मुलांना बचतीची सवय लावण्याचे पाच सोपे आणि खात्रीशीर उपाय

बचतीचे महत्त्व आपल्याला सर्वांना माहीतच आहे. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण पैसे साठविण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करते.

पण कोणतीही सवय अंगवळणी पडण्यासाठी काही काळ जावा लागतो. म्हणून जर लहान वयातच मुलांना पैसे वाचवण्याची सवय लावली तर भविष्यात पैसे खर्च करताना ते अविचाराने वागणार नाहीत.

लहानपणी झालेले संस्कार मनात खोलवर जाऊन रुजतात म्हणून जेवढ्या लवकर आपण मुलांना बचतीची सवय लावू तेवढं चांगलं!!!

आजकाल बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबात दोन्ही पालक कमावते असतात. राहणीमान उंचावले असल्यामुळे “स्टेटस” या नावाखाली बऱ्यापैकी महागड्या वस्तू खरेदी केल्या जातात.

आपल्या लहानपणी परिस्थितीमुळे जी हौसमौज करता आली नाही ते सर्व आपल्या मुलांना द्यावे असे पालकांना बऱ्याच वेळा वाटते.

मग हाताशी पैसे असल्याने मुलांनी मागणी केली की कितीही महाग वस्तू असली तरी लगेच खरेदी होते. पण यामुळे मुलांना तडजोड, वस्तूचे मूल्य आणि पैशाची किंमत कळत नाही.

मनाचेTalks या लेखातून तुम्हाला असे पाच विशेष उपाय सांगणार आहे की ज्यामुळे मुलांना बचत करणे, विचारपूर्वक पैसे खर्च करणे याचे महत्त्व समजेल.

कोणते आहेत हे मुलांना अर्थसाक्षर करणारे पाच उपाय?

१. मुलांसोबत आर्थिक विषयांवर चर्चा करा

घरातील कोणतीही वस्तू खरेदी करताना मुलांसोबत चर्चा करा. वस्तूची किंमत, बाजारभाव, किंमतीच्या तुलनेत त्या वस्तूची खरंच गरज आहे का?

अशाच इतर ब्रॅण्ड्सची किंमत किती? आता लगेच खरेदी करणे गरजेचे आहे का? ऑनलाईन किंमत आणि प्रत्यक्ष दुकानात खरेदी यात किंमतीत काही फरक पडणार आहे का?

मुलांसोबत अशी सखोल चर्चा केल्याने त्यांना घरातील निर्णय घेताना आपले मत विचारले याचा आनंद होतो. त्याचबरोबर जबाबदारीची भावना निर्माण होते.

वरील सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने जर मुलांना माहिती काढायला सांगितली तर त्यांचे ज्ञान तर वाढतेच पण चौकस वृत्ती निर्माण होते. म्हणून मुलांना गृहीत न धरता त्यांच्या विचारांना चालना द्या.

२. लहान सहान खरेदी करताना मुलांना सोबत घेऊन जा

रोजची भाजी किंवा महिन्याचे वाणसामान खरेदी करताना मुलांना जरुर सोबत घ्या. यामुळे चार पैसे कसे वाचवायचे, वस्तूचा दर्जा यांची माहिती मुलांना कळते.

त्याचप्रमाणे हिशोबाची डायरी लिहीणे हे सुद्धा महत्वाचे आहे. यामुळे महिन्याभरात किती खर्च झाला आणि यापैकी अनावश्यक, टाळता येण्याजोगा कोणता हे समजते.

ही डायरी लिहीताना मुलांशी बचतीचे महत्त्व, यापुढे कोणती अनावश्यक खरेदी बंद करायची यावर संवाद साधा.

३. साधारण समजुतदार वयाच्या मुलांना पैसे हाताळायला द्या

जेव्हा स्वत: खरेदी करतील तेव्हाच मुलांना पैशाचे महत्त्व कळेल. सुरुवातीला व्यवहार करताना चुका होतील पण अनुभव घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे मोजकेच पैसे त्यांच्या हातात द्यावे. खरेदी करताना पैसे वाचवले की न चुकता मुलांचे कौतुक करावे आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यांना स्वतःची अशी खर्चाची डायरी द्यावी.

नियमितपणे डायरी लिहीतात का हे पहावे. यामुळे जबाबदारीची भावना वाढीस लागते. शालेय वस्तू, मुलांच्या मित्रमैत्रिणींचे वाढदिवस याकरीता एक ठराविक रक्कम त्यांना महिन्याच्या सुरुवातीला द्यावी आणि महिनाअखेर हे पैसे त्यांनी कशाप्रकारे खर्च केले याचा आढावा घ्यावा.

४. मुलांना अर्थसाक्षर करा

आईवडील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये जेवढे लक्ष देतात, जागरूक असतात तेवढे प्रयत्न मुलांना पैशाचे व्यवस्थापन आणि महत्त्व समजावे या दृष्टीने करतात का?

अर्थसाक्षर म्हणजे पैशाच्या बाबतीत जागरूकपणे व्यवहार करणारा. यासाठी बॅंक, पोस्ट इत्यादी ठिकाणी व्यवहार कसे चालतात याची सोप्या भाषेत मुलांना माहिती द्या.

एखादे बचत खाते उघडून वेळोवेळी त्यात पैसे कसे साठवावे ते सांगा. मुलांना भेट म्हणून किंवा बक्षिस स्वरूपात मिळालेले पैसे या खात्यात जमा करायला प्रोत्साहन द्या.

हातात आलेली रक्कम उडवून टाकण्यापेक्षा बचत केली तर कोणत्या प्रसंगात उपयोगी पडेल हे मुलांना सांगा. तुमचे बरेवाईट अनुभव, तुमच्या पैसे वाचवण्याच्या सवयीचा कसा उपयोग झाला आणि डोळसपणे निर्णय न घेतल्याने तुमचे आर्थिक नुकसान कसे झाले, यातून तुम्हाला काय शिकता आले हे मोकळेपणाने मुलांच्या बरोबर शेअर करा.

५. स्वत:च्या उदाहरणाने मुलांना शिकवा

पालकांच्या सवयी, अनावश्यक खरेदी करणे, ऑनलाईन शॉपिंगचे व्यसन किंवा अतिरेकी खरेदी, फक्त ब्रॅण्डेड वस्तूच खरेदी करण्याचा दुराग्रह, आजकाल विशेषतः भरमसाट कपडे आणि फुटवेअर किंवा लक्झरी आयटेम्स खरेदी करणे, वरचेवर हॉटेलिंग हे एक प्रकारे स्टेटस सिम्बॉल मानले जाते.

पण मुले आपले शब्द नाही तर कृती पहातात आणि अनुकरण करतात. म्हणून फक्त उपदेश करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

आपल्या सवयी, ॲडिक्शन्स, पैशाचे नियोजन आणि ते जास्तीत जास्त प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण काय करतो याचा प्रामाणिकपणे आढावा घ्यावा. आवश्यक ती सुधारणा करावी.

हे पाच उपाय पुढचे सहा महिने अंमलात आणा. मुलांच्या वागण्यात, विचारात आणि पैसे या विषयाबाबत त्यांच्या दृष्टीकोनात निश्चितच फरक पडेल.

बचत ही फक्त पैसे या स्वरूपात नसून वीज, पाणी, अन्न, पेट्रोल, गॅस या संसाधनांचा काटकसरीने वापर ही देखील बचतच आहे. प्रत्येक माणसाने जागरुकपणे यांचा वापर केला तर देशाच्या अर्थव्यवस्थेला, समाजाला आणि पर्यावरणाला याचा फायदा होतो. हा संस्कार लहान वयातच होणे गरजेचे आहे.

या विषयावरील तुमचे मत आम्हाला कमेंट्स करून जरुर सांगा. तुम्ही मुलांना बचतीची सवय कशी लावता हे सुद्धा सांगा. लेख आवडला तर लाईक व शेअर करा.

मुलांना पैशांचे महत्त्व पटवून देणारे सात उपाय वाचा या लेखात.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।