केरळ राज्यात आलेल्या पुराने हाहाकार उडवून दिल्यावर सगळे राजकारणी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून असताना भारतीय सेना आपल्या कर्तव्यात बिझी आहे. भारतीय सेना मग ती थल सेना असो वायु सेना वा नौदल ह्यांच्या सोबत एन.डी.आर.एफ. तटरक्षक दल आणि इतर संस्था आपआपल्या परीने एक मिशन राबवत आहेत. लक्ष्य एकच प्रत्येक भारतीयाची जीवावर उदार होऊन रक्षण करण. त्याला संकटातून सोडवून सुरक्षित स्थळी नेणं.
तिकडे खरं कर्तव्य बजावत असलेल्या लोकांकडे बघून अभिमानाने उर भरून येतो तर दुसरीकडे मदतीच्या नावाखाली पैसे जमा करून त्याच धर्माच्या नावाने रुपांतर करणाऱ्या लोकांची चिड येते. आता कोणी विचारत नाही? त्या सैनिकाची जात कुठली? त्याने जिला, ज्याला वाचवल तो कोणत्या धर्माचा आणि त्याला वाचवण्यासाठी किती पैसे मिळाले? ह्या असल्या तद्दन फालतू गोष्टीना भारतीय सेनेत स्थान नाही म्हणून फक्त बोलतात ती चित्र आणि त्या चित्रातून दिसून येतो तो देशाभिमान आणि आपलं लक्ष्य गाठण्यासाठी सर्वोच्च बलिदानाची तयारी.
सगळं साफसूफ झालं की हेच उद्या ह्या जातीचे किती गेले त्या धर्माचे किती गेले आणि कोणत्या धर्माने काय केलं ह्याचे आकडे प्रसिद्ध करतील. पण जे काम करतात ते शांतपणे आपलं काम करत राहतात त्यांना जगभर बोंबा मारायची गरज नसते. त्यांच्यासाठी देशसेवा ही सर्वोच्च असते. जिकडे सगळे देव पाण्यात बुडाले तिकडे तेच देव बनून आकाशातून आले. नुसते आले नाही तर त्या पाण्यातही स्वतःचा जीव धोक्यात घालून उतरले. नुसते उतरले नाही तर प्रत्येक जिवाला सुरक्षित स्थळी नेईपर्यंत आपलं काम सुरूच ठेवलं. त्यासाठी कोणी पैसे घेतले नाहीत की वाचवणाऱ्याचा जात, धर्म, पंथ विचारला नाही. तु आरक्षित का ओपन, तु ब्राह्मण का क्षुद्र, तु हिंदू का ख्रिश्चन हे असले प्रश्न त्यांना कधीच पडले नाहीत. जो समोर आहे तो भारताचा नागरिक आहे व त्याचा जीव वाचवणं हेच त्याच लक्ष्य होतं आणि तेच पूर्ण करण्याच काम आत्ता ह्या क्षणाला ही चालू आहे. तो देव किंवा मसीहा किंवा गॉड म्हणजे भारतीय सेना.
९० वर्षाची आजी असो वा २ वर्षाचा चिमुकला जीव प्रत्येकाला वाचवताना त्या जीवाची सुरक्षितता आपल्या जिवापेक्षा मोठी मानणारे सैनिक आहोत म्हणून आज भारतीय जिवंत आहे. आत्ता एक व्हिडीओ बघितला त्यात एका दोन वर्षाच्या चिमुकल्या जिवाला पाण्यात बुडालेल्या घराच्या गच्चीवरून एअर लिफ्ट करतानाचा आहे. एकतर अश्या ठिकाणी हेलिकॉप्टर उभं करण त्यातही आपला जीव धोक्यात टाकून त्या घराच्या गच्चीवर उतरणं. त्यानंतर एका दोन वर्षाच्या चिमुकल्या जिवाला आपल्या छातीशी कवटाळून एअर लिफ्ट करण हे एवरेस्ट वर चढाई करण्यापेक्षा कठीण काम आहे. हा व्हिडीओ बघताना डोळ्यातून पाणी आपसूक बाहेर आलं जेव्हा त्या मातेच्या चेहऱ्यावर हास्य आलं आणि तिने आपल्या बाळाला कवेत घेतलं. ते करताना भारतीय सैनिका बद्दल वाटणारा अभिमान म्हणा अथवा त्या डोळ्यातून धन्यवादाची दिलेली पावती ही कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी आहे.
ती पावती हसत हसत स्वीकारताना सैनिकाच्या चेहऱ्यावरील भाव हेच सांगून जातात की हे तर आमचं कर्तव्य आहे. आमच्यासाठी जीवावर उदार होणं रोजचच आहे. हे बघणं माझ्यासाठी एक अपूर्व आनंद देणारा क्षण होता. कारण हेच देशप्रेम आहे हीच देशसेवा आहे. ज्यात देणारा आणि घेणारा सगळच शब्दांशिवाय सांगून जातो. त्याला कोणत्याही पुरस्काराची, पैश्याची इतर गोष्टींची गरज वाटत नाही. मी नतमस्तक आहे अश्या भारतीय सैनिकांपुढे ज्यांनी देशसेवेचा आदर्श माझ्यापुढे ठेवला आहे……..जय हिंद……
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.