संध्याकाळची वेळ, कंजारभाट समाजाचा एक तरुण मुलगा आपल्या ट्युशनमध्ये पोहोचतो. बरेच दिवसांनंतर हजेरी लावल्यामुळे मित्र त्याला विचारतात. “कुठे गेला होता?” तर मुलगा सांगतो…
लग्न होत माझंच…
गोंधळलेले मित्र प्रश्न विचारतात…
इतक्यात तुझं लग्न झालं? आणि तू असा वापस पण आला? काय झालं? कसं झालं?
त्यावर मुलगा सांगतो…
काही नाही मुलगी खराब निघाली.
मित्रांच्या माहितीत इतकंच होतं कि लग्नात जेवण खराब असू शकतं, लग्नाचं कार्यालय खराब असू शकतं पण मुलगी खराब कशी असू शकते? पण मुलाला समजलं नाही कि मुलगी खराब असू शकते हे या मित्रांना कसे माहित नाही!!
यांच्यामध्ये नवरी मुलगी खराब नसेल का निघत??
खरंतर मुलगी खराब कशी निघू शकते, ते या किशोरवयीन मुलाला सुद्धा नीट्स माहित नव्हतं..
यथावकाश हा मुलगा मोठा झाला तसा आपल्या समाजातल्या लग्नांना समजून घ्यायला त्याने सुरुवात केली. त्याने पाहिलं कि लग्नातले मंगल अष्टका वगैरे सोपस्कार झाले कि नवरदेव नवरीला एका चादरीवर बसवतात. आणि कंजारभाट समाजाची जातपंचायत त्यांना घेरून बसते. सर्वांसमोर मुलीच्या घरच्यांना मुलीला काही आजार आहे का? यासारखे प्रश्न विचारले जातात. आणि मग मुलीला आणि मुलाला म्हणजेच नववधू-वराला एका खास तयार केलेल्या खोलीमध्ये पाठवले जाते. त्या खोलीमध्ये कोणती टोकदार वस्तू राहणार नाही याची खबरदारी घेतली जाते. नवऱ्या मुलीच्या हातातल्या बांगड्यासुद्धा मोजून काढल्या जातात. आणि मग मुलाला स्वच्छ पांढरी चादर घेऊन त्या खोलीमध्ये पाठवले जाते.
साधारण अर्ध्या एक तासानंतर त्यांना त्या रूमच्या बाहेर यायचं असतं ते थेट त्या चादरीवर रक्ताचे डाग घेऊन!!! आणि हे रक्त नववधूच्या योनीमार्गातील पातळ पडदा तुटल्यानेच आले पाहिजे याची काळजी म्हणून त्या खोलीमधल्या टोकदार वस्तू काढून टाकलेल्या असतात. एवढंच नाही तर मुलीच्या हातातल्या बांगड्या काढण्याची खबरदारी सुद्धा घेतली गेलेली असते….
चादरीवरचे हे रक्ताचे डाग पुरावा देतात कि मुलगी खराब नव्हती… दुसऱ्या दिवशी वर वधूने सकाळी पुन्हा पंच मंडळींसमोर उभे राहायचे असते. आणि तेथील उपस्थित समाजाच्या बायकांमध्ये हि चादर फिरवली जाते, रक्ताचे डाग बघून मुलगी खरी आहे कि खोटी ते इथे ठरवलं जातं…
या चाचणीत नवरी मुलगी जर खोटी ठरली तर तिच्या परिवाराला आर्थिक दंड ठोठावला जातो, नाहीतर लग्न मोडलं जातं किंवा मुलीने यापूर्वी कोणाशी संबंध ठेवले आहेत हाही प्रश्न तिला केला जातो.
(खरेतर शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर योनीतील पडदा हा काही स्त्रियांमध्ये जाड तर काही स्त्रियांमध्ये पातळ सुद्धा असू शकतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला पहिल्या संभोगाच्या तो पडदा फाटून वेळी रक्त येईलच असेही नसते.)
तर असं आता कुठे या मुलाला समजलं कि मुलगी खराब कशी निघू शकते. हा मुलगा आहे अम्बरनाथचा विवेक तामाईचेकर. विवेक आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून ‘रेग्युलेटरी गव्हर्नन्स’ या विषयावर अभ्यास करत आहे. आता विवेकने ठरवले आहे कि आपल्या होणाऱ्या पत्नीबरोबर हा घृणास्पद प्रकार मी होऊ देणार नाही. तसेच तो आपल्या समाजातून हि वाईट प्रथा मुळासकट उपटून काढण्यासाठी समाजातल्या तरुण मुलांमध्ये जागृती आणण्याचं काम काम सुद्धा करतो आहे. पण यामुळे समाजातले कट्टर लोक त्याचा विरोध करता आहेत.
‘Stop the V-ritual’ या नावाने विवेकने एक व्हाट्स ऍप ग्रुप चालू करून त्यात कंजारभाट समाजात चालणाऱ्या वाईट रूढी परंपरांच्या विरोधात जनजागृती करायला सुरुवात केली. विवेक सारखे तरुण जेव्हा पुढाकार घेतील तेव्हाच कुठल्या वाईट रूढी परंपरांना थांवणे शक्य होईल. नाही का!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
हे खूप भयंकर आणि लज्जास्पद आहे.विवेक तमाईचेक र चे खूप अभिनंदन त्यांनी ह्या विरोधात जन जागृती सुरू केली.