आपण इस्लामिक बँकिंग बद्दल बरंच ऐकतो आणि त्याबद्दल आपल्याला कुतूहलही बरेच असते कि व्याज न घेता न देता या बँक चालतात कशा? इस्लामिक बँकांचा मूळ हेतू हा शरिया कायद्यानुसार जास्तीत जास्त लाभ कमावणे हा आहे.
इस्लामिक बँकिंग ही सामान्य बँकिंग पेक्षा काहीशी वेगळी आहे. यामध्ये व्याज देणे आणि व्याज घेणे हे दोन्ही शरियतच्या विरुद्ध मानले जातात. कारण इस्लाम मध्ये व्याज हेच मुळात हराम मानले जातात. जगाच्या इतिहासात पहिली इस्लामीक बँक ही १९७५ साली दुबईमध्ये स्थापन झाली. तर भारतात केरळमध्ये पहिली शरियतच्या कायद्यानुसार चालणारी बँक सुरू झाली.
इस्लामिक बँकिंग म्हणजे काय?
इस्लामिक बँकेचा मूळ उद्देश हा सामान्य बँके सारखाच असतो पण ती शरियतच्या कायद्यानुसार गठीत केलेली असते. यामध्ये ग्राहकांच्या जमा असलेल्या पैशावर व्याजही दिला जात नाही आणि त्यांनी घेतलेल्या कर्जावर बँक व्याज घेत सुद्धा नाही. इस्लाम मध्ये व्याजावर पैसे देण्याघेण्याचा मनाई आहे कारण व्याज घेणे हे इस्लाम मध्ये हराम मानलं जातं. चांगल्या आणि नैतिक व्यवहारांच्या आधारावर इस्लामिक बँक लोन देते. फक्त मूळ कर्जाची रक्कम जी आहे ती द्यावी लागते म्हणजेच त्या लोनवर इंटरेस्ट लागत नाही. या बँकांचे सुद्धा इतर सामान्य बँकांसारखे क्रेडिट, डेबिट कार्ड असते.
थोडक्यात म्हणजे इस्लामिक बँकिंग मध्ये बँक ही फक्त जमा निधीच्या ट्रस्टीची भूमिका पार पाडते. या बँकांमध्ये बँकेचे ग्राहक पैसे जमा करतात आणि जेव्हा हवे तेव्हा काढू शकतात. इथे तुमच्या बचत खात्यावर तुम्हाला व्याज दिले जात नाही परंतु बँक जेव्हा एखाद्या व्यवहारातून नफा कमावते तेव्हा त्या नफ्याचा काही भाग हा ग्राहकांना भेटीच्या स्वरूपात दिला जातो.
कर्जावर व्याज घेत नाही मग इस्लामिक बँक चालते कशी?
इथे एक प्रश्न येतो की जर बँक व्याज घेत नाही किंवा जमा पैशावर व्याज देत नाही तर मग कर्मचाऱ्यांचा पगार, इतर खर्च हे कसे पूर्ण होतात?
खरंतर इस्लामिक बँका या काही वेगळ्या पद्धतीने नफा कमवतात. आपल्याकडच्या जमा पैशातून या बँका स्थावर मालमत्ता खरेदी करतात. घर दुकान प्लॉट अशा या स्थावर मालमत्ता असतात. आणि या स्थावर मालमत्ता बँका काही नफा घेऊन विकतात. आणि हे पेमेंट खरेदीदाराला EMI च्या स्वरूपात द्यावे लागते.
या गुंतवणुकीतून बँकांना जो नफा होतो तो ग्राहकांमध्ये वाटला जातो आणि बँकांचे खर्च कर्मचाऱ्यांचे पगार या गोष्टी पूर्ण केल्या जातात. यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की जसा बँकेला होणारा फायदा ग्राहकांमध्ये वाटला जातो तसाच बँकेला होणाऱ्या तोट्यातला हिस्सा सुद्धा ग्राहक उचलतात.
इस्लामिक बँका पैशांची गुंतवणूक कुठे करतात?
फिक्स इन्कम, व्याज देणारे सिक्युरिटीज यामध्ये गुंतवणूक करण्याला इस्लाम मध्ये अनुमती नाही. परंतु ‘सुकुक’ हे इस्लामिक कायद्यानुसार शरीयावर आधारित एक फायनान्शिअल प्रॉडक्ट आहे. याशिवाय वरती उल्लेख केल्याप्रमाणे स्थावर-जंगम मालमत्तेमध्ये सुद्धा इस्लामिक बँका गुंतवणूक करतात.
भारतात इस्लामिक बँकांची सद्यस्थिती काय आहे?
भारतात पहिली इस्लामी इस्लामिक बँक कोचीन मध्ये सुरू झाली होती त्यामध्ये राज्याची हिस्सेदारी 11 टक्के होती. याशिवाय दुबईमध्ये असलेल्या इस्लामिक डेव्हलपमेंट बँकेची एक शाखा गुजरात मध्ये लवकरच सुरू होणार आहे जफर सरेश्वला यांनी हि बँक सुरु करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. स्टँडर्ड चार्टर्ड आणि एचएसबीसी बँकेने आपल्या सामान्य बँकिंग शिवाय काही देशांमध्ये इस्लामिक बँकासुद्धा चालू केल्या आहेत.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.