रूपकुंड तळं भारताच्या उत्तराखंड राज्याच्या चमोली जिल्ह्यात हिमालयाच्या तीन शिखरांच्या कुशीत वसलेलं आहे. समुद्रसपाटी पासून तब्बल ५,०२९ मीटर (१६,४९९ फुट) इतक्या उंचीवर हेतळं आहे. रूपकुंड तळं हे रहस्यमयी तळं म्हणून प्रसिद्ध आहे. रूपकुंड तळ्याची खोली साधारण २ मीटर इतकीच आहे. पण ह्याच्या तळाशी आहेत मानवी सांगाडे. हे सांगाडे कोणाचे? कुठून आले? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्यासोबत कित्येक शतके ठेवणारे हे सांगाडे रूपकुंड तलावाच्या तळाशी आणि आजूबाजूच्या भागात मिळाले आहेत.
साधारण १९४२ च्या आसपास नंदादेवी गेम रिझर्व रेंजर हरी किशन मढवाल ह्यांना हे सांगाडे पहिल्यांदा दिसल्याची नोंद आहे. बर्फात झाकलेल्या तळ्याच्या खाली काही सांगाडे त्यांना त्याकाळी दिसले होते. उन्हाळ्यात तळ्याचं पाणी आटल्यानंतर अजून काही सांगाडे त्यांच्या दृष्टीस पडले. त्या काळात ब्रिटीशांनी हे सांगाडे जापनीज लोकांचे असतील असा समज केला. दुसऱ्या महायुद्धात ह्या बाजूने जाताना हिमवर्षाव अथवा कोणत्यातरी नैसर्गिक आपत्ती मध्ये जापनीज लोक इकडे गाडले गेले असतील असा अंदाज त्यांनी केला व ह्याकडे दुर्लक्ष केल. ह्या तळ्यात तब्बल ३००-५०० लोकांचे सांगाड्यांचे अवशेष मिळाले असून नॅशनल जिओग्राफिक टीम ने ह्यातून जवळपास ३० सांगाडे शोधून काढून त्याचा अभ्यास केला. ह्या सांगाड्यांना ज्या वेळेस वर काढले गेले तेव्हा काही ठिकाणी मास शाबूत होत. बर्फात अनेक वर्ष दबून राहिल्याने हे शक्य झाले होते.
ह्या सांगाड्यांच रेडीओकार्बन डेटिंग ऑक्सफोर्ड विद्यापिठाच्या टीम ने केल्यावर ह्या सांगाड्यांचं वय जवळपास ८५० शतकातील निघालं. म्हणजे हे सांगाडे तब्बल १२०० वर्षाहून अधिक काळ रूपकुंड इकडे अस्तित्वात होते. ह्या ठिकाणी तब्बल १२०० वर्षापूर्वी मानवाचं अस्तित्व होतं. रूपकुंडाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आजही जिकडे मनुष्यवस्ती नाही आणि तिकडे जाण्यास हि ट्रेक करत जाव लागते अश्या ठिकाणी जवळपास ३०० -५०० माणसं का गेली असतील हे अजून न उलगडलेलं कोड आहे. हि माणसं कोण होती ह्यावर हि अनेक मतप्रवाह आहेत. सेंटर फॉर सेल्युलर मायक्रोबॉयलॉजि हैद्राबाद ह्यांनी २००४ मधे केलेल्या संशोधनात असं आढळून आलं होतं कि ह्यातील काही सांगाडे हे कमी उंचीच्या लोकांचे होते तर काही उंच लोकांचे होते. ह्यातील कमी उंचीचे जे आहेत ते तेथील स्थानिक लोकांचे आहेत तर उंच असलेल्या लोकांच्या डी.एन.ए. म्युटेशन मधील ३ नमुने हे महाराष्ट्रातील कोकणस्थ ब्राह्मण (चितपावन) ह्यांच्या डी.एन.ए. म्युटेशन शी जुळतात. तपासलेल्या नमुन्यातील ७०% लोकांचे डी.एन.ए. हे इराण मधल्या लोकांशी जुळतात. इराण मधून आलेले लोक काही भारतीयांना घेऊन ज्यात तिथले स्थानिक हमाल लोक हि समाविष्ट असतील ह्या भागातून जात असताना इकडे मृत्युमुखी पडले असतील असा अंदाज आहे.
हे लोक ह्या ठिकाणी का आले होते? ह्याचा संदर्भ लावताना नंदादेवी इकडे भरणाऱ्या अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या आणि १२ वर्षातून एकदा असणाऱ्या नंदादेवी राज जाट यात्रेला जात असावेत. कारण रूपकुंड तळ हे नंदादेवी मार्गावर असणारं महत्वाचं धार्मिक ठिकाण पूर्वीच्या काळी होतं. हे लोक कशामुळे मेले असावेत ह्याचा कयास लावण्यासाठी हि संशोधन झालं. ह्या सगळ्या लोकांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागल्याच्या खुणा निदर्शनास आल्या. अश्या प्रकारचा फटका अथवा मार हिमवर्षाव किंवा भूस्खलन ह्यामुळे होणं शक्य नाही. ह्या सगळ्यांचा मृत्यू गारपीटीमुळे झाला असावा ह्यावर अनेक वैज्ञानिकांच एकमत आहे. ह्या गारा साधारण क्रिकेटच्या चेंडू इतक्या मोठ्या असाव्यात त्यामुळे लपायला काही जागा न मिळाल्यामुळे जागच्या जागी सर्वांचा मृत्यू झाला असावा असा कयास आहे.
रूपकुंड तळ्याचं सौंदर्य शब्दात मांडता येणं शक्य नाही इतक ते सुंदर आहे. हिमालयाच्या कुशीत बर्फाच्या पांढऱ्या चादरीत ह्या ३००- ५०० सांगाड्याचा इतिहास तब्बल १२०० वर्षापेक्षा जास्ती काळ आपल्या सोबत घेऊन आहे. पण लोकांनी तिकडे जाऊन त्याच्या सौंदर्याला गालबोट लावण्यास सुरवात केली आहे. अनेक ट्रेकर्स आणि हौशी मंडळी रूपकुंडा मधील हे सांगाडे बघण्यासाठी ह्या रहस्यमयी तळ्याला भेट देतात त्यामुळे इथली गर्दी वाढत आहे. त्यात लोकांनी ह्या संगाड्यांची चोरी सुरु केली आहे. ह्यामुळे इथे दिसणारे सांगाडे हळूहळू नष्ट होत आहेत. माणूस किती स्वार्थी असू शकतो ह्याचं दुसर उदाहरण नसेल कि जिकडे हजारो वर्षाआधी मेलेल्या लोकांच्या सांगाड्यांची पण चोरी होते तिकडे अजून काही न बोललेलं बरं.
रूपकुंडाच रहस्य तिथले मानवी सांगाडे आणि त्यामागे असणाऱ्या पौराणिक कथा आणि संदर्भ ह्या सगळ्याची जपवणूक आपण करायला हवी. रहस्याबद्दल कुतूहल असणं आणि वाटणं समजू शकतो. पण ते रहस्य चोरी करणं त्या जागेत लपलेला हजारो वर्षांचा इतिहास मज्जा म्हणून नष्ट करण हे कुठेतरी थांबवायला हवं. ज्या रूपकुंड तळ्याची निर्मिती पुराणात महादेवांनी जमिनीत त्रिशूळ खुपसून केली अस म्हंटल जाते. त्या रूपकुंडाच सौंदर्य आणि तिथलं रहस्य अबाधित ठेवणं हे आपल्याच हातात आहे.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Khup chan