इराणमध्ये ‘चाबहार’ बंदर विकसित करणे भारतासाठी महत्त्वाचे का ठरले??

चीन ची जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्यावर त्यांच्या महत्वकांक्षेला पंख फुटायला लागले. त्यामुळे चीन ने आपला विस्तार आशियात वाढवायला सुरवात केली. पण त्यांच्या पुढे अडचण होती ती त्यांना टक्कर देऊ शकेल अशा एका देशाची तो म्हणजे भारत.

भारतावर अंकुश ठेवण्यासाठी चीन ने भारताचा एक नंबरचा शत्रू पाकिस्तानशी मैत्री केली. शत्रूचा शत्रू आपला मित्र ही नीती चीन ने खेळून पाकिस्तान ला आपल्या जाळ्यात अलगद ओढत नेलं. हे जाळं होतं सिपेकचं. सिपेक म्हणजे “चीन पाकिस्तान इकोनॉमिक कॉरीडोर”. चीनची अर्थव्यवस्था आज मजबूत आहे. ह्याचा फायदा घेत चीन छोट्या देशात प्रगती आणि विकासाचं स्वप्न दाखवत त्या देशातील वेगवेगळ्या प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक करतो. ही आर्थिक गुंतवणूक ही फुकट नसते तर ती कर्जाच्या स्वरूपात असते. त्यावर प्रचंड चढ्या भावाचं व्याज लावलेलं असतं. तसेच जर व्याज आणि कर्ज वसूल नाही झालं तर ते प्रकल्प चीन च्या मालकीच्या होण्याची तरतूद चीन ने करारात केलेली असते.

चीन ह्या सगळ्या गोष्टीत नेहमीच जिंकतो. कारण जर तो प्रकल्प यशस्वी झाला तर चार पट परतावा चीन ला मिळतो आणि नाही झाला तर त्याची मालकी चीन ची होते. ‘सिपेक’ ची सुरवात चीन ने पाकिस्तान च्या ग्वादर बंदराला विकसित करून २००७ मध्ये केली. बंदर विकसित करून पाकिस्तान च्या अडाणी राज्यकर्त्यांना चीनने विकासाचं गाजर दाखवलं. त्या गाजराला भुलत पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी डोळे बंद करत ‘सिपेक’ करारावर सह्या केल्या.

ह्या करारानुसार चीन ने ह्या प्रकल्पात जवळपास ६२ बिलियन अमेरिकन डॉलर खर्च केले आहेत. ह्या पूर्ण प्रकल्पात अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे. ज्यात ग्वादर बंदराचा विकास, स्पेशल इकोनॉमिक झोन (सेझ), रस्ते, रेल्वे, उर्जा प्रकल्प ह्या सर्व गोष्टी आहेत. चीन ला आफ्रिकी देशांशी जोडणारा एक मार्ग ते जगातील तेलाच्या मार्गावर आपला वचक अश्या सगळ्या गोष्टींवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं. ‘सिपेक’ च्या माध्यमातून त्याची ही उद्दिष्ठ सफल होण्याचा राजमार्ग सुरु झाला.

भारताचा मध्य आशियायी तसेच अफगाणिस्तानशी होणारा व्यापार हा आजवर पूर्णतः पाकिस्तानशी निगडीत होता. हे एक प्रमुख कारण होतं की पाकिस्तानशी व्यापारी संबंध तोडण्याची हिंमत करू शकत नव्हता. आजवर पाकिस्तान ह्याचा हवा तसा वापर करून घेत होता. त्यात ‘सिपेक’ च्या येण्याने चीन चे सुप्त मनसुबे भारताने लगेच ओळखले. भारताने कुटनितीने हालचाली सुरु केल्या. भारताने इराणशी आपले संबंध वाढवण्यासाठी इराणमध्ये ‘चाबहार’ बंदराला विकसित करण्याची कल्पना मांडली. पण तेव्हाच्या सरकारला अमेरिकेच्या इराणशी असलेल्या संबंधांमुळे गप्प बसावं लागलं. कारण इराणशी संबंध वाढवल्यास अमेरिकेशी केलेलं सिव्हील न्युक्लीअर डील धोक्यात येईलं अशी शक्यता त्यांना वाटत होती. प्रत्यक्षात कुटनीती मध्ये आपलं सरकार त्याकाळी कमी पडलं. अमेरिका आणि इराण ह्या दोघांना त्यांच्या जागेवर ठेवून भारताला आपला फायदा करून घेता आला असता पण ह्यात भारत कमी पडला.

पाकिस्तान आणि चीन चा ‘सिपेक’ आकार घेत असताना सिपेककडे पूर्ण आशियाचं गेम चेंजर प्रकल्प म्हणून बघितलं जाऊ लागलं. पण हवा बदलायला वेळ लागत नाही. २०१४ साली भारतात सरकार बदललं आणि वेगळे वारे वाहू लागले. भारताच्या दृष्ट्रीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या ‘चाबहार’ प्रकल्प कमीत कमी वेळात पुढे नेण्यासाठी भारताने कंबर कसली. पाकिस्तान ला त्याच्याच जाळ्यात अडकवण्यासाठी भारताने इराण सोबत अफगाणिस्तान ला आपल्या सोबत घेऊन मे २०१६ ला एक त्रिपक्षीय मसुदा तयार केला.

ज्यावर तिन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्या नुसार भारताने पुढल्या १८ महिन्यात ८५ मिलियन डॉलर गुंतवत ‘चाबहार’ बंदर विकसित करण्याचं ठरवलं ह्या शिवाय १५० बिलियन डॉलरचं क्रेडीट इराणला दिलं. तसेच चाबहार ते झाहेद्न मधे रेल्वे बनवण्यासाठी लागणाऱ्या १.५ बिलियन डॉलरचं मोठा हिस्सा उचलण्याचं मान्य केलं तसेच इराण इथलं इन्फ्रास्ट्रक्चर प्रगत करण्यासाठी तब्बल ६५० मिलियन डॉलर गुंतवण्याचं मान्य केलं. हे काम युद्ध पातळीवर करण्यात आलं. भारताने आपलं वजन वापरून अमेरिकेला इराण वर घातलेल्या आर्थिक निर्बंधातून चाबहार ला मुक्त ठेवण्यास भाग पाडलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे डिसेंबर २०१८ मधे भारताने इराण च्या भूमीवरील चाबहार बंदराच्या आर्थिक व्यापाराची सूत्रं आपल्याकडे घेतली आहेत.

भारत इतकी गुंतवणूक चाबहार मध्ये का करतो आहे? असा प्रश्न सामान्य माणसांना पडणं सहाजिक आहे. फक्त चीनला शह द्यायला इतके पैसे? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. भारताने ‘चाबहार’ विकसित करताना एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. ‘चाबहार’ च्या बनण्याने अफगाणिस्तानला आता पाकिस्तान सोबत व्यापार करण्याची गरज संपली आहे. त्याच्या मालाला इराण मार्गे भारताची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. ह्याचा सरळ तोटा पाकिस्तान ला झाला आहे. पाकिस्तानी ची आर्थिक नाकेबंदी करण्यात भारताने यश मिळवलं आहे. चाबहार मार्गाने भारत आता सरळ मध्य आशियातील देशांशी जोडला गेला आहे. ज्यात तजाकिस्तान सारख्या देशाचा समावेश आहे. ज्याच्यासोबत भारताचा व्यवहार मोठा आहे. भारताने समुद्री मार्गाने अफगाणिस्तान शी सबंध जोडताना पाकिस्तानशी आपला आर्थिक व्यवहार पूर्ण बंद केला आहे. ह्यामुळे सगळ्यात मोठा फटका पाकिस्तान ला दोन्ही बाजूने झेलावा लागला आहे. त्या ही पलीकडे ‘सिपेक’ ला पर्याय म्हणून पाकिस्तान सारख्या आतंकवादी पोसणाऱ्या देशाला वगळून एक समांतर रस्ता युरोपीय आणि रशिया ला आफ्रिकेशी जोडणारा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे एकेकाळी एकच व्यापार करणारं बंदर असल्यामुळे आपल्याला हवा तसा पैसा आकारता येईल ह्या चीन आणि पाकिस्तान च्या स्वप्नांना भारताने सुरुंग लावला आहे.

अफगाणिस्तान हा देश खनिज संपत्तीने ओतप्रोत भरलेला आहे. अफगाणिस्तानाच्या जमिनीत जवळपास ६० मिलियन टन तांब, २.२ बिलियन टन लोखंड, १.४ मिलियन टन रेअर अर्थ एलिमेंट जसे सोन, चांदी, पारा, लिथियम, सेरियम सारखी मूलद्रव्य आहेत. तसेच ह्या सगळ्या खनिज मालमत्तेची किंमत ३ ट्रिलीयन अमेरिकन डॉलर च्या घरात आहे. ह्या शिवाय इराण इकडे असलेल्या फर्झाद गॅस क्षेत्रात भारताने उत्सुकता दाखवली आहे. ह्या क्षेत्रात तब्बल ९.७ ट्रिलीयन नैसर्गिक गॅस उपलब्ध असण्याची शक्यता आहे. १.३ बिलियन लोकसंख्या असणाऱ्या भारताची उर्जेची गरज पुढली काही दशक भागवण्याची क्षमता ह्या दोन्ही देशांकडे असलेल्या खनिज संपत्तीकडे आहे. आजवर युद्ध आणि इतर कारणांनी तांत्रिकदृष्ट्या हे साठे उपलब्ध झाले नव्हते. पण भारतासारख्या देशाच्या व्यापारामुळे हे साठे भारतीय तंत्रज्ञान वापरून त्याचा वापर करण्याची संधी ह्या दोन्ही देशांना जोडणाऱ्या चाबहार च्या राजमार्गमुळे उपलब्ध झाली आहे.

एकेकाळी गेम चेंजर असणारा सिपेक आता गेम ओवर ठरत आहे. भारताने योग्य वेळी टाकलेल्या पावलांनी पाकिस्तानचं कंबरडं मोडलं असलं तरी चीन चा पाकिस्तान च्या भूमीवर होणारा हस्तक्षेप भारतासाठी धोक्याची घंटा नक्कीच आहे.

जय हिंद!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।