तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमचा फोन, त्यामध्ये असलेला डेटा.. म्हणजे तुमचे फोटो व्हिडीओ, फोन कॉल्स, एसएमएस हे सगळे तुमच्या फोनमध्ये सुरक्षित आहेत, तुमच्याशिवाय ते कोणालाच दिसू शकत नाही तर हा तुमचा मोठा गैरसमज असू शकतो.
आजकाल या तंत्रज्ञानामुळे जशी नवनवीन उपकरणे बाजारात येत आहेत, तशीच त्यांना हॅक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुद्धा निर्माण करण्यात येत आहेत.
आपल्या आकलनाच्या बाहेर असले, तरीही तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की फोन, टॅबलेट, लॅपटाॅप असे कोणतेही यंत्र अस्तिवात नाही जे हॅक केले जाऊ शकत नाही.
त्यामुळे अशी यंत्रे वापरताना सावधान राहिले पाहिजे.
आपल्याला ‘सेफ’ वाटणाऱ्या या यंत्रामधून आपला ‘डेटा’ चोरीला जाऊन त्याचा गैरवापर होऊ शकतो.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या लेखाचा हेतू तुम्हाला घाबरवण्याचा नाही.
पण यामुळे तुम्ही सतर्क नक्की व्हाल.
तुमच्या या यंत्रांमधून तुमची माहिती चोरीला जाऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची, हे आज या लेखात तुम्हाला वाचायला मिळणार आहे.
तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण तुमच्या नकळत तुमची ही यंत्र हॅक केली जातात.
अनेकदा याचा पत्ता सुद्धा लागत नाही.
पण चोर ज्याप्रमाणे चोरीचे काही पुरावे मागे सोडूनच जातो, अगदी त्याचप्रमाणे जर तुमचा फोन हॅक झाला असेल तर त्याच्या काही खुणा मागे राहतात.
काही ऍप वापरून तुमचा फोन अगदी सहजपणे हॅक केला जाऊ शकतो.
स्पाय फोन ऍप, स्पायझी ही काही उदाहरणे आहेत.
तुम्ही जर नीट लक्ष दिले तर या खुणा तुम्ही सहज ओळखू शकाल.
ही अशी काही लक्षणे असतात जी तुमचा फोन जर हॅक झाला असेल तर दिसतात.
तुम्हाला फोन वापरताना ही काळजी कशी घ्यायची ते समजावे, फोनमधल्या बदलांकडे कसे लक्ष द्यावे, कोणत्या बदलांबद्दल काळजी करावी हे समजायला सोपे जावे म्हणून आपण आधी बघू की तुमचा फोन हॅक कशाप्रकारे केला जाऊ शकतो.
१. सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असणारे मोफत वायफाय.
तुम्ही जर तुमचा फोन अशा कोणत्या माहिती नसणाऱ्या वायफाय नेटवर्कला कनेक्ट केला, तर त्याद्वारे तुमची सगळी माहिती फोनमधून हॅकर्सन मिळवता येते.
२. सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जिंग
सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जिंगसाठी ज्या युएसबी ठेवल्या जातात, त्यांना जर तुम्ही तुमचा फोन जोडला तर त्यामधून फोनमधला डेटा चोरला जाऊ शकतो.
३. धोकादायक मेसेजेस
जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सेव्ह नसणाऱ्या एखाद्या नंबरवरून मेसेज आला, ज्यामध्ये कोणती तरी लिंक आहे तर ते धोकादायक ठरू शकते.
तुम्ही जर ती लिंक उघडून त्यावर असलेली फाईल डाऊनलोड केली तर तुम्ही तुमचा फोन हॅकर्सच्या सुपूर्त केल्यासारखेच आहे.
असे मेसेजेस बरेचदा तुम्हाला काही आमिष दाखवण्याबद्दल केलेले असतात.
मित्रांनो, वरची ही तीन उदाहरणे वाचल्यावर फोन हॅक करणे किती सोपे आहे हे तुम्हाला समजले असेलच.
या गोष्टी खरेतर साध्या वाटणाऱ्या आहेत.
कुठे फोन चार्ज करणे, वायफाय घेणे या गोष्टी आपण अगदी पटकन करतो पण त्यामुळे आपला सगळा डेटा मात्र धोक्यात येऊ शकतो.
आपल्याकडून थोडेसे दुर्लक्ष, जराशी चूक झाली तर आपणच आपला सगळा डेटा चोरीला जाण्याची संधी उपलब्ध करून देत असतो.
आपल्याला जरी ही गोष्ट आवघड वाटत असली तरी हॅकर्सना हे काम अगदी सहज करता येते.
हे सगळे कसे टाळता येईल, याइतकेच महत्वाचे आहे की फोन हॅक झाला आहे का? ते ओळखणे.
तुमचा फोन हॅक झालाय हे कसे ओळखायचे?
१. तुमचा फोन जर अचानक खूप भरभर चालू लागला तर
फोन अचानक अति वेगाने चालू लागला याचा अर्थ तो धोक्यात आहे.
जर एरवीच्या स्पीडपेक्षा अचानक तुमच्या फोनचा स्पीड वाढला तर ते गंभीर लक्षण असू शकते.
याचा अर्थ असतो की, तुमच्या फोनमध्ये तुमच्या नकळत एखादे वेगळेच ऍप चालू झाले आहे.
२. तुम्ही फोन वापरत नसताना देखील तो तापत असेल तर.
तुम्ही जर फोन वापरत असाल तर तो काही प्रमाणात गरम होणे हे अत्यंत साहजिक आहे, पण तुम्ही फोन वापरत नसालच आणि मधेच काही कारणाने तो हातात घेतल्यावर तुम्हाला तो खूप तापला असे जाणवत असेल तर नक्कीच काळजी करण्यासारखे आहे.
याचा अर्थ तुमच्या अपरोक्ष कोणीतरी तुमच्या फोनचा ताबा घेतला आहे, हे ही असू शकते.
३. अचानक चालू-बंद होणे
तुमचा फोन जर अचानक स्वीच ऑफ होऊन, स्वीच ऑन होत असेल, तुम्ही एखादे ऍप उघडले नसताना सुद्धा ते उघडले जात असेल, आपोपाप कोणालातरी कॉल लागत असतील तर या सगळ्याचा अर्थ हाच आहे की तुमचा फोन हॅक झाला असेल.
४. स्विच ऑफ होण्यात अडचण
तुम्ही जर तुमचा फोन स्वीच ऑफ करण्याचा प्रयत्न करत असाल पण तुम्हाला ते जमत नसेल तर ओळखावे काहीतरी गडबड आहे आणि फोन हॅक झाला असण्याची शक्यता आहे.
५. कॉल लॉग मध्ये अनोळखी नंबर
तुमच्या कॉल लॉग मध्ये जर तुम्हाला अनोळखी नंबर एकाएकी दिसू लागले तर त्याचा अर्थ तुमचा फोन हॅक झाला आहे.
६. क्रॉस कनेक्शन सारखे वाटणे
तुम्ही फोनवर बोलत असताना फोनमधून वेगवेगळे आवाज येणे हे पण फोन हॅक झाला असण्याची शक्यता दर्शवते.
मग आपल्या फोनची काळजी कशी घ्याची? तो हॅक होऊन त्यातील डेटा चोरीला जाऊ नये यासाठी काय करता येईल?
१. जर तुम्हाला अनोळखी मेसेजद्वारे काही अपूर्ण वाटणाऱ्या लिंक्स आल्या तर त्या क्लिक करू नका. या लिंक्स सहसा काही आमिष दाखवणाऱ्या असतात.
२. जर तुम्ही तुमचा फोन चार्जिंगसाठी एखाद्या वेगळ्या लॅपटाॅपला जोडला तर तिथे ‘only charging’ हा पर्याय निवडावा. यामुळे फोनमधला इतर डेटा जाणार नाही.
३. तुमच्या स्वतःच्या फोनमध्ये सुद्धा पासवर्ड सेव्ह करून ठेवण्याचा पर्याय निवडू नका.
४. सार्वजनिक ठिकाणी वायफाय नेटवर्क शक्यतो घेऊ नका. तुमचा फोन जर अपोआप फ्री वायफायला कनेक्ट होत असेल तर ते सेटिंग बदला.
५. कधी बाहेर वायफाय घ्यायची वेळ आलीच तर फ्री वायफाय घेऊ नये. ज्या वायफायना पासवर्ड आहेत असेच नेटवर्क निवडावेत, उदाहरणार्थ एयरपोर्टवर किंवा हॉटेलमध्ये.
६. सार्वजनिक ठिकाणीचे वायफाय घेतले असताना कधीही फोनमधून पैशांची देवाणघेवाण, बँकेचे एप उघडू नयेत.
७. फोनमध्ये antivirus इंस्टाॅल करून घ्या.
८. तुमच्या फोनला पासवर्ड ठेवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.