चांगले समभाग (Share) म्हणजे गुंतवणूकीदाराच्या दृष्टीने अशा कंपनीचे समभाग, जी कंपनी सातत्याने नफा मिळवत असून ठराविक अंतराने गुंतवणुकदाराना बोनस म्हणजेच हक्कभाग देते, लाभांश देते. काळानूरूप आपल्या व्यवसायात बदल करून सातत्याने प्रगती करते, अश्या कंपनीचे समभाग आपल्या गुंतवणूक संचात (Portfolio) असावेत. ज्यांच्याकडे ते आहेत त्यांना ते शक्यतो विकु नयेत असे वाटते. या समभागाच्या मागणीपेक्षा पुरवठा नेहमीच कमी असल्याने त्यांच्या किंमती सातत्याने वाढत असतात.
बाजारात गुंतवणूक करणारे वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार अंदाजाने तसेच विविध मूलभूत, तांत्रिक विश्लेषणाचे सहाय्याने याचा अभ्यास करीत असतात. यासाठी कंपनीचा जमा खर्च, वार्षिक अहवाल, संचालकांच्या मुलाखती, बाजारतील बातम्या उपलब्ध सर्व माहीती याचा एकत्रितपणे अथवा स्वतंत्रपणे वापर करीत असतात.यातील काही गोष्टींशी दुसऱ्या गोष्टीचा असलेला संबध म्हणजे गुणोत्तर. यामुळे प्राथमिक अंदाज बांधता येतो. अनेक प्रकारची गुणोत्तरे तयार उपलब्ध आहेत त्यामुळे ती काढण्याचा त्रास नाही, परंतू त्यातून काय अर्थबोध घेता येतो ते महत्वाचे आहे. काही महत्वाची गुणोत्तरे यातून समजावून घेवूया.
अ. प्रत्यक्ष शेअरशी संबधित गुणोत्तरे (Ratios)
१. अर्निंग पर शेअर रेशो (E. P. S. Ratio) : अर्निंग पर शेअर रेशो, हे अतिशय प्राथमिक गुणोत्तर असून ते कंपनीला झालेला करपश्चात नफ्यास (Net Profits) शेअरहोल्डरचे ताब्यात असलेल्या (outstanding) संख्येने भागले असता मिळते .यावरून कंपनीने प्रति शेअर किती रुपये कमावले ते समजते .समजा एखाद्या कंपनीने त्यांच्या १० ₹ मूल्य असलेल्या शेअरवर १५ ₹ प्रतिशेअर कमाई केली तर प्रथम दर्शनी ती कंपनी चांगली असे कोणीही म्हणेल .परंतू या कंपनीचा नफा सातत्याने वाढतोय का? अशाच प्रकारच्या दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत (peer compering) तो किती आहे ते शोधता येते . अनेकदा कंपन्या त्यांचे सर्व समभाग विक्रीसाठी काढत नाहीत किंवा असलेल्या शेअरची पुनर्खरेदी करतात .शेअरहोल्डर ते ताब्यातील शेअर्सची संख्या विचारात घेताना हे पहाणे जरुरीचे आहे. अमुक एक इ. पी. एस. अर्निंग पर शेअर रेशो असणारी कंपनी म्हणजे चांगली कंपनी असे सांगता येवू शकत नाही. कंपनीचा व्यवसाय, उलाढाल, भांडवल गुंतवणूक, समभाग संख्या यावर त्याचप्रमाणे सारख्याच आकाराच्या दुसऱ्या कंपनी बरोबर तुलना करून कंपनी चांगली की वाईट हे ठरवता येणे शक्य आहे .
२. डायल्यूटेड EPS : हा इ पी एस काढताना करपश्चात नफ्यास एकूण शेअर्सचे संख्येने भागताना भविष्यात विविध कारणांनी वाढ होवू घातलेल्या शेअर्सची संख्या विचारात घेतलेली असते. रूपांतरणीय रोखे, वॉरंट, कर्मचाऱ्याना दिलेले स्टॉक ऑप्शन किंवा काहींना कंपनी नावारूपास आणण्याचे ऋण म्हणून दिलेले मोफत शेअर्स यांमुळे नजीकच्या काळात शेअर्सची संख्या वाढण्याची शक्यता असते यामुळेच डायल्यूटेड इ. पी. एस. (Diluted E.P.S) हा नेहमीच्या इ. पी. एस. पेक्षा कमी असतो.
लेखाचा पुढील भाग वाचा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
1 thought on “नफा देणारे शेअर शोधण्याची गुणोत्तरे- भाग १ ( How to find good Shares)”