कोरोनाचे मनावर होणारे आघात कसे टाळायचे.. पाहुया या लेखातून..

नवीन वर्ष सुरू झाले की आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता लागते की आता हे वर्ष कसे जाईल.. मात्र वर्षापासून ह्या प्रोग्रामिंगमध्ये भलतीच मोठी गडबड झालीये..

ह्यात शिरलाय व्हायरस..!!

छोटासा व्हायरस जो आपल्या सगळ्यांना त्याच्या इशाऱ्यावर नाचवतोय.. जगभर त्याचे तांडव सुरूच आहे.

आपल्या महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागतो का काय? या भीतीने सगळ्यांना घाबरवून सोडले आहे..

सगळीकडे फक्त ह्याचीच चर्चा आहे.. इतकी की ह्या कोरोना व्हायरस बद्दल ऐकून, बोलून, बघून सगळ्यांनाच खूप वीट आला आहे.. कोणतीही गोष्ट अति झाली की त्याचा वीट येतोच..

पण वीट आला तरी आपण काहीही करू शकत नाहीये.. भीतीची एक टांगती तलवार सगळ्यांच्या डोक्यावर आहेच..!!

हीच ती भीती जी आपले मन पोखरत आहे.. आपल्या कुटुंबाची चिंता, आप्तेष्टांबद्दल चिंता, शेजाऱ्यांबद्दल चिंता, पुढच्या पिढीच्या भविष्याबद्दल चिंता, आपल्या राज्याबद्दल आणि देशाबद्दल चिंता..

आणि शेवटी संपूर्ण मानवजातीबद्दल चिंता करून करून हे मन थकून गेले आहे.. भले ह्या लॉकडाऊनच्या काळात आपापले मन रिझवायला आपण कित्येक मजेदार गोष्टी करत आहोत.. पण तरीही मनामध्ये ती सुप्त भीती घर करून बसली आहेच..

ह्या भीती पोटी आपण सगळे काही अंशी विचित्रही वागतो आहे.. कोणाच्या घरात प्रचंड भांडणे होत आहेत तर कोणी मृत्यूच्या भयाने एकलकोंडा होतो आहे. कोणी आपला रोग लपवून ठेवत आहे तर कोणी नुसत्याच भीतीने खंगत आहे..

मागच्या लॉकडाऊनमध्ये घरगुती हंसाचार जो वाढलाय त्यात चक्क प्रशासनाला लक्ष घालावे लागले आणि पत्नीबरोबर भांडणाऱ्या नवरोबांना वेगळे क्वारंटाईन करून ठेवण्याचा निर्णय पुणे जिल्हा प्रशासनाने घेतला होता.

हा मनावरचा, मेंदू वरचा ताण आपल्यासाठी चांगला नाही..!! वर वर हसतमुख असलात तरी आत पोखरणारी चिंता थोडी दूर केली पाहिजे..

कोरोनामुळे येणाऱ्या काळात आर्थिक बाजू सावरणं कसं जमेल याचीही चिंता खूप जणांना छळायला लागली आहे.

जसे वर आनंदी आहात तसे मनापासून आनंदी राहणे आता सध्या गरजेचे आहे.. तुमच्यावर तुमचे कुटुंबीय अवलंबून असतील तर त्यांच्या आनंदासाठी का होईना तुम्ही टेन्शन फ्री असणे खूप महत्वाचे आहे..

तुम्हाला जगभर चाललेल्या बातम्या ऐकून कधी कधी खूप दडपण, आगतिक किंवा हेल्पलेस वाटत असेल म्हणूनच तुम्ही ह्या काही गोष्टी अंगिकरून घ्या..

आणि स्वतःच्या मनावरचे दडपण जरा कमी करा.. बघा स्वतःला काही प्रश्न विचारून.. आणि त्याची शोधलेली उत्तरे आपल्या सर्वांनाच उपयोगी ठरणार आहेत..

१. तुम्हाला खूप निराश वाटते का..??

अर्थातच सारख्या सारख्या नकारात्मक बातम्या पाहून कोणाला निराश हताश वाटणार नाही..?? हा एवढासा व्हायरस जो दिसतही नाही, तो भल्याभल्यांना जड झालाय..

आणि त्यातून आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे ते आपण जाणतोच त्यामुळे जास्तीच निराश व्हायला होत असते. सारखे काय होईल आणि कसे होईल एवढाच विचार मनात घोळत राहतो..

हे नैराश्य सध्या खूप कॉमन आहे. जगातील सगळ्याच माणसांना ह्याने त्रस्त केले आहे.. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सुद्धा निराशाच असले पाहिजे.. आपण ह्यावर नक्कीच काहीतरी तोडगा काढला पाहिजे..

ह्या साठी सोप्पे उपाय आहेत.. सगळ्यात आधी तुम्ही सरकार ने सांगितलेल्या सगळ्या नियमांचे पालन करत आहात ना ते बघा.. स्वच्छतेचे सगळे नियम पाळा..

त्यानंतर मुख्य म्हणजे त्याच त्याच गोष्टींवर मनातले मांडे खात वेळ घालवणे सोडा.. जे अजून झाले नाहीये त्यावर खूप विचार करणे सोडा..

कोणाला काय होईल मग कसे होईल हे सगळे सध्या लांब ठेवा.. सतत एकच एक नकारात्मक विचार करत राहून मनाला नैराश्याच्या खाईत लोटू नका..

बाकी खूप काही करण्यासारखे आहे त्यात मन गुंतवा.. आनंदी राहा..

२. सतत टीव्ही पाहणे, रेडिओ ऐकणे, बातम्या वाचणे हे करता का..?

मनावरचा ताण वाढवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या गोष्टी आहेत ह्या.. टीव्ही वरच्या त्याच त्याच बातम्या, रेडिओ, सोशल मीडिया वरचे भयावह वर्णन, महामारीवर चालणारे राजकारण ह्याचा सगळ्यांनाच उबग आलेला आहे. आणि ह्याने मनावर आणखी ताण येत आहे..

पण बातम्या पाहून अपडेट राहणे हेही गरजेचे आहेच.. कारण हा रोगच असा आहे त्यासाठी आपल्याला खूपच दक्ष राहणे गरजेचे आहे. मात्र दक्ष राहण्यासाठी तिन्ही त्रिकाळ आपण घवरवणाऱ्या बातम्यांचा भडिमार मनावर केला पाहिजे असे नव्हे..

बुलेटिन, हेड लाईन आणि महत्वाची माहिती देणारे शो थोडावेळ पाहिले तरी बास होते. इतर वेळी घरच्यांना वेळ द्या, स्वतःला वेळ द्या.. मनाला आनंद देणाऱ्या कार्यात मग्न व्हा.. मनःशक्ती आपल्याआपण वाढेल..

३. सतत कोणीतरी तुम्हाला नसत्या खबरी देऊन भंडावून सोडते का..??

नक्कीच..!! आपले १०-१५ व्हाट्सऍप ग्रुप असतात.. आणि त्यात कित्येक जण रिकामटेकडे बसलेले असतात.. त्यांचे एकच काम असते की दिवसभर ग्रुप वर काही ना काही सनसनाटी खबर देत राहणे..

न राहवून आपणही दिवसभर नको असलेले व्हिडीओ पाहतो, मन विचलित करणारे फोटो पाहतो.. हेही काय कमी म्हणून कोणी तरी फोन करूनच आपल्याला देशो देशाच्या बातम्या देतो..

विनाकारण आपल्या मनावर क्लेशकारक बातम्या पडत राहतात.. आणि कळत नकळत आपण उदास होत राहतो..

जरा कुठे मन रमवावं तर कोणीतरी, अरे हे ऐकलस का..?? अमुक तमुक पाहिलेस का?? म्हणून मागे लागतो..

नैराश्याजनक माहिती मिळत राहिल्याने आपल्या मनावर उगीच ओझे वाढत असते.. जे सध्या अपण टाळले पाहिजे.. कोरोना बद्दल फक्त खऱ्या सोर्सेस कडूनच माहिती घेतली पाहिजे..

आणि जो कोणी उगाच दिवस रात्र कोरोना कोरोना चे पालुपद लावून आपल्याला त्रास देत असेल अश्यांपासून जरा दूरच राहिलेले उत्तम..

हवे तर ताकीदही द्यायला मागे पुढे पाहू नका.. मनाचे स्वास्थ्य टिकवणे हे जास्ती हितावह आहे..

४. भीतीपोटी आणि नैराश्येपोटी कोणते निर्णय घेताय का..??

परदेशात भीती पोटी अराजक माजलेले पाहिल्यामुळे आपणही अशी भीती बाळगून आहोत.. ह्या भीतीपोटी आपण बऱ्याच चुकाही करत आहोत..

कोणी सगळे पैसे संपले तरी बेहत्तर म्हणून घरात कित्येक महिन्यांचे वाण समान भरून ठेवत आहे.. तर कोणी गरिबांना मदत करण्यासही घाबरत आहे..

कोणाला घरकाम नकोसे झाल्यामुळे त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येत आहे तर कोणी घरात बसून कंटाळल्याचा राग आपल्या घरच्यांवर काढत आहे..

अहो..!! आपण मोठी मंडळी असे वागू लागलो तर घरातील वृद्ध आणि लहानग्यांनी कोणाकडे बघावे..??

तेही ह्या कोरोनाला घाबरलेत.. तेही ह्या लॉक डाऊनला नक्कीच कंटाळलेत.. पण तुम्ही इतके हताश असाल तर ते कोणापुढे आपली व्यथा मांडणार..??

त्यापेक्षा आपण ही भीती जरा घालवूया ना.. सगळेच कुटुंब मिळून एकमेकांना सकारात्मकता देऊया ना..

स्वयंपाक, घरकाम, बाहेरचे काम आपापसात वाटून घेऊया ना.. सोबत एकमेकांना समजूनही घेऊया..!!

एक मोठा श्वास घेऊया आणि स्वतःला, घरातल्यांना मित्रमंडळींना सगळ्यांनाच मनाच्या तणावातून काही वेळ मुक्त कसे करता येईल ते पाहुया.. सध्या ह्याची खूपच गरज आहे..

खूपच जर चिंतेने तुमचं मन पोखरून ठेवलं तर एक करा… सगळ्या चिंता, काळजी एका कागदावर लिहून काढा…

एक खोल स्वास घ्या… आणि तो कागद कागद फाडून टाका किंवा जाळून टाका

ऐकायला बालिश वाटेल. पण एकदा करून बघा.

मुलांना, वृद्धांना कोरोना बद्दल सजग करा पण त्यांना हे दिवस लवकरच जातील असा विश्वास द्या.. त्यांच्या मनाला उभारी द्या..

कोणी कुठे आजारी असल्याचे कळल्यास त्यांच्यासाठी प्रार्थना करा.. कोणाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू शकलात तर त्याहून मोठे समाधान नाही.. असे समाधान मनाला मिळवून द्या..

पैसा कमावता येईल पण स्वतःचे आरोग्य आणि अवतीभवतीची गोड माणसे पुन्हा पुन्हा मिळत नसतात.. हे सगळेच जपा..!!

ह्या कोरोनामुळे काय चांगले घडत आहे त्याच्याकडे लक्ष द्या.. ते वाढवा आणि अंगिकारा..

हेही दिवस सरतील आणि आयुष्याचे महत्त्व कळल्यामुळे आपण सगळे पुन्हा नव्या उभारीने नव्या उत्साहाने उभे राहू ह्याची खात्री बाळगा..

एक गम्मत माहितीये? २००३ साली सुद्धा अशीच सार्स व्हायरस मुळे महामारी आली होती. पण तेव्हा सोशल मीडिया आणि इतर मीडियाचा इतका प्रभाव नव्हता. त्यामुळे ती येऊन गेली तरी तुम्हा आम्हाला त्याचा इतका फरक पडलाच. आणि तसेच हेही दिवस जातील….

चला सगळे मिळून ह्या महामारीला हरवूया.. आणि आपल्या मनाला, आपल्या लोकांना, आपल्या देशाला आणि ह्या जगाला जिंकवूया..

संबंधित लेख:

होम क्वारंटाईनच्या काळात सुरु करा तुमचा “लाईफ डिझायनिंग प्रोग्रॅम”

ह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..??

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।