११ जून २२ ला क्षमाचा सोलोगामी विवाह ठरला होता.
मात्र राजकीय आणि सामाजिक दबावामुळे तीन दिवस आधीच तिनं विवाह उरकून घेतला आहे.
या अनोख्या लग्नाची चर्चा देशभरात विविध पातळीवर होत आहे.
सुरवातीपासूनच काही जणांनी क्षमाच्या या संकल्पनेला विरोध केला होता.
काहींनी मात्र तिला भक्कम पाठिंबासुद्धा दिला होता.
कुठल्याही विरोधाला न जुमानता क्षमाने बुधवारी स्वतःशीच लग्न केलं आहे.
सर्व रिती- रिवाजानुसार क्षमाने स्वतःच्या घरीच हे लग्न केलं.
यात हळद, मेहंदी आणि सात फेरे हे सगळे विधी तिने मोठ्या आनंदाने पार पाडले. वडोदरातील गोत्री इथल्या आपल्या राहत्या घरीच तिने हे लग्न केलं.
या लग्नात नवरदेव नाहीच हे जगजाहीर होतं पण या लग्नात पंडितजीही नव्हते.
अगदी मोजकेच मित्र- मैत्रिण आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत तिनं हे लग्न केलं.
क्षमानं स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर खरंतर प्रचंड खळबळ उडाली.
तिच्या या निर्णयाची चेष्टा ही झाली, सोशल मिडीयावर अनेक मिम ही फिरले.
त्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरातून मोठा विरोध ही तिला पत्करावा लागला. शेजाऱ्यांकडूनही तिला विरोध झाला.
म्हणूनच लग्नाच्या दिवशी कुठलाही वाद होऊ नये म्हणून तिने बुधवारी ९ जुनलाच लग्न उरकून घेतलं.
कारण तिला तिच्या आयुष्यातल्या या खास दिवशी कोणतंही विघ्न नको होतं.
खरंतर क्षमाने मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
पण राजकीय नेत्यांनी या लग्नाला कडाडून विरोध केला, त्यानंतर भटजींनीही लग्न लावायला नकार दिला.
शेवटी घरीच लग्न करण्याचा निर्णय घेत क्षमाने पंडितजींशिवाय , रेकॉर्डेड मंत्र लावून लग्न केलं.
मित्रांनो तुम्हीही विचारात पडला असाल ना? असा सोलोगॅमी विवाह खरंच शक्य आहे का ?
की केवळ संसाराची जबाबदारी नको, पण लग्नातल्या वधु सारखी मेंदी, हळद आणि कपड्यांची हौस पुरवायची म्हणून सोलोगामीचा पर्याय निवडला जातो?
आज इतर देशातल्या सोलोगामीची उदाहरणं दिली जातात, ती खरी असतील का?
अहो, ब्राझील मध्ये एका सोलोगामी विवाहाचे उदाहरण तर असेही आहे की, ३३ वर्षांच्या मुलीने स्वविवाह करून २९ दिवसांनंतर स्वतःशीच काडीमोड सुद्धा घेतला.
अर्थात तिचे काडीमोड घेण्याचे कारण असे होते की, तिला तिच्यासाठी योग्य असा जोडीदार भेटला!!!
या सोलोगामी लग्नाचे फायदे जास्त आहेत की तोटे?
भविष्यात मुलींनी सोलोगामीचाच पर्याय निवडला तर काय होईल?
आपल्या देशात मांगलिक दोष असलेल्या मुलींचे पिंपळाशी लग्न लावून दिले जाते, तर क्षमच्या लग्नाला इतका विरोध होण्याचे खरंच काही कारण आहे का?
मात्र काल क्षमाने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो आज दिसू शकत नाहीत.
तुम्हांला काय वाटतं? हा नवा भारतात प्रकार रुजेल की मागे पडेल ?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.