निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग !!!

निराश व्यक्ती ध्येय गाठू शकेल का? हे तर अजिबातच खरं वाटत नाही. हाच विचार मनात आला ना?

पण यात तुमची काहीच चूक नाहीय. कारण आपला दृष्टिकोन संपूर्ण वेगळा आहे. आजवर आपण जे ऐकत आलोय त्यातूनच तो घडलेला आहे.

नेहमी सकारात्मक विचार करा!!! आशावादी रहा!!!

यातच तुमचं यश दडलं आहे. असे सुविचार आपण नेहमीच ऐकतो. पण या लेखातून आम्ही नकारात्मक विचारांचा यश मिळविण्यासाठी कसा वापर करायचा हे सांगणार आहोत.

आश्चर्य वाटलं ना? पण हो, हे शंभर टक्के खरंय. तुम्ही नेहमी सकारात्मक विचारसरणीचं महत्त्व ऐकत आलेला असलात तरी त्याचे काही तोटेही आहेत. ते कोणते हे जाणून घेऊया.

नेहमी सकारात्मक विचार केल्यास आपल्या मेंदूवर त्याचा विशिष्ट परिणाम होतो. सतत आपण यशस्वी होणारच असाच विचार करत राहिल्यास मेंदूला तीच गोष्ट खरी वाटू लागते आणि मग आपण सर्व काही मिळवले आहे अशी भावना निर्माण होते. त्यामुळे परिश्रम करण्याची तितकीशी गरज वाटत नाही.

कामाची टाळाटाळ सुरू होते आणि आपला सळसळता उत्साह ओहोटीला लागतो.

याचाच अर्थ असा की फक्त एकांगी विचारसरणी योग्य नाही.

सकारात्मक रहावे हे जरी खरे असले तरीही ते पूर्ण सत्य नाही. काही प्रमाणात नकारात्मक विचार, निराश होणे, चिंता वाटणे हे सुद्धा आवश्यक आहे. या भावना असतील तर त्या असुरक्षिततेवर मात करण्यासाठी म्हणून आपण प्रयत्नशील होतो आणि ध्येय गाठण्यासाठी सतत धडपडत रहातो.

सकारात्मक विचार करत असताना नेहमीच प्रत्यक्ष परिस्थिती कशी आहे याचा आढावा घेणे गरजेचे असते. नाहीतर तुमच्या आकांक्षा फक्त कागदावरच राहतील, प्रत्यक्षात उतरणार नाहीत. सकारात्मकतेच्या नावाखाली स्वप्नरंजन करणे योग्य नाही तर जागरूकता दाखवणे आवश्यक आहे. तुम्ही वास्तववादी असाल तरच योग्य रितीने विचार करु शकता.

कशा प्रकारे आपण अधिक यशस्वी होऊ शकतो?

तुमचं ध्येय कोणतंही असो जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी ही आहे त्रिसूत्री!!!

१. ध्येय निश्चित करणे

आपले ध्येय हे काहीतरी अशक्य कोटीतील गोष्ट नसावी. तर ते सुस्पष्ट आणि ठराविक वेळेच्या मर्यादेत बसविले पाहिजे. हा झाला पहिला सकारात्मक भाग.

२. आपल्याला काय हवे ते समजून घ्यावे

एकदा आपल्याला काय मिळवायचे आहे हे ठरले की त्यात कोणत्या अडचणी येऊ शकतात याचा अभ्यास करता येतो.

या अडचणी म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वात असलेले काही दोष जसे की चंचलता, आत्मविश्वासाचा अभाव अशा गोष्टी असू शकतात. आपल्या ध्येयाकडे जाणाऱ्या मार्गातील हा आहे नकारात्मक भाग.

३. आता या नकारात्मक भागाचा नीट विचार करा. त्यावर चिंतन करून हे दोष कसे दूर करता येतील ते पहा. आपल्यामधील कमतरता ध्येयाच्या आड येऊ देऊ नका. त्यासाठी लवकरात लवकर त्यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू करा.

मानस शास्त्रात याला मेंटल कॉन्ट्रास्टिंग (Mental Contrasting) असे म्हणतात. म्हणजेच मनात दोन परस्परविरोधी चित्रं रंगवायची. यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंचा वास्तववादी विचार केला जातो.

आपले ध्येय ही झाली चांगली बाजू आणि ते गाठण्यासाठी भविष्यात कोणत्या अडचणी येतील, ती झाली याचीच दुसरी बाजू.

एक प्रकारे हा तुलनात्मक अभ्यास आहे. या शास्त्रीय पद्धतीला WOOP असे म्हणतात.

काय आहे WOOP Strategy?

ही एक शास्त्रीय पद्धत असून यात आपल्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. ही पध्दत physiotherapy मध्ये वापरतात. तसेच मार्केटिंगच्या अभ्यासात WOOP थेरपी चा विचार केला जातो. त्यावरुन कोणत्या सुधारणा कराव्यात याचे मार्गदर्शन मिळते.

WOOP हा शब्द कसा तयार झाला आणि त्याचे महत्त्व काय आहे हे समजून घेऊया.

  • W. Wish (इच्छा)
  • O. Outcome (परिणाम)
  • O. Obstacles (अडथळे)
  • P. Plan (आराखडा)

या चार स्तंभावर ही संकल्पना आधारित आहे. हिचा डोळसपणे वापर करून तुम्ही यशस्वी होऊ शकता. कारण तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे सर्व भाग यात समाविष्ट करण्यात आले आहेत. फक्त तुमचे ध्येय साध्य करणे एवढ्यापुरताच हिचा उपयोग मर्यादित नाही. तर तुमच्या नातेसंबंधांना मजबूत बनविण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी आणि करिअर मधे अधिक उंचीवर जाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे तंत्र वापरू शकता.

याचे अजूनही काही फायदे खालीलप्रमाणे आहेत.

१. भीतीवर मात करण्यासाठी.

२.मानसिक खंबीरता

३. एनर्जी लेव्हल वाढते.

४. अधिक चांगली कार्यक्षमता.

हे जाणून घेतल्यानंतर आता तुमच्या मनात साहजिकच पुढचा प्रश्न आला असेल की हे तंत्र वापरायचे कसे?

WOOP कशाप्रकारे वापरता येते?

हे वापरण्यास अतिशय सोपे आहे. फक्त शांत जागी बसून सुरुवातीला याचा अभ्यास करा. म्हणजे तुमचे लक्ष आजूबाजूला वेधले जाणार नाही. एकदा का तुम्हाला याची सवय झाली की फक्त पाच मिनिटे एवढ्या कमी वेळात तुम्ही हे करु शकता. आणि ते सुद्धा मनातल्या मनात!!!

आता याची संपूर्ण शास्त्रीय पद्धत सविस्तर पाहूया.

१. सर्वप्रथम तुम्हाला काय हवंय, तुमची प्रबळ इच्छा कोणती याचा विचार करा. ते चित्र डोळ्यासमोर उभे करा आणि ही तुमची इच्छा एका लहान वाक्यात लिहून काढा. लक्षात ठेवा, हे वाक्य अगदी लहान पण सुस्पष्ट रितीने ध्येय मांडणारे असले पाहिजे.

२. आता हे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला कोणते मार्ग सुचतात ते आठवा. कदाचित हा मार्ग म्हणजे एखादी भावना सुद्धा असू शकते. हे मनात घोळवत रहा त्यामुळे तुम्हाला सुखद अनुभव येईल.

३. आता तुमच्या विचारांचा ट्रॅक थोडासा बदलून वेगळ्या दिशेला जा. तुम्ही ध्येय गाठण्यासाठी जो मार्ग निवडला आहे त्यात कोणत्या अडचणी येऊ शकतात याचा विचार करा. हे करत असताना स्वतःशी प्रामाणिक राहून सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. माझ्या मार्गातील अडथळे कोणते? या प्रश्नाची अनेक उत्तरं असू शकतात.

आळस, चालढकल, आत्मविश्वास नसणे, व्यसन किंवा इतर वाईट सवयी, यापूर्वी आलेले वाईट अनुभव इत्यादी घटक हे तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकतात. कारण हे सर्व म्हणजे तुमचा मेंटल ब्लॉक आहे. मनाच्या मार्गामधे कोसळलेली दरड असे समजा !!!

४. आता सर्वात शेवटी यावरचे उपाय आठवून पहा. प्रत्येक टप्प्यावर कोणती अडचण येऊ शकते आणि त्यावर तुम्ही कशी मात कराल याचा प्लॅन बनवा. एका पद्धतीने हे प्रश्न सुटले नाहीत तर दुसरा प्लॅन पण तयार ठेवा.

यशाचा आराखडा कसा बनवावा?

यशाचा आराखडा म्हणजेच Success Plan. यात जर आणि तर या दोन शक्यता लक्षात घेतल्या आहेत.

तुमचे ध्येय साध्य करत असताना जर अमुक एखादी गोष्ट घडली तर अशा पद्धतीने मी त्यातून पुढे वाटचाल करेन असा हा आराखडा मांडला जातो. म्हणजेच प्रतिकूल परिस्थिती आणि त्यावरचे संभाव्य उपाय यावर हा संपूर्ण प्लॅन बेतलेला आहे.

Success Plan चे व्यवहारातील एक साधे उदाहरण पाहूया म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला समजेल.

समजा सतत येणारे सोशल मिडिया वरील नोटिफिकेशन्स, मेसेज यामुळे तुमचे कामातून लक्ष विचलित होते. ही झाली प्रतिकूल परिस्थिती आणि यावर मात करण्यासाठी तुम्ही शोधलेला उपाय म्हणजे काम सुरु असताना एक तास मोबाईल न पहाणे.

अशाच प्रकारे संभाव्य अडचणी आणि त्या तुम्ही कशा सोडविणार आहात याचा विचार करु शकता.

याचा उपयोग करून वाईट सवयी, आळस यापासून स्वतःला दूर ठेवणे आणि आपले वर्तन सुधारणे शक्य आहे. पण हे एका दिवसात होणारे काम नाही. यासाठी सतत मानसिक सजगता जपली पाहिजे. अंगवळणी पडलेली कोणतीही सवय बदलण्यासाठी काही काळ जावाच लागतो. संयम आणि स्वतः वर विश्वास ठेवलात तर तुम्ही हे साध्य करु शकता.

या पद्धतीचा एक फायदा म्हणजे यात आधीच अडचणींवरचे उपाय मनाशी ठरविले जातात. त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा ती समस्या समोर उभी ठाकते, त्यावेळी आपला मेंदू त्यावरचे उपाय सहजपणे समोर आणतो.

मनाशीच आपण याची प्रॅक्टिस केलेली असल्याने तशीच कृती प्रत्यक्षपणे करणे तितकेसे जड जात नाही.

यावरुन तुमच्या लक्षात आले असेल की कोणत्याही अडचणींचा विचारही न करता फक्त सकारात्मक विचार करणे तितकेसे उपयोगी नाही, त्यापेक्षा व्यावहारिक आणि वास्तवाचे भान ठेवून काही प्रमाणात नकारात्मक विचार सुद्धा आपल्या फायद्याचे आहेत.

कारण यात समस्या येणारच नाहीत असा मनाचा कल नसतो तर समस्या येतील आणि मी त्यावर उपाय करत करत पुढे जाईन अशा प्रकारे मानसिक तयारी केली जाते. त्यामुळे आपला उत्साह, जिद्द टिकून राहते आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते.

म्हणजेच यावरून निराशा, चिंता आणि आपल्यातील कमतरता या वाईट नसून यातच यशाचा मार्ग दडलेला आहे हे सिद्ध होते.

मग यापुढे कोणतेही नकारात्मक विचार मनात आले तर घाबरून जाऊ नका किंवा ते झटकून पण टाकू नका.. त्यांचा शिडी सारखा वापर करा आणि यशाची एकेक पायरी चढत जा. जेव्हा तुम्ही शिखरावर जाल तेव्हा लक्षात येईल वेळोवेळी या नकारात्मक विचारांमुळे तुमच्या प्रगतीला किती हातभार लागलाय!!!!

लेख आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

असा बनवा तुमच्या वैयक्तिक विकासाचा आराखडा

मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचे निन्जा टेक्निक 🤩

विविध विषयांवरील शास्त्रशुद्ध माहिती ऑडिओ बुकच्या स्वरूपात ऐकण्यासाठी येथे क्लिक करून KUKU FM चे ऍप डाउनलोड करा. आणि वार्षिक सब्स्क्रिप्शन प्लॅन खरेदी करताना KPJHS8825 हा मनाचेTalks चा कुपन कोड वापरा. आणि दिवसाला फक्त रु. १/- इतका खर्च करून वर्षभरासाठी ज्ञानाचे भांडार खुले करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।