मला भेटलेली आजी!

ठाणे स्थानकावरुन रात्री लोकल पकडण्यासाठी फलाट क्रमांक एकवर उभा असताना एक ७५ वर्षीय आजी काही लोकांना आलेल्या लोकलबद्दल विचारत होती. मला त्या आजीनं काय विचारलं ते स्पष्ट ऐकायला आलं नाही. लोकल होती खोपोली आणि मला वाटलं आजीला जायचं आहे कसार्‍याला! ज्या लोकांना विचारलं त्यांनी आजीला लोकल पकडायला सांगितली होती. गाडीत बसल्यानंतर मी आजीला कुठे जायचं आहे, असं विचारलं. म्हातारीनं खांदे उडवून कल्याणला जायचं असल्याचं सांगितलं. म्हातारीचं उत्तर ऐकून मी लोकलच्या दरवाज्यात गाणी ऐकत उभा राहिलो. थोड्या वेळाने माझ्या बाजुच्या एका माणसाने म्हातारी मला बोलवत असल्याचे सांगितले. मी कानातले इयर फोन काढून म्हातारीकडे गेलो. तिला काही विचारायच्या आधीच तिने मला बसायला जागा दिली.

तिच्या मांडीवर एका लुगड्याचं गाठोडं होतं. बाजुला बसल्यानंतर सहज प्रश्न केला, कल्याणहून कुठे जायचं आहे?

ती म्हणाली, कल्याणलाच! मी विचारलं कल्याणला कुठे?

ती म्हणाली, मी नाशिकची आहे. ठाण्याला भिक मागते आणि कल्याण स्टेशनमध्येच राहते!

म्हातारीचं उत्तर ऐकून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आम्ही दोघे बोलत असताना डब्यातील सगळ्यांच्या नजरा मला न्याहाळत होत्या. बोलत असताना पुढील स्टेशन डोंबिवली अशी घोषणा ऐकायला आली. माझ्या मनात अनेक प्रश्न होते. त्यांची उत्तरं मला मिळवायची होती. त्यासाठी मी आजीला डोंबिवलीला चहा प्यायला उतरतेस काय? असं विचारलं. म्हटलं चहा वगैरे घे, नंतर तुला कल्याणला जाणार्‍या गाडीत बसून देतो! आधी म्हातारीने नकार दिला. मात्र नंतर तिला काय वाटलं काय माहित ती माझ्यासोबत डोंबिवलीला उतरली!

डोंबिवलीत उतरल्यानंतर फलाटावरील टपरीवाल्याला चहा सांगितला. त्यावर म्हातारी म्हणाली, मला उपवास आहे. चहापेक्षा फराळाचं काही तरी घ्या! चहा ऐवजी मग मी तिला वेफर्स घेऊन दिले. तोंडात एकही दात नसल्याने म्हातारी हळूहळू चिप्स तोंडात टाकत माझ्यासोबत बोलायला लागली होती. भाऊ, मी नाशिकची आहे. मला दोन मुलं, सुना आणि नातवंडं आहेत. पण मुलं सांभांळत नसल्याने माझ्यावर भिक मागण्याची वेळ आली आहे.
मी म्हटलं, इतक्या दूर येण्यापेक्षा नाशिकमध्येच का नाही मागत?

त्यावर ती म्हणाली, तिथे ओळखीचे लोक भेटतात. इकडे मला कोण ओळखतंय? त्यामुळे इकडे भिक मागायला काही वाटत नाही. आजी आता दिलखुलास बोलायला लागली होती. मी हळूच मोबाईलचा कॅमेरा चालू केला. तिला कळणार नाही अशा पध्दतीनं मी व्हिडीओ काढायला सुरूवात केली. मी म्हातार्‍याचा विषय काढला. तेव्हा तिने म्हातार्‍याच्या अनेक आठवणी सांगितल्या. म्हातारा तेव्हासुद्धा म्हणाला होता की, मी गेल्यावर तुझं काही खरं नाही. पण व्हायचं होतं तेच झालं! मुलं लहान असतानाच म्हातार्‍याचं निधन झालं. मुंबईला आणून दवाखाना केला. पण काही फायदा झाला नाही. अखेर म्हातार्‍याचं निधन झालं. आज म्हातारा असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती, असं सांगताना म्हातारीचा कंठ दाटून आल्यासारखं वाटत होतं. तिचे डोळेही पानावल्यासारखे वाटत होते. थोड्यावेळात ती रडेल की काय, असा अंदाज आल्याने मी विषय बदलत इथून गेल्यावर नातू विचारतात काय?असा प्रश्न विचारला.

तर ती म्हणाली, नातू पण नाही विचारत! लहान आहेत अजून चौथी -पाचवीत आहे आता! त्यांना काही कळत नाही अजून!

मी म्हटलं, नाशिकला कीती दिवसांनी जातेस?

पंधरा-वीस दिवसांनी जात असल्याचं तिने सांगितलं. त्यापेक्षा जास्त दिवस नाही गेलीस तर मुलं विचारतात का? असं विचारल्यावर म्हातारी म्हणाली, मी गेली काय किंवा नाही गेली काय, त्यांना काहीच फरक पडत नाही!

इतक्यात दोन रेल्वे पोलिसांनी मला हटकलं. एकाने म्हातारीला ओरडून विचारलं, हा कोण लागतो तुझा? नातेवाईक आहे का?

अचानक झालेल्या प्रश्नांच्या भडीमाराने ती गांगरुन गेली. पटकन तिच्या तोंडातून शब्द निघाले, माझ्या बहिणीचा मुलगा आहे! मी शांतपणे हे सगळं बघत होतो. बरं तुझ्या बहिणीचा मुलगा आहे का? कळेल काय आहे ते? चला, पोलीस स्टेशनमध्ये! आतमध्ये गेल्यावर कळेलच तुझ्या बहिणीचा मुलगा आहे की कोण आहे?

पोलिसांनी सांगितल्याबरोबर मी रस्त्याने चालायला लागलो. पाठीमागून पोलीस डोक्यावर गाठोडं घेतलेल्या आजीला घेऊन येत होते. मी पोलीस स्टेशनमध्ये एका अधिकार्‍याच्या समोर बाकावर जाऊन बसलो. दोन साध्या कपड्यातले पोलीस खिडकीतून डोळे मोठे करुन बघत होते. बाजुलाच दोन महिला पोलीस बसलेल्या होत्या. मधल्या एका खुर्चीत एक वरिष्ठ अधिकारी बसलेले होते. एकाने त्यांना सगळा प्रकार सांगितला. सुरूवातीलाच त्यांनी मोठ्या आवाजात मला विचारलं तुम्ही कोण आहात?

मी अत्यंत विनम्रतेने त्यांना पत्रकार असल्याचं सांगितलं. त्यावर थोडं नरमाईच्या भाषते ते म्हणाले, तुम्ही पत्रकार असल्याचं सांगता, तुम्हाला सगळं माहित आहे की, असं कोणाचं शुटींग करायचं नसते म्हणून! मग कशासाठी करत होतात शुटींग?

मी त्यांना सांगितलं की, अहो मला आजीला मदत करायची इच्छा आहे! इतक्यात खिडकीतून बघणार्‍या एका पोलिसाने म्हातारीला एक प्रश्न विचारला. म्हातारी घाबरलेली असल्याने त्याचं उत्तर मीच देऊन टाकलं. त्यावर खिडकीतून विचारणारा पोलीस माझ्यावर घसरला, तुम्ही शांत राहा हो, थोडावेळ! म्हातारीला बोलू द्या! तेवढ्यात साहेबानं मला माझं ओळखपत्र मागितलं. बॅगेत ओळखपत्र शोधत होतो पण ते काही सापडेना! त्यांना म्हटलं ओळखपत्र घरी विसरलोय!

दुसर्‍या एकाने मला तिथून उठवून आतमध्ये नेलं. साहेबानं आजीला नाव विचारलं. भीमाबाई गिते, वय ७५ वर्ष, राहणार नाशिक. पुढे सगळी हकीकत ती कथन करत होती. मात्र तिचं सगळं लक्ष माझ्याकडे होतं. मी पोलिसांना सांगितलं तिला माझी काळजी वाटत आहे. तिला सांगा की, तुम्ही मला ओळखता म्हणून!

त्यावर सगळ्यांनी हसून दाद दिली. त्यानंतर म्हातारीला सांगितलं, काळजी करू नको हे आमचे मित्र आहेत. आता पोलीस ठाण्यातलं वातावरण निवळलं होतं. सगळ्यांना हसताना बघून म्हातारीच्या चेहर्‍यावरही नूर आला होता. आतापर्यंत घाबरलेल्या म्हातारीच्या आवाजात आत्मविश्वास आला होता. कडक आवाजात म्हातारी सगळ्यांसोबत बोलायला लागली होती. पोलिसांनी तिला वृद्धाश्रमात जाण्याबद्दल विचारलं. भाऊ, भीक मागून दिडशे रुपये रोज मिळतात. तेवढ्यात माझं भागते कसंतरी! जोपर्यंत माझ्या हातापायात ताकद आहे, तोपर्यंत भीक मागून खाईन, पण वृद्धाश्रमात जाणार नाही! आमच्या महानुभाव पंथात मांस-मच्छी चालत नाही. माझ्या गळ्यात माळ आहे, हे बघा! गळ्यातली माळ बाहेर काढून तिने सर्वांना दाखवली. तिकडे काहीही खायला देतात. त्यावर एका महिला पोलीसाने तिला विचारलं किती दिवस भिक मागणार आहेस. त्यापेक्षा वृद्धाश्रमात आराम मिळेल! तर यावर म्हातारीचं उत्तर तयारच होतं. ज्या दिवशी माझे हातपाय थकतील, माझ्याकडून काहीच होणार नाही, त्यादिवशी मी साधुची दिक्षा घेईन! दिक्षा घेतल्यावर काहीच करायची गरज पडत नाही. आरामात बसून खायला मिळते!

जवळपास तासभर उलटून गेला होता. मलाही घरी जायचं होतं. उपस्थित पोलिसांसोबत हस्तांदोलन करुन मी जायला निघालो. म्हटलं आजीला कल्याण गाडीत बसून देतो आणि घरी जातो. बाहेर पडताना म्हातारीच्या पायाकडे एका महिला पोलिसाचं लक्ष गेलं. तिने विचारलं चप्पल नाही का तुला? चप्पल, एक चोळी, लुगडं चोरीला गेल्याचं तिने सांगितलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर आलो, तुला चप्पल घ्यायला पैसे देऊ का? असं तिला विचारलं. तर पैसे घ्यायला तिने नकार दिला. एका कागदाच्या चिठ्ठीवर माझा मोबाईल क्रमांक तिला लिहून दिला. काही अडचण असेल तेव्हा फोन करायला सांगितला. तेवढ्यात कल्याण लोकल आली म्हातारीला बसून दिलं. घरी गेलो, बायको, आई-वडिल वाट पाहत बसले होते. बायकोनं उशीर का झाला विचारलं. तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी सरळ झोपयला गेलो. मात्र अनवाणी पायांनी चालणारी म्हातारी राहून राहून माझ्या डोळयांसमोर येत होती. रात्रभर जागरण केल्यानंतर ठरवलंय आता म्हातारी भेटली तर तिला अनवाणी पायांनी जाऊ देणार नाही. तेव्हापासून ठाणे स्टेशनवर गेल्यानंतर माझी नजर आजीला शोधत राहते!

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।