मित्रांनो, आयुष्य ही आपल्याला मिळालेली सर्वात सुंदर आणि मौल्यवान भेट आहे. या जगात जन्माला येऊन आपण कसं जगायचं हे स्वतःच ठरवायचं असतं.
मनाचेTalks कडे विश्वासाने आपले हितगुज मांडणारे असंख्य मित्र-मैत्रिणी आहेत. तुम्ही तुमचे खाजगी विषय आमच्याकडे मांडतात कारण तुम्हाला विश्वास असतो कि, तुमची गोष्ट कानगोष्ट होऊन इकडे-तिकडे पसरणार नाही, तर पडलेल्या प्रश्नाचे अलगद उत्तर तुम्हाला मिळेल.
असाच खूप जणांकडून नेहमी येणारा प्रश्न म्हणजे काही लोक आपले वाटतात पण त्यांचा त्रास होतो, मग ते खरंच आपले असतात का? अशा वेळी काय करावं? हे प्रश्न फक्त नवरा बायकोच नाही, तर कोणत्याही नात्यात पडलेले आढळतात.
कधीकधी काय होतं की तुमच्या आयुष्यात एवढा गोंधळ का चाललाय हेच तुम्हाला समजत नाही. कुठेतरी काहीतरी चुकतंय हे मात्र कळतं. अशा वेळी थोडं थांबून शांत होण्याची गरज असते. मग हळूहळू चित्र स्पष्ट होत जातं. काय केलं पाहिजे आणि काय करणं थांबवायचं हे एकदा समजलं की आयुष्य पुन्हा रंगतदार होतं.
या लेखातून आम्ही अशाच चार गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हीच जीवनातील अगदी अल्टीमेट सत्यं आहेत. ‘जीवनातील सत्य’ हे शब्द वाचून घाबरून जाऊ नका. आम्ही कोणताही मोठा उपदेश करत नाही आहोत. या अशा बेसिक गोष्टी आहेत ना, की ज्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त जगू शकता. नो टेन्शन ऍट ऑल !!!
मग जाणून घेऊया तर ही चार सत्यं कोणती आहेत.
१. एकटं असणं म्हणजे एकाकी असणं नाही.
एकटेपणा आणि एकाकीपणा यात खूप फरक आहे.
एकटेपण हे खूप अर्थपूर्ण असू शकतं. आनंददायक सुद्धा असतं पण एकाकी या शब्दालाच एक बिचारेपणा, नाईलाज यांची छटा जोडलेली आहे.
एकटेपण हा स्वतःचा निर्णय असू शकतो. आणि एकाकीपणा हा लादलेला असतो.
सर्व गोतावळ्यात रहात असताना सुद्धा तुम्हाला एकाकी वाटत असेल, सोबतीची उणीव भासत असेल, आपल्याला समजून घेणारं कुणीही नाही असं वाटत असेल तर तुम्ही चुकीच्या संगतीत आहात हे लक्षात घ्या.
मानसिक आणि भावनिक सोबत न मिळाल्याने तुम्हाला एकाकी वाटतंय. मग अशा आधार न देणाऱ्या सोबतीत दु:खी रहाण्यापेक्षा आनंदाने एकटं रहाणं कधीही चांगलं.
आपल्या सोबत रहाणारी माणसं कशी आहेत, त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. सतत एकमेकांबरोबर रहाताना या विचारांचा आपल्यावर निश्चितच प्रभाव पडतो.
जर आनंदी, उत्साही, हसतमुख, विनोदबुद्धी असलेली, प्रामाणिक, एकनिष्ठ माणसे आजूबाजूला असतील तर जगणं आनंदी होतं आणि हेच जर सतत कटकट, भांडणं, द्वेष, टोमणे, तुलना, अहंकार, फसवणूक या भावना घेऊन वावरणारी माणसं बरोबर असतील तर आपली एनर्जी हळूहळू कमी होत जाते.
अशा माणसांना एनर्जी व्हॅम्पायर्स असं म्हणतात. कामाच्या ठिकाणी असो की कुटुंबात अशा माणसांची सोबत नकोशी वाटते. यांचा विचार जरी मनात आला तरी शरीर तुम्हाला काही संकेत देतं. म्हणजे या नकोशा व्यक्तीचा उल्लेख झाला की छातीत धडधड होणे, श्वास जोरात चालणे, कपाळावर आठ्या पडणे, संताप येणे अशी लक्षणं जाणवायला लागतात.
अशा माणसांचा नकारात्मक प्रभाव वेळीच झुगारून दिला नाही तर मन:स्वास्थ्य बिघडते. खूप खोलवर आणि गंभीर परिणाम भोगावे लागतात. अशावेळी ही पोकळ, वरवरची सोबत नाकारण्याचे धैर्य दाखवावेच लागते.
खरं सांगू मित्रांनो, प्रत्येक माणूस या जगात एकटाच आलाय आणि एकटाच इथून जाणार आहे. या दरम्यानचा इथला आपला काळ म्हणजे हे आयुष्य !!!!
ते आनंदी, समाधानी आणि अर्थपूर्ण असावं ही तर प्रत्येकाची इच्छा असते. मग नकारात्मकतेने भरलेल्या जागी रहाण्यात काय अर्थ आहे? याचा अर्थ सर्वांपासून दूर जायचं, तुसडेपणाने वागायचं असा अजिबात नाही. पण माणसं ओळखता यायला हवीत हे ही तितकंच खरं आहे.
शांतपणे बोलून, आपल्या बाऊंड्रीज आखून घेऊन सुद्धा जर सतत मानसिक त्रास होत असेल तर इतरांकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःसाठी जगावे. आपल्या मनाशी मैत्री करावी. आयुष्यात आपल्याला काय करायचंय हे ठरवावं आणि त्या कामामध्ये झोकून द्यावे. आपल्या मानसिक, भावनिक गरजांसाठी जेवढे इतरांवर अवलंबून राहू, तेवढेच इतर लोक आपल्याला गृहीत धरतील, एकटे पाडतील म्हणून आत्मनिर्भर होणे ही बेस्ट पॉलिसी आहे!!!
म्हणजे आपले सुख, दु:ख, सर्व बऱ्यावाईट भावना, आयुष्यात आपण घेतलेले निर्णय यांची जबाबदारी आपणच घ्यायची. ना कोणाला दोष ना कोणावर राग!!! मग बघा आपला स्वतःशीच संवाद सुरु होतो. हे खरं हितगुज. आणि मग तुम्ही शरीराने एकटे असाल किंवा माणसांच्या गर्दीत, तुम्ही कधीच एकाकी होणार नाही.
२. मजबूत नात्यांसाठी दोन्ही बाजूंनी तेवढीच आस्था असावी लागते.
मित्रांनो, इंग्रजी भाषेत एक म्हण आहे. Grass is always green on the other side. पण यात थोडीशी दुरुस्ती करुया. Grass is green only where you water it and harvest it.
कोणतंही नातं असू दे. ते खऱ्या अर्थाने बहरायला हवं असेल, तर त्यातील दोन्ही व्यक्तिंनी ते नातं टिकवण्यासाठी समान प्रयत्न केले पाहिजेत. आणि यासाठी त्यांना एकमेकांबद्दल आपुलकी, प्रेम ,जिव्हाळा, आदर वाटला पाहिजे. पण काही वेळा असं होत नाही. काळानुरूप माणसे बदलतात.
त्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, जोडीदाराविषयी वाटणाऱ्या भावना सर्व काही बदलत जातं. अशावेळी एक व्यक्ती मनाने या नात्यातून बाहेर पडलेली असते. आणि उरलेली व्यक्ती मात्र प्राणपणाने हे नातं टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असते. पण तिच्या हे लक्षात येत नाही की आपण जे काही करतोय ते एकतर्फी प्रयत्न आहेत.
असं करण्यामुळे दुसऱ्यांच्या नजरेत आपली किंमत शून्य होते. ते आपल्याला लाचार, प्रेमासाठी भीक मागणारे आणि दुर्बल समजतात. म्हणून जर कधी आयुष्यात अशी वेळ आली तर तुम्हाला परकं करणारं नातं निवडण्यापेक्षा स्वतःचा स्वाभिमान जपा. जास्त सुखी व्हाल!!!
हे जीवनातलं महत्त्वाचं सत्य आहे. आणि ते समजून घेतलंच पाहिजे. आपला वेळ आणि एनर्जी अशाच ठिकाणी खर्च करा जिथे त्याची कदर केली जाते. जेव्हा कधी तुमच्या लक्षात येईल की समोरची व्यक्ती तुम्हाला टाळतेय, तुमची सोबत त्यांना नकोय किंवा त्यांच्या वागण्यात, बोलण्यात फरक पडलाय. अशा वेळी दोन शक्यता असतात. एकतर आपल्याकडून नकळतपणे ते दुखावले गेले आहेत. अशावेळी काय झालंय हे नीट आठवून बघा. समोरच्या माणसाशी स्पष्ट बोला. कोणतेही गैरसमज असतील तर ते दूर करा. आणि मुख्य म्हणजे खुल्या मनाने सॉरी म्हणा. तुमच्याकडून नातं टिकवण्यासाठी एवढे प्रयत्न कराच.
दुसरी शक्यता म्हणजे त्या व्यक्तीच्या तुमच्या विषयी असणाऱ्या भावना बदलल्या आहेत. ही गोष्ट कदाचित ते तुम्हाला स्पष्ट सांगणार नाहीत. पण त्यांची बॉडीलॅंग्वेज, बदललेलं वागणं आणि बोलणं यातून हिंट्स नक्कीच देतील.
अशावेळी त्यांच्यामागे लागणं, जबरदस्तीने त्यांच्या आयुष्यात घुसणं, स्पष्टीकरण मागणं या गोष्टी कधीच करु नका. त्यांना तुम्ही पूर्वीसारखे हवेहवेसे वाटत नाही एवढंच पुरेसं आहे. कारणं विचारण्याची गरज नाही. शांतपणे अशा नात्यातून बाजूला व्हा. अर्थात ही सोपी गोष्ट नाही. तुम्हाला खूप त्रास होईल.
पण वारंवार अपमान आणि आपण नकोसे असल्याचे जाणवते अशा ठिकाणी न जाणे चांगले. त्यापेक्षा एकदाच स्वतःला सांगा की या नात्याचे आयुष्य एवढेच होते. तुम्ही एकत्र घालवलेले चांगले क्षण मनात ठेवा. कटुता विसरण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, काळ हे प्रत्येक गोष्टीवरचे उत्तर आहे. हळूहळू तुम्ही अशा नात्यातून नक्कीच बाहेर पडाल.
याबाबत गुलजारजींचं एक वाक्य खूपच छान आहे. वो अफ्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकीन, उसे इक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा…
३. जिथे तुम्हाला वेदना होतात अशा ठिकाणी तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही.
सुखी होण्यासाठी मन शांत असलं पाहिजे. आणि मन:शांती तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या आजूबाजूचं वातावरण चांगलं असेल. मग तुमची मन:शांती बिघडवणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही ओळखली पाहिजे. यालाच ट्रिगर असं म्हणतात. आपला ट्रिगर कोणता हे कळलं की आणीबाणीच्या प्रसंगी काय करायचं हे आपल्याला समजतं.
नाहीतर काय होतं की आपण ज्याला त्याला दोष देत बसतो. पण यात नुकसान आपलंच होतं. आपला आनंद, मानसिक शांती यांचा कंट्रोल दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देऊच नये. मग कठपुतळी सारखे तुम्हाला ते आपल्या तालावर नाचवतील.
म्हणून जाणीवपूर्वक आपल्याला राग येईल असं कोणी वागत असेल तर ते ओळखता आलं पाहिजे. तुम्ही कशी आदळआपट करता, भांडणं करता, रडता याचा तमाशा बघून ते मजा घेत बसतात. इतरांच्या नजरेत तुम्ही एक संतापी, आक्रस्ताळेपणा करणारी व्यक्ती म्हणून ओळखले जाता.
असं करणारी माणसं धूर्त, कारस्थानी असतात. आणि साधी, सरळ माणसं यांच्या कटकारस्थानांना बळी पडतात. आपला आनंद गमावून बसतात. म्हणून स्मार्ट बना. समोरच्या व्यक्तीचा हेतू जाणून घ्या. माणसांचं नीट निरीक्षण करा. त्यांच्या गोड बोलण्याला न भुलता प्रत्यक्षात कृती काय करतात हे पहा. लवकरच तुमच्या लक्षात येईल आपलं कोण आणि परकं कोण.
हे अगदी जवळच्या नात्यात सुद्धा पारखून घ्यावं लागतं कारण प्रत्येक व्यक्ती केवळ तुमच्या सोबत रहाते म्हणून तुमची वेल विशर असेलच असे नाही. जर त्यांना तुमच्या बद्दल मत्सर, द्वेष असेल किंवा तुमच्याशी बौद्धिक बाबतीत ते बरोबरी करु शकत नसतील तर इतर मार्गांनी तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी ते काहीही करु शकतात.
म्हणून आपली मानसिक शांती ही टॉप प्रायोरिटी आहे हे लक्षात घेऊन कोणत्याही नकारात्मक वातावरणापासून दूर रहा. ट्रिगर करणाऱ्या व्यक्तीला जाणीवपूर्वक दूर ठेवा. त्यांच्याशी संभाषण करणं एकतर बंद करा किंवा अगदी कामापुरतं हो किंवा नाही अशी उत्तरे द्या.
आपल्या बाउंड्रीज त्यांनी सहजपणे ओलांडता कामा नयेत. उगीचच अती नम्र, अती चांगुलपणा दाखवू नका. तुम्हाला जाणूनबुजून दुखावणाऱ्या व्यक्तीला जशास तसे उत्तर दिलेच पाहिजे. म्हणजे परत तुम्हाला दुखावण्याची हिंमत ते करणार नाहीत. आणि तुमचं आयुष्य तुम्ही शांतपणे जगू शकाल.
४. नात्यातील आपली मर्यादा ओळखा.
प्रत्येक नात्यात एक व्यक्ती देणारी आणि दुसरी घेणारी असते. मूलतः हा माणसांच्या स्वभावात असणारा फरक आहे. काही माणसे देणारी असतात. म्हणजे दुसऱ्यांच्या गरजा ओळखणारी, मदतीचा हात पुढे करणारी, मानसिक आणि भावनिक आधार देणारी.
यांना इतरांना होणारा त्रास, त्यांची तळमळ समजते. अशा व्यक्ती समजूतदार, नाती टिकवणाऱ्या, वेळप्रसंगी पडती बाजू घेणाऱ्या, इतरांच्या भावना ओळखणाऱ्या असतात. तर काही माणसे याच्या विरुद्ध स्वभावाची असतात. त्यांना आपल्या गरजा, आपल्या अडचणी, इच्छा यापुढे इतरांची किंमत नसते. अशी माणसे स्वार्थी, असंमजस, हट्टी, अपरिपक्व आणि अहंकारी असतात.
वयामुळे येणारी मॅच्युरिटी यांना येतच नाही. ते फक्त तुमचा वापर करून घेतात. काही वेळा तुमचा पैसा तर काही वेळा वेळ आणि एनर्जी ओरबाडून घेतात.
म्हणून एका ठराविक मर्यादेपर्यंत देणे ठीक आहे. पण समोरची व्यक्ती तुमचा गैरफायदा घेत असेल तर वेळीच सावध झाले पाहिजे. नात्यातील आपली मर्यादा ओळखायला शिका.
नाहीतर अशी सतत घेणारी माणसे आपले प्रचंड नुकसान करतात. यांच्यामुळे आपले इतर नातेसंबंध बिघडतात. सततची यांची काही ना काही मागणी असतेच. कितीही दिले तरी समाधान नावाची गोष्टच यांच्या जवळ नसते. अशा माणसांना ठराविक अंतरावर ठेवले पाहिजे. दुसऱ्याला आनंद, समाधान देण्यासाठी आधी तुमच्या आयुष्यात ते शिल्लक राहिले पाहिजे. जर इतरांनी हा आनंदच ओरबाडून घेतला तर तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे?
म्हणून अशा नात्यात सावध रहा. आपली लिमिट ठरवा. आणि त्यापलीकडे कोणी आपल्याकडून अपेक्षा करत असेल तर सरळ नकार द्या. मग ती आर्थिक मागणी असो की कोणी तुमचा वेळ मागत असो.
शहाणपणाचे वागणे म्हणजे तरी दुसरे काय? माणसे आणि त्यांचे हेतू ओळखून त्यानुसार वागणे. एवढं साधं सोपं गणित आहे. आणि ही चार सत्यं तुम्हाला शहाणपण शिकवतील एवढं नक्की!!!
तर मित्रांनो, हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. लेख आवडला तर लाईक व शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.