खोटं कधी बोलू नये असं नेहमी सांगितलं जातं.
लहान मुलं चुकुन घडलेल्या एखाद्या चुकीमुळे मार मिळू नये म्हणून खोटं बोलण्याचा प्रयत्न करतात.
आजूबाजूला खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला मिळालेली संधी दिसली की तुम्हालाही खोटं बोलून काम करून घेण्याचा मोह आवरत नाही.
“आज-काल असंच चालतं यार…” असं म्हणत तुम्हीपण अतिशयोक्ती करायला जाता आणि खोटेपणाच्या जाळ्यात नकळत अडकता.
लक्षात घ्या, तुमच्या बोलण्यातून एक इमेज, एक प्रतिमा समोरच्या व्यक्तीच्या मनात निर्माण होत असते.
तुम्ही खोटं बोलताय हे लक्षात आलं की या प्रतिमेला तडा जातो. जो परत कधीच सांधता येत नाही.
लक्षात घ्या मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी ज्ञान गरजेचं आहे आणि प्रामाणिकपणा हा या ज्ञानाच्या पुस्तकातला पहिला महत्त्वाचा धडा आहे.
या पहिल्या धड्याच्या अनुषंगाने एक गोष्ट आठवते.
खूप खूप वर्षांपूर्वी एक राजा होता तो वृद्ध झाला, आणि आता आपला उत्तराधिकारी निवडण्याची वेळ जवळ आलेली आहे हे त्यांनं ओळखलं.
त्याची महाराणी आणि राजकुमार एका अपघातात बऱ्याच वर्षांपूर्वी दगावले होते. त्याला स्वतःला मूलबाळ नव्हतं.
अनोळखी व्यक्तीच्या हातात राज्य कारभार सोपवायला राजा सहजासहजी तयार नव्हता, पण तरीही कुणाला तरी निवडायला हवा ना?
मग राजाने आपल्या राज्यातील सगळ्या तरुणांना परीक्षेसाठी बोलावलं.
राजवाड्यावर जमा झालेल्या मुलांच्या हातात एक तपकिरी “बी” ठेवण्यात आलं.
राजांनं सगळ्यांना सांगितलं, “घरी जा, हे बीज रुजवा. आज पासून पुढचे सहा महिने या बीजाची तुम्ही नीट काळजी घ्यायची, यातून आलेल्या रोपाची नीट निगा घ्यायची.
सहा महिन्यानंतर तुमचं ते सुंदर रोप घेऊन तुम्ही परत इथेच भेटायला या, ज्यांनी आपल्या रोपाची नीट निगा राखली असेल तोच ठरेल पुढचा राजा”!
प्रत्येक तरुणानं बी मोठ्या आनंदाने, उमेदीने आपापल्या घरी नेलं.
प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या डोळ्यात एक स्वप्न होतं की पुढचा राजा मीच असणार.!
प्रत्येकाने आपल्या घरामध्ये एक सुंदर कुंडी घेऊन त्यामध्ये ते बी अगदी सावकाश पणे पेरलं. त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली.
या सगळ्या युवकांमध्ये प्रताप हा ही होता.
प्रताप एका साध्या घरातला बुद्धिमान मुलगा.
प्रतापनं आपल्या “बी” साठी साधीशीच पण स्वच्छ कुंडी निवडली.
त्याच्यामध्ये बी पेरलं आणि उन्हाच्या ठिकाणी ही कुंडी ठेवून रोज तो त्याची काळजी घ्यायला लागला.
बघता बघता सहा महिने संपले. राज्यातले सगळे युवक उत्साहानं राजवाड्याकडे निघाले.
सुंदर सुंदर रोपांनी राजवाड्याचा मार्ग अगदी फुलून गेला होता.
या सगळ्या युवकांना एका दालनात बोलावण्यात आलं.
थोड्याच वेळात महाराजांची स्वारी दालनात आली.
प्रत्येक युवकाच्या हातातलं रोप महाराज कौतुकानं बघत होते.
“अरे वा छान” ! “अप्रतिम” ! अशा शब्दांची उधळण महाराज करत होते.
महाराजांना नक्की कोणतं रोप आवडेल आणि कोण होईल नवा राजा याची उत्सुकता वातावरणात आता शिगेला पोचलेली होती.
महाराज प्रताप जवळ पोचले. प्रताप मान खाली घालून उभा होता.
त्याच्या हातातली साधीशीच कुंडी पण त्याच्यामध्ये कोणतंही रोप नव्हतं.
महाराजांनी विचारलं “तरुण मित्रा, तुझं रोप. कुठं आहे?”
खालमानेनं प्रतापने उत्तर दिलं, “महाराज मी खूप प्रयत्न केले, दिवस-रात्र याची काळजी घेतली पण मला मिळालेल्या “बी” मधून कोणतं ही रोप उगवलं नाही.
महाराजांचा चेहरा आनंदाने फुलला, बेभान होऊन ते गरजले ‘सापडला ! माझा उत्तराधिकारी सापडला”! “पहा, नीट पहा, हा प्रताप आहे तुमचा नवा राजा”!
सगळेच आश्चर्यचकित झाले. एक विचित्र शांतता दालनात पसरली. तसं बोलत कोणीच नव्हतं पण प्रत्येकाच्या मनात असंख्य प्रश्न होते.
ते प्रश्न ओळखून महाराज म्हणाले, “मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल ना?”
“ज्याच्याकडे रोपच नाही, तो राजा कसा?”
“तर मित्रांनो सहा महिन्यांपूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना एक “बी” दिलं होतं रुजवण्यासाठी, आज तुम्ही सगळे जण छान छान रोपं घेऊन हजर झाला आहात, पण मित्रांनो या सगळ्या बिया उकळून घेतल्या होत्या त्यामुळे त्या कधीच रूजणार नव्हत्या”.
“पण हे सांगण्याचे धाडस फक्त प्रतापनं दाखवलं, त्याचा हा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे, आणि म्हणूनच प्रताप हा तुमचा नवा राजा आहे”!
तर ही कथा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आला का हा मुद्दा की आपल्या कुटुंबाला, आपल्या मित्रमंडळींना किंवा टीममध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाविषयी तुम्ही बरेचदा तिखट-मीठ लावून सांगता, ते चुकीचं आहे.
आपलं महत्त्व वाढवण्यासाठी, इम्प्रेस करण्यासाठी, आपला प्रभाव पाडण्यासाठी, प्रेम आदर आणि विश्वास मिळवण्यासाठी तुम्ही असत्त्याचा आधार नकळत जरी घेत असाल तरी त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो.
असत्त्याचा, खोटेपणाचा वापर लगेच बंद करा. कारण त्याचा काहीही उपयोग, कधीही होत नाही.
यश मिळवण्यासाठी तुम्ही खोटेपणाचा आसरा घेत असाल तर तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता नाही.
लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं खोटं बोलणं कधी ना कधी उघडकीला येतच, त्याच्यातला असंबद्धपणा समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येतो.
एखादं नातं दृढ करण्यासाठी तुम्ही जसे खरे खुरे आहात तसेच ते लोकांना दिसा.
तरच तुमच्यावरचा विश्वास दृढ होईल.
तुमच्या प्रांजळपणामुळे अनेक व्यक्तींशी तुमचे ऋणानुबंध जुळतील.
खोटेपणानं, दांभिकपणानं प्रभाव टाकण्यासाठी मारलेल्या थापांमुळे, तुमची नाती लवकर तुटतात.
खरं बोलायचा एक फायदा असतो, तुम्हाला काय काय सांगितलं हे लक्षात ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत नाही, आणि त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व धीर गंभीर आणि शांत होतं.
तुमच्या खरेपणामुळंच तुम्ही लोकांना आवडता. तुमच्याविषयी दुसऱ्यांच्या मनामध्ये आदर निर्माण होतो.
तेव्हा मित्रांनो नेहमी सत्याचाच हात धरा आणि आयुष्यात तो कधीही सोडू नका.
एक हितचिंतक.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.