घेता ना ?
तुमच्या संसाराविषयी नेमका त्याचा दृष्टिकोन काय आहे हे पूर्णपणे त्याच्याकडूनच नीट समजून घ्या.
आणि जोपर्यंत तुम्हाला सगळे मुद्दे क्लिअर कळत नाहीत तोपर्यंत नाना प्रश्न विचारून हा मुद्दा क्लिअर करून घ्या.
एखाद्या गोष्टीला तुमचा जोडीदार विरोध करत असेल तर तो विरोध नेमका कोणत्या कारणामुळे आहे हे शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
4) एकत्र उपाय शोधा
संसार दोघांचा असतो दोघांनी तो सावरायचा असतो, मांडायचा असतो.
त्यामुळे विसंवादाच्या कोणत्याही मुद्द्यावरती एकतर्फी निर्णय न घेता दोघांनी एकत्र मिळून निर्णय घ्या.
कदाचित पहिल्या प्रयत्नात तुमचे सुर जुळणार नाहीत. पण निराश होऊ नका पुन्हा संवाद साधायचा प्रयत्न करा.
कदाचित थोडा जास्त वेळ लागू शकेल पण जेव्हा मनाच्या तारा जुळतील जेव्हा सुसंवाद निर्माण होईल, तेव्हा तुम्हाला संसाराची गोडी लक्षात येऊ शकेल.
कामाचा वाढलेला ताण तुमची चिडचिड वाढवू शकतो त्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीची मदत अपेक्षित आहे हे सौम्य शब्दात सांगा आणि जोडीदारालाही जबाबदारीची जाणीव करून द्या.
जोडीदार नक्की तुमच्या मदतीसाठी तयार होईल.
5) वास्तवाचा स्वीकार करा.
प्रत्येक माणसाची जडणघडण वेगळी असते आजूबाजूचा परिसर, त्यातल्या व्यक्ती, आर्थिक, सामाजिक, परिस्थितीतून आणि संस्कारातून माणूस घडत असतो.
तुमच्या जोडीदाराच्या स्वभावाचा एखादा पैलू तुम्हाला आवडला नाही तर तो त्यांनं लगेच बदलावा ही तुमची अपेक्षा चुकीची आहे.
त्यामुळे एखाद्या मुद्द्यावर दोघांचे मतभेदही होतील.
पण हे मतभेद सौम्य शब्दात मांडा मग भांडणाची पहिली वेळ असो किंवा पन्नास वेळा भांडण झालेलं असो, शब्दांची धार कमी ठेवा.
आता हेच बघा ना साधी किराणा मालाची खरेदी असते, तुमच्यासाठी एखादं दुकान सोयीचं असतं मात्र त्याच वेळेला तुमच्या जोडीदाराला त्याच्या एका ठराविक दुकानातून खरेदी करायची असते.
त्यावर भांडून कोणताच मार्ग निघणार नाही तर संवाद साधून, क्वचित माघार घेऊन मार्ग निघू शकेल.
त्यामुळे जोडीदाराला पटकन बदलायचा प्रयत्न करू नका, तर मुळात आधी तो आहे तसा त्याला स्वीकारायचा प्रयत्न करा.
6) वेळच्यावेळी माफ करा
तुमचं वैवाहिक आयुष्य सुरळीत चालावं असं तुम्हाला वाटत असेल तर राग संताप यांना सतत सहन करणे योग्य नव्हे.
जोडीदाराविषयी दुखरी भावना असेल तर त्याला त्याच्या भूतकाळाच्या वागण्याविषयी माफ करून टाका.
त्या आधी स्पष्ट बोलून, मनात काही न ठेवता तुम्ही तुमच्या जोडीदाराची मनापासून माफी मागा.
तुमचं नातं तुम्हाला टिकवायचं असेल तर एखादया वेळी तुम्ही नमतं घ्यायला काय हरकत आहे?
7) घर कामं वाटून घ्या
सध्याच्या जीवनशैलीमध्ये नवरा बायको अशा दोनच व्यक्ती राहतात.
तुम्हाला सपोर्ट सिस्टीम मिळत नसते.
अशा वेळी नोकरी, घर सांभाळणे हे सगळं महिलांना खूप त्रासदायक ठरू शकतं.
त्यात एखादं लहान मूल असेल तर कामाचा व्याप प्रचंड होतो.
यावर उपाय म्हणजे दोघांनी एकमेकांशी बोलून काम शेअर केलं पाहिजे.
काही काम एकत्र करण्यामुळे सहवासही वाढू शकतो, शिवाय मोकळेपणानं कामाची विभागणी केली तर एका व्यक्तीवरच ताण राहणार नाही.
त्यामुळे धुसफूस कमी होईल.
8) मुलांच्या संगोपना विषयी चर्चा करून निर्णय घ्या
सुखी संसाराचे रहस्य जाणून घेताना एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे सूत्र लक्षात ठेवा.
मुलांचं संगोपन हा त्यातला एक महत्त्वाचा विषय.
बर्याचदा मुलांचं संगोपन त्यांच्या विषयीचे निर्णय ही आईची जबाबदारी ठरते.
आईने घेतलेले निर्णय हे जोडीदाराकडून निमूटपणे ऐकले जातात.
त्यावेळी काही शंका असेल तर मनात ठेवली जाते. पण नंतर त्याचं रुपांतर धुसफूशीत होऊ शकतं.
त्याऐवजी सुरुवातीपासूनच डे केअर कोणतं निवडायचं? शाळा कोणती असावी? ऑफिस आणि त्याची सांगड कशी घालायची? याविषयी एकमेकांशी केलेली चर्चा जास्त फायदेशीर ठरते.
कुणा एका वरती ताण पडत नाही त्यामुळे नात्यालाही ओढ बसत नाही.
9) रोज प्रेम व्यक्त करा
भारतीय लोकांना अजूनही कृतीतून किंवा बोलून सतत प्रेम व्यक्त करता येत नाही.
ज्याच्यावर प्रेम आहे त्याची मनातून काळजी तुम्ही करता पण रोजच्या जीवनात खांद्यावर हलकेच थोपटणे, हलकीशी मिठी अशातून तुम्ही प्रेम व्यक्त केलं पाहिजे.
आपल्या जोडीदाराच्या आवडीचा पदार्थ आवर्जून सहज म्हणून आणा, कामाच्या रगाड्यात एखादा छानसा मेसेज पाठवा.
अशा गोष्टीतून नातं फुलायला मदत होते.
तुमच्या जोडीदाराला कोणत्या पद्धतीने व्यक्त होणं आवडतं त्या पद्धतीने व्यक्त होण्याचा प्रयत्न करा.
10) गुलाबी दिवसांना नवी संजीवनी द्या
लग्नं जसजसं मुरत जात तसंतसं ते रूक्ष होत जातं.
जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली नात्यांची ओढाताण होते.
तेव्हा एकमेकांशी बोलून वातावरण हळूहळू निवळत आणा तुमच्या नात्याच्या नवलाईचे दिवस आठवा.
एकमेकांना छोटी छोटी सरप्राईजेस द्या, कँन्डल लाइट डिनर अरेंज करा.
अशा छोट्या गोष्टीतून त्या गुलाबी दिवसांच्या आठवणी ताज्या ठेवा.
तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी पूर्वीइतकीच ओढ आहे हे त्याला जाणवू द्या.
- जोडीदाराच्या आवडीचा ब्रेकफास्ट करा.
- अगदी छोट्या गिफ्ट द्या.
- छोट्या गोष्टींचं कौतुक करा.
11) जोडीदाराचे गुण आठवा.
नातं तेंव्हाच त्रासदायक वाटायला लागतं जेंव्हा तुम्हांला तुमच्या जोडीदाराचे दुर्गुण सतत दिसायला लागतात.
पण लक्षात ठेवा कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते.
नाती सांभाळताना चांगल्या गुणांचं कौतुक करून आपलं नातं जोपासायचं असतं.
तुमच्या जोडीदाराचे तुम्हाला आवडणारे गुण आठवा त्याची यादी करा, जसं…
- आवाज गोड आहे, सुंदर गाणं म्हणते.
- सगळ्यांना मदतीला तयार असतो.
- शांत डोक्यानं निर्णय घेऊ शकतो.
- आर्थिक नियोजन उत्तम असतं.
12) नात्यात कुरबुर असेल तर आधी स्वतः कडे लक्ष द्या
कोणत्याही नात्यामध्ये विशेषत: नवरा-बायकोच्या नात्यात जेव्हा तक्रारी सुरू होतात तेव्हा जोडीदार मदत करत नसल्याचा राग मोठा असतो.
पण जग बदलण्याआधी स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं असतं.
तसं कुठल्याही नात्यात जोडीदाराकडून बदलाच्या अपेक्षा करण्यापूर्वी स्वतःमध्ये बदल करणं खूप महत्त्वाचं असतं.
सुरूवातीला तुमच्या कामाचं नियोजन कुठं चुकतं आहे का याविषयी खात्री करून घ्या.
तुमच्या वागण्यात काही चुकत आहे का याविषयी सुद्धा स्वतःची खात्री करून घ्या.
एकुणच नातं सांभाळणं ही दोघांची जबाबदारी आहे.
तुमच्या नात्याला पुरेसा वेळ द्या. नात्याची काळजी घ्या.
नातं तोडणं खूप सोपं आहे, पण तुम्ही हेल्दी नातं जपायचा प्रयत्न करा.
गरज पडली तर व्यावसायिक कौन्सिलरची मदत घ्या. आणि लग्नात आलेली वादळं शमवण्यासाठी प्रयत्न करा. हे सगळे प्रयत्न करून झाले तरीही जोडीदाराशी संबंध नीट न होऊ शकलेले जोडपे सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात.
अशा वेळी ‘अनहॅप्पी मॅरेज’ मध्ये सुद्धा आनंदी राहण्यासाठीचे उपाय आपण पुढच्या लेखात बघू.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.