1990 साली स्वतःचे घर बांधण्यास सुरुवात केली. कंपनीच्या नियमांप्रमाणे 1 लाख रुपये मला कर्जरूपात मिळाले. घराचा अंदाजित खर्च होता 1 लाख 60 हजार परंतु तो वाढून 2 लाखापर्यंत गेला.
आज ही आकडेवारी किरकोळ वाटत असली तरी 28 वर्षांपूर्वी माझे वार्षिक उत्पन्न 20 हजाराचे आसपास असल्याने त्या तुलनेत ही रक्कम खूप मोठी होती.
मला मिळालेली वेतनवाढीची थकबाकी, नातेवाईक, मित्रमंडळी यांनी केलेली मदत, कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज याशिवाय 45 हजाराची तूट येत होती.
ती भरून काढण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचे मी ठरवले. माझा पगार एका नामवंत सहकारी बँकेत जात होता. बँकेत ओळख होती.
याशिवाय बँकेस अपेक्षित असलेले तारण ठेवण्याची माझी तयारी होती. तरीही सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही काहीतरी कारणे काढून हे कर्ज मिळण्यास मला दोन महिने लागले.
अशा प्रकारे बँकेच्या दृष्टीने सुरक्षित असलेले कर्ज मिळवणे एके काळी तापदायक ठरत होते. यानंतर 10 वर्षांनी याच बँकेतून याहून अधिक रकमेचे कर्ज, कागदपत्रे सादर दिल्यापासून 3 दिवसात मिळाले. हा सर्व खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या (#खाउजा) धोरणाचा परिणाम.
Personal Loan ही सर्वसाधारणपणे, विनातारण असतात. बँका, पतसंस्था अथवा नॉन बँकिंग कंपन्या यांच्याकडून ते आपल्याला मिळू शकते.
बँका, बिगर बँकिंग कंपन्या आपल्या अनुभवावर वितरित करतात. कर्ज परतफेडीची पात्रता हा त्यांचा महत्वाचा निकष असतो. याशिवाय काही वित्तसंस्था एल. आय. सी. पॉलिसी, एन. एस. सी. यावर आपला बोजा चढवतात किंवा एक दोन हमीदार मागतात.
बँकाबँकांत आणि फायनान्स कंपन्यात असलेली तीव्र स्पर्धा यामुळे असे कर्ज देण्याच्या अटी, परातफेडीचा कालावधी , कमान /किमान कर्जरक्कम, व्याजदर यात भिन्नता आढळते.
ते बहुतेक विनातारण मिळत असल्याने त्याचा व्याजदर हा तारण कर्जाहून अधिक असतो. सध्या अशा प्रकारच्या कर्जावरील व्याजदर किमान 11% प्रतिवर्ष आहे.
काही तातडीच्या अडचणींवर जसे की आजारपण, शिक्षण, लग्नाचा खर्च, घराचे नूतनीकरण, स्थावर मालमत्ता खरेदी, परदेश प्रवास इ. अशा तात्कालीक मोठया खर्चावर मात करण्यासाठी अशी कर्जे घेतली जातात.
तर काही जण असे कर्ज सुलभतेने मिळते आहे असे समजल्यावर, ते मुद्दाम घेऊन आपल्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरतात.
कर्ज वितरित करण्यासाठी, अर्जदाराची पात्रता निश्चित करण्याचे बँक आणि फायनान्स कंपन्या यांचे सर्वसाधारणपणे खालील निकष आहेत. यात त्यांच्या धेय्यधोरणानुसार थोडाफार फरक असू शकतो.
- अर्जदाराचे वय 18 ते 60 व्यावसायिकांसाठी 55 वर्षापर्यंत असावे.
- तो नोकरदार किंवा व्यावसायिक असावा.
- त्याची हाती येणारे मासिक उत्पन्न किमान 15 ते 25 हजार रुपये असावे.
- CIBIL या पतमापन संस्थेकडे असलेला अर्जदाराचा पतदर्जा (rating) किमान 750 (उच्च दर्जाचे) हून अधिक असावा.
- नोकरदारांना कमाल 15 लाख तर व्यावसायिकांना 30 लाख रुपये वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
यासाठी नियमाप्रमाणे अर्ज, फोटो ओळखपत्र , निवासाचा पुरावा आणि उत्पन्नाचा पुरावा व फोटो द्यावा लागतो. व्यावसायिकांना मागील दोन वर्षांचा लेखपालाने प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला लागतो.
क्वचित एखादी व्यक्ती हमीदार म्हणून हवी असेल तर तिची माहिती व फोटो लागतो. सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर वैयक्तिक कर्ज 48 तासात मंजूर होऊ शकते.
अन्य कर्जाप्रमाणे ते त्याच कारणास वापरले पाहिजे असे बंधन नसते. कर्ज रक्कम जरुरीप्रमाणे लागेल तशी टप्याटप्याने घेता येते. परतफेड आपणास शक्य होईल असा हप्ता बांधून करता येते.
bankbazaar.com या संकेतस्थळावर भेट देऊन आपण ऑनलाईन कर्ज मागणी करू शकतो. व्याजदर, प्रक्रिया फी, कर्जरक्कम, परतफेडीची मुदत याशिवाय अन्य काही खर्च यांची तुलना करता येते.
वैयक्तिक कर्जामुळे आपली तत्कालीन गरज झटपट पूर्ण होते. सध्या SBI, HDFC Bank, ICICI Bank, AXIS Bank , Bajaj Finserv यांनी मोठया प्रमाणात वैयक्तिक कर्जाच्या व्यवसायावर ताबा मिळवलेला आहे.
अशा प्रकारे कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
- आपल्याला किती कर्जाची गरज आहे ते निश्चित करावे.
- कर्ज घेणे कोठून फायदेशीर होईल याचा शोध घ्यावा.
- आपला पतदर्जा तपासून पहावा.
- कर्ज करारातील बारीकसारीक तपशील वाचावा. विशेषतः कर्ज मुदतीपूर्वी परत केल्यास काही आकारणी फी द्यावी लागेल अथवा नाही ते तपासावे.
- आपल्याला योग्य अशी मुदत आणि कर्जफेड रक्कम ठेवावी.
- आपली पात्रता, कर्जफेडीची क्षमता, व्याजदर या गोष्टी विचारात घ्यावी.
- प्रोसेसिंग फी ची तुलना करावी.
- कर्ज परतफेडीसाठी पुढील तारखेचे धनादेश, किंवा इ. सि. एस. या सारख्या माध्यमातून परस्पर हप्ता कापण्याची सूचना देऊन ठेवावी.
हा लेख म्हणजे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठीची शिफारस नसून यात उल्लेख केलेल्या बँक, नॉन बँकिंग कंपनी, संकेतस्थळ यांच्याशी लेखकाचा कोणताही प्रकारचा व्यावसायिक संबंध नाही.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very shortly this website will be famous amid all blog viewers, due to it’s
good content
Thanks