लग्न हा सर्वांच्याच आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा प्रसंग असतो. मग तो ठरवून केलेला विवाह असो की प्रेम विवाह, त्यामुळे आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते हे नक्की.
लव मॅरेज असो की अरेंज मॅरेज दोन्ही बद्दल समाजात अनेक मते आहेत. काही जणांना लव मॅरेज योग्य वाटते तर काही जणांना अरेंज मॅरेज ठीक वाटते.
आज ह्या लेखात आपण अरेंज मॅरेजबद्दल चर्चा करणार आहोत. लव मॅरेज आणि अरेंज मॅरेजचे फायदे तोटे जाणून घेणार आहोत.
त्यासाठी आपण काही तरुणींची मते देखील जाणून घेतली आहेत. सुरक्षेच्या कारणासाठी इथे त्यांची नावे बदलण्यात आली आहेत.
चला तर मग जाणून घेऊया अरेंज मॅरेजचे फायदे आणि तोटे.
काही लोकांच्या मते अरेंज मॅरेज करणे ही अगदी जुनी पद्धत आहे तर काही लोक मात्र असं म्हणतात की अरेंज मॅरेज करणे हे आजच्या युगात अगदी प्रॅक्टिकल गोष्ट आहे आणि असे करणे फायद्याचेच आहे.
भारतात अरेंज मॅरेजचे प्रमाण खूप जास्त आहे आणि तरीही यशस्वी विवाहांचे प्रमाण खूपच आहे. भारतात घटस्फोट होण्याचे प्रमाण हे फक्त २% आहे तर पाश्चात्य देशात जिथे जास्तीत जास्त प्रमाणात प्रेम विवाह होतात तिथे मात्र घटस्फोट होण्याचे प्रमाण ५०% आहे.
म्हणजेच आपल्या देशात अरेंज मॅरेज यशस्वी होतात असे म्हणायला वाव आहे. बघूया खरी परिस्थिती काय आहे?
अरेंज मॅरेजचे फायदे
प्राथमिक शाळेत शिक्षिका असणाऱ्या २९ वर्षांच्या दीक्षा जैनचं असं म्हणण आहे के अरेंज मॅरेज करणं हे फायद्याचं आहे, कारण आपला जोडीदार निवडण्याचं, तो कसा असेल ह्याचं कुठलंही टेंशन आपल्याला घ्यावं लागत नाही. ती म्हणते की, जेव्हा तिच्या पालकांनी तिचे लग्न आकाशशी ठरवले तेव्हा ती सुरुवातीला जरा साशंक होती.
परंतु तिच्या मैत्रिणींना स्वतः जोडीदार निवडण्यात आलेलं अपयश तिने पाहिलेलं असल्यामुळे आणि आपले पालक आपल्यासाठी योग्य जोडीदार निवडतील ही खात्री असल्यामुळे तिने पाऊल पुढे टाकले आणि ती आता अतिशय सुखी आहे. तिच्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत. आकाश आणि ती अगदी मेड फॉर ईच अदर आहेत असं तिला वाटतं.
अरेंज मॅरेजचा दूसरा महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला पालकांची संमती मिळण्याचे टेंशन नसते. २४ वर्षांची नवीन लग्न झालेली कविता अरुण मिष्किलपणाने म्हणते, मला स्वतः डेटिंग ऍपवर जाऊन १० जणांना भेटून एकाची निवड करायची वेळ आली नाही.
माझ्या आई वडिलांनी निवडलेल्या मुलांपैकी जो सर्वात जास्त योग्य वाटला त्याची मी निश्चिंत मनाने निवड केली, असे कविताने पुढे सांगितले.
आपल्या पालकांना असणाऱ्या जीवनाच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आपल्याला नक्कीच होतो, बंगलोरची कायद्याचे शिक्षण घेणारी २३ वर्षांची शिवानी म्हणते की, आपल्यासाठी काय बेस्ट आहे हे आपल्या पालकांपेक्षा जास्त चांगले कुणाला माहीत असणार? आणि असे मुळीच नाही की अरेंज मॅरेजमध्ये प्रेम नसते. पूर्वापार आपल्याकडे ठरवून केलेले विवाह यशस्वी होत आहेत आणि पुढेही होत राहतील. आयुष्यातील इतका महत्वाचा निर्णय घेताना पालकांचा सल्ला घेतला तर काय बिघडलं? उलट त्याचा फायदाच आहे.
पण हे एवढंच आहे का? का ह्या नाण्याला दुसरीही बाजू आहे?
पालक अनेक वेळा आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी योग्य जोडीदार निवडताना धर्म, जात, आर्थिक सुस्थिती आणि कौटुंबिक माहिती ह्या गोष्टींना जास्त महत्व देतात.
मुलगा आणि मुलगी हे एकमेकांना अनुरूप आहेत का, त्यांचे एकमेकांशी पटेल का ह्याचा फारसा विचार करत नाहीत. विवाह समुपदेशक असणारे डॉ. विजय नागास्वामी म्हणतात की अरेंज मॅरेजमध्ये एकच महत्वाचा प्रॉब्लेम असतो आणि तो म्हणजे अशा लग्नात दोन्हीकडच्या कुटुंबीयांना जास्त महत्व दिले जाते.
ज्यांचं लग्न होणार आहे त्या मुला, मुलीला फारसे महत्व उरत नाही. त्यांच्या म्हणण्याचा फारसा विचार केला जात नाही.
आणखी एक गोष्ट म्हणजे मुलगा आणि मुलगी एकमेकांना नक्की अनुरूप आहेत ना ही गोष्ट अरेंज मॅरेजमध्ये तितकीशी लक्षात येत नाही.
लग्न होण्यापूर्वी होणाऱ्या मोजक्या भेटींमध्ये दोघेही एकमेकांशी चांगलेच वागतात. त्यामुळे बऱ्याच वेळा खरा स्वभाव पुढे येत नाही. लग्न झाल्यावर मग अशा गोष्टी समोर येतात.
असाच काहीसा अनुभव मोहिनी राव ला आला. सुरुवातीला चांगला वागणारा तिचा नवरा प्रत्यक्षात संशयी स्वभावाचा आणि शिवीगाळ करणारा निघाला. अशा वेळी लग्न यशस्वी होणे अवघड होऊन बसते.
तरी त्यातल्या त्यात हल्ली पालक मुलांना लग्नाआधी अनेक वेळा भेटून एकमेकांना समजून घेण्याची संधी देतात. त्याचा काही प्रमाणात उपयोग होताना दिसतो.
लग्न ह्या महत्वाच्या घटनेत मग ते ठरवून केलेले असो, अथवा प्रेम विवाह असो थोड्या प्रमाणात जुळवून घेणे दोन्ही बाजूना करावेच लागते, लग्न यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर पती व पत्नी दोघांनाही आपल्या स्वभावाला थोडी थोडी मुरड घालावीच लागते.
४८ वर्षांची नंदिता सांगते की नवीन लग्न झालेले असताना तिला अनेक गोष्टींशी जुळवून घ्यावे लागले. परंतु स्वतः अड्जस्ट करतानाच तिने सौम्य शब्दात पती आणि सासू सासरे ह्यांच्याशी चर्चा करून त्यांना काही गोष्टी समजावून सांगून त्यांना देखील काही गोष्टीत बदल करायला सांगितले. त्यांनी देखील असे बदल स्वीकारले. त्यामुळे सगळेच आनंदात आहेत.
तर अशा प्रकारे अरेंज मॅरेजमध्ये मनमोकळा संवाद असणे, एकमेकांवर विश्वास असणे ह्या गोष्टींची लग्न यशस्वी होण्यास मदत होते. जरी वादाचे प्रसंग आलेच तरी एकमेकांशी बोलून ते मिटवणे शक्य होते.
डॉ. नागास्वामी ह्यांनी अरेंज मॅरेज यशस्वी व्हावे यासाठी काही उपयुक्त टिप्स सांगितल्या आहेत. कोणत्या ते आपण पाहूया..
१. नेहेमी शांत रहा. वादाचे मुद्दे टाळा.
२. जोडीदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या.
३. एकमेकांबद्दल गैरसमज होतील असे प्रसंग टाळायचा प्रयत्न करा.
४. सतत तक्रार करणे टाळा. परंतु न पटणाऱ्या महत्वाच्या गोष्टी मात्र सौम्य शब्दात नक्की मांडा.
५. सुरुवातीच्या काळात मनाने एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा.
तर ह्या आहेत अरेंज मॅरेज करणाऱ्या नव्या जोडप्यासाठीच्या टिप्स. डॉक्टर म्हणतात की जे मनापासून अरेंज मॅरेजचा स्वीकार करतात त्यांच्यासाठी ह्या विवाह प्रकाराचे फायदेच फायदे आहेत. ज्यांना तसे वाटत नाही त्यांना ह्या पद्धतीत तोटे दिसून येतात.
तर हे आहेत अरेंज मॅरेज करण्यातले फायदे आणि तोटे. शेवटी महत्वाचे काय तर आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबरोबर कायम सुखाने रहावे. त्यासाठी सतत प्रयत्न करत रहावेत.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.