मैत्रिणींनो, तुमच्या किचन मध्ये अशा काही वस्तू असतात ज्यांच्या वापर तर नेहमी होतो मात्र त्यांचा वापर झाल्यानंतर त्या ठेवायचा कुठं हा प्रश्न नेहमी येतो.
कारण या वस्तू किचन मध्ये तशाच ठेवल्या तर किचनमध्ये फक्त गर्दी आणि पसारा दिसून येतो.
अशा वस्तूं लपवून, झाकून ठेवता येतात त्यामुळे तुमचं किचन स्वच्छ सुंदर मोकळं दिसू शकतं.
अशा कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आणि त्या कुठं कुठं नीट मांडून ठेवता येतात, तेच आज जाणून घेऊया.
१) सिंक जवळ असणाऱ्या वस्तू
सिंक जवळ डिश वॉशर, स्क्रबर, वायपर या वस्तू प्रत्येक मैत्रिणीच्या घरात दिसतातच.
या वस्तू सिंकवरती ठेवल्यामुळे त्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दिसत असतात.
या वस्तूंमुळे तुमचं सिंक अस्ताव्यस्त दिसतं.
त्यावर अगदी छोटा उपाय करा. स्क्रबर साठी तुम्ही सोपबॉक्स वापरू शकता.
या बॉक्समध्ये पाणी निथळून स्क्रबर कोरडा होऊ शकतो हा ही एक फायदाच.
सोपबॉक्सचं झाकण लावल्यानंतर तो झाकला जाईल, विचित्र दिसणार नाही.
तुमच्या सिंक खाली जर जागा असेल, कपाट असेल त्या कपाटाला दार असेल तर त्यात एक छोटीशी बास्केट अडकवून टाका.
त्याच्यामध्ये डिश वॉशर, वायपर, स्क्रबर अशा वस्तू तुम्ही ठेवू शकता.
जेव्हा तुम्हाला या वस्तू लागतील तेव्हा त्या पटकन तुम्ही बाहेर काढू शकता आणि तितक्याच तत्परतेने काम झाल्यावर त्या परत जागेवर ही ठेवू शकता.
त्यामुळे तुमचं सिंक छान मोकळं राहील, अस्ताव्यस्त दिसणार नाही.
२) किचन ओटयावरचे नॅपकिन
कट्टा, टेबल पुसण्यासाठी मैत्रिणी 2/3 नॅपकिन्स वापरतात.
ही कापडं,/ नॅपकिन्स सिंकमध्येच धुऊन, तिथचं स्वयंपाकघरातच वाळत टाकली जातात.
ती दिसायला अतिशय बेकार दिसतात.
जर तुमच्या स्वयंपाकघरात खिडकी असेल तर हँगरला हे नॅपकिन अडकवून खिडकीच्या शेवटच्या ग्रीलला लटकवून द्या.
हे नॅपकिन्स जास्तीत जास्त नजरेआड ठेवण्याचा प्रयत्न करा.
३) भांड्यांची जाळी
घासायची भांडी आणि घासलेली भांडी ज्या गोलाकार किंवा चौकोनी जाळीत साठवली जातात ती जाळी रिकामी असताना कुठे ठेवायची?
हा एक मोठा प्रश्न असतो.
फ्रीज आणि भिंतीच्या मध्ये किंवा वॉशिंग मशीन आणि भिंतीच्या मध्ये किंवा जिथे ही तुम्हाला भिंतीच्या आसपास जागा मिळू शकेल अशा ठिकाणी ती झाकून जाईल अशा पद्धतीने ठेवता येईल.
४) घरातली जादा भांडी
पाहुणे येतील तेव्हा वापरायला किंवा सणावारी किंवा गिफ्ट आलेली अशी काही जादाची भांडी तुमच्या घरात असतात.
ही भांडी रोज काही वापराला लागत नाहीत, पण ती जरुरीची असतात.
त्यामुळे ती किचनमधून हटवता येत नाहीत पण ती ठेवायची कुठं?
तर एखाद्या रँकवर या भांड्यांचे बॉक्स ठेवून त्यावर तुम्ही नीट कापड अंथरु शकता.
या बॉक्सची मांडणी पायऱ्यासारखी करून त्याच्यावर वेगवेगळ्या बरण्या तुम्ही जर ठेवल्या तर तुमचं किचन आखीव रेखीव दिसेल.
६) मायक्रोवेव्हची भांडी
काही मैत्रिणी मायक्रोव्हेव कधीकधीच वापरतात.
धावत्या आयुष्यात या मायक्रोव्हेवचा रोजच फारसा उपयोग केला जात नाही.
पण मग त्या मायक्रोव्हेवसाठी जी स्पेशल भांडी असतात ती कुठं ठेवायची?
ट्रालीमध्ये या भांड्यांमुळे गर्दी होऊ शकते.
तर ती तुम्ही व्यवस्थितपणे मायक्रोव्हेवमध्येच ठेवू शकता आणि ती जागा व्यवस्थित वापरू शकता.
६) गॅस सिलेंडर जवळ ठेवा पॅन
गॅस सिलेंडर जवळची जागा मोकळी ठेवणं तसं गरजेचं असतं.
पण तरीही तुम्ही एखाद-दुस-या एक्स्ट्रॉ तव्यांपैकी अगदी कधीतरी लागणारा पॅन किंवा तवा या गॅस सिलेंडर शेजारी ठेवू शकता.
पण एक मात्र अजिबात विसरायचं नाही की हा तवा वापरून झाल्यानंतर पूर्ण गार झाल्यानंतरच पुन्हा जागेवर ठेवा.
७) ट्रे
काही वेगळ्या डिझाईनचे, आकाराचे, मोठे ट्रे तुम्ही हौसेनं जमवले असतील, पण त्यांची गरज ही कधीतरी लागते.
तर मग हे ट्रे ठेवायचे कुठं? या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे.
कपाटात भिंतीलगतची थोडीशी जागा या ट्रेसाठी राखून ठेवली तर तुमच्या किचनमध्ये अजिबात पसारा जाणवणार नाही.
८) टिशू पेपर रोल
हा रोल जर तुम्ही बाहेर ठेवला तर त्यावर हळूहळू धूळ जमा होते.
त्यामुळे किचनच्या एखाद्या कपाटाच्या आतल्या बाजूने, दाराला तुम्ही हा टिशू पेपर रोल टांगून ठेवू शकता.
मैत्रिणींनो प्रत्येकीच्या किचनची रचना वेगळी असते, जागा वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध असते.
त्यामुळे रोजच ज्यांचा वापर होणार नाही अशा वस्तू किंवा किचनची एकूणच रचना अशी करा की ब-याचश्या वस्तू या दाराआड झाकून जातील.
त्यामुळे तुमचा किचन सुटसुटीत मोकळं स्वच्छ आणि प्रसन्न दिसेल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.