“कोणतीही गोष्ट केली तरी नेहमी दोष मात्र मलाच का?”
“ते आपापसात काय बोलत होते? नक्कीच माझ्याबद्दल असणार.”
“काय? आज भाजीची चव बिघडली? मी केली म्हणूनच असं बोलत असतील.”
हे असं तुमच्या मनात सतत येत असतं का?
मग हा लेख शेवटपर्यंत नीट वाचा. मनाचेTalks आपल्या वाचकांसाठी या लेखातून काही खास टीप्स घेऊन येत आहे.
मित्रांनो, या जगात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आहेत. एकाच घटनेमुळे त्यांच्यावर होणारा परिणाम सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा असतो.
एकाच प्रसंगात कोणी रागावतो, कोणी दु:खी होतो तर कोणी विशेष काही मनाला लावून घेत नाही.
असं का बरं होतं? याला कारणीभूत आहे आपली मानसिक स्थिती.
समजा एखाद्या दिवशी आपण चिडलेले असताना कोणीतरी काही बोलले तर तेवढेच निमित्त होते आणि आगीत तेल ओतले जाते. मग भडका तर उडणारच ना?
किंवा कधीकधी आपण दु:खी असतो, अशावेळी जरा कोणी अधिक उणा शब्द बोलला तरीही टचकन डोळ्यात पाणी येतं.
यावरुन तुमच्या लक्षात आले असेल की आपण मनात जसा विचार करतो तशीच प्रतिक्रिया वागण्यातून उमटते.
आपल्या विचारांचा एक ठराविक पॅटर्न बनलेला असतो. लहानपणापासून आपण कोणत्या परिस्थितीत वाढलो, आजूबाजूच्या माणसांचा प्रभाव, सामाजिक किंवा सांस्कृतिक वातावरण यामुळे प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट विचारसरणी तयार होते.
या सर्व कारणांमुळे माणसे विविध गुणदोष दाखवत असतात. अती भावना प्रधान, संतापी, शांत, कृतज्ञ अशा निरनिराळ्या व्यक्तीमत्त्व छटा दिसून येतात.
एकाच व्यक्तीमध्ये हे सर्व गुण थोड्याफार प्रमाणात असले तरीही तिचा स्वतःचा ठळक दिसणारा असा एक स्वभावधर्म असतोच !!!
मनाची जडणघडण जशी झालेली असेल तसाच आपला स्वभाव बनतो.
ठराविक पद्धतीने विचार करण्याची सवय होऊन जाते. मनाचं प्रोग्रामिंग जसं झालेलं असेल तशाच भावनांचा अनुभव येतो.
म्हणून आपल्याला कोणी काही बोललं किंवा आपण एखादी गोष्ट केली किंवा केली नाही यापेक्षा आपल्या मनात काय चाललंय हे महत्त्वाचे आहे.
म्हणून यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा एखादी व्यक्ती नाराजी व्यक्त करत असेल तेव्हा लगेच तिने मलाच उद्देशून टीका केली किंवा माझ्यावरच दोषारोप केला असा विचार करु नका.
प्रत्येक गोष्ट स्वतः वर ओढवून घेऊ नका. त्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय त्यानुसार ती बोलत असते.
त्यांची विचार करण्याची पद्धत, बोलण्याची सवय, शब्दांची निवड यातून त्या व्यक्तीबद्दल बरंच काही दिसून येतं.
तुम्ही सतत इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हेच मनात धरुन ठेवता का? त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो का?
तर मग या पाच गोष्टी ध्यानात घ्या.
१. या जगात प्रत्येक व्यक्ती तुमचाच विचार करत नसते.
तुम्ही जेव्हा इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हे मनात घट्ट धरून बसलेले असता, तेव्हा खरंच इतरांना एवढा वेळ असतो का? हे लक्षात घ्या.
प्रत्येक माणसापुढे काही ना काही समस्या उभ्या असतात. त्यातून कसा मार्ग काढायचा या विचारात ते असतात. दुर्धर आजार, कर्ज, नोकरी व्यवसायाची चिंता, नात्यांमधील तणाव, एक ना दोन!!!
जेवढी माणसं तेवढे त्यांचे प्रश्न.
त्यामुळे जर कोणी रागाने बोलत असेल, भांडण उकरून काढत असेल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या आयुष्यात इतर काही प्रॉब्लेम असू शकतात.
त्यामुळे होणारी चिडचिड तो व्यक्त करतोय. तुम्ही फक्त निमित्तमात्र आहात. रोजच्या व्यवहारातील उदाहरणे पाहिलीत तरी हेच दिसेल.
बॉसचं घरी काही बिनसलं असेल तर राग मात्र ऑफिस मध्ये जो कोणी पहिल्यांदा समोर दिसेल त्याच्यावर निघतो.
अशावेळी ते काही तुम्हाला सांगणार नाहीत, की घरचा राग मी तुझ्यावर काढतोय. हे आपणच समजून घ्यायचं आणि जास्त त्रास करून घ्यायचा नाही.
सासू सुनेचे काही वाजले तर सून आपल्या लहान मुलावर ओरडते, रागावते.
अशावेळी नकळत ते मूल हे तिचा राग व्यक्त करण्याचं एक माध्यम होऊन जातं. अजून एक अगदी कॉमन उदाहरण बघूया.
जर नवरा कामावरुन तणतणत घरी आला तर तोफेच्या तोंडी पहिला बळी जातो तो बायकोचा!!! अशावेळी तिने खरंतर काहीच चूक केलेली नसते.
म्हणून समजून घ्या, की जेव्हा इतर कोणी तुम्हाला उगीचच काहीतरी बोलतं तेव्हा वड्याचं तेल वांग्यावर ही म्हण लक्षात ठेवा.
२. स्वतःचे विचार तपासून पहा.
जेव्हा आपण इतरांना दोष देतो तेव्हा प्रामाणिकपणे स्वतःचं परीक्षण करतो का?
हा मला असं बोलला, तिने मला टोमणा मारला, त्यांनी मला नावं ठेवली अशी सतत तक्रार जर तुम्ही करत असाल तर नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्या.
जर बराच काळ आपण चिंता, नैराश्य, डिप्रेशन मधून जात असू तर अशावेळी भावनांना काबूत ठेवणे शक्य होत नाही. अशावेळी व्हिक्टिम मेंटॅलिटी निर्माण होते.
म्हणजे स्वतःला बिचारे, दुर्बल समजणे, दोष ओढवून घेणे, जे काही चुकीचं झालं ते माझ्याचमुळे असा विचार करणं.
यामागील सायकॉलॉजी समजून घेऊया. प्रत्येक माणसामध्ये काही असुरक्षित भावना असतात. स्वतः मधले दुर्गुण, कमतरता आपल्याला माहीत असतात. आपल्या व्यक्तीमत्त्वाची डार्क साईड आपल्याला स्वतःला सुद्धा आवडत नाही.
त्यामुळे इतरांना देखील ही बाजू आवडणार नाही हे आपण गृहीत धरून चालतो. आणि नकळतपणे ही नकारात्मकता इतरांवर प्रोजेक्ट करतो. आपल्या मनात शंका, असुरक्षितता असते त्यामुळे समोरच्या माणसाचा तसा हेतू नसला तरीही आपण त्याचं वागणं बोलणं मनाला लावून घेतो.
एकत्र कुटुंबात याचा जास्त अनुभव येतो. वयाने किंवा अनुभवाने लहान असणाऱ्या व्यक्तींना आपल्याला मुद्दामहून डावललं जातं, माझं मत कोणीच विचारात घेत नाही असं वाटत असतं.
खरंतर बऱ्याच वेळा वस्तुस्थिती अशी असते, की ते आपलं मत मांडतच नाहीत. कोणी आपलं म्हणणं ऐकून घेईल की नाही, किंवा बोललं तर मला उद्धट म्हणतील का अशी भीती वाटत असते.
म्हणून आपल्या मनाचा आढावा घेणं गरजेचं आहे. मोकळं मन असलेल्या व्यक्तीचा दृष्टीकोन सुद्धा निकोप असतो. जर मनातच अनेक कुंपणे, भिंती उभारलेल्या असतील तर प्रत्येक ठिकाणी अडथळेच दिसतात.
३. स्वतःच्या मर्यादा ओळखायला शिका.
कामाच्या ठिकाणी असो किंवा घरात, आपला रोल नक्की कोणता आहे हे ओळखता आलं पाहिजे.
काहीवेळा इतरांना मदत करण्याच्या नादात आपण एवढ्या जबाबदाऱ्या ओढवून घेतो, की मग त्याचं ओझं वाटायला लागतं. म्हणून आपली कर्तव्ये नीट समजून घ्या.
त्यात कोणतीही कसूर करु नका. पण त्यापलीकडे जाऊन जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही करता तेव्हा त्यामागे इतरांना मदत करण्याची तुमची इच्छा असते हे प्रथम लक्षात घ्या.
तुम्ही ही मदत करायला बांधील नाही त्यामुळे जर त्याचा त्रास होत असेल तर स्पष्टपणे तसं सांगून टाका. आपला चांगुलपणा जर स्वतः साठीच तापदायक होत असेल तर वेळीच थांबणं योग्य.
नाहीतर इतरांच्या अपेक्षा वाढत जातात आणि मग आपणच कुठेतरी कमी पडतोय की काय, असं वाटतं.
सुपर वुमन सिंड्रोम हे याचं उत्तम उदाहरण. एकाचवेळी मी सगळेच रोल उत्तम प्रकारे करणार असं ठरवलं की कुठल्याच रोलला संपूर्ण न्याय देता येत नाही.
मग सतत मनात कुढत रहाणे, इतर लोकं मला काय म्हणतील ही चिंता करणे अशी मानसिकता दिसून येते.
४. आपलं क्षितीज विस्तारीत ठेवा.
म्हणजेच नेहमी फक्त माझं मत, मी, माझं जग असा संकुचित विचार करु नका. आपण समाजात वावरताना इतरांची मतं, त्यांचा व्ह्यू पॉइंट विचारात घेऊन वागलं पाहिजे.
प्रत्येक गोष्ट स्वतः वर ओढवून घेण्यापूर्वी थोडा विचार करा. आपल्या पेक्षा जास्त जग पाहिलेली माणसं इथे आहेत. त्यांचे अनुभव, मतं खूप उपयोगी असतात.
त्यामुळे जर काही वेळा तुमचं मत डावलून त्यांना जास्त महत्त्व दिलं जात असेल तर त्यामागचं कारण आधी शोधा. लगेच स्वतः वर वाईटपणा लादून घ्यायची काहीही गरज नाही.
५. शंका वाटत असेल तर प्रश्न विचारा.
जर एखादा मुद्दा तुमच्या लक्षात येत नसेल तर अनुमान काढू नका. कधी कधी असं होतं की समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचे आहे ते आपल्याला समजत नाही.
आणि आपण सोयिस्करपणे त्याचा अर्थ लावतो. खरं तर अर्थाचा अनर्थ करुन टाकतो.
म्हणून संदिग्धता असेल तिथे सरळ त्यांना यातून काय म्हणायचे आहे ते स्पष्ट विचारा. पण हे करताना मात्र चतुराईने वागा.
तुमचा प्रश्न त्यांना अपमानास्पद वाटता कामा नये. किंवा त्यातून मुद्दा अधिकच चिघळत जाऊ नये. त्यामुळे आपला बोलण्याचा टोन फार महत्त्वाचा असतो.
इतरांना ट्रिगर करणारा कोणताही प्रश्न विचारु नये. फक्त फॅक्ट्स काय आहेत व त्याला धरुनच विषय स्पष्ट होईल असे प्रश्न विचारावेत. भावनिक न बोलता तर्कसंगत बोलणे जास्त योग्य ठरेल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या विचारांचा पॅटर्न बदलणे. नवीन पद्धतीने विचार करणे थोडे कठीण आहे पण अशक्य नाही. यासाठी जुन्या सवयी मोडून काढाव्या लागतील.
आत्मविश्वास वाढवणे, धीटपणे प्रश्न विचारणे, वेळीच शंका दूर करणे, स्वतः ला कमी न लेखणे यामुळे बरेच प्रश्न सुटतात.
जेव्हा आपण स्वतःला दोष देणे बंद करतो तेव्हाच इतरांना नावं ठेवणं देखील थांबून जातं. म्हणून यापुढे कोणत्याही गोष्टीचं खापर स्वतः वर फोडून घेण्यापूर्वी वरील पाच गोष्टी जरूर विचारात घ्या.
मित्रांनो, लेख आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका.
रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.
- अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
- तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
- निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
- अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
- मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
- वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
- आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
- हे तेरा प्रश्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
- तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
- नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
- आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
- आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
- स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
- पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
- मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
- स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
- स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
- जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
- समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
- एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.