व्यसन म्हणजे काय?
एखादी अशी गोष्ट जी केल्याशिवाय राहवत नाही.
अनेकदा आपण व्यसन हा शब्द सिगारेट किंवा दारू, जुगार याच्या संदर्भात वापरतो, पण तुम्हाला माहीत आहे का की व्यसन हे कुठल्याही गोष्टीचे लागू शकते..
टीव्ही बघण्याचे, सिनेमे बघण्याचे अगदी फोन वापरण्याचे सुद्धा व्यसन लागू शकते?
कदाचित तुमच्या नकळत तुम्हाला हे व्यसन लागले सुद्धा असेल!
आपल्या आयुष्यात स्मार्टफोन हा आता एक गरज झालेला आहे.
गेले आठ महिने तर सगळे काम, व्यवहार, मुलांचा अभ्यास, खरेदी या स्मार्टफोनवरच सुरु आहे.
त्यामुळे त्याचा वापर तर टाळता येणे शक्य नाही.
पण तुम्ही त्याचा वापर गरजेपेक्षा जास्त करत आहात का?
दिवसभरात कामा किंवा अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा सारखा फोन बघायची इच्छा तुम्हाला होते का?
कधी फोनचे चार्जिंग संपले किंवा व्यवस्थित रेंज नसेल तर अस्वस्थ झाल्यासारखे वाटते का?
काम झाल्यावर सुद्धा फोन बाजूला न ठेवता त्यात गेम खेळायची किंवा चॅटिंग करायची इच्छा होते का?
रात्री झोपायच्या पूर्वी पण थोडा वेळ फोन बघून मग तुम्ही झोपायला जाता का?
जर या प्रश्नांचे उत्तर हो असेल, तर ती चिंता करण्याची बाब आहे.
या व्यसनाचा तुमच्या आरोग्यावर इतर व्यसनांप्रमाणेच वाईट परिणाम होऊ शकतात.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
तुम्ही देखील ह्याच्याशी सहमत असालच पण व्यसने ही काही कोणी मुद्दाम लावून घेत नाही.
तुमच्या नकळत तुम्ही फोनच्या जास्त आहारी गेला असाल किंवा जात असाल तर, तुम्ही वेळीच त्यातून बाहेर पडावे यासाठी हा लेख आहे. फोनचा वापर पूर्णपणे बंद करणे तर शक्य नाही.
कामासाठी फोन हवाच, तसेच विरंगुळ्याचे साधन म्हणून पण फोने हवा.
मित्रांशी, नातेवाईकांशी संपर्कात राहायला सुद्धा फोन गरजेचा आहेच.
पण या सगळ्यासाठी फोनचा वापर करताना स्वतःसाठी सीमा कुठे आखायची हे तुम्हाला समजावे यासाठी या लेखात काही टिप्स दिल्या आहेत.
१. फोनचा वापर नक्की कशासाठी करायचा आहे ते ठरवून घ्या
खरेतर स्मार्टफोन असेल तर टीव्ही, वर्तमानपत्र, पुस्तके, बातम्या, रेडीओ, कॅमेरा यापैकी कशाचीच गरज लागणार नाही.
हे सर्वकाही आणि यापेक्षा सुद्धा अनेक गोष्टी तुम्ही काही सेकंदात, अगदी चुटकीसरशी तुमच्या फोनवर करू शकता.
फोनसारख्या या छोट्याशा उपकरणाने इतर अनेक उपकरणांना, पुस्तकांना बघता बघता मागे टाकले आहे.
आता सरळ सोपे उदाहरण द्यायचे असेल, तर समजा की तुम्हाला एखाद्या पदार्थाची रेसिपी हवी आहे तर त्यासाठी काही वर्षांपूर्वीपर्यंत पाककृतीच्या पुस्तकाचा आधार घ्यावा लागायचा.
पण आता त्या रेसिपीचे फोटो, व्हिडीओ, इतिहास, माहिती हे सगळे अवघ्या काही सेकंदात तुमच्या फोनवर उपलब्ध होते.
हे एकप्रकारे चांगले ही आहेच.
ज्या गोष्टीतून शिकायला मिळते त्या कराव्यातच, पण त्याचबरोबर तुम्ही सरसकट सगळ्याचसाठी फोनचा वापर करत नाही ना हे सुद्धा बघितले पाहिजे.
जर वरील सांगितलेल्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही फोन वापरत असाल तर ते कमी केले पाहिजे.
कोणत्या गोष्टींसाठी फोनचा वापर करायचा हे आधीच ठरवून घेतले तर नक्की फायदा होईल.
२. फोनचा वापर कधी करायचा ते ठरवून घ्या
तुम्हाला कामासाठी कदाचित दिवसभरच फोन वापरावा लागत असेल.
या बाबतीत तुम्ही स्वतःवर काहीच नियंत्रण घालून घेऊ शकत नाही.
पण जर तुम्ही काम नसताना सुद्धा सतत फोन वापरत असाल तर ती सवय तुम्हाला बंद करायला हवी.
काम झाल्यावर किंवा काम नसताना फोन आजिबातच न वापरणे हे काही शक्य नाही, पण त्यावर बंधने मात्र तुम्ही नक्कीच घालू शकता.
फोन कधी बघायचा यापेक्षा फोन कधी वापरायचा नाही याकडे जास्त लक्ष द्यावे.
उदाहरणार्थ, सकाळी, दुपारी चहा पिताना फोन बघायचा नाहीं जेवताना फोन बघायचा नाही, झोपण्याआधी फोन बघायचा नाही अशा काही मर्यादा जर तुम्ही तुमच्यापुरत्या आखून घेतल्या तर फोन गरजेपेक्षा जास्त वेळ वापरला जाणार नाही.
३. स्क्रीन टाईम कमी करा
यासाठी तुमच्या फोनमध्ये तुम्हाला ऍप्लीकेशन घेता येतात.
त्यावर तुम्ही दिवसातले किती तास मोबाईल वापरला, त्यात किती वेळ कोणते ऍप्लीकेशन वापरले याचा हिशोब मिळतो.
यामुळे तुम्हाला तुम्ही किती वेळ फोन वापरण्यात घालवला, हे तर समजतेच पण त्याचबरोबर फोन वापरताना किती वेळ तुम्ही कामासाठी वापरला, किती वेळ मित्रांशी किंवा नातेवाईकांशी संपर्कात राहण्यासाठी वापरला आणि किती वेळ त्यात वाया घालवला हे समजते.
तुमचा स्क्रीन टाईम जर जास्त होत असेल तर तो कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत.
स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी हा लेख वाचू शकता.
मोबाईलमुळे वाढलेल्या स्क्रीनटाइम चे दुष्परिणाम कमी कसे करता येतील?
४. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन नोटीफीकेशन बंद करा
फोनचा वापर जर सगळ्यात जास्त कशामुळे वाढत असेल तर तो आहे नोटीफीकेशनमुळे…
कोणाचा मेसेज आल्याचे नोटिफिकेशन, कोणी फोटो लाईक केल्याचे तर कोणी पोस्टवर कॉमेंट केल्याचे नोटिफिकेशन येत राहिले की तुम्ही ते साहजिकच उघडून बघता.
एक नोटिफिकेशन उघडून बघायचे म्हणून एकदा फोन हातात घेतला की त्यात तासभर अगदी सहज निघून जातो.
म्हणून ही नोटिफिकेशन बंद करून टाकणे हाच उत्तम पर्याय आहे.
यामुळे तुम्हाला सारखा सारखा फोन बघण्याचा मोह होणार नाही.
५. दिवसभरात एक तास तरी फोन न बघता घालवा
हे तुम्ही स्वतःला देण्याचे एक चॅलेंज आहे असे समजा.
दिवसाचे चोवीस तास काही काम नसते. त्यामुळे तुमच्या कामाचे आणि झोपेचे तास वगळून दिवसभरात एक तास तरी फोन वापरायचा नाही असे ठरवून घ्या.
या तासात फोन लांब ठेऊन इतर गोष्टी करायच्या. जसे की पुस्तक वाचणे, बागकाम करणे, स्वयंपाक करणे.
रोज असा काही वेळ तुम्ही जर फोन न वापरता घालवला तर तुम्हाला लागलेले किंवा लागत असलेले फोनचे व्यसन नक्की कमी होईल.
६. झोपताना फोन जवळ घेऊ नका
रात्री झोपताना फोन बघितल्यामुळे झोपेवर परिणाम होतो, झोप लवकर लागत नाही आणि झोप लागत नाही म्हणून वेळ घालवण्यासाठी, झोप येण्यासाठी सतत फोन बघितला जातो.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो हे एक दृष्ट चक्र आहे.
यातून बाहेर पडायचे असेल तर झोपताना हातात येणार नाही अशा अंतरावर फोन ठेवा.
यामुळे फोन बघत झोपण्याची सवय जाईल, फोनचा अति वापर होणार नाही आणि झोप सुद्धा व्यवस्थित लागेल.
फोन ही एक गरज असून तिचा गरजेप्रमाणे आणि गरजेसाठीच वापर करायला हवा.
जर तुम्ही फोन जास्त वापरत असाल तर या टिप्स वापरून तुम्ही तुमचे हे व्यसन नक्की कमी करू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुप सुंदर लेख. पण हे वाचण्यासाठी सुद्धा मोबाईल हाती घ्यावाच लागतो