साहित्यासाठी भाषा खुप महत्त्वाची आहे. भाषेचा विकास साधण्यासाठी साहित्यातून बोलीभाषेचा वापर करायलाच हवा. बोलीभाषेतून मग प्रमाण भाषेकडे वाटचाल करता येते. आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य वापरत असतो. काही जण आपल्या मनातील विचार भाषणाच्या माध्यमातून व्यक्त करतात तर काही लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करतात. भाषणामधून जे व्यक्त होते ते संग्रही ठेवणे जरा कठीण जाते मात्र लिखित स्वरूपातील विचार चिरकाल टिकून राहतात. आज आपण संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या काळातील साहित्य लिखित स्वरुपात असल्यामुळे आपण वाचन करू शकतो.
कागदाचा शोध लागण्यापूर्वी माणसे तोंडातोंडी माहिती लक्षात ठेवत असत. पाठांतर करण्यावर जास्त भर राहत असे. एकाजवळ असलेली माहिती दुसऱ्यांजवळ तोंडीच जात असे, त्यास गुरुकुल पध्दत असे म्हटले आहे. अश्मयुगीन काळातील लोक झाडाची पाने, साल आणि दगड गोट्याचा वापर करून काही नोंदी करत असत. काही कालावधी उलटल्यानंतर कागदाचा शोध लागला आणि लिखित साहित्याला चांगले दिवस बघायला मिळाले.
प्रसिध्द कवयित्री बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या मात्र त्यांचे कवन अप्रतिम होते. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते पण त्यांच्या नात्यातील एका व्यक्तिने ते सर्व लिहून ठेवले म्हणून आज ते साहित्य आपणास वाचायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक संतानी त्यांच्या प्राकृत मराठी भाषेत आपले साहित्य लिहून ठेवले म्हणून आज ते सर्व साहित्य आपणास दिशा देण्यासाठी खुपच उपयोगी ठरत आहेत. त्यांनी स्वतःच्या प्रसिद्धिसाठी नाही तर लोककल्याणासाठी साहित्य लिहून ठेवले.
साहित्यात अनेक प्रकार आहेत जसे की, कविता, कथा, चारोळी, ललित आणि वैचारिक लेख इत्यादी. अश्या अनेक माध्यमातून व्यक्ती आपले विचार जतन करू शकतो. भारतीय परंपरेत असे अनेक साहित्यिक मंडळी होऊन गेले त्यांच्या नावाची यादी करीत बसलो तर कागद अपूरे पडेल. त्यांनी प्रसिद्धिची हाव न ठेवता विपुल साहित्य लिहून ठेवले म्हणून मराठी साहित्य आज समृद्ध बनले आहे, एवढे मात्र खरे आहे.
आज साहित्याची काय स्थिती आहे किंवा साहित्य किती जतन केल्या जात आहे ? तर याचे उत्तर म्हणजे आज साहित्य विपुल प्रमाणात तयार होत आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जतन केल्या जात आहे. मात्र पूर्वीप्रमाणे दर्जेदार साहित्य निर्माण होत नाही अशी खंत अधुनमधून ऐकायला मिळते. साहित्य निर्माण करणे हे येरागबाळ्याचे काम नाही. खुप शिक्षण घेतलो म्हणजे साहित्य निर्माण करता येते असे मुळीच नाही. साहित्य निर्माण करण्यासाठी स्वतःजवळ तशी प्रतिभा असावी लागते, त्यासाठी वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागते, नविन शिकण्याची जिद्द ठेवावी लागते, अपार मेहनत करण्याची तयारी असावी लागते, या सर्वासोबत विनम्रता असणे आवश्यक आहे तरच आपले साहित्य दर्जेदार निर्माण होते.
आज बरेचजण प्रसिध्दीच्या लालसेपोटी अक्षराला अक्षर जोडून, यमक जुळवून साहित्य तयार करीत आहेत. लगेच त्यास स्थानिक वृत्तपत्रामधून प्रसिध्दी मिळाले की झाले साहित्यिक. लगेच आपल्या नावसमोर किंवा नावाखाली बिरुदावली मिरवण्यास तयार. हे तर काहीच नाही काही साहित्यिक मंडळी इतरांचे साहित्य आपल्या नावावर प्रकाशित करून स्वतःची वाहवा मिळवितात. त्यामुळे ते खरोखरच साहित्यिक होतात काय ? हा प्रश्न सुटत नाहीच. आजकाल सोशल मीडियामुळे खुप साहित्य तयार करता येत आहे आणि अनेक साहित्य जतन करून ठेवता येत आहेत.
म्हणून आपले साहित्य प्रसिध्द व्हावे म्हणून लेखन न करता आपल्या मनाच्या समाधानासाठी पहिल्यांदा लिहिण्याचा प्रयत्न करावा. मनोरंजनातून लिहिलेले साहित्य दर्जेदार बनते. त्यानंतर लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी लिहावे म्हणजे आपल्या साहित्याला आपोआप प्रसिध्दी मिळेल. “जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करुनी सोडावे, सकळजन” या उक्तीनुसार सर्व लोकांना काही बाबी कळाव्यात म्हणून साहित्य निर्माण करावे. स्वतःच्या नावाच्या प्रसिध्दीसाठी जो लिहितो तो मुळात लिहित नसून आपला स्वार्थ शोधत असतो. म्हणून साहित्यिक मित्रांना माझी नम्रतेची विनंती आहे की फक्त प्रसिध्दीसाठी कधी ही साहित्य लिहू नका.
आपल्या लेखनीद्वारे समाजाचा, गावाचा, राज्याचा त्याचप्रमाणे देशाचा विकास होईल असे साहित्य निर्माण करणे आवश्यक आहे. जातीजातीत किंवा धर्माधर्मात तेढ निर्माण होईल असे कोणतेही लेखन प्रसिध्दीच्या मोहापायी प्रकाशित करू नये. त्यामुळे आपणास तर त्रास होतोच शिवाय आपल्यामुळे इतरांना देखील त्रास होऊ शकतो. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की, शब्द हे तलवारी सारखे धारदार शस्त्र आहे, जरा जपून वापरा. शब्दाने मन जसे जोडली जातात तसे तोडली देखील जातात. तेंव्हा चला प्रसिध्दीची जरा देखील आस न धरता निर्भेळ साहित्याची सेवा करूया आणि आपले साहित्य आपल्या नंतर येणारी पिढी अभ्यासेल असे तयार करू या.
वाचण्यासारखे आणखी काही…..
श्रीदेवी!! कॅमेऱ्या पलीकडची…….
पेढे घ्या पेढे…..
“अटॅक इज द बेस्ट डिफेन्स”- आक्रमक व्हा आणि जिंका!!
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.