तुम्ही पुण्यात रहात असाल किंवा कामानिमित्ताने पुण्याला आला असाल तर शनिवार, रविवारी मिळणाऱ्या सुट्टीत काय करायचं हा तुमचा प्रश्न आज सुटणार आहे.
आज आपण जाणून घेणार आहोत अशा ठिकाणांबद्दल जी पुण्यापासून जवळ आहेत, अगदी पटकन २ दिवसाच्या सुट्टीत जाऊन येण्यासारखी.
पुण्यातली नेहेमीची प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे आणि म्युझियम्स सोडून पुण्याजवळ इतरही अनेक स्थळे आहेत, जिथे भेट देऊन आपण निसर्गात रमण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकतो, काही साहसी खेळांचा आनंद लुटू शकतो.
पुणे हे असे मध्यवर्ती ठिकाण आहे जिथून आपण अशा सर्व स्थळांना अगदी थोड्या कालावधीत अगदी सहज भेट देऊ शकतो.
चला तर मग पाहूया अशी कोणकोणती ठिकाणे आहेत. खाली सांगितलेली सर्व ठिकाणे पुण्यापासून १०० किमी परीघाच्या आत आहेत.
१. सिंहगड (३० किमी )
तुम्ही जर तुमच्या मित्र मैत्रिणींबरोबर पुण्यात आला असाल तर सिंहगड हे एक दिवसीय सहलीसाठी ग्रुप ने जाण्याचे सर्वोत्तम ठिकाण आहे.
पुण्यापासून फक्त ३० किमी वर असणाऱ्या सिंहगडावर हिरवाईने नटलेल्या डोंगर दऱ्यांबरोबरच मराठे शाहीचा इतिहास देखील अनुभवता येतो.
एका छोट्याशा ट्रेक ची मजा अनुभवायला मिळते.
सिंहगडला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ : जून ते मार्च
२. कामशेत (४८ किमी)
पॅराग्लायडिंग चा थरार अनुभवायचा असेल तर पुण्यापासून फक्त ४८ किमी वर असलेले कामशेत हे ठिकाण उत्तम आहे.
येथे अनुभवी ग्लायडर्स बरोबर पॅराग्लायडिंग करण्याबरोबरच, त्याचे प्रशिक्षण देखील घेता येऊ शकते.
एक दिवसीय सहलीसाठी हे ठिकाण उत्तम आहे.
तसेच रात्रीच्या वेळी निरभ्र अशा आकाश दर्शनाची मजा देखील अनुभवता येते.
कामशेतला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मे
३. पवना लेक (५२ किमी)
तुम्हाला निरभ्र आकाशाखाली चांदण्याचा आनंद घ्यायचा असेल तसेच रात्री तंबूत राहण्याचा थरार अनुभवायचा असेल तर पवना लेक ला नक्की भेट द्या.
सुंदर आणि विस्तीर्ण अशा पवना लेकच्या काठावर हे तंबू आहेत, तिथे राहून तुम्ही कॅम्पिंग बरोबरच शेकोटी, बार्बेक्यू इत्यादीचा देखील आनंद घेऊ शकता.
पवना लेक ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मे
४. बेडसे लेणी (५६ किमी)
फार प्रसिद्ध नसलेली ही बेडसे लेणी सौंदर्यात मात्र कुठेही कमी नाहीत.
अप्रतिम कलाकुसरीने नटलेली ही लेणी पहाटेच्या वेळी जाऊन पाहणे, तेथे सुर्योदयाचा आनंद घेणे, सूर्याचा सोनेरी प्रकाश पडून झळाळलेली लेणी पाहणे ह्याची मजा काही औरच.
बौद्ध धर्माविषयी अधिक माहिती देखील ह्या लेण्यांमधून मिळते.
असे हे सुंदर ठिकाण पुण्यापासून फक्त ५६ किमी वर आहे.
बेडसे लेणी ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मे
५. लवासा (६० किमी)
सुंदर तळ्याकाठी वसलेल्या एखाद्या यूरोपीयन शहरसारखे आहे लवासा हे शहर, तेही पुण्यापासून फक्त ६० किमी वर.
सुंदर आखणी केलेले शहर, उत्तम रस्ते आणि सुंदर इमारती हे येथील वैशिष्ट्य आहे.
तसेच येथे निरनिराळे साहसी खेळ खेळण्याची आणि बोटिंग वगैरेची सुविधा आहे.
लवासा ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – संपूर्ण वर्षभर
६. लोहगड (६४ किमी)
१७ व्या शतकात बांधला गेलेल्या लोहगड हा किल्ला हे पुण्याजवळच्या गिर्यारोहकांचे अत्यंत आवडते ठिकाण आहे.
गिर्यारोहणाबरोबरच उत्तम निसर्गाने नटलेल्या डोंगर दऱ्या हे येथील वैशिष्ट्य आहे.
येथील अत्यंत आल्हाददायक हवामान चित्तवृत्ति प्रफुल्लित करते.
लोहगड ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – जून ते मार्च
७. लोणावळा (६६ किमी)
लोणावळा हे पुण्याजवळचे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण हिरवाईने नटलेल्या डोंगर दऱ्या, नेत्रसुखद धबधबे आणि दाट धुके ह्याने नटलेले आहे.
पावसाळ्यात येथील भुशी डॅम, राजमाची पॉइंट इत्यादि ठिकाणे गजबजलेली असतात.
लोणावळ्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – संपूर्ण वर्षभर
८. अंधारबन (६७ किमी)
अंधारबन हे देखील ट्रेकिंग साठीचे पुण्याजवळचे प्रसिद्ध ठिकाण आहे.
सलग १३ किमी चा मार्ग ४ ते ५ तासात पूर्ण होतो.
दिवसा आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत हा ट्रेक पूर्ण करण्याची मजा काही औरच.
अंधारबन ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – संपूर्ण वर्षभर
९. कूणेगाव (६८ किमी)
येथील ‘द डेल्ला ऍडव्हेंचर पार्क’ हे ७० पेक्षा जास्त साहसी, थरारक खेळांसाठी प्रसिद्ध आहे.
एक दिवसीय सहलीसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
येथील रॉक क्लाइम्बिंग, नेट क्लाइम्बिंग, रॅपलिंग प्रसिद्ध आहे.
कूणेगाव ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मे
१०. खंडाळा (७० किमी)
लोणावळ्याच्या जवळच असणारे खंडाळा हे देखील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे.
येथील ड्युक्स नोज वगैरे सारखे पॉईंट्स निसर्ग दर्शनाचा उत्तम आनंद देतात. तसेच लोणावळा ते खंडाळा चालत करण्याचा ट्रेक देखील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.
खंडाळ्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मे
११. राजमाची ( ८४ किमी )
राजमाची चा ऐतिहासिक किल्ला हे देखील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
ट्रेकिंग बरोबरच हिरवाईने नटलेल्या निसर्गाचा येथे आनंद घेता येतो.
राजमाचीला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – जून ते मार्च
१२. वाई ( ८८ किमी)
वाई हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असून येथे नदी असल्यामुळे रिव्हर राफ्टिंग, कयाकिंग असे साहसी खेळ येथे खेळता येतात, तसेच आकाश निरभ्र असल्यामुळे रात्रीच्या वेळी चांदण्याने नटलेल्या आकाशदर्शनाचा आनंद ही घेता येतो.
वाईला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मे
१३. जुन्नर (९१ किमी)
ग्रामीण जीवनशैली अनुभवायची असेल तर जुन्नर ह्या गावाला जरूर भेट द्या. शिवरायांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील येथे आहे.
जुन्नरला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मार्च
१४. पाचगणी (१०० किमी)
एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन मस्त आराम करावा, रीलॅक्स व्हावे असे तुम्हाला वाटते आहे का?
मग पाचगणीला जरूर भेट द्या. निरनिराळे देखावे, घोडेस्वारी आणि सुंदर निसर्ग ह्याचा आनंद इथे घेता येतो.
पाचगणीला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ – ऑक्टोबर ते मे
तर ही आहेत पुण्यापासून १०० किमी च्या आत असणारी उत्तम पर्यटन स्थळे.
आता वीकएंडच्या २ दिवसाच्या सुट्टीत बोअर न होता ह्या स्थळांना भेट द्या आणि फ्रेश व्हा.
हो पण आपली सुरक्षा, सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊनचे सर्व नियम पळून बरका!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्या जवळील अशीच पर्यटन स्थळांची माहिती मिळाली तर खुप बरं होईल…..