युद्ध तंत्रज्ञानात जगातील प्रत्येक देश काम करत असतो. आपल्या देशांच्या सीमांच्या संरक्षणासाठी तसेच शत्रूवर वचक ठेवण्यासाठी जगातील सगळी राष्ट्रे आपल्या शस्त्रात्र सज्जतेत वाढ करत असतात. आजवर जगातील युद्ध पारंपारिक पद्धतीने लढली गेली आहेत. जगाचा युद्धाचा इतिहास बघितला तर आपल्याला तेच दिसून येतं. पण येत्या काळात होणारी युद्धे ही वेगळी असतील. म्हणूनच अशा युद्धात सामोरं जाण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या शस्त्रात्र निर्मितीच्या तंत्रज्ञानावर अनेक राष्ट्र काम करत आहेत. त्यात भारत ही मागे नाही. आधी तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणून सुरु झालेल्या प्रोजेक्टचं महत्त्व राष्ट्र संरक्षणासाठी लक्षात आल्यावर भारताने त्या तंत्रज्ञानाला भारताच्या संरक्षणासाठी वापरण्याचं तंत्र विकसित केलं. हे तंत्रज्ञान म्हणजेच ‘काली ५०००.’
काली म्हणजे (Kilo Ampere Linear Injector) सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झालं तर हे तंत्रज्ञान शत्रूला इजा न करता मारून टाकते. हे कसं शक्य होतं, तर कोणत्याही पारंपारिक क्षेपणास्त्रे किंवा बॉम्ब हल्यात स्फोट करून शत्रूच्या वाराला निष्प्रभ केलं जातं. लेझर सारख्या तंत्रज्ञानात उच्च तापमान निर्माण करून आपल्याकडे येणाऱ्या अशा क्षेपणास्त्रे अथवा विमाने ह्यांचा हल्ला निष्प्रभ केला जातो. ह्याचा अर्थ आपण क्षेपणास्त्रे अथवा बॉम्ब, विमाने ह्यांनी शारिरीक हानी करत असतो. पण समजा त्यांचा मेंदूच निकामी केला तर? माणसाचा मेंदू निकामी केला तर त्याचं शरीर काहीच कामाचं उरणार नाही. तसचं आपण जर ह्या सगळ्यांचा मेंदूच निकामी केला तर ही शत्रूची क्षेपणास्त्रे, बॉम्ब अथवा विमाने काहीच कामाची उरणार नाहीत. नेमकं हेच करण्याचं तंत्रज्ञान म्हणजे काली.
काली भारतावर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रे, बॉम्ब अथवा विमानांचा मेंदू असणारी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम पूर्ण निकामी करतो. ज्याचा परिणाम म्हणजे जिथल्या तिथे ह्या गोष्टी निकामी होतात. काली हे काम कसं करते तर काली हे आपल्या लक्ष्यावर इलेक्ट्रॉनचा मारा करते. ज्याला Relativistic Electron Beams (REB) असं म्हणतात. ह्यात मारा करणारे इलेक्ट्रॉन १ MEV उर्जेचा दाब, 40 KA उर्जेचा प्रवाह तर 40 GW उर्जेची शक्ती निर्माण करतात. हे कण चुंबकीय रेडीएशन मध्ये नेले जाऊ शकतात. मग हे रेडीएशन ‘एक्स रे’ अथवा ‘मायक्रोव्हेव्ह’ स्वरूपात डागलं जाऊ शकते. अशा १००० मिलियन GW शक्तीचा प्रवाह जेव्हा कोणत्याही क्षेपणास्त्रे अथवा विमाने ह्यावर प्रक्षेपित केला जातो. तेव्हा तो त्यात असलेल्या संपूर्ण संगणक, इलेक्ट्रोनिक प्रणाली ला निकामी करतो. आपल्या लक्ष्याच्या मेंदूचा गेम ओव्हर केल्यावर तो मेलेला मेंदूच त्या क्षेपणास्त्रे अथवा विमानाला जागच्या जागी उध्वस्त करतो.
काली तंत्रज्ञानावर काम खूप आधी सुरु झालं. सर्वप्रथम ह्याची कल्पना १९८५ साली डॉक्टर आर. चिदंबरम जे की भाभा अणुसंशोधन केंद्राची अध्यक्ष होते त्यांनी मांडली. बी.ए.आर.सी. च्या Accelerator and Pulse Power Division ह्या युनिट ने सर्वप्रथम हे तंत्रज्ञान विकसित केलं. १९८९ ला ह्या तंत्रज्ञानाचा वापर संरक्षणासाठी होऊ शकतो हे लक्षात आल्यावर भाभा अणुसंशोधन केंद्र आणि ‘डिफेन्स रिसर्च एन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे डी.आर.डी.ओ. ह्यांनी ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून रक्षात्मक प्रणाली बनवण्यावर काम सुरु केलं. काली तंत्रज्ञान हे खूप निराळं असल्याने ह्यावर सुरु असलेला अभ्यास कमालीचा गुप्त ठेवण्यात आलेला आहे. जगातील फक्त अमेरिकेकडे असं तंत्रज्ञान असल्याचं बोललं जाते. भारताचं काली तंत्रज्ञान अजूनही विकासाच्या टप्प्यात असल्याने ह्याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही.
काली ५००० भारताने विकसित करून त्याची चाचणी घेतल्या असल्याचं जागतिक पातळीवर बोललं जात असलं तरी ह्याबद्दल कोणत्याच घटनांना सरकार कडून दुजोरा मिळालेला नाही. काली तंत्रज्ञानाचा वापर भारताने आपल्या तेजस विमानाला अशा इलेक्ट्रोनिक रेडीएशन पासून वाचवण्याच्या चाचण्यात केलेला आहे. काली तंत्रज्ञानामुळे सगळ्यात जास्ती धसका आपल्या एक नंबर शत्रू पाकिस्तान ने घेतलेला आहे. भारताच्या ह्या ब्रम्हास्त्राचं उत्तर भारताच्या कोणत्याच शत्रूंकडे नसल्याने त्यांची झोप उडाली आहे. येत्या काळात काली ला अजून लहान तसेच तंत्रज्ञानात अचूक करत भारताच्या संरक्षणासाठी दाखल करण्यात येईल तेव्हा शत्रूराष्ट्राकडे हतबलतेशिवाय पर्याय असणार नाही.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.