आपल्या आजूबाजूला सहज दिसणाऱ्या पक्ष्यांपैकी एक म्हणजे कबुतर.
करड्या रंगाचा, गुटुरगुं आवाज करणारा, बिनधास्त आपल्या घराच्या दारात, छतावर, खिडकीत येऊन बसणारा हा पक्षी.
माणसांची त्याच्याशी जवळीक इतकी की कबुतरावरची कितीतरी फिल्मी गाणी ऐकायला मिळतात.
मोठमोठ्या शहरांच्या ठराविक भागात लोक त्यांना प्रेमानं दाणे खाऊ घालतात. काही पक्षीप्रेमी त्यांना घरचा सदस्य मानून पाळतात सुद्धा.
या कबुतरांचे फायदे तोटे दोन्ही विचारात घेण्यासारखे आहेत.
काही जणांच्या मते कबुतरांच्या सहवासात आपण जास्त राहिलो तर वेगवेगळे आजार विशेषतः श्वसनाचे आजार होण्याची शक्यता निर्माण होते.
शिवाय कबुतराने तुमच्या घरातल्या बाल्कनी वगैरे एखाद्या भागात एकदा अंडी घातली कि, समस्त कबुतर जणांसाठी ती बाल्कनी म्हणजे त्यांचं मॅटर्निटी होम होऊन जातं. हा अनुभव सुद्धा बरेच जण घेतात.
अशा या कबुतरांच्या नाना तऱ्हा तर असतातच,
पण कबुतरांचा सगळ्यात मोठा फायदा हा की, त्यांना योग्य ट्रेनिंग दिल्यावर संदेशवहनासाठी त्यांची मोठी मदत होते.
खरंतर कबुतरांमध्येही जाती आहेत. ठराविक जातीची कबुतरं सर्वाधिक वेगाने आणि जास्तीत जास्त उंच उडू शकतात.
अशी कबुतरं सैन्यदलासाठी खूप उपयोगी असतात. अगदी ऐतिहासिक काळात सुद्धा त्यांचा खुबीनं उपयोग करून घेतला जायचा.
तर या लेखात आपण जाणून घेऊ असं कोणतं कबुतर जगात गुणवत्तापूर्ण आणि महाग आहे.
असं म्हटलं जातय की, कबुतरांची एक जात अतिशय वेगवान आणि उंच उडणारी आहे.
त्यामुळे अशा कबुतरांची किंमतही सर्वोच्च आहे, ती इतकी की तेवढ्या किंमतीत एखादी व्यक्ती दिल्ली, मुंबई सारख्या ठिकाणी अलिशान बंगला खरेदी करू शकते.
होय, एका लिलावात या कबुतरांची किंमत १४ करोड इतकी ठरवली आहे.
या बेल्जियम प्रजातीच्या कबुतराचं नाव आहे ‘न्यू किम’.
सुपर डुपर आणि हिटमॅन नावाच्या दोन चिनी व्यक्तींमध्ये या कबुतराला खरेदी करण्यासाठी लिलावात शर्यत लागली होती.
यापैकी सुपर डुपर नावाच्या व्यक्तीने १४.१४ कोटींना हे कबुतर खरेदी केलं.
७६ वर्षांचे ‘गॅस्टन वॉन डे वुवन’ आणि त्यांचा मुलगा अशा कबुतरांना उंच आणि वेगाने उडण्याचं प्रशिक्षण देऊन रेसिंग साठी तयार करतात.
न्यू किम सारख्या कबुतरांचं सर्वसाधारण आयुष्य १५ वर्ष इतकं असतं.
ही कबुतरं खास रेससाठी प्रशिक्षित केली जातात. विशेषतः चिन आणि युरोपीय देशात अशा कबुतरांना रेससाठी मागणी असते.
दुसऱ्या महायुद्धात बेल्जियम कडे अशी जवळपास २.५ लाख कबुतरं होती. त्यांची एक संघटना सुद्धा होती.
खास प्रशिक्षण देऊन त्यांना तयार केलं जायचं. साधारण ५० वर्षांपूर्वी फ्रान्स, स्पेन या देशात हवामानाचा अंदाज घेण्यासाठी कबूतरांचा वापर व्हायचा.
उच्च प्रतीच्या कबूतरांच्या पायाला हवामानाचा अंदाज घेणारं एक उपकरण लावलेलं असायचं. कबुतर जितकं उंच आणि दूरवर जाईल तेवढ्या भागातला हवामानाचा अंदाज घेता येई.
आपल्या आसपास बागडणारा हा एवढासा जीव. पण त्याचा जगात एवढा उपयोग होत असेल यावर विश्वास बसत नाही ना!!
काही ऐतिहासिक गोष्टी लक्षात घेतल्या तर जगावर अधिराज्य गाजवायला माणूस एकटा पुरेसा नाही.
रोजच्या छोट्या मोठ्या गरजांपासून माणसाला इतरांवर अवलंबून रहाव लागतं. कधीकधी भरभक्कम किंमतही मोजावी लागते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.