भारतात पूर्वापार धार्मिक पद्धतीने विधिपूर्वक लग्न करण्याची प्रथा आहे. अशा पद्धतीने केलेले लग्न वैध मानले जाते. कोर्ट मॅरेज करण्याची आवश्यकता नाही.
परंतु लग्न जरी धार्मिक पद्धतीने केले तरी त्याचे रजिस्ट्रेशन करून मॅरेज सर्टिफिकेट तयार करून घेणे अनेक बाबतीत उपयोगी पडते. विवाहित जोडप्याला भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करताना मॅरेज सर्टिफिकेट अतिशय उपयोगी पडते.
शिवाय मॅरेज सर्टिफिकेट बनवणे अतिशय सोपे असून त्याला फार वेळही लागत नाही आणि फारसा खर्चही येत नाही.
सध्या तृणमूल कोंग्रेसच्या नेत्या आणि संसद सदस्य असणाऱ्या नुसरत जहा आणि बिजनेसमन निखिल जैन ह्यांचे लग्न मोडले ही गोष्ट चर्चेत आहे.
त्यामध्ये नुसरत ह्यांनी आपले लग्न तुर्कस्थानमध्ये झाले असल्यामुळे आणि आंतरधर्मीय असल्यामुळे भारतात वैध नसून ते मोडण्याचा किंवा घटस्फोटाचा प्रश्नच येत नाही असे म्हटले आहे.
ह्यावरून सध्या देशभर सगळीकडे लग्नाच्या रजिस्ट्रेशनची आणि मॅरेज सर्टिफिकेटच्या आवश्यकतेची चर्चा सुरु झाली आहे.
मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर विवाहित जोडप्याला अनेक कायदेशीर बाबींमध्ये अडथळा येऊ शकतो.
म्हणून आपण आज लग्नाचे रजिस्ट्रेशन आणि मॅरेज सर्टिफिकेट हयासंबंधी सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
भारतात मॅरेज सर्टिफिकेट कसे महत्वाचे आहे?
मॅरेज सर्टिफिकेट ही लग्नाला मिळालेली एक प्रकारची कायदेशीर मान्यता आहे. भारतात दोन प्रकारचे विवाह अधिनियम आहेत.
१. हिंदू विवाह अधिनियम (१९५५)
ह्या अधिनियमाअंतर्गत विवाह करू इच्छिणाऱ्या दोन्ही व्यक्ती एकतर अविवाहित किंवा घटस्फोटीत असल्या पाहिजेत किंवा त्यांचे जोडीदार हयात नसले पाहिजेत. अशा दोन व्यक्ती ह्या पद्धतीने त्यांचा विवाह रजिस्टर करून मॅरेज सर्टिफिकेट मिळवू शकतात.
२. विशेष विवाह अधिनियम (१९५४)
हा अधिनियम बिगर हिंदू असणाऱ्या सर्व भारतीयांसाठी लागू होतो. ह्या अधिनियमाअंतर्गत विवाह करू इच्छिणाऱ्या दोन्ही व्यक्तीना त्यांच्या त्यांच्या धर्मातील नियम लागू होतात. आंतरधर्मीय विवाह देखील ह्या ऍक्टद्वारे रजिस्टर केले जातात व त्यानुसार मॅरेज सर्टिफिकेट मिळते.
ह्या दोन्ही ऍक्टपैकी कोणत्याही पद्धतीने लग्न रजिस्टर केलेली जोडपी एकमेकांना कायद्याने बांधील असतात. त्यांचे कायद्याने एकमेकांवर काही हक्क आणि काही जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे लग्न झालेल्या जोडप्याला विशेषतः त्यातील महिलांना कायदेशीर संरक्षण मिळते.
जर लग्न रजिस्टर केले नाही तर काय होते ?
आता प्रश्न असा आहे की एखाद्या जोडप्याने त्यांचे लग्न रजिस्टर केले नाही तर ते लग्न अवैध ठरते का?
तर नाही, असे होत नाही. ज्या त्या धर्माप्रमाणे आणि सामाजिक संकेत पाळून केलेले लग्न भारतात वैध मानले जाते. तसेच वेळ आलीच तर घटस्फोटाची कारवाई सुद्धा त्याच पद्धतीने होते.
परंतु मॅरेज सर्टिफिकेट असेल तर अनेक बाबतीत उपयोगी पडते. उदाहरणार्थ बँकेत नॉमिनी म्हणून नाव देताना, एकत्र घर खरेदी करताना, इन्शुरन्स क्लेम करताना आणि मुलांची कस्टडी मिळवायची वेळ आली तर मॅरेज सर्टिफिकेट दाखवले की काम सोपे होते.
भारतात मॅरेज सर्टिफिकेट कोणाकडून दिले जाते?
लग्न रजिस्टर करण्यासाठी भारतात आपल्या विभागातील सब डिविजनल मॅजिस्ट्रेट ह्यांच्याकडे अर्ज करता येतो. सरकारी सुट्ट्या सोडून कोणत्याही दिवशी असा अर्ज करता येतो.
कोणत्याही ठिकाणाहून लग्न रजिस्टर करण्याचा अर्ज भरणे शक्य आहे का?
आपले राहते घर जिथे आहे त्या विभागातील सब डिविजनल मॅजिस्ट्रेट ह्यांच्याकडे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. शिवाय ऑनलाइन पद्धतीने कुठूनही असा अर्ज करता येऊ शकतो. त्यासाठी विभागाची अट नाही.
पासपोर्टसाठी अर्ज करताना मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक असते का?
पासपोर्टसाठी अर्ज करताना पूर्वी मॅरेज सर्टिफिकेट सादर करणे अनिवार्य होते. परंतु २०१८ साली आलेल्या नवीन नियमानुसार आता पासपोर्ट अर्जाबरोबर मॅरेज सर्टिफिकेट जोडणे सक्तीचे नाही. हा बदल महिलांना ध्यानात घेऊन करण्यात आला आहे. अनेक महिला ज्यांचे लग्न अयशस्वी असू शकते त्यांचा त्रास वाचवण्यासाठी नियमात असे बदल करण्यात आले आहेत.
लग्न रजिस्टर करून मॅरेज सर्टिफिकेट मिळायला किती वेळ लागतो?
हल्लीच्या कम्प्युटरच्या जमान्यात ही प्रोसेस अतिशय फास्ट झाली आहे. आता अर्ज केल्यापासून लग्न रजिस्टर होऊन मॅरेज सर्टिफिकेट मिळायला केवळ ७ ते १५ दिवस लागतात.
मात्र जोडप्याला एकदा सब डिविजनल मॅजिस्ट्रेट ह्यांच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जावे लागते आणि काही फॉर्म भरावे लागतात.
ऑनलाइन अर्ज केला असेल तरी अपॉईंटमेंट घेऊन ही प्रोसेस पूर्ण करावी लागते. संपूर्ण प्रोसेस जास्तीत जास्त १५ दिवसात पूर्ण होते.
मॅरेज सर्टिफिकेट तयार करायला किती खर्च येतो?
मॅरेज सर्टिफिकेट बनवणे फारसे खर्चीक नाही. हिंदू विवाह ऍक्टनुसार रु. १००/- तर विशेष विवाह ऍक्टनुसार रु. १५०/- इतकी ऍप्लिकेशन फी भरावी लागते.
त्याव्यतिरिक्त प्रतिज्ञापत्र करण्यासाठी ४०० ते ५०० रुपये खर्च येतो.
मॅरेज सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन अर्ज करताना तुम्ही ज्या राज्यात रहात असाल त्या राज्याच्या ‘सरकारी मॅरेज रजिस्ट्रेशन’ वेबसाइटला भेट द्या. तेथे विचारलेली संपूर्ण माहिती नीट आणि खरी भरा.
अशी माहिती सबमिट झाल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक तारीख मिळेल. ती ऍक्सेप्ट करून त्या दिवशी सब डिविजनल मॅजिस्ट्रेट ह्यांच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन लग्नाचे रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर साधारण १५ दिवसात मॅरेज सर्टिफिकेट मिळते.
तर ही आहे मॅरेज सर्टिफिकेट बनवण्याची सोपी प्रोसेस. अतिशय कमी खर्चाची आणि कमी वेळात होणारी ही प्रोसेस एकदाच करावी लागते. परंतु त्यापासून मिळणारे कायदेशीर संरक्षण मात्र अतिशय महत्वाचे आहे.
पती-पत्नी ना एकमेकांच्या संपत्तीत वाटा मिळणे, पेन्शन असेल तर फॅमिली पेन्शन मिळणे, तसेच वडीलोपार्जित संपत्तीमध्ये आपल्याला व आपल्या मुलांना वाटा मिळणे ह्यासर्व बाबींमध्ये मॅरेज सर्टिफिकेट असणे फार महत्वाचे ठरते.
त्यामुळे सर्वांनी आपल्या विवाहाचे रजिस्ट्रेशन जरूर करून घ्यावे.
विशेषतः महिलानी ह्या बाबतीत आग्रह धरावा आणि कायदेशीर संरक्षण मिळवावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.