बालपणापासून ती उलटे लिहिते. ती काय आणि कसे लिहिते, हे एक क्षण आपल्याला कळत नाही. पण, तिने लिहिलेल्या कागदासमोर जेव्हा आरसा धरला जातो तेव्हा उलटी अक्षरे सुलटी दिसू लागतात. तिच्या वेगवेगळ्या पाच भाषा उलट्या लिहिण्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे. या उलटे-सुलटे लिहिण्याच्या छंदामुळेच आज तिच्या नावाला एक नवी ओळख मिळाली आहे. ‘Mirror Writting’ मधील या ‘मिरॅकल’चे नाव अमरिन खान आहे.
नागपूर येथील वकील दाम्पत्य अयुब आणि शबिना खान यांची अमरिन ही कन्या आहे. तिचा जन्म 30 जानेवारी 1997 रोजी नागपूरमध्ये झाला. अमरिन लहानपणापासूनच उलट सुलट काहीतरी लिहायची. हे तिच्याकडून अजाणतेपणे व्हायचे. पण, प्रत्येक घरात लहान मुलाने डाव्या हातांनी लिहिले की उजव्या हाताने लिहायला शिकवले जाते, त्याचप्रमाणे अमरिनचे आईवडील देखील तिला यासाठी रागावत असत.
अमरिन जसजशी मोठी होत गेली तशी तिला आपण काय लिहितो हे कळायला लागले. लहानपणी जे अजाणतेपणी लिहिले जायचे ते आता जाणतेपणी व्हायला लागले. उलटे काहीतरी लिहायचे आणि ते आरशामध्ये बघायचे, लिहिलेले आरशात सुलटे दिसले की तिला त्याचा मनस्वी आनंद व्हायचा. इतर मुलांसारखी आपली मुलगी सरळ लिहीत नाही म्हणून बरेचदा अमरिनने आई-वडिलांचा मारही खाल्ला आहे. पण, दहावीच्या परीक्षेत जेव्हा तिने 94 टक्के गुण मिळवले तेव्हा त्या दोघांनाही जो आनंद झाला तो शब्दांमध्ये व्यक्त होणे शक्य नाही.
दहावीनंतर घरच्यांना मुलीने जोपासलेल्या छंदाचा अभ्यासावर परिणाम होत नाही याची खात्री झाली होती. ही एक वेगळी कला आहे याचीही त्यांना जाणीव झाली होती. त्यामुळे आईवडील अमरिनला प्रोत्साहन द्यायला लागले. तिनेही या संधीचे सोने करायचे ठरवले. अभ्यास सांभाळून तिने आपला छंद जोपासायला सुरूवात केली. एका-एका भाषेचा ती सराव करू लागली. आज हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि अरेबी या पाच भाषांमध्ये ती सामान्य माणसापेक्षा अधिक वेगाने उलटे लिहू शकते. अमरिनने पाच भाषांमध्ये मिरर रायटिंग करून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आपल्या नावाची नोंद करून एक नवा कीर्तिमान स्थापित केला आहे. इच्छा असेल तर काहीही कठीण नाही हे तिने सिद्ध करून दाखवले आहे. अमरिन आपले शिक्षण सांभाळून छंद जोपासत आहे. ती सध्या अंजुमन कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे.
मुलांच्या मनात एखाद्या मुळाक्षराचे प्रतिबिंब तयार झाले की ते लिखाणातून उमटते. लहानपणी मुले उलटसुलट लिहितात, कारण त्यांच्या मनात एखाद्या मुळाक्षराबद्दल तशी प्रतिमा तयार झालेली असते. काही काळानंतर मुले मुळाक्षरे बरोबर लिहायला लागतात. गेल्या १५ वर्षांपासून मी मुलांसाठी सुलेखन चळवळ राबवत आहे. बरीच डाव्या हातांनी लिहिणारी मुलेसुद्धा माझ्याकडे येतात. त्यांची अक्षरेही खूप छान असतात. त्यामुळे डाव्या हाताने लिहिण्याचा अक्षरावर काहीही परिणाम होत नाही. – राम कस्तुरे, ज्येष्ठ सुलेखनकार, वेदाक्षरे, सुलेखन चळवळ, डोंबिवली
ऑस्ट्रेलिया आणि जपानचे निष्कर्ष
एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राच्या अनौपचारिक सर्व्हेमध्ये ६५,००० लोकांपैकी केवळ १० जणांना अशाप्रकारे लिहिता येते. लहान मुलांमध्ये असे लिहिण्याचे प्रमाण जास्त असते. मुख्यतः डाव्या हातांनी लिहिणारी मुले मिरर रायटिंग चांगल्या प्रकारे करू शकतात. असे या सर्वेमधून पुढे आले आहे. जपानमधील होक्काईदो विद्यापीठातील न्यूरोसर्जरी विभागाच्या एका प्रयोगाअंती डोक्याला इजा झाल्यामुळे मनुष्य मिरर रायटिंगसदृश लिखाण करतो, असे स्पष्ट झाले आहे. पण, याच विद्यापीठाच्या एका अभ्यासामधून लहान मुले नकळतपणे उलटे लिहितात, असे समोर आले आहे. त्यामुळे आताच मिरर रायटिंगच्या मुळाचा शोध लावणे कठीण असल्याचे या विद्यापीठातील जाणकार म्हणतात.
लिओनार्दो-दा-विंची
लिओनार्दो १५ व्या शतकातील एक महान चित्रकार व संशोधक होता. लिओनार्दोने अनेक क्षेत्रात योगदान दिले असले, तरी इतिहासात त्याची चित्रकार म्हणून खूप मोठी ओळख आहे. मोनालिसा, द लास्ट सपर, मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्याची जगप्रसिद्ध चित्रे आहेत. त्याच्या नव्याने सापडलेल्या अनेक नोंदवह्यांतील उलट अक्षरांमधील नोंदींमुळे लिओनार्दोविषयीचे गूढ वाढतच जाते. त्याने मिरर रायटिंगमध्ये अनेक प्रयोग केल्यामुळे लिओनार्दोची कारकीर्द रहस्यमय झाली आहे.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.