भारतीय नागरिकांसाठी दर महिन्याला ठराविक रक्कम मिळवण्याच्या ५ उत्तम स्किम
दर महिन्याला ठराविक उत्पन्न नियमितपणे मिळावे अशी आपली सर्वांची इच्छा असते. नोकरदारांना पगाराच्या रूपाने असे उत्पन्न मिळते. परंतु सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक आणि व्यवसायात नव्याने सुरुवात करणारे तरुण-तरुणी यांना मात्र अशा ठराविक उत्पन्नाचे काही साधन नसते.
अशा वेळी त्यांची जवळ असलेली पुंजी अशा एखाद्या स्कीममध्ये गुंतवण्याची इच्छा असते जिथे नियमित उत्पन्न तर मिळेलच शिवाय केलेली गुंतवणूक सुरक्षित असेल.
आज (या लेखाच्या दोन भागात) आम्ही तुम्हाला अशा ११ स्कीम सांगणार आहोत ज्या दर महिन्याला उत्पन्न तर देतीलच आणि तुलनेने कमी रिस्क असणाऱ्या आहेत. आपण या सर्व स्कीमचे फायदे आणि त्यामध्ये असणारे काही निगेटिव्ह पॉईंट्स समजून घेणार आहोत.
१. सरकारी आणि निमसरकारी बँकांच्या मंथली इनकम स्कीम
एसबीआय, आय. सी. आय. सी. आय. यासारख्या सरकारी किंवा खाजगी बँका त्यांच्याकडे ठेवलेल्या एफडी म्हणजेच मुदत ठेव पावत्यांवर दर महिन्याला व्याज देतात. अशा बँकांमध्ये आपल्याजवळील रक्कम गुंतवून होऊन त्यावरील व्याज आपल्याला दर महिन्याला मिळेल अशी व्यवस्था करता येते. साधारणपणे ५ % ते ८ % इतका व्याज दर असतो.
या स्कीमचे फायदे
१. मुदत ठेव पावत्यांमधली गुंतवणूक अतिशय सोयीची आणि सहजपणे गुंतवता आणि काढता येण्याजोगी असते.
२. सरकारी आणि निमसरकारी बँकांमध्ये तसेच नावाजलेल्या खाजगी बँकांमध्ये गुंतवणूक केल्यास अशी गुंतवणूक अतिशय सुरक्षित असते.
३. मिळणारे उत्पन्न खात्रीशीर असते.
४. ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर मिळू शकतो.
५. अडचणीच्या वेळी ठेवलेल्या मुदत पावतीवर कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो.
या स्कीमचे तोटे
१. बँकेमध्ये ठेवलेल्या मुदत ठेव पावती वर मिळणारे व्याज करपात्र असते. सदर व्यक्ती उत्पन्नाच्या ज्या स्लॅबमध्ये असते त्यानुसार त्या व्यक्तीस इन्कम टॅक्स भरावा लागतो.
२. मुदत ठेव पावती वर मिळणारे व्याजाचे उत्पन्न रु. ४००००/- पेक्षा जास्त असेल तर त्यावर टिडिएस कापला जातो. अर्थात हे टाळण्यासाठी बँकेला आधी सूचना देता येणे शक्य आहे.
३. बहुतेक सर्व बँकांची मुदत ठेवीचा कालावधी दहा वर्षांचा असतो. त्यानंतर पुन्हा गुंतवणूक केल्यास नक्की किती व्याजदर मिळेल याची हमी नसते.
४. मुदत ठेव पावती मुदतीपूर्वी काढून घेण्यासाठी काही पेनल्टी बसू शकते.
तर ही आहे बँकेमध्ये मुदत ठेव पावती करून दर महिन्याला उत्पन्न मिळवण्याची स्कीम. राष्ट्रीयीकृत अथवा चांगल्या दर्जाच्या खाजगी बँकांमध्ये अशी रक्कम गुंतवणे अतिशय फायदेशीर आहे.
२. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम
भारतीय नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस मध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक करण्याची स्कीम उपलब्ध आहे. या स्कीमचा व्याजदर ६.६% इतका आहे. गुंतवणूक करणाऱ्याला दर महिन्याला या व्याजदराने इनकम मिळू शकते.
फायदे
१. भारत सरकारचे या योजनेला सहाय्य असल्यामुळे या योजनेत गुंतवलेली रक्कम सुरक्षित असते.
२. उत्पन्न मिळण्याची हमी असते.
३. बँकांच्या तुलनेत मिळणारा व्याजदर जास्त चांगला आहे.
तोटे
१. गुंतवणूक करण्याचा कालावधी फक्त पाच वर्षांचा असतो. पुन्हा गुंतवणूक करताना व्याजाचे दर कमी झालेले असण्याची शक्यता असते.
२. मिळणारे व्याजाचे उत्पन्न करपात्र असते.
३. गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला पैसे गुंतवताना आणि काढून घेताना पोस्टात जाणे आवश्यक असते. काही ज्येष्ठ नागरिकांसाठी हे गैरसोयीचे ठरू शकते.
४. या स्कीम मध्ये एखादी व्यक्ती जास्तीत जास्त रु. ४.५ लाख इतकी रक्कम गुंतवू शकते. दोघांचे मिळून जॉइंट अकाउंट काढल्यास जास्तीत जास्त रु. ९ लाख इतकी रक्कम गुंतवता येते. त्यापेक्षा जास्त रक्कम गुंतवण्याची सोय नाही.
५. मुदती आधी अकाउंट बंद केल्यास दंड भरावा लागतो.
३. सीनियर सिटीजन सेविंग स्कीम
ज्येष्ठ नागरिकांमध्ये अतिशय लोकप्रिय असणारी अशी ही स्कीम आहे. दर तिमाहीला या योजनेची व्याजाची रक्कम सदर व्यक्तीच्या बँक अकाउंट मध्ये जमा होते. या योजनेचा व्याजदर ७.४ % इतका आहे.
फायदे
१. ही योजना भारत सरकारची असल्यामुळे गुंतवलेली रक्कम सुरक्षित असते.
२. नावाजलेल्या बँकांपेक्षाही जास्त व्याज दर मिळतो.
३. व्याजाच्या उत्पन्नाची हमी असते.
४. इन्कम टॅक्सच्या सेक्शन ८० c द्वारे या योजनेतील रुपये १.५ लाख पर्यंतचे मुद्दल करमुक्त असते.
तोटे
१. या योजनेत मिळणारे व्याज मात्र करपात्र उत्पन्नात धरले जाते.
२. या योजनेचा मुदत कालावधी पाच वर्षांचा असतो. त्यानंतर पुन्हा रक्कम गुंतवल्यास व्याजाचा दर कमी झाला असण्याची शक्यता असते.
३. रक्कम गुंतवण्याची मर्यादा रु. १५ लाख इतकी आहे.
४. मुदती आधी स्कीम बंद केल्यास दंड भरावा लागू शकतो.
५. रुपये ४0 हजार पेक्षा जास्त व्याज मिळाल्यास टिडिएस कापला जातो.
४. प्रधानमंत्री वय वंदना योजना
प्रधानमंत्री वय वंदना योजना ही योजना भारत सरकार द्वारे २०१७ पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवली गेली आहे. ही योजना एलआयसी ऑफ इंडिया द्वारे चालवली जाते. सदर योजनेमध्ये ३१ मार्च २०२२ पर्यंत गुंतवणूक करता येईल. या योजनेचा व्याजदर ७.४ % इतका आहे.
फायदे
१. कोणत्याही विमा कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर असणारी ही योजना आहे.
२. भारत सरकार आणि एलआयसी ऑफ इंडिया द्वारे चालवली गेली असल्यामुळे ही योजना अतिशय सुरक्षित आहे.
३. या योजनेद्वारे मिळणारी रक्कम दरमहा, दर तीन महिन्यांनी, दर सहा महिन्यांनी अथवा दर वर्षी एकदा या पद्धतीने घेता येऊ शकेल.
४. या योजनेसाठी भरावा लागणारा प्रीमियम जीएसटी मुक्त आहे.
५. वैद्यकीय कारणास्तव मुदतपूर्व ही योजना बंद करता येऊ शकते.
६. आर्थिक अडचणीच्या परिस्थितीत सदर योजनेच्या ७५ % रक्कम कर्जाऊ मिळू शकेल.
तोटे
१. रुपये १५ लाख इतकी गुंतवणूक केल्यावर केवळ दहा हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल.
२. मिळणारे पेन्शन करपात्र उत्पन्नात धरले जाईल.
३. ही योजना दहा वर्षांची असल्यामुळे त्यानंतर पुन्हा गुंतवणूक करायची झाल्यास व्याजाचे दर कमी झालेले असू शकतात.
५. कंपनी फिक्स डिपॉझिट
सध्या अनेक सरकारी किंवा खाजगी कंपन्या तसेच नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीज नागरिकांना मंथली किंवा क्वॉर्टरली इनकम स्कीम उपलब्ध करून देत आहेत. सदर कंपनीमध्ये आपल्याजवळील रक्कम गुंतवल्यावर त्यांच्याकडून ठराविक व्याजदराने दर महिन्याला अथवा दर तीन महिन्यांनी ठराविक उत्पन्न मिळू शकते. या योजनांचा व्याजदर ६ % ते ९ % इतका असू शकतो.
फायदे
१. मिळणारा व्याजदर अशा पद्धतीच्या सर्व गुंतवणूक योजनांपेक्षा जास्त असतो.
२. मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी असते.
तोटे
१. मिळणारे व्याजाचे उत्पन्न करपात्र असते.
२. व्याजाच्या उत्पन्नावर टीडीएस कापला जाऊ शकतो.
३. सर्व साधारणपणे एक ते पाच वर्षे इतक्या मुदतीसाठी असे पैसे गुंतवता येतात.
४. फॉर्म भरणे, केवायसी डॉक्युमेंट देणे अशी किचकट कामे करावी लागू शकतात.
५. मुदतीपूर्वी गुंतवणूक काढून घ्यायची असल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो.
अशा पद्धतीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर असले तरी आधी त्या कंपनीबद्दलची सर्व माहिती जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे.
तर या आहेत अशा पाच स्कीम ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही दरमहा खात्रीशीर उत्पन्न मिळवू शकता. सर्व योजनांचा नीट अभ्यास करून आपल्याला सोयीची असेल अशा योजनेमध्ये गुंतवणूक करा.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका. लेखाच्या पुढील भागाचे नोटिफिकेशन मनाचेTalks च्या फेसबुक पेजवर मिळेल. मनाचेTalks चे सर्व अपडेट्स व्हाट्स ऍपवर मोफत मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.