साखरेचं खाणार त्याला देव देणार!!! तुमच्या तोंडात साखर पडो…
ऐकल्याच असतील ना या म्हणी?
यावरून तुमच्या लक्षात येईल की रोजच्या जीवनात साखर किती बेमालूमपणे मिसळून गेलीय ते.
अगदी आपला दिवस सुरु होतो तोच चहा, कॉफी मधल्या साखरेपासून. हल्ली बऱ्याच प्रमाणात लोकं साखर टाळतात.
कारण साखरेचे दुष्परिणाम आता सर्वांना माहीत झालेत. पण नवीन संशोधनातून साखर आणि मानसिक आरोग्य यांचा काय संबंध आहे हे समोर येत आहे.
नेमके साखरेमुळे शरीरात काय बदल होतात हे पाहूया.
साखरेचे प्रकार कोणते?
साखर म्हटली की आपल्या डोळ्यासमोर पांढऱ्या रंगाची, कणीदार साखर येते.
पण ब्राऊन शुगर, मॅपल सिरप, कॉर्न सिरप, फ्रूक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज आणि ज्यूस ही सर्व साखरेची विविध रूपे आहेत.
याशिवाय निरनिराळ्या प्रकारची कोल्ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड यातही भरपूर प्रमाणात साखर असते.
नाश्त्याला वापरले जाणारे रेडी टू कूक फूड, एनर्जी बार, फ्लेवर्ड दही, ब्रेड इत्यादी अनेक पदार्थांमध्ये साखर असते. यामुळे जरी अपायकारक असली तरीही साखर संपूर्ण वगळणे बऱ्याच वेळा शक्य होत नाही.
साखर किती प्रमाणात खाणे योग्य आहे?
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार आपल्या एकूण दैनंदिन आहारात ५% एवढे साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवावे.
परंतु यापेक्षा कितीतरी पटीने अधिक साखर आहारातील कोणत्या ना कोणत्या पदार्थातून आपल्या शरीरात जात असते.
पण साखरेचे आपल्या मेंदूवर होणारे परिणाम लक्षात घेता आपण हे प्रमाण कसे कमी करता येईल यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे.
मेंदूवर होणारे साखरेचे दुष्परिणाम कोणते?
कित्येक पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यात साखर घालतात. शिवाय साखरेमुळे पदार्थ लवकर खराब होत नाहीत.
पण या साखरेचा एक अतिशय वाईट पण लोकांना क्वचितच माहीत असणारा गुणधर्म म्हणजे साखरेचे व्यसन लागते.
रिसर्च मधून समजते की साखर कोकेन पेक्षाही जास्त व्यसन लावणारी आहे.
साखर खाल्ल्यानंतर मेंदूमध्ये डोपामीन नावाचे हार्मोन निर्माण होते.
या हार्मोन्समुळे कोणत्याही गोष्टीचे व्यसन लागते. शिवाय साखर खाल्ल्यावर शरीरात एनर्जी निर्माण होते आणि मूड सुधारतो त्यामुळे वरच्यावर साखर खावी असे वाटते.
आणि या सवयीचे रुपांतर व्यसनात कधी होते हे कळतच नाही. पण सतत अधिक प्रमाणात साखर खाल्ल्यावर मेंदूमध्ये कोणते बदल होतात हे जाणून घेऊया.
डिप्रेशन, अस्वस्थता, वागण्याचे बदललेले पॅटर्न असे अनेक वाईट परिणाम साखरेच्या व्यसनामुळे होतात. इतकेच काय पण अतिप्रमाणात साखर आणि स्किझोफ्रेनिया सारखा आजार यांचाही संबंध संशोधनातून दिसून येतो.
आहारातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी काय करावे?
एवढे वाईट परिणाम करणारे हे व्यसन कमी करण्यासाठी ठोस उपाय करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.
जास्त प्रमाणात मासे आणि स्टार्च युक्त भाज्या यांचे सेवन केले असता साखरेमुळे होणारे वाईट परिणाम काही प्रमाणात टाळता येतात.
साखरेचे प्रमाण आहारातून कमी करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे
कोणताही पदार्थ विकत घेताना त्यात कोणत्या स्वरूपात साखर आहे व किती प्रमाणात हे चेक करण्याची सवय ठेवा.
मॉल अथवा सुपरमार्केट मधे जास्त साखरयुक्त पॅकेज फूड मिळते. त्याऐवजी इतर ठिकाणी जाऊन साखरेचे नैसर्गिक पर्याय असलेली फळे विकत घ्या.
गोड पदार्थ पाहिले की खावेसे वाटतात आणि मग आपण लगेच ते विकत घेऊन खातो.
पण हे तीव्रतेने खावेसे वाटणे फक्त काही काळापुरते असते. यावर उपाय म्हणून घरातून निघण्याच्या आधी व्यवस्थित खाऊन किंवा जेवून बाहेर पडा.
जर पोट भरलेले असेल तर तुम्ही गोड पदार्थ पाहिल्यावर लगेच खरेदी करुन खाणार नाही.
किंवा घरात सुद्धा असे पदार्थ फ्रीजमध्ये भरुन ठेवू नका. जर हे व्यसन निर्माण करणारे पदार्थ तुमच्या नजरेसमोर आलेच नाहीत तर ते पोटात जाण्याची शक्यता सुद्धा कमी होते.
आपले ट्रिगर फूड ओळखा. म्हणजे असा कोणता पदार्थ आहे की जो तुम्ही टाळू शकतच नाही. या पदार्थांपासून कटाक्षाने दूर रहावे. उदा. चॉकलेट
तुम्ही साखरेचे पदार्थ कमी खायचे असे ठरवले तरी जीभेला लागलेले व्यसन आणि चटक कमी होण्यास काही काळ जावा लागतो.
यादरम्यान साधे, घरगुती जेवण आणि त्यातील कमी गोड पदार्थ तुम्हाला आवडणार नाहीत पण जाणीवपूर्वक ही चव तुम्हाला हळूहळू निर्माण करावी लागेल. अन्यथा साखरेचे व्यसन सुटणे फार कठीण आहे.
अगदी कडकडून भूक लागली की मगच जेवा. तोपर्यंत उगाच जे समोर येईल ते तोंडात टाकायची सवय काढून टाका.
यामुळे अनावश्यक साखर पोटात जाणार नाही.
फळे खाण्याची सवय लावा. प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. यामुळे बराच वेळ पोट भरलेले वाटते आणि सारखे काहीतरी खाण्याची भावना कमी होते.
बडिशेप चघळत रहा. यामुळे पचनाच्या समस्या कमी होतात आणि साखरेचे क्रेव्हिंग येत नाही.
सकाळच्या नाश्त्याला गोड पदार्थ टाळावेत. नाहीतर पुन्हा थोड्याच वेळात काहीतरी गोड पदार्थ खाण्याची इच्छा उफाळून येते. त्याऐवजी अंडी, चीज, टोस्ट असे पदार्थ किंवा आपले पारंपारिक नाश्त्याला केले जाणारे पदार्थ खाणे हितकर असते.
तुम्ही स्वयंपाक स्वतः बनवलात तर त्यात किती साखर घालावी हे तुमच्या हातात आहे. पण विकतचे अन्नपदार्थ खात असाल तर हा पर्याय उरतच नाही.
म्हणून शक्यतो स्वतः जेवण बनवा. यामुळे कोणते पदार्थ शरीरात जाऊ द्यावे आणि कोणते पदार्थ अजिबातच खायचे नाहीत हे तुम्हाला ठरवता येते.
आणि यामुळे आपल्या खाण्याचा कंट्रोल आपल्या हातात येतो.
आजकाल इंटरनेट वर कोणत्या पदार्थात किती साखर असते आणि हे प्रमाण कमी करण्यासाठी कोणते आरोग्यदायक पर्याय उपलब्ध आहेत याची भरपूर माहिती उपलब्ध आहे.
याचा वापर करून आपण योग्य ते पर्याय निवडू शकतो.
आपलं परंपरागत अन्न जे हजारो वर्षांपासून आपले पूर्वज खात आले आहेत असे अन्नपदार्थ शरीरासाठी सर्वात लाभदायी असतात.
याशिवाय शाकाहारी अन्नपदार्थ खाणे आणि भूक लागेल त्यापेक्षा दोन घास कमीच खाणे नेहमीच हितावह असते.
आरोग्यदायक सवयी लावून घ्या
अन्न ही आपली प्राथमिक गरज आहे. पण कोणते अन्न शरीरासाठी चांगले, काय खाल्ले असता दीर्घ काळ शरीर निरोगी राहील हा खरंच निरंतर अभ्यासाचा विषय आहे.
आताच्या काळात जिभेला आणि मनाला भुरळ पाडणारे अनेक अन्नपदार्थ सहज उपलब्ध आहेत.
पण आपण सरसकट विचार न करता समोर येईल ते पोटात ढकलणे खूपच धोकादायक आहे. त्यामुळे नीट विचार करून आपल्या सवयी ठरवाव्यात. जेव्हा तुम्ही निश्चय पूर्वक आरोग्यदायी जीवनशैलीचा स्विकार करता तेव्हा निश्चितच तुमच्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. जीभेचे चोचले पुरवताना चुकीच्या आहाराच्या ‘आहारी’ जाऊ नका.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. तुम्ही साखरेचे पदार्थ आणि त्यांचे घातक परिणाम याबाबत काय जाणता ते सुद्धा जरुर सांगा. आणि आहारातील साखर कमी करण्यासाठी तुम्हाला यातील कोणता उपाय परिणामकारक वाटतो हे आम्हाला कळवा.
लाईक व शेअर करा आणि उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.