UIDAI (Unique Identification Authority of India) ने नुकतेच mAdhaar हे ॲप रिलीज केले आहे. या ॲप द्वारे वापरकर्त्याला वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
आज आपण या ॲप बद्दल आणि त्याद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तसेच या ॲपचा वापर कसा करायचा ते देखील जाणून घेऊया.
या ॲप द्वारे ई-आधार डाऊनलोड करणे, आधार कार्ड अपडेट करणे, आधार कार्ड मिळवण्याकरता अर्ज करण्याची ठिकाणे शोधणे, आधार कार्ड मिळण्यासाठी अपॉईंटमेंट बुक करणे या सुविधा प्राप्त करता येऊ शकतात.
mAdhaar ॲप नक्की कसे आहे ?
mAdhaar म्हणजेच मोबाईल आधार कार्ड किंवा मोबाईल मधले अथवा पाकिटातले आधार कार्ड. mAdhaar हे UIDAI द्वारा डेव्हलप केले गेलेले अधिकृत ॲप आहे. सर्व आधार कार्ड धारकांसाठी हे ॲप उपलब्ध आहे.
तुमचे आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरला लिंक केलेले असेल त्या नंबरवर हे ॲप तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर या ॲप वरील तुमचे प्रोफाइल तुमच्या आधार कार्डाशी जोडले जाईल. त्यानंतर या ॲप वरील तुमचे प्रोफाइल हे तुमचे आयडेंटिटी प्रूफ म्हणून वापरले जाऊ शकते.
mAdhaar ॲप वर प्रोफाईल कसे तयार करायचे ?
सर्वप्रथम ज्या मोबाईल नंबरला तुमचे आधार कार्ड लिंक केलेले असेल त्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर त्यावरील “ रजिस्टर माय आधार“ हे बटन क्लिक करा.
तेथे एक चार आकडी पिन नंबर सेट करा. हा पिन नंबर तुमचे प्रोफाईल उघडण्यासाठी वापरला जाईल. अर्थातच हा पिन नंबर कोणालाही सांगू नका. तो लक्षात ठेवा किंवा एखाद्या गुप्त ठिकाणी लिहून ठेवा.
त्यानंतर ॲप मध्ये तुमचा आधार नंबर लिहून येणारा कॅप्च्या एंटर करा. तिथे असणाऱ्या “रिक्वेस्ट ओटीपी“ या बटणावर क्लिक करा. एक ओटीपी जनरेट होऊन तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर पाठवला जाईल.
तो ओटीपी एंटर करून व्हेरिफाय बटन क्लिक करा. तुमचे प्रोफाइल रजिस्टर होईल. त्यानंतर तुम्हाला तेथे तुमच्या आधार कार्ड वरील सर्व माहिती बघता येईल. एकदा का तुमचे प्रोफाइल ॲप वर क्रिएट झाले की तुम्ही तेथे असणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकाल. त्या कोणत्या ते आता आपण पाहू या….
१. गेट आधार
या सुविधेद्वारे तुम्ही तुमचे डिजिटल आधार कार्ड आणि डिजिटल मास्कड् आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. तुम्ही जर तुमचा UID किंवा EID विसरला असाल तर तो देखील या सुविधेद्वारे तुम्ही प्राप्त करू शकता. ह्यासाठी योग्य तो पिन नंबर एंटर करणे आवश्यक आहे.
२. आधार सर्विसेस
या सुविधेद्वारे आधार नंबर व्हेरिफाय करणे, ईमेल आयडी व्हेरिफाय करणे, व्हर्च्युअल आयडी तयार करणे, क्यू आर कोड तयार करणे, क्यू आर कोड स्कॅन करणे अशी कामे करता येतील.
३. आधार अपडेट
या सुविधेद्वारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ॲपद्वारे तुमचा घराचा पत्ता अपडेट करू शकता. तसेच त्याचे व्हेरिफिकेशन देखील करण्याची मागणी करू शकता.
४. माय आधार
हे प्रत्येकाचे वैयक्तिक सेक्शन असते. इथे पेपरलेस ऑफलाइन केवायसी करणे, ऑथेंटीकेशनची हिस्ट्री तपासणे, आधार लिंक असणाऱ्या बँक अकाउंट डिटेल्स तपासणे, आधार कार्डाची माहिती अपडेट करणे या सुविधा उपलब्ध आहेत.
५. एनरोलमेंट सेंटर सेक्शन
या सुविधेद्वारे तुमच्या घराजवळचे आधार नोंदणी केंद्र शोधून काढता येऊ शकते. अशा केंद्राचे मॅपद्वारे लोकेशन देखील तेथे दिसू शकते.
असे हे अतिशय उपयुक्त असणारे mAdhaar ॲप अँड्रॉइड आणि आयफोन अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईल धारकांसाठी उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअर या दोन्ही वरून हे ॲप डाऊनलोड करता येऊ शकते. हे ॲप अधिकृत असल्यामुळे ते वापरताना सुरक्षिततेची हमी आहे.
तर मित्र-मैत्रिणींनो आपले आधार कार्ड आपल्या मोबाईलमध्ये कायमस्वरूपी ठेवण्यासाठी, तसेच वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी या ॲपचा जरूर वापर करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.