अतिरेक्यांच्या हल्ल्याने सबंध भारताची झोप उडाली होती. परंतु राजा महाराष्ट्रीयन मात्र गाढ झोपेत होते. म्हणजे त्यांना पाहताच क्षणी असेच वाटले असते…
पण ते पहुडल्या पहुडल्या डोळे गट्ट मिटून देशाचाच विचार करत होते. देशावर हा हल्ला अतिरेक्यांनी ऐन निवडणूकीच्या काळात का बरे केला असेल? यामागे कोणाचं कारस्थान असेल? यामुळे कुणाला फायदा होणार आहे? हा सर्व विचार ते स्वप्नात, अर्थात आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी ते स्वप्न असतं….
पण राजा महाराष्ट्रीयानसारख्या दिव्य पुरुषांसाठी ते चिंतन असतं… त्यासाठी अंगी माहत्म्यच असावं लागतं.
आणि राजेंना साक्षात्कार झाला… त्यांच्या आतल्या आवाजाने त्यांना सत्य कथन केलेच… राजेंचे हावभाव बदलत होते. सदैव क्रोधात असणारी त्यांची मुद्रा जराशी स्मित करती झाली… आणि ते उठतील या आशेने समोर बसलेले चार पाच गडी मात्र अत्यंत आनंदी झाले. राजे हसले, राजे हसले म्हणत त्यांनी राजगड निनादून सोडला…
राणीसाहिबा, युवराज यांसह सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला… सगळेच राजेंसमोर येऊन उभे राहिले… राजे उठतील या आशेने…
पण राजेंची स्वप्नात खलबते सुरु होती… त्यांना उठवण्याचे धाडस कुणाच्या म्हणजे कुणाच्यातच नव्हते… कारण गाढ नीद्रेतून जो त्यांना उठवतो त्याचे नाक कलम करण्यात येते… पण एका गड्याने हुतात्मा होण्याचं धाडस केलंच.
आणि तो राजेंना म्हणाला राजे उठा… उठी उठी राजोबा… उठी उठी राजोबा…
पण राजेंची झोप उघडली नाहीच… मग युवराज पुढे आले नि त्यांनी आबासाहेबांना हाक मारली… आबासाहेब? आबासाहेब उठा, दुपारची पहाट झाली आहे… भारत पाकसारख्या अत्यंत महत्वाच्या विषयावर तुम्ही काय बोलणार याची प्रतिक्षा अखंड ब्रह्मांडाला लागलेली आहे.
स्वर्गातून साक्षात इंद्रदेव पुष्पवृष्टी करण्यासाठी आतूर आहेत… उठा… उठा आबासाहेब उठा… युवराजांनी सर्वांना आदेश दिला की आबासाहेबांना आवाहन करुया… माझ्या मागे सर्वांनी म्हणा… युवराजांनी गायला सुरुवात केली…
परप्रांतीयाच्या टपरीमधूनी
(उठी उठी गोपाळाच्या चालीत)
कडक चहा आणिला
स्वीकारावा चहा आता
उठी उठी राजोबा… (३ वेळा)
उठी उठी राजोबा या स्वराने अवघा राजगड दुमदुमला… आणि हळू हळू राजेंना जाग येऊ लागली… राजे जागे झाले ते म्यानातून तरवार काढूनच… म्हणाले… दगा झाला… दगा झाला… भारतासोबत दगा झाला… त्या गुज्जू माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी हा हल्ला घडवून आणला…
आई भवानीची शपथ… आता मी त्या परप्रांतीय पंतप्रधानाला काही सोडत नाही… चला वीरांनो स्टेजकडे कूच करुया… भाषण देऊन त्यांचा कोथळा बाहेर काढतोच… तेवढ्यात बारा वाजून बारा मिनिटे व बारा सेकंदाने बारागावच्या बाराकाकांचा फोन आला…
राजेंनी लगेच तरवार म्यानात ढकलली… मुजरा काकासाहेब… राजे अदबीने म्हणाले… समोरुन आवाज आला… मी बोललो ते पाठ आहे ना? राजे इथे तिथे पाहू लागले आणि सर्वांना आपल्या कानावर हात ठेवण्याचा हुकून फर्मावला… सर्वांनी लगेच आपल्या कानांवर हात ठेवला… राजे बाराकाकांना म्हणाले… काकासाहेब, बोलेंगे हम, मगर शब्द आपके होंगे…
बाराकाका म्हणाले अरे मग हे हिंदित का बोलतोस? तुझा मराठीचा अजेंडा आहे ना? राजेंना आपली चूक कळली… ओह्ह कॉकॉ… आय एम सॉरी… ‘ऍक्च्युअली यस्टरडे आय सॉ हिंदी मुव्ही’…
बाराकाका वैतागून म्हणाले ते जाऊ दे… तू आज भाषणात काय बोललात ते तुम्ही लोक? हा… गमिनींचा कोथळा बाहेर काढ, जीभेच्या खंजीराने… कसले शब्द वापरता रे तुम्ही… असो… चल फोन ठेवतो. तुझं भाषण टिव्हीवर बघेनच मी… बाराकाकांनी फोन ठेवला…
आणि राजेंनी सर्वांना म्हटलं, चला आता माझ्यासोबत… कुणाचे हावभाव बदलेनाच… राजेंनी दोन तीनदा आदेश देऊनही कुणी ऐकलं नाही म्हणून त्यांनी तरवार उपसली… सगळे घाबरले पण कानावरचा हात काही काढला नाही… शेवटी आदेश तो आदेश… मग राजेंच्या चूक लक्षात आली आणि त्यांनी कागदावर लिहून सर्वांना कानावरचा हात काढायला सांगितला… आणि सर्व स्टेजकडे कूच करायला निघाले…
मग भाषणामध्ये त्यांनी परप्रांतीय पंतप्रधानाचे शब्दानेच कोथळे बाहेर काढले. या पंप्रने स्वतःची सत्ता वाचवायलाच हा अतिरेकी हल्ला घडवून आणल्याचा घणाघात केला… तसेच भारतीय जेम्स बॉंडच्या चौकशीचे आदेश सुद्धा दिले… समोर बसलेल्या सर्व गड्यांनी टाळ्यांचा वर्षाव केला… त्यातल्या एका गड्याने दुसर्या गड्याला विचारलं, राजे काय बोलले कळलं का? तर दुसरा गडी म्हणाला, त्यांना स्वतःला तरी कुठे कळलं…
आपलं काम राजेंची स्तुती करणं हेच आहे. गड्यांनी जास्त लॉजिकल विचार करायचा नसतो… पहिल्या गड्याने मान हलवली… आणि काही दिवसातच राजेंची दखल जिहादी अतिरेक्यांचं अत्यंत पवित्र तीर्थस्थान असलेल्या पाकीस्थानने अर्थात अतिरेकीस्थानने घेतली. पाकीस्थानमध्ये राजे झळकू लागले… त्याआधी थोरले महाराज म्हणजे राजेंचे सख्खे काकासाहेब (बाराकाकांसारखे उसने उसने घेतलेले काकासाहेब नव्हे) ह्यांची सुद्धा अतिरेकीस्थानात खूप चर्चा व्हायची.
पण त्यांची अवहेलनाच व्हायची, त्यांच्या शत्रूराष्ट्रात टीकाच व्हायची…
पण…. राजा महराष्ट्रीयन ह्यांनी मात्र त्यांची मने जिंकली… राजे हुरळून गेले… त्यांच्या आनंदाचा बांध फुटून भसा भसा वाहू लागला… लगेच त्यांनी परप्रांतीय पंतप्रधानांवर टिका करणारे आणि अतिरेकीस्थानच्या पंप्रची स्तुती करणारे एक प्रेम पत्र जाहिर केले… त्यात त्यांनी शत्रूराष्ट्राला मित्रराष्ट्र बनवण्याचे आवाहन केले… बरं इथेच ते थांबले नाही… त्यांनी सर्व गड्यांची सभा बोलावली…
त्यांनी गड्यांना सूचना दिली की आता आपल्याला एक हाती सत्ता मिळण्यावासून कुणीही रोखू शकत नाही… सगळे गडी प्रसन्न चेहर्याने पाहू लागले… गडी ओरडू लागले… हा महाराष्ट्र आम्ही काबीज करु राजे, तुम्ही फक्त आदेश द्या… प्रत्येकच्या घरात घुसून ईव्हीएमचं बटन दाबून घेऊ… तसंही लोकांच्या घरात घुसण्याचा आम्हाला चांगलाच अनुभव आहे…
राजेंनी स्मित केले व आता लोकांच्या घरात घुसायचं नाही, बस्स झालं घरात घुसणं… आता आम्ही लोकांच्या मनात घुसलो आहोत… आपल्याला आता सीमोल्लंघन करायवाचे आहे. एकाने म्हटलं म्हणजे आज दसरा आहे? राजे रागावले… त्याच्याकडे धाडधाड पावले आपटत चालत गेले नि म्हणाले गाढवा, आपल्याला भारताची सीमा ओलांडायची आहे. सर्व गडी एकाएकी घाबरले…
गडी म्हणाले राजे आम्ही स्वतःला सैनिक म्हणवून घेतो, मारामार्या पण करतो. पण आम्ही त्यांनाच मारतो जे आम्हाला मारु शकत नाही… परप्रांतीयांना आपण किती मारलं, पण जिहादी दंगली नंतर आपण तर शांती रॅली काढली होती. नाहीतर आम्ही तुमच्यासमोर जीवंत उभे असतो का? तुम्ही आपचं स्वतःला सैनिक म्हणवून घेणं जास्तच मनाला लावून घेतलंय… अहो गोळ्या घालतील ना ते?🤧🤧
राजे गरजले… म्हणाले आपल्याला लढायला नाही तर सत्ता स्थापन करायला जायचं आहे. अतिरेकी स्थानत त्यांच्या पंप्रपेक्षा आमचीच वाह वाह होतेय. याचाच अर्थ तिथे आपली सत्ता स्थापन होणार… आजपासून तुम्ही आम्हाला राजा अतिरेकीस्थानी म्हणत जा… तसंही या महाराष्ट्राने आपल्याला काय दिलं?
आपण लोकांना मारहाण केली, आपल्याच राज्याच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं. इतका त्याग करुन सुद्धा या महराष्ट्रीय जनतेने आपल्याला काय दिलं? म्हणून आता आपण समुद्र बंदी ही बेडी तोडून अतिरेस्थानात कूच करुया आनी तिथली सत्ता काबीज करुया… हत्ती, घोडे, गाढव सिद्ध ठेवा…
एक गडी धैर्य एकवटून म्हणाला पण गाढव कशाला? राजे म्हणाले अरे गाढवा. आम्ही हत्तीवर बसणार, तुम्ही घोड्यांवर बसणार, मग सामान कुठे ठेवयाचं? गाढवावरच ना? चला…
आणि मग अशा रितीने राजेंची स्वारी निघाली… सगळेच गडी घोषणा देत होते… एक हाती सत्ता… इंशाल्लाह इंशाल्लाह…
राज गडावर मात्र उठी उठी राजोबा… गरज सुरुच होता… कुणाला तरी उठवण्याचा ते काकुळतीने प्रयत्न करत होते… ते कोण होते…
राजे तर अतिरेकीस्थानात कूच करायला निघालेत… मग हे कोण आहेत? हळू हळू राजेंची झोप उघडू लागली. राजेंनी आपले डोळे चोळले… सगळे गडी राजेंकडे अवाक होऊन पाहत होते. राजे म्हणाले आलं का अतिरेकीस्थान?
गडी मात्र अजूनही अवाक होऊन पाहत होते. मग राजेंनी इथे तिथे पाहिलं आणि त्यांना कळलं की आपल्याला स्वप्नं पडलं होतं… राजेंनी घड्याळ पाहिलं, दुपारच्या पहाटेचे २ वाजले होते. एका गड्याने त्यांना परप्रांतीयाच्या टपरीवरुन आणलेला कडक चहा दिला… तो चहा पीत पीत त्यांनी स्वप्नात घडलेली सगळी सत्य हकीकत गड्यांना ऐकवली… आपण अतिरेकीस्थानात एक हाती सत्ता काबीज करायला निघालो होतो, सामान गाढवावर, तुम्ही घोड्यांवर आणि मी हत्तीवर… सगळे गडी एकत्र म्हणाले हत्तीच्या… आणि गरमागरम चहाने राजेंची जीभ भाजली…
लेखक: दिल्लीचा भाट जयेश
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.