वंशवादामुळे होणारी टीका, अवहेलना यामुळे प्रियांका डळमळली नाही तर तीच तिची ऊर्जा बनली. आपल्यावर फेकल्या गेलेल्या दगडांना न घाबरता त्यातूनच महाल बनवण्याचं जमलं तर कोणतीही टीका, आरोप, अवहेलना तुमच्यापुढे नतमस्तक होईल हेच प्रियंका योशिकावा च्या जगण्यातून शिकण्यासारखं आहे.
हत्तींना प्रशिक्षण देण्याचं लायसन्स मिळवलेली प्रियंका, तिची मातृभाषा आहे जपानी भाषा पण इंग्रजी आणि बंगाली भाषेत पण तिचे प्रभुत्व आहे. एवढंच नाही तर प्रियंका एक एक्सपर्ट किक बॉक्सर सुद्धा आहे. या प्रियंकाचं पूर्ण नाव आहे ‘प्रियंका योशिकावा’.
६ सप्टेंबर २०१६ ला ‘मिस जपान’ चा किताब मिळवणारी प्रियंका वंशवादाची शिकार होत जपानमध्ये लहानाची मोठी झाली. वंशवाद किंवा racism म्हणजे एका वंशाच्या लोकांकडून दुसऱ्या वंशाच्या लोकांबरोबर भेदभाव केला जाणं. जगभर चालणाऱ्या या वंशवादाला प्रियंकाला तोंड द्यावं लागलं याचं कारणही काहीसं वेगळंच होतं. बालपणीच्या शाळेच्या दिवसांपासून ‘मिस जपान’ चा किताब मिळेपर्यंत या भेदभावाला ती सामोरी जात राहिली.
पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री असलेले प्रफुल्लचंद्र घोष यांचा मुलगा श्री. अरुण घोष हे प्रियंकाचे वडील. १९८५ साली अरुण घोष हे शिक्षणासाठी जपानला गेले. तेथे त्यांची ओळख झाली ‘नाओको’ या टोकियो मधल्या एका शाळेत बंगाली भाषा शिकवणाऱ्या एका मुलीशी. अरुण हे स्वतः बंगाली असल्याने त्यांची नाओको बरोबर चांगली ओळख आणि नंतर घनिष्ट मैत्री झाली. या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन लवकरच त्यांनी लग्न केले.
पुढे २० जानेवारी १९९४ साली घोष दाम्पत्याच्या घरात एका मुलीचा जन्म झाला तीच नाव ‘प्रियंका योशिकावा’ ठेवलं गेलं. प्रियांकाच्या घरात लहानपणापासूनच दोनही संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत होत्या. प्रियांकाचे बोलण्यातले उच्चार, हावभाव यात जपानी आणि बंगाली दोन्हीचं मिश्रण होतं. शाळेत जायला लागल्यानंतर शाळेत मुलं तिला हाफू म्हणून चिडवत. ‘हाफू’ म्हणजे ‘अर्ध’ प्रियांकामध्ये भारतीय आणि जपानी हि दोनही मुळ होते आणि त्यामुळे ती इतर सर्व मुलांपेक्षा वेगळी म्हणून ठळक दिसून यायची. त्यामुळे कोणी तिच्याशी मैत्री करत नव्हतं. ती बरीचशी एकटीच असायची.
नऊ वर्षांची असताना ती पहिल्यांदा भारतात आली. भारतातली गरिबी पाहून गरिबी संपवण्यासाठी काही केलं पाहिजे असं या वयात सुद्धा तिला वाटून गेलं. स्वतःला भेदभावाला सामोरं जावं लागल्याने करुणा आणि दृढ विचार लहानपणापासूनच तिच्या अंगी बनले होते.
६ सप्टेंबर २०१६ साली प्रियांका मिस जपान झाली तेव्हा जपान च्या लोकांसाठी सुद्धा तो आश्चर्याचा धक्काच होता. दुसऱ्या वंशाची मुलगी मिस जपान कशी होऊ शकते यावरून तिच्या निवडीला विरोध सुद्धा झाला. पण प्रियंका योशिकावा ची निवड तिच्या सौंदर्यामुळे आणि समाजातल्या तिच्या योगदानामुळे झाली हे मिस जपान निवडणाऱ्या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वंशवादामुळे होणारी टीका, अवहेलना यामुळे प्रियांका डळमळली नाही तर तीच तिची ऊर्जा बनली. आपल्यावर फेकल्या गेलेल्या दगडांना न घाबरता त्यातूनच महाल बनवण्याचं जमलं तर कोणतीही टीका, आरोप, अवहेलना तुमच्यापुढे नतमस्तक होईल हेच प्रियांकाच्या जगण्यातून शिकण्यासारखं आहे.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.