अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा… किनारा तुला पामराला
गर्जणार्या महासागराला एका दर्यावर्दीनं दिलेलं हे आव्हान आहे….
आयुष्यातही आव्हानांची त्सुनामी काही कमी नसते.
सामान्य लोक मात्र छोट्या-छोट्या अपयशाला मोठ मोठी कारणं शोधतात.
तर अनंत ध्येयासक्ती घेऊन, काही माणसं मात्र आयुष्यात आलेल्या अनंत अडचणींवर मात करून यश मिळवतातच.
आज अशाच एका तरुणाची कहाणी जाणून घेऊया.
त्याच्या डिक्शनरीत “अशक्य” हा शब्दच नाही. परीक्षित शहा या तरुणानं पीएचडीची प्रवेश परीक्षा पहिल्याच झटक्यात पास केली आणि त्याची चर्चा रंगायला लागली.
तुम्ही म्हणाल पी.. एच डी.ची परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास करणं यात तसं अशक्य काय आहे?
तर हा प्रश्न विचारण्याआधी परीक्षितविषयी जाणून घ्या.
पनवेलचा 25 वर्षीय युवक ‘परीक्षित दिलीप शहा’ ऑस्टीयोजेनेसिस या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे.
या आजारामुळे परीक्षितला जन्मापासून अंथरुणावर खिळून राहावं लागतं.
ऑस्टीयोजेनेसिस म्हणजे ठिसूळ हाडांचा रोग. यामुळे परीक्षितच्या हालचाली मर्यादित स्वरूपाच्या आणि वाढ ही मर्यादित आहे.
जन्मापासून या आजाराने ग्रस्त असूनही पीएचडी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणं ही नक्कीच अवघड गोष्ट आहे हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच.
आज सोशल मीडियामुळे परीक्षित पटकन प्रसिद्धीझोतात आलेला आहे.
परीक्षितनं दहावीची परीक्षा बेडवर झोपूनच दिली आणि 80% मिळवले.
त्यावेळेला पहिल्यांदा त्याच्याविषयी चर्चा होऊ लागली.
त्यानंतर पुढच्या शिक्षणात खंड पडू न देता परीक्षितनं बी, कॉम. आणि अर्थशास्त्रात एम. ए. केलं.
त्यानंतर “शहरी विकासातील सूक्ष्म अर्थशास्त्र” या विषयावरील पीएचडी प्रवेश परीक्षा पहिल्याच प्रयत्नात 2018 साली परीक्षितनं पार केली.
वयाच्या 8 व्या वर्षी परीक्षितचं पितृछत्र हरवलं.
मात्र आई विजया बेन यांनी खंबीरपणे परीक्षितचा सांभाळ केला.
आईनं परीक्षितच्या प्रयत्नांना, इच्छाशक्तीला खतपाणी ही दिलं.
परीक्षितची इच्छाशक्ती इतकी जबरदस्त आहे की लेखनिकाच्या मदतीशिवाय तो पेपर पूर्ण लिहितो.
त्याचे गुण पाहिले तर सर्व सुविधा असणाऱ्या तरीही अभ्यास न करणाऱ्या मुलांनी परीक्षित कडून आदर्श घ्यावा असं वाटतं.
प्रत्येक परीक्षेत 75 % पेक्षा जास्त मार्क्स मिळवणा-या परीक्षितने आपली कौटुंबिक जबाबदारी ही टाळली नाही.
राजकारणी व्यक्ती आणि अभिनेते यांच्यासाठी इंटरनेट मार्केटिंग मार्गदर्शक म्हणून काम करुन त्यांनं आर्थिक भार ही सहज उचललेला आहे.
इंटरनेट आणि सोशल मीडिया मार्केटिंग आणि डिजिटल बँड क्षेत्रात आपली कंपनी अव्वल आणण्यासाठी परीक्षित दिवस-रात्र मेहनत ही घेत आहे.
परीक्षितचा हा प्रवास वाटतो तितका सहज सोपा नक्कीच नाही, पण दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची वृत्ती, त्याचबरोबर तक्रारीचा कोणताही सूर न लावता आपलं काम करणं यामुळे परीक्षितनं आजपर्यंतचा हा टप्पा गाठला आहे.
परीक्षित तरुणांनाही हेच सांगतो तुमचं वर्तुळ विस्तारा, संधी शोधा, त्यासाठी तुमचं कौशल्य वाढवा, आणि कोणताही प्रयोग करायला अजिबात घाबरू नका.
कसलंही काम असो त्याला वाईट किंवा तुच्छ मानू नका कारण प्रत्येकातून नवं काहीतरी नक्की शिकायला मिळतं.
तर मित्रांनो आरोग्याच्या, पदोपदी जाणवणा-याऱ्या तक्रारी असूनही परीक्षितनं आयुष्याची उजळ बाजू पाहिली, आपल्या कर्तुत्वानं आयुष्य लख्ख उजळून टाकलं.
सतत अंथरुणात झोपूनच कामं करावी लागत असूनही परीक्षितच्या कामांना आज वेळ पुरत नाही.
परीक्षितचं उदाहरण पाहून धडधाकट सुदृढ तरुणांनीही कामं न होण्याची फालतू कारण सांगणं टाळायला हवं. बरोबर ना?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.