आपल्या जगण्याची गरज म्हणून, गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन असलेले आपण आता हळू हळू अनलॉक होत चाललोय…
पण खरंतर याचा अर्थ असा अजिबात नाही कि आपल्यावरचा धोका टाळला…
उलट चीन, वुहान ची जी रुग्णसंख्या होती तो आकडा सुद्धा आता नुसत्या आपल्या महाराष्ट्राने पार केलेला आहे. तेव्हा अजूनही काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
खरं तर आज मी हे लिहिते आहे याला काही कारण आहे…
परवा म्हणजेच सोमवार सुरु होण्याच्या आधीच्या रात्री अचानक मला अस्वस्थ होऊन जाग आली. खरंतर मला रात्री एकदा झोप लागली तर सकाळी अलार्म होईपर्यंत उगाचच कधीही जाग येत नाही.
पण त्या दिवशी आली आणि घशात काहीतरी टोचल्या सारखं होऊन थुंकी गिळताच येत नाहीये… हे मला जाणवलं.. आणि मग प्रचंड भीती वाटली..
मी सिंगल मदर असल्यानं गोष्टी स्वतःच हॅन्डल करण्याची मला सवय असल्यानं मी उठले आणि किचनमध्ये जाऊन इन्डक्शनवर पाणी गरम करून ते प्यायलं…
पाणी पितानासुद्धा घसा जड झालायं असंच जाणवत होतं…
पुढे झोपण्याचा प्रयत्न केला आणि कधीतरी झोप लागली…
सकाळी चार वाजता अलार्मने मी उठले तेव्हा मात्र घसा प्रचंड जड झाल्यासारखा जाणवत होता, आणि थुंकी गिळताना त्रास होत होता.
आता मात्र मला सगळ्याच गोष्टींची काळजी वाटायला लागली. कारण खरंतर आता आधीपेक्षा थोडं बाहेर जाणं सुरु झालं होतं…
जरी माझं सर्व काम नेहमीच (लॉकडाऊनच्या आधीपण) घरातूनच चालणारं असलं तरी आता गर्दीमध्ये जरी नाही तरी बाहेर जाणं सुरु केलेलंच आहे..
आता मात्र सकाळपासून मी सारखं गरम पाणी पिण्याची आणि एका भांड्यात हळद आणि मीठ टाकून पाणी भरपूर उकळून घेतलं आणि सारखं त्याने गार्गल करायला सुरुवात केली..
आणि या सर्व गोष्टी (म्हणजे गुळण्या वगैरे) करण्यात मुलाला मात्र काहीही इंट्रेस नसल्याने भरपूर चिडचिडही झाली.
टेस्ट करायची का? हा विचार सर्वात आधी आला. आणि जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर मुलाची सोय कशी करायची?… मुलगा सोळा वर्षांचा म्हणजे समजत्या वयाचा असल्याने आमच्यात आता काय अरेंजमेंट करता येईल याचीही चर्चा होऊन गेली.
चांगल्यात चांगल्या पासून, वाईटात वाईट सगळा विचार करून मी माझ्या लाईफ इंश्युरन्सचे सर्व डिटेल्स मुलाच्या मेलवर सुद्धा पाठवले.
आणि आमच्या शहरात म्हणजे नाशिकमध्ये कोरोनाच्या टेस्ट होणारं एकमेव ठिकाण असलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये आमचे एक नातेवाईक आहेत. त्यांच्याकडून टेस्ट बद्दल माहिती घेण्यासाठी दहा- साडेदहाला त्यांना मेसेज टाकला.
तेव्हा त्यांनी सांगितलं कि, Swab सिव्हिल हॉस्पिटल मध्ये घेतात आणि मग तो टेस्ट साठी आमच्याकडे पाठवतात. पण Swab टेस्ट होऊन रिपोर्ट येईपर्यंत सिव्हिल मध्ये ऍडमिट व्हावे लागते.
हे ऐकून मात्र चलबिचल आणखी वाढली. कारण ऍडमिट झालं तर लॅपटॉप बरोबर घेता येईल का? मग जावेच लागले तर मनाचेTalks पुढचे काही दिवस लेख आधीच शेड्यूल करून ठेवायचेत का… असं बरंच काही वाटू लागलं..
आज ABP माझावर ज्ञानदा कदमचा जो लाईव्ह झाला त्यात मुंबईमध्ये टेस्ट करून ऍडमिट केले जात नाही असा तिचा अनुभव होता. हीच पद्धत सगळीकडे सुरु व्हायला खरंतर काहीही हरकत नाही. कारण रिपोर्ट येईपर्यंत सिव्हिल मध्ये जनरल वॉर्ड मध्ये राहावे लागते हेही मला पुढे समजले. जनरल वॉर्ड मध्ये पॉझिटिव्ह असलेल्या पेशण्टचा संसर्ग जे निगेटिव्ह आहेत त्यांनाही होऊ शकतो.
तेव्हा इतर शहरांमध्येही असे बदल झाले पाहिजेत. किंवा तसे आपल्या ठिकाणी असेलही तर आपण त्याची नीट माहिती ठेवली पाहिजे.
या सगळ्याबरोबर हळद-मिठाच्या गरम पाण्याच्या गुळण्या आणि गरम पाणी पीत राहण्याचं मिशन मात्र माझं यद्ध पातळीवर चालू होतं🤩 कारण ताप वगैरे नसला तरी घसा प्रचंड जड पडला होता आणि काहीही गिळताना अजून खूप दुखत असल्याने काहीही खाल्लेलं नव्हतं…
माझ्या मुलाच्या एका मित्राची आई सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सिस्टर आहे. त्यांच्या घरी फोन केला तेव्हा समजलं कि सध्या आठवडाभर त्या कोरोना वॉर्डच्याच ड्युटी वर आहेत. आणि दुपारपर्यंत फ्री होऊन हॉस्पिटलच्या हॉस्टेल रूमवर जातील.
तेव्हा दुपारी मी त्यांना फोन केला आणि काल रात्रीपासून काय होतंय ते सांगितलं. आणि टेस्ट साठी काय करावे लागते तेही विचारले…
तेव्हा टेस्ट रिपोर्ट येई पर्यंत इथल्या जनरल वॉर्ड मध्ये ऍडमिट राहावे लागते, हे हि त्यांनी मला तितक्याच खेदाने सांगितले. आणि काही झाले तर इथे मी आहे घाबरू नका. असे सांगून खुपसा महत्त्वाचा असा सपोर्ट सुद्धा दिला.
आणि सांगितले कि ‘अजून ताप नाही तर जवळच्या चांगल्या क्लिनिक मध्ये जाऊन डॉक्टरांचा विचार घ्या. आणि तरीही त्रास झालाच तर उद्या आपण बघू काय करायचं’ शिवाय त्यांच्याकडचे असलेले एक सर्क्युलर त्यांनी पाठवले.
त्यात पुणे पोलीस स्टेशनमध्ये ‘लिस्ट्रीन माऊथवॉश’ च्या वापराचा बराच उपयोग झाल्याचं दिलेलं आहे. आता या वेळी मला लिस्ट्रीन चा खूप आधार वाटला कारण हळद-मिठाला कंटाळा करणारा माझा मुलगा लिस्ट्रीनचे गार्गल मात्र आढेवेढे न घेता करेल हे मला ठाऊक होते.
त्या सर्क्युलरचा फोटो खाली दिलेला आहे.
आता आजच्या दिवस घरीच काळजी घेऊन, त्रास तसाच चालू राहिला तर उद्या डॉक्टरांना दाखवून टेस्ट बद्दल ठरवू असा विचार करून मी नेहमीच्या कामाला लागले.
रात्रीपर्यंत घसा जड पडल्याचं जे जाणवत होतं ते काहीसं कमी झालं… पण पूर्णपणे थांबलं मात्र नाही. रात्री थोडं जेवणही गेलं… आणि दुसऱ्या दिवशी उठेपर्यंत घसा दुखणं बरचसं कमी झालेलं होतं… आणि सायंकाळपर्यंत ते जवळजवळ पूर्ण थांबलं.
तेव्हा हा घशात आलेला पाहुणा कोरोना होता कि नाही ते माहित नाही…. पण या दिवसात कोरोनाने सगळ्यांमधलाच डॉक्टर, वैद्य जागा केला एवढं मात्र नक्की….
Image Credit: prabhatkhabar
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.